शहापूरला जाण्यासाठी निघालेले राज्याचे आरोग्यमंत्री  भिवंडी बायपासवर वाहतूक कोंडीत अडकले. त्यांचे मौल्यवान दोन तास वाया गेलेच. शिवाय बिचाऱ्यांना तब्बल दोन किमी चालून जावे लागले. हे वाचून मंत्रिमहोदयांविषयी सहानुभूती वाटण्याऐवजी बरे वाटले. गेले अनेक दिवस हा त्रास हजारो ठाणेकर सहन करीत आहेत. माजिवडे ते माणकोली हे अवघे सहा कि.मी.चे अंतर कापायला दोन-तीन तास लागतात. वाहनांमध्ये अडकून पडणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिलांची प्रचंड कुचंबणा होतेय. हा सगळा त्रास सहन करतानाच टोलही भरायचा तो वेगळाच. मागील तब्बल तीस वर्षांहून अधिक काळ अव्याहतपणे सुरू असणारा हा खारेगाव टोलनाका म्हणजे एक कोडेच आहे. तात्पर्य म्हणजे आम्हा सर्वसामान्यांना रोज भोगावा लागणारा त्रास मंत्रिमहोदयांच्या निदान काही प्रमाणात तरी लक्षात आला असावा. गुरुवारी हा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी वाहतूक कोंडी दिसली नाही. म्हणजेच संबंधित यंत्रणांनी काही तरी पर्यायी उपाययोजना केली असावी. याचाच दुसरा अर्थ असा की उपाय होता परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. मंत्री अडकले आणि त्या उपायाची अंमलबजावणी झाली.

रवींद्र पोखरकर, ठाणे

 

.. तर असे मंत्र्यांचे दौरे रोज व्हावेत..

‘पंकजा मुंडे यांचा दौरा असल्यामुळे कुपोषितांची बडदास्त!’ ही बातमी (लोकसत्ता, २१ सप्टेंबर) वाचली. मुंडेंच्या दौऱ्यामुळे तेथील एकमजली ग्रामीण रुग्णालयातील लगबग, भिंतींवर रंगीबेरंगी चित्रे, टाइल्स/ कार्पेट आणि तेथील लहानग्यांच्या गावीही नसणाऱ्या ‘पोकेमॉन’ आदी टीव्ही कार्टून्सची रेखाटने असणाऱ्या चादरी.. अशी सर्व लगबग पाहून तेथील लहानगे आणि त्यांच्या माता हक्काबक्का न झाल्या तर नवलच! मंत्र्यांच्या एका दौऱ्यामुळे एवढय़ा सोयीसुविधा (थोडय़ा कालावधीसाठी का होईना) काही दिवसांत उपलब्ध होत असतील तर सरकारने नवनवीन योजना राबविण्याखेरीज प्रत्येक मंत्र्याचा एक-एक दौरा आखून संपूर्ण राज्य जर पिंजून काढले तर वीज, रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आदी सुखसोयी या थेट पोहोचू शकतात असा निष्कर्ष यातून निघतो.

सध्या सरकारमधील दोन टोकांमध्ये असलेल्या तीव्र मतभेदांमुळे ते कुठल्याही प्रकरणात ‘योग्य तो पवित्रा’ घेत नाही, असे वाटण्यास अर्थ आहे.

कल्पेश गोविंद पवार, भिवंडी

 

हे परिवर्तन सोपे

‘लोककल्याणमस्तु’ हा उलटा चष्मा (२२ सप्टेंबर) नेहमीप्रमाणेच नर्मविनोदरम्य वाटला. यशवंत देव यांचा ‘शब्दप्रधान गायकी’ या नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्या चालीवर शब्दप्रधान नायकी (नेतृत्व) असे या नामपरिवर्तनाच्या अनावर उत्साहाचे वर्णन करता येईल. याच्या पाठोपाठ दिवाकर रावते यांचे वाहनावरील क्रमांक मराठी असावेत हा प्रस्ताव केंद्राकडे गेला आहे. परिवर्तनाची लाट थोपवता येणार नाही. कारण हे परिवर्तन सोपे आणि जलदगतीने होणारे आहे.

गजानन गुर्जर पाध्ये, दहिसर (मुंबई).

 

  हे राम

राष्ट्रीय जनता दलाचे दबंग नेते व माजी खासदार महम्मद शहाबुद्दीन यांचे वकीलपत्र राम जेठमलानी यांनी घेतल्याचे वाचनात आले. आता सर्वोच्च न्यायालयात जेठमलानी हे शहाबुद्दीन यांची बाजू मांडणार आहेत. अर्थात जेठमलानी यांच्याबाबतीत यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. १९७० मध्ये कॉ. कृष्णा देसाई यांची हत्या झाल्यावर जेठमलानी यांनीच शिवसेनेचे वकीलपत्र घेतले होते, हे सर्व वयस्कांना माहीत आहे. पण या निमित्ताने भाजपच्या दुटप्पी राजकीय व तथाकथित नतिक व्यवहाराचे मात्र प्रत्यंतर येते. आज शहाबुद्दीन यांना पाटणा उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामिनावर आकाशपाताळ एक करून नितीशकुमार यांना लक्ष्य करणाऱ्या भाजपचा पूर्वावतार असलेल्या जनसंघाने तेव्हा शिवसेनेचा जाहीर निषेध केल्याचे स्मरत नाही. पण आता शहाबुद्दीनचे वकीलपत्र घेतल्याबद्दल भाजप जेठमलानींचा निषेध करणार का? जेठमलानी हे केवळ वकील नसून राज्यसभेसारख्या देशातील सर्वोच्च कायदेमंडळाचेही सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यावसायिक पेशाची येथे गल्लत करता कामा नये.

जयश्री कारखानीस, मुंबई

 

आपण नेहमी उशिरा का जागे होतो?

मुंबई शहर आणि रायगड जिल्ह्य़ास मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रातील कमकुवत सुरक्षेमुळे काही वर्षांपूर्वी मुंबईने तब्बल ६० तास चाललेल्या अतिरेकी आक्रमणाचा सामना केला आहे. त्यानंतर रायगडमधील संवेदनशील ठिकाणांच्या स्थळी सशस्त्र संशयित दिसणे फार गंभीर आहे. जोपर्यंत त्यांच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत तोपर्यंत त्यांची भीती सर्वत्र कायम राहणार आहे.  मुंबई आणि सभोवतालचा संवेदनशील भाग अतिरेक्यांच्या नेहमीच रडारवर राहिला आहे. मग त्यासाठी आपण आवश्यक ती दक्षता घेत आहोत का? सशस्त्र संशयित संवेदनशील भागापर्यंत येऊन पोचतात तरी कोणालाच कशी त्यांची चाहूल लागली नाही? शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्या संशयितांना पाहिले म्हणून सुरक्षा यंत्रणांना त्या दिशेने शोध मोहीम तरी चालवणे, झटपट नाकाबंदी करणे शक्य झाले. त्यांना शोधण्यासाठी आज जंगजंग पछाडले जात आहे. आपण नेहमी उशिरा का जागे होतो? थोडय़ाच दिवसांनी नवरात्रोत्सव सुरूहोईल. त्या आधी सशस्त्र संशयितांच्या मुसक्या आवळणे अत्यावश्यक आहे.

मनीषा चंदराणा, सांताक्रूझ (मुंबई)

 

सनिकांच्या सुखसोयीकडेही बघा!

उरीमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. पण या घटनेवर सरकारने फक्त दंड थोपटण्याचेच काम न करता सामरिक यंत्रणेवरही लक्ष दिले पाहिजे. हज पर्व सुरू असताना मक्केत मीना मदानात आजकाल असतात तसे फायरप्रूफ टेन्ट्स सरकारने उरीमध्ये लावले नसल्यामुळेही १७ जवानांना प्राणास मुकावे लागले. देशप्रेमाच्या फक्त पोकळ घोषणा करणाऱ्या सरकारने सनिकांच्या सुखसोयींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

नौशाद उस्मान, औरंगाबाद

loksatta@expressindia.com