रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. स्वातंत्र्याची सत्तरी साजरी करत असताना आपल्या एक एक खेळाडूचे पानिपत ऐकायला मिळण्याचे भाग्य ऐकायला मिळणे ही आपल्यासाठी फार चिंताजनक गोष्ट आहे. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचे राजकीय औदासीन्य मुळात आपल्याकडे उपजतच आहे. सव्वाशे कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूचे पानिपत होताना पाहून, कुठल्याही क्रीडा रसिकाला दु:ख वाटणे ही सहजप्रक्रिया आहे.

पेसला अजून किती दिवस खेळवणार? महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या खेळाडूंचा पराभव सुमार देशांच्या खेळाडूंनी केला हे विशेष.

नवीन शैक्षणिक धोरणात तर क्रीडा क्षेत्रावर अन्यायच झाला आहे. किती शाळांना क्रीडांगणच नाही? किती शाळेत क्रीडा शिक्षक आहेत? सानियाचे कितवे ऑलिम्पिक आहे? आता तरी आपल्याकडे शालेय स्तरापासूनच खेळाकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघण्याची गरज आहे. जोपर्यंत शालेयस्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत क्रीडा क्षेत्राची दर्जेदार शृंखला तयार होत नाही तोपर्यंत मोठे यश मिळणे अशक्य आहे. मुळात आमच्यामधील खेळाडू आणि खेळाची हत्या ही शालेय पातळीवरच होते.

जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर आपला क्रमांक लागतो. आपल्याकडे खेळामध्ये मोठय़ा प्रमाणात राजकारण आहे; हे आपल्या हॉकी महासंघावरून आपल्या लक्षात आले असेलच. शिक्षण आणि खेळाला राजकारणापासून दूर ठेवण्याची गरज आता निर्माण झाली आहे. त्यासाठी, तसेच एकंदर शिक्षणात सुसूत्रता असावी यासाठीचा मार्ग म्हणजे शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करण्याचा पर्याय पुन्हा योग्यरीत्या अमलात आणणे.

नाही तर, पुन्हा हेच खेळाडू हाच पराभव आपल्याला बघावा लागेल. पराभवातून काहीतरी शिकण्याची आता वेळ आली आहे..!

संदीप वरकड (खिर्डी, ता. खुलताबाद, औरंगाबाद)

 

.. हीदेखील मोठीच कामगिरी!

यंदाच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा समारोप जवळ आला आहे आणि भारताची यंदाची मोहीम निराशाजनक होते आहे. आता भारतीय खेळाडूंचे, ‘हात हलवत परत आले’, ‘दीडशे कोटींच्या देशात एक जणही सुवर्णपदक आणू शकत नाही,’ अशा शेलक्या शब्दांत स्वागत होईल. पण हे त्या खेळाडूंवर अन्याय करणारे आहे. इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे की इतर बरेच खेळ (उदा. क्रिकेट) हे वर्षभर सतत खेळले जातात. तिथे खेळणाऱ्यांचे बरेच मोठे अपयश छोटय़ाशा यशानेही झाकले जाऊ  शकते. पण ऑलिम्पिक खेळ चार वर्षांनी होतात. बरेचसे खेळाडू हे ऑलिम्पिकमध्ये आल्यावरच लोकांच्या नजरेत येतात आणि मग तिथे अपयशी ठरल्यास ‘हात्तिच्या कशाला एवढा गाजावाजा केला यांचा?’ असा प्रश्न लोकांना पडतो. पण ऑलिम्पिकसाठी पात्र होणे हीच एक मोठी कामगिरी आहे, त्यासाठीसुद्धा प्रचंड मेहनत व इच्छाशक्ती लागते याचा साऱ्यांना विसर पडतो. तेव्हा ऑलिम्पिकसाठी जास्तीतजास्त खेळाडू पात्र होणे हीसुद्धा प्रगतीच्या दिशेने वाटचाल आहे हे लक्षात घ्यायला हवे.

आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याविषयीची अनास्था, सुविधांचा अभाव, निवडीतील राजकारण इत्यादींवर उपाय शोधायलाच हवेत; पण या सर्वातून पुढे येऊन जे खेळतात त्यांच्यावर केवळ ते पदक आणत नाहीत म्हणून टीका करणे योग्य नव्हे हे सांगण्यासाठी हा पत्रप्रपंच

राजेंद्र करंबेळकर, निगडी (पुणे)

 

आजही सीमा असुरक्षितच

‘सत्तरीतले सत्य’ (१५ ऑगस्ट) आणि ‘सत्तरीचे साहस’ (१६ ऑगस्ट) हे अग्रलेख वाचले. आपल्या देशातले भोंगळ राजकारण बघता आपण सत्तरीत आहोत की सातवीत आहोत हे कळत नाही. पंतप्रधान मोदी यांचे लाल किल्ल्यावरील बलुचिस्तान वक्तव्य अजित डोवल प्रेरित असावे. डोवलसाहेब अधूनमधून प्रिय जनांना या बातम्या पोहोचवण्याचे काम करतात; ते देशाच्या तारणहारानी लाल किल्ल्यावरून केले इतकेच. बदला-सूड अशा राजकारणात मारले जातात ते जवान व नागरिक..पण मग त्यांच्याकरिता आपल्याकडे लतादीदींचे ‘ऐ मेरे वतन के लोगों..’ अगदी नेहरूकाळापासून आहेच की. ७० वर्षांनीसुद्धा आपल्याला आपल्या सीमा सांभाळता येत नाहीत हे सांगण्याचे धैर्य दाखवण्यासाठी मात्र ५६ इंची छाती हवी.

राम लेले, पुणे

 

सकारात्मकपणे पाहा

भारताच्या स्वांतत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरील अग्रलेख (१६ ऑगस्ट) नकरात्मक हेतू ठेवूनच किंवा तारीफ करायची पण तीसुद्धा हातचे राखूनच अशा प्रकारे केल्याचे हा अग्रलेख (‘लोकसत्ता.कॉम’ या संकेतस्थळावरून) वाचताना जाणवते. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून दोन वर्षांच्या काळात अनेक महत्त्वाचे व चांगले निर्णय घेतले आहेत. यांचे तात्काळ परिणाम दिसत नसले तरी भविष्यात ते दिसतील यात महत्त्वाच्या निर्णयाचा उल्लेख अग्रलेखात करण्यात आला नाही; तो म्हणजे दारिद्रय़ रेषेखालील गरीब जनतेसाठी एक लाख रुपयेपर्यंतचा आरोग्य विमा. ही योजना जर चांगल्या प्रकारे राबविली गेली तर गरीब जनतेची फार चांगली सोय होईल.

बलुचिस्तानबद्दल पंतप्रधानांची भाषा स्पष्ट आहे. जर काश्मीरमध्ये पाकिस्तानने आपला हस्तक्षेप थांबविला नाही; तर बलुचिस्तानमधील जनतेवर होणारा अत्याचार जगासमोर आणला जाईल. यात चिंता करण्यालायक काहीही नाही. पाकिस्तानला हीच भाषा समजते. एवढय़ा कडक भाषेत जाहीर समज देण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते. ती हिंमत मोदी यांनी दाखविल्याबद्दल अभिनंदन करणे क्रमप्राप्तच ठरते.

प्रा.राजेश ना. झाडे, चंद्रपूर

 

शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांचे काय झाले?

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण हे एका विकसनशील देशाच्या पंतप्रधानाला शोभणारे भाषण नसून ते एका कॉपरेरेट क्षेत्रातील भाषण अधिक वाटत होते.. जो आपल्या विकल्या गेलेल्या एलईडी बल्बचे कौतुक करून आपली पाठ थोपवू पाहत होता! आता एलईडी बल्ब विकून का आपल्या देशाचा विकास होणार आहे? विकासाच्या योजनांचे काय झाले? आपण पुढील वर्षांत कोणत्या विकास योजना राबवणार आहोत याची माहिती द्यायची सोडून दोन वर्षांपूर्वी राबवलेल्या घरगुती गॅस सबसिडी योजनेचे कौतुक आणखी किती वर्षे ऐकावे लागणार आहे? शेतकऱ्यांच्या समस्यांचे काय? दुष्काळग्रस्तांच्या मदतीचे काय झाले? स्मार्ट सिटी योजनेचे काय झाले? या सगळ्या प्रश्नांवर पंतप्रधान बोलणार आहेत की नाही?

ज्या विश्वासाने जनतेने मोदींना पंतप्रधान बनविले तो विश्वास आता ढासळत चालला आहे. असे झाल्यास ज्या जनतेने मोदींना डोक्यावर घेतले तीच जनता त्यांना जमिनीवर आणायला वेळ लावणार नाही.

निमिष बेंद्रे, दादर (मुंबई)

 

देवापुढे असमान?

मंत्री महोदयांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी तुळजाभवानी मंदिर रात्री उशीरा बंद केल्याची बातमी ( लोकसत्ता, १३ ऑगस्ट) वाचली. एरवी सर्वसामान्यासाठी रात्री साडेनऊला बंद होणारे हे मंदिर केवळ खाशा स्वाऱ्यांसाठी रात्री साडेअकराला बंद झाले. सर्व राजकारणी,मंत्री हे ‘जनतेचे सेवक’ असतात. मग जनतेला जे सर्वसामान्य नियम उदा.मंदिरातील दर्शनाच्या वेळांसारखे लागू असतात, ते यांनाही का लागू होऊ नयेत?

आज स्थिती अशी आहे की, ‘जनतेचे सेवक’ असे म्हटले की आधी शंका येते. जनतेच्या जिवावर हे ‘व्हीआयपी’ होतात आणि जनतेलाच विसरतात. यात त्यांची चूक आहे त्याचप्रमाणे मंदिर प्रशासनही जबाबदार आहे. ते यांना अवाजवी महत्त्व देतात. देव हा सर्वसामान्यांचा असतो, त्याच्यासमोर सर्व समान असतात पण व्हीआयपी आले की जनतेने पै-पैसा जोडून केलेल्या दानातून या खाशा स्वाऱ्यांना सोन्या-चांदीच्या भेटवस्तू! याउलट, अनेक तास रांगेत उभे राहून दर्शन घेणाऱ्याला काहीच नाही. इतकेच काय तर त्याला त्या दैवताचे मुखदर्शन देखील पुरेसे मिळात नाही. सोन्या-चांदीच्या भेटवस्तूची सामान्य भक्ताला आशा नसते, त्याला आशा असते ती त्याच्या दर्शनाची आणि तीही संधी त्याच्या कडून काढून घेतली जाते. असे असताना ‘व्हीआयपी’देखील याबद्दल चकार शब्द काढत नाहीत.

सिद्धांत खांडके,लातूर

 

वॉटर कपचे तपशील जास्त महत्त्वाचे

‘सत्यमेव जयते वॉटर कप’च्या पारितोषिक सोहळय़ाची बातमी (‘ आता सुराज्यासाठी लढाई ’  : लोकसत्ता, १६ ऑगस्ट) वाचून विजेत्या सहाही गावांची नावे आणि पुरस्कारांच्या रकमा आदी तपशील समजले. मुख्यमंत्र्यांनी भाषणात राम, छत्रपती शिवराय आणि महात्मा गांधी यांचा उल्लेख केला हेही समजले. पण या कार्यक्रमाच्या, पर्यायाने बातमीच्या मूळ उद्देशाला शोभणारे हे तपशील नाहीत.

प्रत्येक विजेत्या गावाने जलसंधारण किती  केले ? जमिनीत किती पाणी मुरले विहिरी/ बोअरवेल किती भरल्या? बंधारे किती भरले? हे पाणी संबंधित गावांत किती दिवस टिकेल? किती पिकांसाठी याचा फायदा होईल? तुरीसारखे महत्त्वाचे पीक या पाण्याने घेता येईल का? याबदल काहीच माहिती बातमीत नाही.

रघु गाडगीळ, पुणे

loksatta@expressindia.com