‘माझं नाव शिवसेना’ असं म्हणत मतदानासाठी भावनिक आवाहन करणारी जाहिरात आपण सर्वानी वाहिन्यांवरून पाहिली आणि याच शिवसनिकांनी महिला पोलीस अधिकारी आणि शिपाई यांना बेदम मारहाण करताना उभ्या महाराष्ट्राने पाहिले. हे पाहून आझाद मदानात महिला पोलिसांवर अत्याचार झाल्याचे पुन्हा एकदा स्मरण झाले. या दोन्ही घटनांमधील हल्लेखोरांची मानसिकता एकसारखीच. यापकी आझाद मदानातील घटनेत महिला पोलिसांवर अत्याचार करणाऱ्या लोकांची मानसिकता घृणास्पदच आहे, याबाबत कुणाच्याही मनात शंका नसावी. पण शिवरायांच्या नावाने आणि मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची पण मानसिकता तशाच प्रकारची असावी, हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे मला वाटते. महिला पोलिसांवर अशा प्रकारे अमानुषपणे हल्ला होताना पाहून मनामध्ये असा प्रश्न उभा राहिला की, महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार आहे की गुंडशाहीचे?
– सुनील पोळ, शिवडी (मुंबई)

सेनेकडे एकहाती सत्ता नाही म्हणून बरे
ठाण्यातील महिला कॉन्स्टेबलला एक शाखाप्रमुख मारहाण करताना पाहिले तर सुसंस्कृत नागरिकाची मान शरमेने खाली जाईल. अर्थात ज्यांना शरम नावाची चीज नाही अशा राजकारण्यांबाबत न बोललेले बरे. नागरिकांच्या सुदैवाने सेनेकडे एकहाती सत्ता नाही. अन्यथा ती महिला पोलीसच निलंबित झाली असती. मध्यंतरी गृहखाते सेनेकडे असावे अशी मागणी रामदास कदम यांनी केली होती. सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांमुळे तो अनर्थ टळला. सेनेकडे एकहाती सत्ता असती तर अजून काय काय पाहावे लागले असते देव जाणे.
– दामोदर वैद्य, सोलापूर

तिचे चुकलेच!
‘शिवसेना शाखाप्रमुखाच्या गुंडगिरीने राज्यभर संताप’ ही बातमी (२७ फेब्रु.) वाचली. मराठी माणसांसाठी स्थापन झालेल्या पक्षाचे नाव ‘मराठी भाषा दिना’च्या मुहूर्तावर असे झळकावे हे संतापजनक आहेच, पण तितकेच दु:खदायकही आहे . पण तिचेही चुकलेच! पोलीस असली म्हणून काय झाले, आपण कुठल्या स्थळकाळात जगतो याचे भान इतके सुटून कसे चालेल? रस्ते हे समाजजीवनाचा आरसा असतात असे म्हणतात. अशा रस्त्यांवर कायद्यामधील ‘क’चा मागमूस तरी शिल्लक राहिला आहे का? ठाण्यातील हमरस्त्यांपासून ते मुंबई-पुणे द्रुतगती रस्त्यापर्यंत उलटय़ा बाजूने येणारी वाहने, खांदा आणि गाल यात मोबाइल फोन धरून बोलत सुसाट जाणारे दुचाकीस्वार, मागच्या पुढच्या कुठच्याच दिव्यांचा पत्ता नसलेले टेम्पो हे सर्व नित्याचेच नाही का? अशा परिस्थितीमध्ये आपल्या मोटारीत बसून शांतपणे फोनवर बोलणाऱ्याला हटकणे सयुक्तिक आहे का? त्यात काळ्याकुट्ट काचा आणि वाहन क्रमांकाच्या बाजूला कुठल्याशा राजकीय पक्षाचे निशाण असलेली गाडी रोखण्याची ‘जुर्रत’ म्हणजे तर हद्द झाली! सामान्य माणसाने साध्या वेशातील पोलिसाप्रमाणे वागणे दूरच राहिले; मात्र पोलीस हा गणवेशातील सामान्य माणूसच असतो आणि तसाच अगतिक असतो हे मात्र वारंवार पुढे आले आहे.
– प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>

मजेदार चित्रपटाचे स्मरण
‘प्रेममूर्ती पोप’ हे शनिवारचे संपादकीय (२० फेब्रु.) वाचले. माजी पोपच्या एका नाजूक नात्याचे गुपित उत्तमरीत्या त्यात शब्दबद्ध केले आहे. त्यावरून मला एका जुन्या मजेदार इटालियन सिनेमाची प्रकर्षांने आठवण झाली. त्यात प्रेमात पडलेल्या एका धर्मगुरूला पोप मोठय़ा मुश्कीलीने लग्नाला परवानगी देतो. तेव्हा, त्याचे सहकारी धर्मगुरू पार्टी करतात. त्यातील शेरेबाजी अशी : ‘हार्दकि अभिनंदन! आता आम्ही नाही, तरी निदान आमची मुले लग्न करू शकतील.’ चित्रपट : ‘प्रिस्ट्स वाइफ’, कलाकार- सोफिया लॉरेन, मार्सेलो मॅस्ट्रोइयानी. तसेच ‘ऑपरेशन सेंट पीटर्स’ हा आणखी एक धमाल सिनेमा होता.
-आल्हाद (चंदू) धनेश्वर

विषमतेवर बोलताना त्यांची वाचा बसते..
‘दावोसच्या निमित्ताने’ हा संजीव चांदोरकर यांचा लेख (२६ फेब्रु.) आंतरराष्ट्रीय संस्था व त्यांच्या परिषदा यांच्या दुटप्पीपणावर नेमके व सप्रमाण बोट ठेवतो. या सर्व संस्था गोंडस ध्येयांच्या नावाखाली नवीन वसाहतवादच (ठी उ’ल्ल्र२ं३्रल्ल) जोपासत असतात. त्यांच्या प्रभावाचे एक कारण असे की, त्यांच्या मागे त्या त्या विकसित देशांचे संपूर्ण पाठबळ असते. हे विकसित देश विकसनशील देशांवर हे कार्यक्रम वेगवेगळ्या नावांखाली लादत असतात. जागतिकीकरण याचाही उद्देश जुन्या वसाहतीकरणाप्रमाणेच कच्च्या मालाचा पुरवठा व हक्काची बाजारपेठ मिळवणे हाच असून सर्व विकसित पाश्चिमात्य देश आंतरराष्ट्रीय संस्था व परिषदांद्वारे तो विकसनशील देशांवर लादत असतात, हे सत्य आहे. भूतकाळात व आजही मानवी हक्क तुडविणारे हे पाश्चिमात्य देश आशिया व आफ्रिकन देशांना त्याविषयीचे धडे देण्यास आघाडीवर असतात. विषमता हा खरा आमचा प्रश्न आहे आणि त्यावर बोलताना मात्र यांची वाचा बसते, हे सत्य लेखकाने प्रभावीपणे पुढे आणले आहे.
– बी. डी. उशीर, मुंबई</strong>

तरुण पिढीची बेफिकीर वृत्ती
लोकलच्या दारात उभे राहून फलाटावरील प्रवाशाला टपली मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘स्टंट’ त्याच्याच जिवावर बेतल्याची बातमी (२८ फेब्रु.) वाचली आणि तरुण पिढीची बेफिकीर वृत्ती परत एकदा समोर आली. लोकलच्या दारात जागा अडवून जोरजोरात ओरडणे, फलाटावरील प्रवाशांना टपली मारणे, शेरेबाजी करणे असे प्रकार तरुणांच्या टोळक्याकडून नित्याचेच होत असतात. दोन स्थानकांदरम्यानच्या प्रवासात खांबाला एका हाताने पकडून स्वत:ला पूर्णपणे बाहेर झोकून देणे असाही प्रकार केला जातो. हे सर्व प्रकार उघडय़ा डोळ्यांनी पाहण्याशिवाय इतर सहप्रवासी काही करू शकत नाही, कारण या टोळक्यांची असलेली दहशत. या घटनेमुळे तरी अशा टोळक्यांना धडा मिळेल एवढीच अपेक्षा आपण बाळगू शकतो.
– दीपक काशिराम गुंडये, वरळी (मुंबई)

‘विज्ञान दिन’ की विज्ञान ‘दीन’
२८ फेब्रुवारी हा दिवस ‘विज्ञान दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. सी. व्ही. रमण, सर विश्वेश्वरैया, सत्येंद्रनाथ बोस, विक्रम साराभाई, होमी भाभा, सतीश धवन, अब्दुल कलाम, जयंत नारळीकर, वसंतराव गोवारीकर, राधाकृष्णकुमार, सी.एन.आर.राव, अनिल काकोडकर, कस्तुरीरंगन, माशेलकर, राजा रामण्णा आदी भारतीय शास्त्रज्ञांची नावे पाहिली की विचार पडतो या शास्त्रज्ञांपकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त शास्त्रज्ञ हे दक्षिणेकडील राज्यांतील आहे. भौगोलिकदृष्टय़ा उत्तर भारतात लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे. अपवाद वगळता सत्ताकेंद्र उत्तर भारतातच आहे. मग संशोधक तयार करायला का मागे? येथे भेदभाव करण्याचा अजिबात हेतू नाही, मात्र याचा विचार करावा असाच आहे.
माझ्या मते दक्षिणेत जरी धार्मिक समाज असला तरी धार्मिकता ही मोठय़ा प्रमाणात उत्तरेत दिसून येते. या धार्मिकतेने लोकांना शास्त्रीयदृष्टय़ा अपंग केले. यापूर्वी ‘अंधश्रद्धा’ म्हणून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी मोदी सरकार आल्यापासून सरळ सरळ ‘भारताची पौराणिक प्रगती’ सांगायला सुरू केली. धार्मिक भाकडकथा विज्ञानाच्या नावावर खपवायला सुरुवात केली. मागे सायन्स काँग्रेसमध्ये या प्रगतीच्या ‘गावगप्पा’ मंत्रिमहोदयांनीच सुरू केल्या. अशाने विज्ञानाची दीनवाणी अवस्था व्हायला वेळ नाही लागणार. जर खरोखरच सी. व्ही. रमण यांचा वारसा पुढे चालवायचा असेल तर असल्या भाकडकथांना सरकारने विरोध जरी नाही केला तरी चालेल मात्र पाठबळ देऊ नये.
– सचिन आनंदराव तांबे, पिंपळसुटी, ता. शिरुर, जि. पुणे</strong>

हे मात्र पवार विसरतात!
भाजप तिन्ही राज्यांत आगामी निवडणुका हरणार हा कोणीही दिलेला शाप नसून सर्वाना माहीत असणारे भविष्य शरद पवार यांनी सांगितले आहे. तामिळनाडू, केरळ व प. बंगाल राज्यांत सत्तेवर येण्याइतपत संघटनेची वीण भाजपकडे नाही. त्यामुळे तीनही राज्यांत भाजप हा कितीही जोर लावला तरी जास्तीत जास्त तिसऱ्या स्थानावर राहू शकतो. थोडक्यात या राज्यांत भाजपचा विजय कोणीच अपेक्षित धरत नाहीत. ठाण्यातील बिल्डर परमार याने लोकप्रतिनिधींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. हे माहीत असतानाही पवारांनी आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींची पाठराखण केली. मराठवाडय़ात पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न भाजप कसा सोडवणार, असा प्रश्न विचारून त्या पक्षाच्या सरकारला पवार दूषणे देत आहेत. पण धरणे योग्य ठिकाणी बांधली गेली असती तर हा प्रश्न निर्माणच झाला नसता, हे मात्र ते विसरतात.
– अश्विनी भावे, सातारा