News Flash

महिला व बालकल्याणमंत्र्यांचे हे अपयश नाही?

‘निर्भयासाठी निधीचा खडखडाट’ ही बातमी (४ सप्टेंबर) वाचली.

‘निर्भयासाठी निधीचा खडखडाट’ ही बातमी (४ सप्टेंबर) वाचली. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने झालेले दुर्लक्ष आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या विभागाकडे निधी नसल्याची दिलेली माहिती ही हतबल करणारी आहे. आघाडी सरकारच्या विरोधात संघर्षयात्रेने एल्गार पुकारणाऱ्या पंकजा मुंडे या सत्तेत आल्यावर बलात्कार, अत्याचार नशिबी आलेल्या ‘निर्भया’साठी निधी नसल्याचे लिखित देतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव असून ‘निर्भया’ निधी १५ दिवसांत न मिळणे म्हणजे ‘सरकारी काम सहा महिने थांब’चे नवे उदाहरणच आहे. राज्य सरकारकडे निधी नाही हे खरे आहे, पण मेक इन महाराष्ट्रचा नेत्रदीपक कार्यक्रम, कुंभमेळा, नीरा-नरसिंगपूर मंदिराला निधी, आमदारांचे मानधनवाढ यासाठी सढळ हाताने उधळपट्टी कशासाठी? एका बाजूला राजकीय नेत्यांची मुले आजारी पडली तरी त्यांना बडय़ा  हॉस्पिटलमध्ये नेले जाते, तर दुसरीकडे स्वत:चा काही दोष नसताना नराधमाच्या अन्याय-अत्याचाराला बळी पडून शरीरावर आणि मनावर झालेल्या जखमांवर उपचारासाठी व न्याय मिळण्याच्या प्रतीक्षा करणाऱ्या १ हजार  मुली व महिला ‘निर्भयां’साठी निधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी महिला व बालविकास विभागाकडे निधी नाही म्हणून गप्प बसणे हे आज पंकजा मुंडे (जनतेच्या मनातील मुख्यमंत्री!) यांचे अपयशच नव्हे काय?

नकुल बिभीषण काशीद, परंडा (उस्मानाबाद)

 

.. तर बदलांचा मार्ग सापडेल

‘पोलिसांचे पांडुकरण’ हा अग्रलेख (३ सप्टें.) वाचला. हवालदार िशदे यांच्यावर झालेला हल्ला हा निषेधार्ह व असमर्थनीयच. गुन्हेगारीचे राजकीय मार्गाने झालेले प्रतिष्ठीकरण, कायदा झुगारणे म्हणजेच शौर्य आणि प्रतिष्ठेचे प्रतीक ही काही स्वयंघोषित प्रतिष्ठितांमध्ये निर्माण झालेली भावना आणि या सर्वाचा तरुण वर्गावर होणारा परिणाम याचीच अशा हल्ल्यांमध्ये परिणती होत आहे अशी एक ढोबळमानाने मांडणी केली जात आहे. ही मांडणी समाजव्यवस्थेचे कशा प्रकारे अध:पतन होत आहे याचे उत्तर देत असली तरी व्यवस्थेविरोधात सामान्यांमध्ये रोष का निर्माण होतो याचे उत्तर देत नाही. प्रशासनाने बदलत्या जागतिक परिमाणांनुसार स्वत:मध्ये आवश्यक बदल घडवून आणले काय? सर्व शासन यंत्रणा लोकाभिमुख आहे असे म्हणता येईल काय? आपले लोकसेवक खरेच सेवाभावी आहेत, की त्यांनाही पदाच्या उन्मादाने ग्रासले आहे? पोलीस व्यवस्थेतील काही घटक सभ्य नागरिकांशीही सर्वसामान्य नियम उल्लंघनासाठी सराईत गुन्हेगाराला वागणूक देतात तशी वागणूक देत नाहीत काय? आणि महत्त्वाचे म्हणजे लोकांशी वागताना आवश्यक असणारी व्यावसायिकता आणि ‘सॉफ्ट स्किल्स’ हे प्रशासनाच्या सर्व स्तरांमध्ये आहे का? आणि नसेल तर त्या दृष्टीने काही प्रयत्न चालू आहेत का? याही प्रश्नांचा ऊहापोह करावा लागेल आणि त्यातूनच एकूणच आपली व्यवस्था व समाजव्यवस्था यांच्यात आवश्यक बदलांचा मार्ग सापडेल.

हृषीकेश संजय कुलकर्णी, राहुरी, अहमदनगर

फसवाफसवीचा भारतीय उद्योग जुनाच!

‘मूल्याची किंमत’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, ३ सप्टें.) वाचला. जवळजवळ २७ वर्षांपूर्वी मी कॅलिफोíनयात वास्तव्याला होतो. त्या वेळेस माझा एक भारतीय मित्र तिथे सिल्क व लेदरच्या कपडय़ांचे नमुने विक्री करण्याच्या हेतूने घेऊन आला होता. मी त्याला काही दुकानांत घेऊन गेलो. पहिल्या दोन-तीन दुकानांत आम्हाला फारसा काही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. चौथ्या दुकानात मी पुढाकार घेऊन शिरलो. काचेचे दार उघडून आत प्रशस्त दुकानाच्या शेवटास त्याचा गोरा मालक उभा होता. स्मितांचे आदानप्रदान झाल्यावर, मी त्याच्याशी हस्तांदोलन करून आमचे येण्याचे प्रयोजन सांगितले. माझा हातात घेतलेला हात घट्ट धरून त्याने माझी पाठ थोपटली व म्हणाला ग्रेट, इंडिया ग्रेट! असे म्हणत हसत त्याने माझ्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाला लेट्स गो! हसत हसत आम्ही तिघे दरवाजाच्या दिशेने गेलो. चला, इथे तरी चांगला प्रतिसाद आहे म्हणून सुखावलो. पुढे होऊन त्याने दरवाजा उघडला व औचित्याने आम्हास आधी बाहेर जाऊ दिले. आम्ही बाहेर जाताच त्याने दार आतून लावून घेत असताना ‘डोण्ट यू एव्हर कम हिअर अगेन चीटर्स!’ असे आम्हास सुनावले व पाठ करून आत निघून गेला. तो एक मोठाच धक्का होता! त्यानंतर अनेक दुकानांत आम्हाला लोकांनी विचारले की भारतीय लोक असे का वागतात? नमुने (सॅम्पल्स) उत्कृष्ट देऊन माल मात्र बकवास पाठवतात? उत्तर थोडेफार माहीत होते, पण देशाच्या वैशिष्टय़ाची गेल्या पाच हजार वर्षांत झालेली घडण संक्षिप्त रूपात सांगायची कुवत नव्हती. आम्ही भेटलेल्या ३० दुकानांपकी फक्त दोघांनी सॅम्पल्स ठेवून घेतली होती! त्या घटनेने चांगलीच जाग आली होती.

जयदीप भोईटे, पुणे

 

सकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न

‘दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ना-पास हा शेरा असणार नाही’ या वाक्याचा आवाका हा केवळ ‘हत्तीचे मरण व थांबलेला श्वासोच्छ्वास’ या अर्थाने सीमित नाही. त्यापलीकडेही याचा अर्थ आहे. पूर्वी इंग्रजी-गणित हे विषय सोडण्याची मुभा होती. हे दोन विषय सोडून दहावी झालेले अनेक जण आयुष्यात यशस्वी झाले. त्याचप्रमाणे दहावीमध्ये एखाद दोन विषयांत विद्यार्थ्यांला गती नसेल तर आणि त्याऐवजी ‘कौशल्याधारित’ विषयांचा पर्याय दिला गेल्यास त्या विद्यार्थ्यांचे आयुष्य ‘पास-नापासा’च्या पलीकडे जाईल व मार्गी लागेल हे निश्चित. कौशल्यविकास हा फक्त  अनुत्तीर्णासाठीच आहे, असे नसून त्या विद्यार्थ्यांकडे पुस्तकी चाकोरीबद्ध विषयांपेक्षा वेगळे कौशल्य आहे आणि ते कौशल्य शिकण्याची त्याला दिलेली एक संधी आहे. मालविकाने पारंपरिक शालेय शिक्षण घेतले नाही. तरीही तिला विद्यापीठात प्रवेश मिळू शकला. एका अर्थाने या अध्यादेशाचा खरा मथितार्थ हाच आहे. एखादा विषय आवडत नाही म्हणून तोच शिकण्याचा अट्टहास न धरता त्याला कौशल्याची संधी देणे हे सकारात्मक मानसिकतेचे लक्षण आहे. ‘पास-नापासाच्या’ गत्रेत अडकलेल्या सामाजिक मानसिकतेच्या बाहेर काढायचे असेल तर गाळात रुतलेल्या हत्तीसाठी जसे सकारात्मक वातावरण तयार केले तसेच एक सकारात्मक वातावरण तयार करण्याचा स्तुत्य प्रयत्न या अध्यादेशाने केला आहे. विद्यार्थ्यांना विविध विषय शिकण्याची संधी मिळणार आहे.

पल्लवी देव, अंधेरी (मुंबई)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 2:08 am

Web Title: loksatta readers letter 121
Next Stories
1 आंदोलनाला कायदेशीर पर्याय मिळाले 
2 स्वार्थ असेलही, परंतु म्हणून मागणी चुकीची ठरत नाही..
3 लेखात मोरे यांचे वैचारिक योगदान कोणते?
Just Now!
X