‘यूएस ओपन’ ही गिरीश कुबेर यांची लेखमाला वाचली. ट्रम्प-हिलरी यांच्यात रविवारी झालेली दुसरी वाद-फेरीही (डीबेट) बघितली. प्राप्त परिस्थितीत हिलरी बाजी मारणार असे दिसते, पण राजकारणात चमत्कारसुद्धा घडतात.

माझ्या मते ट्रम्पचे हुकमी एक्के (ट्रम्प कार्ड?) म्हणजे त्यांची आत्मविश्वासपूर्ण देहबोली व रोखठोक स्वभावामुळे चेहऱ्यावर दिसणारा (‘आय हॅव नथिंग टु हाइड’!) निरागसपणा (कोणी याला उद्दामपणाही म्हणेल)! अमेरिकेतील २० टक्के मतदार कुंपणावर बसून (अनडिसायडेड)आहेत व त्यांना वरील दोन गोष्टी भुरळ घालू शकतात. १९८१च्या अध्यक्षपदासाठी कार्टर व रेगन उमेदवार होते व अमेरिकेसारख्या महासत्तेला सुमार बुद्धीचे रोनाल्ड रेगन अध्यक्ष म्हणून शोभत नाहीत असा जागतिक मतप्रवाह होता. तरीही रेगन यांनी ती निवडणूक जिंकलीच आणि त्यापुढील निवडणूकसुद्धा! आठ वर्षांच्या कारकीर्दीदरम्यान त्यांना जरी कमी लोकपसंती (रेटिंग) असली तरी २००२ मध्ये झालेल्या पाहणीत (‘गॅलप अ‍ॅप्रूव्हल रेटिंग’मध्ये) त्यांना ७३ टक्के लोकांनी पसंती दिली व अमेरिकेच्या सर्व अध्यक्षांमधून ते दुसरे आले; फक्त जॉन केनेडीच लोकपसंतीत त्यांच्यापुढे (८३ टक्के) होते.

सुरेश कराळे, पुणे  

 

निवडणूक नव्हे, बुद्धय़ांक चाचणी!

डोनाल्ड ट्रम्प यांची दिव्य वक्तव्ये वाचून अचानक आपली भारतीय नेते मंडळी एका उंचीवर उभी आहेत असे उगीच वाटून गेले- मग आपली मंडळी कितीही भ्रष्ट, गलथान वा गुन्हेगारी असोत! महत्त्वाच्या राजकीय पक्षातल्या- विशेषत: पंतप्रधान वा राष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकेल अशा- एकाही नेत्याने गेल्या पन्नासएक वर्षांत ट्रम्प यांच्याइतक्या खालच्या पातळीची विधाने केल्याचे मला आठवत नाही. मेरा भारत महान!

कुणी तरी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे ते अशा वेळी खरे वाटते : अमेरिकेत जे होणार आहे ती खरं तर निवडणूक नाही. अमेरिकी मतदात्यांची ती बुद्धय़ांक चाचणी आहे.

अशोक राजवाडे, मुंबई

 

प्रतिस्पध्र्याचा फायदा नकोही मानसिकता!

‘दूर.. दूरसंचार’ हा अग्रलेख (११ ऑक्टोबर) भारतात दूरसंचार कंपन्यांनी सगळेच कसे मोफत द्यावे ही ग्राहकांची अपेक्षा (हाव?) आणि त्याला जबाबदार असणारे इथल्या दूरसंचार कंपन्यांचे वर्तन यांची खोलवर चर्चा करतो. वापरकर्त्यांच्या आकडेवारीत जगातील द्वितीय क्रमांकाची बाजारपेठ असूनही प्रगत तंत्रज्ञानासाठी आवश्यक कंपनलहरी खरेदी करण्यात दूरसंचार कंपन्या उदासीन आहेत, याचं कारण कंपन्यांचा महसूल तुटवडा आहे हे निश्चितच. पण या महसूल तुटवडय़ाला कुठली गोष्ट सर्वाधिक कारणीभूत असेल तर ती म्हणजे सिम-कार्ड वाटपाची भिकार व्यवस्थादेखील. कशी ते पाहू या : (१) जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करण्यासाठी प्रत्येक कंपनी नवीन ग्राहकाला सुरुवातीला जवळपास २००-३०० रुपयांच्या मोफत संदेश, मोफत इंटरनेट आदी विविध सेवा स्वखर्चाने पुरविते. (२) दोनएक महिन्यात ही मोफत सेवा खंडित झाली की ‘चाणाक्ष’ ग्राहक ते सिम फेकून देतात. पुन्हा नवीन सिम, पुन्हा सगळे मोफत. (३) एका व्यक्तीच्या नावावर किती सिम घ्यावेत याचे नियम असले तरी इथे त्याच्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष केले जाते.

बाजारपेठेच्या नियमानुसार ग्राहकाने आपला फायदा पाहणे नैसर्गिकच आहे; त्यामुळे त्याला दोष देण्यात अर्थ नाही. पण ‘माझा तोटा झाला तरी चालेल पण प्रतिस्पध्र्याचा फायदा होऊ देणार नाही’ ही भारतीय दूरसंचार कंपन्यांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत या कंपन्या आर्थिक स्थैर्यापासून दूरच राहतील यात शंका नाही.

किरण बाबासाहेब रणसिंग, नवी दिल्ली

 

अंधश्रद्धांना खतपाणी कशामुळे?

हैदराबादमध्ये आराधना या १३ वर्षांच्या मुलीने ६८ दिवसांचा उपवास केला आणि उपवास सोडताना मरण पावली. जैन समाजात चातुर्मासात उपवास केला जातो हे खरे, पण  कोवळ्या वयात नाही. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन मनुष्य किती विवेकहीन होऊ  शकतो हे या घटनेवरून दिसून आले. सुशिक्षित म्हणवून घेणारा वर्गही अंधश्रद्धेपासून दूर राहू शकत नाही. आराधनाला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याच्या सीमा तिच्या नातलगांनी ओलांडल्या.

अर्थात अंधश्रद्धेतून काही सवयी, परंपरा यांच्या बंधनात अडकलेल्या मनुष्याला आपण ‘अंधश्रद्धेच्या बंधनात आहोत’ याची जाणीवदेखील नसते. त्यांना चांगल्या-वाईटाचे भानच राहात नाही. सध्याच्या आधुनिक युगातही अंधश्रद्धांना नेमक्या कोणत्या गोष्टी खतपाणी घालतात, हा खरा प्रश्न आहे.

सुनील कुवरे, शिवडी, मुंबई.

 

यशाचे हे सातत्य विदेशांतही टिकावे

इंदूर येथील न्यूझीलंडविरुद्धची कसोटी भारताने ३२१ धावांच्या मोठय़ा फरकाने जिंकून मालिकाही ३-० अशी खिशात घातली. अष्टपैलू अश्विनने आपल्या जादुई फिरकीने किवी फलंदाजांची भंबेरी उडविताना सामन्यात १३ बळी, तर मालिकेत २७ बळी घेऊन सामनावीर तसेच मालिकावीराचाही बहुमान मिळविला. यापूर्वीच जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविणाऱ्या टीम इंडियाने मायदेशात खेळलेल्या सलग चौदा कसोटींत अपराजित राहण्याचाही मान मिळविला. या मालिका विजयाने चालू हंगामाची सुरुवात चांगली झाली असून कर्णधार कोहली, अश्विन, जडेजा, शमी, भुवनेश्वर, साहा, पुजारा, विजय, रोहित या खेळाडूंना फॉर्म गवसल्याचाही आनंद आहेच; तथापि मायदेशात खेळताना फिरकी गोलंदाजी आणि भक्कम फलंदाजी ही नेहमीच आपली पारंपरिक बलस्थाने राहिली आहेत, तेव्हा विदेशातही मालिका जिंकण्याचे सातत्य ठेवावे.

प्रा. विजय कोष्टी, कवठे महांकाळ (जि. सांगली)

 

प्रवक्तेगिरी करता सरकारविषयी बोलावे

‘‘आत’ले सीमोल्लंघन’ हे संपादकीय (१२ ऑक्टो.) वाचले. सरसंघचालक मोहन भागवत यांचे विजयादशमीनिमित्त केलेले भाषण म्हणजे सरकारच्या प्रवक्त्याने केलेले भाषण वाटले. ‘दुनियामें ऐसी शक्तियां है जो भारत के प्रभाव को नहीं चाहती’ या वाक्याने तर इंदिरा गांधींच्या, भारताला असलेल्या ‘परकीय हाताच्या’ (फॉरिन हॅण्ड) धोक्याबद्दल वारंवार दिलेल्या सूचनेची आठवण करून दिली; पण इंदिरा गांधींच्या भीतीला वास्तवाचा आधार होता. पंजाबमध्ये खलिस्तानच्या नावाखाली जे अराजक निर्माण झाले होते त्यामागे परकीय शक्तीच असल्याची जनतेला खात्री होती. अखेर त्यांची झालेली हत्या ही त्याचा पुरावा होती; पण सध्या परिस्थिती तशी नाही. जग आज भारताकडे ‘काटेरी बाभूळ’ नव्हे तर रसरशीत मधुर फळांनी लगडलेला वृक्ष म्हणून पाहतो. इतकी मोठी बाजारपेठ हातची घालवायला कुठचीच परकीय सत्ता धजणार नाही. तेव्हा सरसंघचालकांची ही भीती तितकीशी रास्त वाटत नाही.

काश्मीरमधील दहशतवादी कारवाया व त्यातून निर्माण झालेली अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती, त्यानिमित्त पाकिस्तानच्या विरोधात भारताने केलेला लक्ष्यभेद (सर्जिकल स्ट्राइक) या गोष्टींचा ऊहापोह भागवतांच्या भाषणात होणे अपेक्षितच होते; पण त्यांच्याकडून सरकारला पाकिस्तानबाबत काही निश्चित कारवाईबद्दल सूचना केली जाईल असे वाटले होते. गेली सत्तर वर्षे पाकिस्तानची डोकेदुखी निष्कारणपणे सहन केली जात आहे. भारतापुढे पाकिस्तानचा वकूब तो काय? पण कुठच्याही ठोस कारवाईच्या अभावी व चीनकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे पाकिस्तान लाडावल्यासारखा वागत आहे. त्यांना एक तर गोडीगुलाबीने जवळ करावे किंवा ते शक्य नसल्यास, जरूर त्या ‘दांडगाईने’ त्याला कायमचा धडा शिकवावा ही देशाची गरज आहे. त्याबाबत भागवत काहीच बोलले नाहीत.

सरसंघचालकांना सरकारच्या अडचणींची चिंता असणे स्वाभाविक आहे; पण त्यासाठी संघाने सयुक्तिक मुद्दय़ांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, जेणेकरून सरकार अधिक कार्यक्षमपणे चालणे शक्य होईल. सरकारला भाजपने कोणत्या मुद्दय़ांवर निवडणुका लढविल्या होत्या याचा विसर पडता कामा नये. विकास व भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व त्यानंतर येणारे ‘अच्छे दिन’ या मुद्दय़ांवर भाजपने निवडणुका लढवल्या. देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणे ही केवळ थट्टा होती, ‘अच्छे दिन आयेंगे’ हे आम्ही कधी बोललोच नाही, अशा लंगडय़ा सबबी या पक्षाला द्याव्या लागत आहेत. भ्रष्टाचारबाबत हे सरकार सुस्त आहे. औद्योगिक उत्पादन घटू लागले आहे. त्यामुळे बेकारी वाढत आहे. सार्वत्रिक निवडणुकांत दिलेल्या आश्वासनपूर्तीबाबत फारशी प्रगती झाल्याचे सामान्य नागरिकाला भासत नाही. संघचालकांनी याबाबत सरकारला मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा होती. त्याऐवजी त्यांनी जुनेच गुऱ्हाळ सुरू ठेवले.

गोहत्येचा मुद्दा त्यांनी उचलला हे त्यांच्या दृष्टीने योग्यच होते. गोहत्येसंबंधीचा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेला विचार हा संघाच्या विचारसरणीपेक्षा कितीही भिन्न असला तरी संघावर सावरकरी तत्त्वज्ञान बंधनकारक असण्याचे कारण नाही; पण भाजपच्या सरकारचा विचार करता गोहत्येचा विषय किती ताणायचा याचा संघाने विचार करणे जरूर आहे. या एका विषयामुळे देशातील बहुसंख्य मुस्लीम आणि बराचसा दलित समाज भाजपपासून दुरावला आहे. त्यांना भाजपच्या निकट आणण्याचा प्रयत्न भागवतांनी केला पाहिजे होता; पण त्या प्रकारचा फारसा काही प्रयत्न त्यांच्या भाषणात झाला नाही याचे आश्चर्य वाटते.

संजय जगताप, ठाणे

loksatta@expressindia.com