‘दिवस ‘डेटागिरी’चे..’ हा नीरज पंडित यांचा लेख (रविवार विशेष, ११ सप्टें.) वाचला. आजकाल हे स्वस्त किंमतयुद्ध सर्वच क्षेत्रांत, विशेषत: सेवाक्षेत्रात जास्त बोकाळत चालले आहे. सुरुवातीला सेवा मोफत देऊन ग्राहकांच्या सवयीची इतकी करायची की ते जीवनाचे अविभाज्य अंग वाटले पाहिजे. एकदा ग्राहकसंख्या अमर्याद झाली की नंतर कितीही पसे मोजून ती घेत राहण्याचे ‘व्यसन’ जडलेले ग्राहक कंपनीची भरभराट करत राहतात हे तत्त्वच यामागे असावे. पण सुरुवातीला स्वस्ताईचा कळस गाठणारा व्यापारी त्यातून होणारा तोटा भरून काढता आला नाही तर आणि स्पर्धकांच्या किंमतयुद्धामुळे किंमत वाढवता आली नाही तर पुढे पुढे नफ्या-तोटय़ाचे गणितच कोलमडल्याने मुदलाचाच घसारा झेलत राहतो आणि एक दिवस त्याला आपले चंबूगवाळे बाजारातून आवरावे लागते. ‘मोफत डेटा’ देणाऱ्या जिओ सेवेतल्या प्रति जीबी डेटाच्या किमतीचे विश्लेषण लेखात दिल्याने अशी घोषणा करणाऱ्या अंबानींची मोफत डेटा आणि सेवाशुल्कात कमालीची स्वस्ताई देण्याची आरंभशूरताच दिसून येते. मूळ कंपनीच्या पुण्याईवर निकोप स्पध्रेऐवजी गळेकापू स्पध्रेच्या मागे लागून त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये असे वाटते. आपल्या तुंबडय़ा भरून घेऊन कंपनीला तोटा होऊ लागला की दिवाळे काढून भागधारकांना वाऱ्यावर सोडून द्यायचा उद्योग करणारे महाभाग आपल्या देशात कमी नाहीत. त्यांच्याच गाजावाजा करत आलेल्या ‘आर कॉम्’ची पुढे शेअरबाजारात काय किंमत राहिली हेही सर्वाना माहीत आहे. या पाश्र्वभूमीवर कंपन्यांनी ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी आणि तात्पुरता नफा मिळवण्यासाठी आíथक आणि मानसिक वातावरण गढूळ करू नये. दूरगामी परिणामांची पूर्ण कल्पना जनतेला देणे आणि स्वस्त सेवेमागची वस्तुस्थिती सांगणे महत्त्वाचे वाटते.

– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे</strong>

 

‘आप’ल्याच पायी मारितो धोंडा!

‘‘आप’लाचि वाद..’ हा अग्रलेख (९ सप्टें.) वाचला. मदनलाल खुराणा हे दिल्लीचे मुख्यमंत्री असताना केंद्रात कॉँग्रेसचे राज्य होते, पण कॉँग्रेसने राजकीय संकेत पाळले. मुळात केजरीवाल यांचे वर्तनही राजकीय दृष्टीने विसंगत होते. राजकीय परिपक्वता आणि अचूक टायिमग याला राजकारणात महत्त्व आहे. कारण राजकारणात शिक्षणापेक्षा अनुभव आणि निर्णयक्षमता हे गुण महत्त्वाचे आहेत. केजरीवाल यांच्याकडे याचीच वानवा आहे. अण्णा हजारेंमुळे प्रकाशझोतात आलेल्या केजरीवाल यांना दिल्लीतील विजयानंतर लाल किल्ला दिसू लागला. दिल्लीचा विकास करून दाखवण्याची संधी ‘आप’ला मिळाली होती. पण सगळ्यांनाच संधीचे सोने करता येत नाही. त्याला केजरीवाल अपवाद ठरले नाहीत. नुसते आरोप करून लोकप्रियता मिळत नाही. मिळालेली सत्ता तुम्ही कशी राबवली यावर तुमचे नेतृत्व सिद्ध होते. मोदींनी पहिले दशक गुजरातच्या विकासावर केंद्रित केले आणि कालांतराने राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. ‘आप’ची अवस्था देशात काय आहे? तेव्हा केजरीवाल यांची अवस्था ‘आपुल्याच पायी मारितो धोंडा’ अशी झाली आहे.

– संदीप वरकड, मु. पो. खिर्डी, ता. खुलताबाद (औरंगाबाद)

 

हा प्रकार गांभीर्याने घेणे गरजेचे

‘वाळीत टाकल्याचा बनाव करणाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे आरती’ ही बातमी (९ सप्टेंबर) वाचली. ऐकावे ते नवलच असा हा प्रकार म्हणावा लागेल. आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल हे सांगता येत नाही. अशी बातमी वाचून काही क्षण करमणूक जरी होत असली तरी हा प्रकार खोल विचार करता गंभीर आहे. याचे दूरगामी परिणाम होतात. भविष्यात जर कोणी आपले गाऱ्हाणे सरकारदरबारी मांडण्यासाठी अशाच एखाद्या विचित्र मार्गाचा अवलंब केला तर प्रथमदर्शनी त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. गाऱ्हाण्याची दखल घेण्याआधी प्रशासनाला दहादा विचार करावा लागेल. त्यामुळे भविष्यातील अशा प्रकारच्या तक्रारकर्त्यांचा मार्ग या बातमीतील व्यक्तीने बंद केला आहे याचा विषाद वाटतो. बातमीतील प्रकार म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. तरी याची दखल घेणे अपरिहार्य आहे. ती मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. असे केल्यास भविष्यात कोणी अशा प्रकारे अन्याय झाल्याची बतावणी करणार नाही.

– रवींद्र भागवत, सानपाडा (नवी  मुंबई)

 

मंत्र्यांच्या उधळपट्टीवर बंधने आवश्यक

केंद्रीय मंत्रिमंडळातील काही नव्या मंत्र्यांनी आपल्या कार्यालयाच्या नूतनीकरणावर  साडेतीन कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्याचे वृत्त (८ सप्टें.) वाचले. कॉँग्रेसप्रमाणेच भाजपचे नेते वागतात हे पुन्हा दिसून आले. नवे मंत्री कोणत्याही पक्षाचे असले तरी असा वायफळ खर्च सुरूच राहतो.  नूतनीकरणावर खर्च करण्यात स्मृती इराणी आघाडीवर आहेत. त्यांनी सुमारे ७० लाख रुपये खर्च केले. त्यांच्या राज्यमंत्र्यांनी ४० लाख रुपयांचा चुराडा केला.  कचरापेटीच्या खरेदीसाठी तर सात हजार रुपये उधळले. याची खरे तर काहीही गरज नव्हती. यापुढे मोदी आणि जेटली यांनीच अशा खर्चावर बंधने आणणे आवश्यक आहे. शेवटी हा पसा जनतेचा आहे, याचे भान ठेवलेच पाहिजे.

– शांताराम य. वाघ, पुणे

 

श्रद्धापूर्वक नमस्कारही पुरेसा

तुळजाभवानी मंदिर देवस्थान समितीच्या सदस्यांनी केलेल्या साडेसात कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची बातमी वृत्तपत्रात झळकली. त्यावर अनेक वाचकांनी पत्रे लिहिली की, ‘दानाच्या अपहारामुळे लाखो भाविकांच्या श्रद्धेला तडा गेला आहे. भवानीमातेचे सुवर्णालंकार गडप करून साडेसात कोटी रुपये हडपणाऱ्या दरोडेखोरांना कडक शासन झाले पाहिजे.’ हे सर्व ठीकच आहे. पण पेटीत टाकलेले पसे, दागिने अशा वस्तू देवीला हव्या असतात का? भक्तिभावाने केलेला नमस्कार तिला पोहोचतो आणि तेवढाच हवा असतो. म्हणून मंदिरात गेल्यावर देवीला श्रद्धापूर्वक नमस्कार करावा. एक परिपाठ म्हणून पेटीत फार तर दहा रुपये टाकावेत. जेवढे दान मोठे तेवढी देवीची कृपा अधिक असे मानणे चुकीचे आहे. देवीला म्हणून दिलेले दान तिला पोहोचत नाही हे स्पष्टच आहे. तसेच त्या मंदिरातच देवी असते असे नाही. ती सर्वत्र आहे. म्हणून आपल्या घरात तिची प्रतिमा (मूर्ती, चित्र इ.) ठेवून स्मरणपूर्वक नमस्कार करावा. म्हणजे तुमची घामाची कमाई भ्रष्टाचाऱ्यांच्या खिशात जाणार नाही.

– प्रा. य. ना. वालावलकर