पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची सदनिका विक्रीसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीतील नमूद पात्रता निकषांनुसार कोणाही व्यक्तीचा उत्पन्न गट निर्धारित करताना त्या व्यक्तीचे कौटुंबिक उत्पन्न विचारात घेतले जाणार आहे, ज्यात पती व पत्नी दोघांचेही उत्पन्न गणले जाईल (निकष क्र. ४). मात्र बँक खात्याचा तपशील देताना अर्जदाराचे केवळ स्वत:च्या नावावर खाते असणे आवश्यक आहे, असे निकष क्र. ८ मध्ये म्हटले आहे. संयुक्त बँक खाते याकरिता अपात्र ठरविले जाणार आहे. ही अट नाहक असून ती काढून टाकणे गरजेचे आहे. आजकाल कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांत घरातील व्यक्तीच्या मृत्यूपश्चातदेखील सातत्य राहावे, यासाठी लोक केवळ नामनिर्देशन (नॉमिनेशन) करून न थांबता संयुक्त खाते उघडण्यावर भर देतात. तेव्हा अर्जदाराचे एकल खाते सक्तीचे करण्याची अट मंडळाने शिथिल करणे आवश्यक आहे. संयुक्त खात्यावर अर्जदाराचे नाव प्रथम नमूद केलेले असल्यास असे खाते ग्राह्य़ धरण्यात आले पाहिजे.

गुलाब गुडी, मुंबई

 

रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा हवा

‘रिझव्‍‌र्ह बॅँक, गव्हर्नर फक्त इंग्रजीच?’ हे पत्र (लोकमानस, ८ सप्टें.) वाचले. काही शब्द आपण जसेच्या तसे इंग्रजीतून उचलले आणि ते आता जवळपास मराठीच (किंवा देशी!) झाले, त्यातीलच हे दोन शब्द आहेत. टॅक्सी, रिक्षा, बस, ट्रक यांनाही दैनंदिन जीवनातील असूनदेखील स्थानिक भाषांमध्ये प्रतिशब्द निर्माण होऊ  शकलेले नाहीत. नाणी हा शब्द प्रचलित असताना चलनी नोटांना मात्र मराठीत प्रतिशब्द नाही, हाही विरोधाभासच नाही का? ‘गव्हर्नर’करिता मात्र पर्यायी शब्द शोधण्याचे काम मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांनी थोडेसे हलके करून ठेवले आहे. पायउतार होण्यापूर्वी दिल्लीतील सेंट स्टीफन्स महाविद्यालयात केलेल्या भाषणात त्यांनी गव्हर्नरांची स्वायत्तता टिकविण्यासाठी ‘पदोन्नती’ची अपेक्षा व्यक्त केली होती. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांचे वेतन केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवाच्या तोडीचे असते आणि राजशिष्टाचारात त्यांची वर्णी केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या पातळीवर लावली जाते, असे वाचनात आले होते. खरे तर गव्हर्नरपदाचा आवाका आणि जबाबदाऱ्या पाहता त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांचाच दर्जा बहाल करावयास हवा. तसे केल्यास अर्थमंत्र्यांप्रमाणेच गव्हर्नरांना मराठी/ हिंदीत ‘मुद्रामंत्री’ वा ‘चलनमंत्री’ असे नामाभिधान देता येईल.

नवनीत गोळे, प्रिन्सेस स्ट्रीट (मुंबई).

 

बॅँक गव्हर्नरांना धनपालम्हणणं योग्य होईल

रिझव्‍‌र्ह बँक आणि गव्हर्नर या शब्दांविषयीचं पत्र (लोकमानस, ८ सप्टें.) वाचलं. माझ्या मते ‘पाल’ प्रत्यय लागून तयार होणारे बरेच शब्द अर्थपूर्ण व अर्थवाहक असतात. गोपाल, लोकपाल, राज्यपाल असे काही शब्द मराठी-हिंदी आदी भाषांमध्ये प्रचलित आहेतच. पाल म्हणजे पालन करणारा या अर्थानं तो समर्पक आहे. म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरला धनपाल हा शब्द सुचवावासा वाटतो. तो आपल्या देशाच्या महाकाय अर्थव्यवस्थेचे पालन, नियंत्रण, नियमन करण्याचं काम घटनेला अनुसरून करत असतो. म्हणूनच त्याला चलनी नोटांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यादृष्टीने त्याच्या पदाला ‘धनपाल’ म्हणणं योग्य होईल. रिझव्‍‌र्ह ह्य़ा इंग्रजी शब्दाला ‘अधिरक्षित’ किंवा ‘अभिरक्षित’ हा शब्द योजावा असं वाटतं. ‘भारतीय अधिरक्षित\ अभिरक्षित मुद्राकोश’ असं ‘रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया’चं भाषांतर करता येईल का?

विजय काचरे, पुणे

 

इशारे खूप झाले, आता ठोस कृती करा

कल्याणमध्ये एका पोलिसाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांचा काहीही धाक जनतेला उरलेला नाही हेच यातून स्पष्ट होत असून याची जबाबदारी स्वत: पोलीस आणि सरकारवरच आहे.  पोलिसांच्या तोंडावर चार नोटा फेकल्या की ते आपल्याकडे दुर्लक्ष करतात अशी सवय जनतेला का लागली? कुणाच्या वागण्यामुळे लागली? अपुऱ्या उत्पन्नात, गळक्या घरात प्रपंच चालवणाऱ्या पोलिसांवर चिरीमिरी घ्यायचा प्रसंग येतो हा कुणाचा दोष? आपले मानधन भरभक्कम वाढवून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींची बडदास्त ठेवण्यासाठी पोलिसांना घरच्या नोकरासारखे राबवले जाते. मिरवणुका, उत्सव, सणासुदीच्या दिवसांत दोन दोन दिवस घरी जायला मिळत नाही पोलिसांना. त्यांच्या नाश्त्या-जेवणाची सोय आजूबाजूची जनता करते हे हस्तिदंती मनोऱ्यात बसून कारभार हाकणाऱ्या मंत्र्या-संत्र्यांना माहीत असते. हे सहन करणार नाही, ते खपवून घेणार अशा घोषणा खूपदा ऐकल्या. आता ठोस कृती करायची वेळ आली आहे. कोणत्याही नेत्याचा फोन आला तरी गुन्हेगारांना सोडू नका, असा आदेश आता गृहमंत्र्यांनी काढावा.

कल्याणी नामजोशी, गोरेगाव (मुंबई)

 

जपानमधील असाही वंशभेद

टोकियो येथे अलीकडेच ‘मिस जपान २०१६’ ही सौंदर्य स्पर्धा पार पडली. या स्पध्रेत प्रियांका योशिकावा या मूळ भारतीय वंशाच्या तरुणीला विजेती म्हणून घोषित करण्यात आले. प्रियांका योशिकावा वॉिशग्टन येथे होणाऱ्या मिस वर्ल्डच्या स्पध्रेत जपानचे प्रतिनिधित्व करणार आहे. परंतु प्रियांका योशिकावाच्या निवडीमुळे तिच्या विरोधात जपानच्या प्रसारमाध्यमातून वंशभेदाचे वादळ उठले आहे. कारण प्रियांकाचे वडील अरुण घोष हे भारतीय असून आई नावको ही जपानी आहे. अशा अर्धजपानी तरुणीला (जपानी भाषेत हाफू) देशाचे नेतृत्व करायला देऊ नये असा सूर तेथील समाजमाध्यमात उमटत आहे. विशेष म्हणजे गतवर्षी आफ्रिकन-अमेरिकन वडील व जपानी आई असलेल्या अरियाना मियामोटो या अर्धजपानी तरुणीला मिस जपानचा मुकुट चढविण्यात आला होता. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा मिश्र वंशाच्या तरुणीला हा मान मिळाल्यामुळे तेथील नेटीझन्सचे पित्त अधिकच खवळले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सौंदर्य स्पध्रेतील विजेती पूर्णपणे शुद्ध जपानी वंशाचीच असायला हवी. अरियाना, प्रियांकासारख्या मिश्र वंशाच्या नको. प्रियांका योशिकावाने यावर शांतपणे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, माझे वडील भारतीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. परंतु मी पूर्णतया जपानीच आहे, असे सांगून यापुढे जपानमधील वंशभेदाच्या विरोधात लढण्याचा संकल्प तिने जाहीर केला आहे.

प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (मुंबई)