‘संगत विसंगत’ हा (९ नोव्हेंबर) हा संपादकीय लेख वाचला. त्यात सरकारची प्रशंसा आणि टीका अशा दोन्ही बाजू होत्या. त्या दोन्हीही खऱ्या असल्या तरी शत्रुराष्ट्रांनी देशावर लादलेले ‘आर्थिक युद्ध’ जिंकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक उपाययोजनांपैकी ‘सर्वाधिक आवश्यक’ अशीच ही तरतूद आहे हे समजून घेतल्यास मोदी सरकारने खऱ्या अर्थाने राष्ट्रहित समोर ठेवून घेतलेला हा पहिलाच असा बिगरराजकीय निर्णय म्हणावा लागेल. तरीही १००, ५०, २० आणि दहा रुपयांच्या बनावट नोटा चलनात नाहीत, हा निष्कर्ष सरकार कशाच्या आधारावर काढते, हा प्रश्न अनुत्तरित राहतोच.

–  सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड

 

विनारोकड व्यवहारांचा मार्ग!

‘संगत विसंगत’ हे ९ नोव्हेंबरचे विशेष संपादकीय वाचले. पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे परिणाम शून्य होतील हे न पटण्यासारखे आहे. कारण हादेखील मोदी सरकारचा एक विनारोकड व्यवहारांच्या (कॅशलेस ट्रान्झ्ॉक्शन) दीर्घकालीन उद्दिष्टाकडे नेणारा मार्ग असू शकतो हेही लक्षात आले पाहिजे.

– सचिन पाटील, अंधेरी

 

नेतृत्वाकडे वक्तृत्व हवेच!

‘आता वाजले की बारा’ हे ९ नोव्हेंबरचे संपादकीय आणि ‘प्रश्न नकोतच, आम्ही देशभक्त आहोत’ हा ८ नोव्हेंबरचा पी चिदम्बरम् यांच्या ‘समोरच्या बाकावरून’ सदरातील लेख, दोन्ही वाचले. या दोन लेखांचा परस्परसंबंध नाही. संपादकीय लेखात म्हटले आहे की, गांधी घराण्यातील नेतृत्वाशिवाय काँग्रेस उभी राहू शकत नाही, असे वारंवार दिसले आहे आणि त्यासाठी राहुल यांना स्वत:ला नेतृत्वासाठी सिद्ध करावेच लागेल. माझा प्रश्न हा आहे की जर एखादी व्यक्ती विशिष्ट गुणांसाठी सक्षमच नसेल तर ती व्यक्ती स्वत:ला कशी सिद्ध करू शकेल?

प्रत्येक व्यक्तीची मूलभूत अशी एक क्षमता असते. जी व्यक्ती खेळात निपुण आहे तीच व्यक्ती अभ्यासात ढ असू शकते. पण फक्त त्या व्यक्तीचे आई-वडील शिक्षक होते म्हणून ती व्यक्तीही उत्कृष्ट शिक्षक असू शकते हा विचार अतार्किक आहे. समाजाचे भान आणि राजकीय चातुर्य, अमोघ वक्तृत्व, खंबीर नेतृत्व हे गुण सगळ्यांमध्ये सारखेच नसतात आणि काही व्यक्तींमध्ये तर त्यांची फारच कमतरता असते. राहुल गांधींनी हे वेळोवेळी सिद्ध केले आहे की त्यांच्यामध्ये या गुणांची किती दयनीय कमतरता आहे. मनमोहन सिंग यांना वक्तृत्वामध्ये शून्य गुण दिले, तर राहुल यांना उणे १०० आणि मोदींना १०० गुण द्यावे लागतील.

अमोघ वक्तृत्व हे सामान्य जनतेवर मोहिनी घालण्याचे सर्वात महत्त्वाचे परिमाण आहे. राहुल यांच्या अतार्किक वक्तृत्वाचे दाखले यू टय़ुबवर सर्वश्रुत आहेतच, त्याविषयी जास्त न बोललेलेच बरे. माझ्यासारख्या तरुणांना गरज आहे ती एका अशा नेतृत्वाची जे धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, प्रामाणिक (भ्रष्टाचारमुक्त) आणि विकासाभिमुख असेल. मोदींचे सरकार हे धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता या आघाडय़ांवर नापास झाले आहे, पण प्रामाणिकता आणि विकास या मुद्दय़ांवर या सरकारने तरुणांची मने निश्चितच जिंकली आहेत. पुढील निवडणुकीत आम्हाला गरज असेल ती मोदींच्या भक्कम पर्यायाची जो वरील सर्व भूमिका पार पाडू शकेल असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करू शकेल. तसा पर्याय नसेल तर नाइलाजाने पुन्हा मोदींना निवडून देण्याव्यतिरिक्त दुसरा उत्तम पर्याय नसेल.

आता चिदम्बरम् यांच्या लेखाचा दाखला सुरुवातीला यासाठी दिला की हा लेख असू दे किंवा यापूर्वी ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे इतर लेख असू देत. हे लेख त्यांच्यामधील सामाजिक आणि राजकीय क्षमतेची चुणूक दाखवतात. असेच विचार जर चिदम्बरम् लिखाणाबरोबरच आपल्या वक्तृत्वाने लोकांपुढे प्रभावीपणे अमोघ शैलीत मांडू शकले तर जनतेला ते नक्कीच विचार करावयाला भाग पडू शकतील. आणि कुणास ठाऊक हेच चिदम्बरम् मोदींपुढे एक सक्षम आव्हान म्हणून उभे राहू शकतील. सध्या तरी राहुल यांना भावी पंतप्रधान म्हणून स्वीकारण्याची १ टक्काही मानसिकता आम्हा तरुणांमध्ये नाहीये.

– मानस पगारे (बोरिवली), मुंबई

 

‘डावे’ हाच सक्षम, पर्यायी विरोधी पक्ष

‘आता वाजले की बारा..’ हे संपादकीय (९ नोव्हें.) वाचले. ‘काँग्रेसजनांना राहुल गांधी यांची नितांत गरज आहे ही बाब सर्वसामान्यांच्या दृष्टीने सुतराम महत्त्वाची नाही, परंतु देशाला सक्षम विरोधी पक्षाची सक्त गरज आहे हे सर्वसामान्य जनतेने लक्षात घायला हवे,’ हे त्यातील म्हणणे पटण्याजोगे आहे. विकासाच्या आश्वासनावर विसंबून एकहाती सत्ता सोपवलेल्या भाजपने गेल्या अडीच वर्षांत पूर्णत: भ्रमनिरास केला आहे.

जात-धर्माच्या अस्मितेचे राजकारण आणि सवंग लोकप्रियतेसाठी जाहीर केलेल्या उत्सवी, दिखाऊ  योजना जाहीर करणे याखेरीज काहीही करू न शकलेल्या या पक्षाला सक्षम पर्याय हवा आहे, मात्र तो पर्याय, सक्षम नेतृत्व नसलेला आणि प्रचंड भ्रष्टाचाराचा इतिहास असलेला काँग्रेस पक्ष हा नव्हे. संपादकीयातही मान्य केल्याप्रमाणे : लालू, मुलायम यांसारखे नेते हे जातीपातींवर आधारित राजकारण करणारे प्रादेशिक पक्षांचे लिंबूटिंबू नेते आहेत.

अशा परिस्थितीत ‘राष्ट्रीय पक्ष’ हा दर्जा असलेले, जात-धर्मनिरपेक्ष भूमिका असणारे, भ्रष्टाचारापासून संपूर्णत: मुक्त असणारे किंवा अपवादात्मक आरोप असणारे डावे पक्ष हेच समर्थ विरोधी पक्ष हा पर्याय होऊ  शकतात, हे सर्वसामान्यांनी लक्षात घ्यायला हवे. धर्मनिरपेक्षता आणि स्वच्छ प्रशासन ही दोन्ही गुणवैशिष्टय़े एकाच वेळी जपणाऱ्या, सत्तेकडे डोळे लावून न बसता तळागाळात प्रामाणिकपणे कार्यरत असणाऱ्या, केवळ नेत्रदीपक प्रचारयंत्रणा राबवण्याच्या आर्थिक क्षमतेअभावी मध्यमवर्गाकडून दुर्लक्षित होत असलेल्या डाव्या पक्षांकडेच सद्य:परिस्थितीत वस्तुनिष्ठ पर्याय म्हणून पाहायला हवे.

 – प्रमोद तावडे, डोंबिवली

 

काँग्रेसकडे दुष्काळ, पण ‘काळ’ महत्त्वाचा

‘आता वाजले की बारा..’ हा अग्रलेख (९ नोव्हें.) वाचला. मुळात एखाद्या पक्षाचे राजकारणातील अपयश हे त्यांचे भविष्य अधोरेखित करणारे असते, हा राजकीय समज चुकीचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या दोन वर्षे आधीपर्यंत भाजपची अवस्था कशी होती? अडवाणींचे कुणी ऐकत नव्हते आणि अटलबिहारी वाजपेयी वयोवृद्ध झाले. नरेंद्र मोदी गुजरातमधून दिल्ली पाहतील, असे त्या वेळी कुणालाही वाटत होतं का? परंतु गलितगात्र झालेला भाजप सत्तेत आला. वाजपेयींनंतर सोनिया गांधी ‘कमबॅक’ करतील असे कुणालाही वाटत नव्हते. जेव्हा वयोवृद्ध सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते, असाही एक काळ होता.. तेव्हा तर काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वावरच राजकीय विश्लेषक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत होते.

सध्याची अवस्थाही काहीशी अशीच आहे. राहुल गांधी सक्षम नाहीत, अनेक जुन्या नेत्यांमध्ये क्षमता नाही आणि राजकीय तारतम्यही नाही, सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाला वेळ देऊ  शकत नाहीत.. तेव्हा काँग्रेसला भाजपच्या चुकाच सत्तेवर आणू शकतात. कोणत्याही पक्षाचे मूल्य आणि भविष्य कुणीही ठरवीत नाही, कारण काळच सर्वाचे मूल्य जोखत असतो..!

– संदीप वरकड, खिर्डी (ता. खुलताबाद, औरंगाबाद)

 

‘वायफाय’पेक्षा गर्दीकडे पाहा..

एकीकडे राज्यातील सात शहरांमध्ये, नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी खास ‘तेजस्विनी’ बस उपलब्ध होणार असल्याची दिलासादायक बातमी वाचनात येत असतानाच दुसऱ्या एका बातमीवरून मात्र वास्तवात रेल्वेप्रवास नोकरदार महिला प्रवाशांसाठी किती जिकिरीचा बनला आहे त्याची कल्पना येऊ  शकते. तसाही रेल्वेप्रवास किंवा इतर ठिकाणचा प्रवास नोकरदार महिलांसाठी दिवसेंदिवस कठीण बनत चालला आहेच; परंतु डहाणू-चर्चगेट ट्रेनमधील महिला डब्यातील महिला प्रवाशांनी विरार स्थानकातील महिला प्रवाशांना दरवाजाच बंद करून प्रवेशच नाकारल्याची घटना भविष्यातील एखाद्या अप्रिय घटनेची नांदी ठरू शकते. एरवीदेखील विरार लोकल गाडीत बोरिवलीकर प्रवाशांच्या बाबतीत, स्टेशन येताच गाडीत येण्याची वा बाहेर जाण्याची संधी रोखण्याचे प्रकार घडत असतातच. तेच लोण आता डहाणू गाडीमध्ये पोहोचले आहे. मागच्या महिन्यात डहाणू गाडीमध्ये पुरुष प्रवाशांच्या बाबतीत असाच प्रकार घडल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी हस्तक्षेप केला होता. त्याचीच पुनरावृत्ती महिलांच्या डब्यात होते आहे.

रेल्वे प्रशासनाने मोफत वायफाय पुरवण्यापेक्षा रेल्वे प्रवास सुखकर व सुरक्षित (विशेषत: महिला प्रवाशांच्या बाबतीत) कसा होईल याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

– दीपक काशिराम गुंडये, वरळी.

 

गांधीजींच्या दोघा मुलांचा जन्म इथलाच

महात्मा गांधी यांच्या नातवंडांपैकी दोन ‘कनू गांधीं’बद्दलचा (चुलत नातू कनू आणि सख्खे नातू कान्हा ऊर्फ कनू गांधी) स्पष्ट उलगडा ९ नोव्हें. २०१६ अंकातील ‘व्यक्तिवेध’ सदरातील माहितीत वाचला. तो तसा करण्याची गरज होतीच, त्याबद्दल धन्यवाद. मात्र लेखात एक चूक झालेली आहे.

म. गांधींच्या चार मुलांपैकी दोघांचा जन्म भारतात झाला : हरिलाल (१८८८), मणिलाल (१८९२). उरलेल्या दोघांचा जन्म द. आफ्रिकेत झाला. रामदास (१८९७), देवदास (१९००). त्यामुळे रामदास हे गांधींचे तिसरे पुत्र होत.

– जया नातू, बेळगाव