‘मुस्लिमांना आपलेसे करा!’ ही बातमी आणि ‘उरी, उरण, उरस्फोड!’ हा अग्रलेख (लोकसत्ता, २६ सप्टेंबर) हे दोन्ही वाचले. पंतप्रधान मोदींची सध्याची वक्तव्ये पाहता मौनी पंतप्रधानांच्या जागी बोलघेवडे पंतप्रधान आले, इतकाच फरक गेल्या काही वर्षांत झाला की काय, असा भास होऊ  लागला आहे. आधीच्या पंतप्रधानांच्या मौनामुळे निदान लोकांची दिशाभूल तरी होत नव्हती. पण मोदींच्या आजकालच्या चर्पटपंजरीमुळे तीही सोय राहिलेली नाही. २०१४च्या निवडणुकीच्या प्रचारधुमाळीतले छप्पन्न इंची छातीवाले मोदी खरे, की पाकिस्तानने दोन वेळा (पठाणकोट आणि उरी) भारतीय सैन्याला नख लावण्याचे धाष्टर्य़ दाखविल्यावरही गरिबी, बेकारीचा ७० वर्षे जुना राग आळवणारे कोमलहृदयी मोदी खरे, असा प्रश्न पडतो. पाकिस्तानविरुद्ध थेट युद्ध हा कदाचित सध्याच्या परिस्थितीतला सर्वोत्तम उपाय नसेलही; परंतु त्याऐवजी पाकिस्तानी जनतेच्या भावनेला आवाहन करणारी भाषणे ठोकणे हे मुत्सद्देगिरीचे लक्षण ठरण्याऐवजी भारतीयांच्या भावनांचा अपमान करणारे ठरत नाही का? शब्दाचा मार शहाण्याला पुरतो, पाकिस्तानला नाही. तेव्हा मोदींनी भारत-पाकिस्तानसमोरील सामायिक समस्यांच्या गप्पा मारण्यापेक्षा गप्प राहून पडद्याआडून का होईना, पण पाकिस्तानला वठणीवर आणण्याकडे अधिक लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे.

नवनीत गोळे, प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई

 

मुस्लिमांसंबंधी उक्तीप्रमाणे कृती हवी

‘मुस्लिमांना आपले म्हणा..’ ही बातमी वाचून (२६ सप्टेंबर) आश्चर्य वाटले. देशाच्या प्रधानमंत्र्यांना एका समाजघटकाला आपले म्हणा असे आवाहन करावे लागणे हे सामाजिक अस्वास्थ्याचे लक्षण म्हणावे लागेल. समाजकारण, राजकारण, धर्मकारण आणि अर्थकारण या सर्व क्षेत्रांत यश मिळविण्यासाठी काही प्रवृत्ती सातत्याने मुस्लीमद्वेषाचा आधार घेत आल्या. देशासमोर समस्या कुठलीही असो, ही प्रवृत्ती मुसलमानांना जबाबदार धरते. यासाठी गोबेल्सला लाजवेल असे खोटय़ाचे खरे करण्याचे तंत्र अवलंबिते. लोकशाहीत संख्येचे गणित महत्त्वाचे असते. त्यामुळे अल्पसंख्याक समाज निर्णय प्रक्रियेपासून दूर फेकला जातो. गैरसमजुतीतून त्याच्यावर करण्यात येणाऱ्या घृणेचा तो मुकाबला करू शकत नाही. त्याला एकीकडे परकेपणाची वागणूक दिली जाते, दुसरीकडे त्याच्या राष्ट्रभक्तीकडे संशयाने पहिले जाते. व्यक्तिगत स्तरावर प्रेमाने राहणाऱ्या या समाजाची सार्वजनिक स्तरावर घृणा केली जाते. शासकीय, प्रशासकीय इ. स्तरावरदेखील त्याची हेळसांड होत राहिल्याने तो न्याय मागण्यासाठीसुद्धा पुढे येत नाही.

काँग्रेस पक्षाच्या विरोधासाठी मुसलमानांचे तुष्टीकरण, समान नागरी कायदा, दहशतवाद अशा राजकीय विषयांना धार्मिकतेचे रूप देऊन मुस्लीमद्वेष पसरविण्यात आला. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक असुरक्षिततेत रोजच जगणाऱ्या या समाजावर सातत्याने बिनबुडाचे आरोप करून परकेपणाची वागणूक दिली जाते. एक राष्ट्र म्हणून हे गैर आहे. राजकारणासाठी मुस्लिमांच्या तिरस्काराचे हत्यार वापरणाऱ्यांना आता ते आपले कसे वाटतील, हे पुढच्या काळात पाहण्यास मिळेल. सत्तेसाठी हे सर्व करणाऱ्यांनी आता ही चातुराईची राजनीती सोडून खरेच उक्तीप्रमाणे कृती करून आपला देश मजबूत करण्यास मदत करावी. हेच देशहिताचे ठरेल.

सलीम सय्यद, सोलापूर

 

द्वेषाच्या दुकानात गिऱ्हाईकबनणार?

‘उरी, उरण, उरस्फोड’ हे संपादकीय (२६ सप्टें.) वाचून वाटले की, सरकारची आवाजाची पातळी बदलते, पण आशय तोच राहतो. मोदी तर फक्त भारतीय जनतेशीच संवाद साधून थांबले नाहीत, तर पाकिस्तानींनासुद्धा आवाहन केले. त्या भाषणातही पुन्हा तसेच हातवारे.. वक्तृत्व स्पर्धेआधी एखाद्या विद्यार्थ्यांला त्याच्या शिक्षकाने सांगितले असेल की, जितक्या टाळ्या जास्त तितके बक्षिसाच्या जवळ जाशील, तसेच यांचे भाषण.. तेच ते सव्वासो करोड, सीना तानकर वगैरे.

उरीला आठ दिवस झाले, पण हे सारे बहुधा जाहीर सभेतच बोलायचे होते. पुन्हा एकदा त्यांच्यातील राजकारणी जिंकला. एकूणच भाषणाचा आशय मात्र काँग्रेसी होता : लढाई गरिबीशी करू! तेव्हा हे म्हणायचे.. पाकिस्तानला त्यांच्या भाषेतच उत्तर दिले पाहिजे.

एक मात्र ते नकळत बोलून गेले : भारत व पाक एकाच वेळी स्वतंत्र झाले, भारत सॉफ्टवेअर निर्यात करतो आहे- या देशाची ७० वर्षांत प्रगतीच झाली नाही, हे त्यांचे देशात- परदेशात व्यक्त झालेले मत त्यांनी स्वत:च खोडून काढले..

पाकिस्तानी राजकारणी भारतद्वेषावर आपले दुकान चालवतात, भारतीय राजकारणी तसे करू पाहत असतील तर, आपण ‘गिऱ्हाईक’ होणार नाही यांची विवेकबुद्धी शाबूत ठेवून काळजी घेतली पाहिजे.. हीच खरी देशभक्ती ठरेल.

मनोज वैद्य, बदलापूर [सचिन वाळिबा धोंगडे, अकोले, जि. अहमदनगर यांनीही ७० वर्षांत  सॉफ्टवेअर निर्यातकडे याच प्रकारे लक्ष वेधणारे पत्र पाठविले आहे]

 

राजकीय पोरकटपणा कधी बंद होणार?

पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्यास मनसेच्या नेत्यांनी सांगितले तेव्हा त्यांच्या पोरकटपणावर हसावे की रडावे, असा प्रश्न पडतो. कोणतीही कला ही देश, सीमा, धर्म, जात यांच्यापलीकडे असते. कला ही मानवी जीवन सुंदर व तणावरहित करण्यासाठी असते, कला माणसांना जोडणारी असते, तोडणारी नव्हे, याचा गंधच ज्यांना नाही त्यांना फक्त कोवळ्या वयातील तरुणांची माथी भडकावून देशात दंगल घडवून राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान करणे माहीत आहे. त्यांनी देशभक्तीचे गोडवे तरी कोणत्या आधारावर गावेत, याचेच आश्चर्य वाटते. आजचा तरुण सजग होत आहे, त्यामुळे राजकीय स्वार्थी हेतूने पोळी भाजणे फार दिवस चालणार नाही हे जाणून तरी राजकीय नेत्यांनी आता पोरकटपणाऐवजी समृद्धतेकडे वाटचाल करायला हवी.

ज्योत्स्ना दिलीप पाटील, नाशिक  

 

शत्रूचे काहीही नको

एका राजकीय पक्षाच्या (मनसे) सिने विभागप्रमुखाने सांगितले की, पाकिस्तानी कलाकारांनी मुंबई सोडली आहे, शिवाय यापुढे त्यांना चित्रपट व टीव्हीतील कलाकृतीत घेणार नसल्याचे पत्र अनेक निर्मात्यांनी दिले आहे. झाले ते उत्तमच झाले. भारतीय जनतेच्या मनी शत्रुदेशातील कोणासही येथे येण्यामागील विरोधाची भावना तीव्र होत आहे. शत्रूकडून कृतीच तशी होत असल्याने त्यांच्यासाठी येथे पायघडय़ा का अंथरायच्या? वर्षांनुवर्षे शत्रूसोबत क्रिकेट खेळून, गाण्याच्या मैफिली भरवून त्यांच्यासोबतचे संबंध सुधारले नाहीत तर त्यांचे सिनेजगतातील कलाकार येथील जनतेसमोर आणून कोणता बदल होणार आहे? कलेचा आदर करायला हवा, कलेला कोणती सीमा नसते, वगैरे पुस्तकी वाक्यांचा पाकसारख्या देशासाठी उपयोग नाही. वारंवारच्या दहशतवादी घटनांचा एकाही पाकिस्तानी कलाकाराने जाहीर निषेध नोंदवलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी येथील सिनेजगताचा मार्ग बंद करणे ही भारतीय वीर जवानांसाठी एक श्रद्धांजली ठरेल. भारत-पाक संबंध कधीच चांगले नव्हते आणि भविष्यात ते होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे पाक कलाकारांनी भविष्यात अर्थार्जनासाठी भारताच्या वाटेकडे आस लावून बसू नये.

अमित पडियार, बोरिवली, मुंबई

 

फार्मसिस्टचे महत्त्व ओळखण्याची गरज

प्रा. मंजिरी घरत यांचा ‘रुग्णाभिमुख फार्मसी : काळाची गरज’ हा लेख मीदेखील एक फार्मासिस्ट असल्याने आवडलाच, पण सामान्य नागरिकालाही सहज समजेल अशा प्रकारे फार्मसी व्यवसायाविषयी इत्थंभूत माहिती या लेखात दिली आहे, हे विशेष वाटले.

वास्तविक प्रगत देशातील नागरिकांना फार्मासिस्ट या व्यावसायिकाविषयी आदरयुक्त विश्वास वाटतो, त्याचे कारण तेथील फार्मासिस्टची भूमिका ही केवळ औषध विक्रेता म्हणून न राहता खऱ्या अर्थाने जनतेचा आरोग्यमित्र अशीच विकसित झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सामाजिक आरोग्य जपण्यासाठी डॉक्टर, नर्स व फार्मासिस्ट या तीन व्यावसायिकांचे महत्त्व सारख्याच प्रमाणात अधोरेखित करून ‘आरोग्याची काळजी घेणाऱ्यां’मध्ये त्यांना समाविष्ट केले आहे. या तीन घटकांवर ते बजावीत असलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर आरोग्यरक्षणाची एकत्रित जबाबदारी टाकण्यात आली आहे. हे तिन्ही व्यावसायिक एकमेकांना पूरक भूमिका बजावून रुग्णास बरे करण्यासाठी आपले ज्ञान, अनुभव यांआधारे सेवा देत असतात. याउलट भारतातील आरोग्य व्यवस्था अद्याप बाल्यावस्थेत व पूर्णतया विस्कळीत असल्याचे दिसून येते. विशेषत: आपल्या येथे काही मंडळींनी फार्मासिस्ट व्यावसायिकांना त्यांची भूमिका बजावण्यापासून वंचित ठेवले आहे. पर्यायाने लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांची आर्थिक पिळवणूकही होत आहे.

केंद्र व राज्य शासनावर आरोग्यरक्षणाची असलेली जबाबदारी व लोकांचा स्वत:चे आरोग्य जपण्याचा मूलभूत अधिकार लक्षात घेता शासनाने आता हे चित्र विनाविलंब बदलणे अत्यंत आवश्यक झाले आहे. फार्मासिस्टच्या भूमिकेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन जनतेच्या आरोग्यरक्षणासाठी त्यांना मुक्तपणे कार्य करू दिल्यास निश्चितपणे लोकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार यात शंका नाही.

यातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, आजमितीस भारतामध्ये फार्मासिस्टची संख्या दहा-बारा लाखांच्या आसपास असून दर वर्षी हजारच्या वर फार्मसी महाविद्यालयांतून साधारण ५० हजार फार्मासिस्ट बाहेर पडत आहेत. मात्र, प्रचंड संख्येने वाढत असलेल्या फार्मसीसारख्या उच्च तांत्रिक शिक्षण धारण करणाऱ्या फार्मासिस्टमधील बेरोजगारीचे प्रमाणदेखील वाढत असून त्यामुळे त्यांच्यामधील खदखदणाऱ्या असंतोषाचा उद्रेक आज ना उद्या निश्चिपणे झाल्याशिवाय राहणार नाही!

फार्मासिस्ट या व्यावसायिकाचे आरोग्यरक्षण साखळीतील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन त्यांना त्यांची हक्काची भूमिका बजावण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत, तरच आपल्याला रुग्णाभिमुख फार्मसी ही गरज भागविता येईल!

बलभीम खोमणे [निवृत्त सहायक आयुक्त, अन्न औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य]

loksatta@expressindia.com