News Flash

धरता बोटे, प्रचार-भाषण खोटे..

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बदलण्याचा निर्णय तर फारच किचकट ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Misery acquaints a man with strange bedfellows या शेक्सपिअरच्या ‘द टेम्पेस्ट’ या नाटकातील एका वाक्यावर आधारित ‘Politics makes strange bedfellows’ या राजकारणात लागू होणाऱ्या ‘तत्त्वज्ञानाची’ प्रचीती १५ नोव्हेंबरच्या ‘लोकसत्ता’तील संपादकीय (‘साखरसत्याचे प्रयोग’)  व ‘एकमेका  सा करू..’ या संतोष प्रधानलिखित वृत्तवेधात पुन्हा एकदा आली. दु:ख म्हातारी मेल्याचे नाही, तर काळ सोकावल्याचे वाटते!

नरेंद्र मोदींनी निवडणुकांपूर्वी ‘शरद पवार हे भ्रष्टाचार शिरोमणी’ असल्याचे म्हटले तेव्हा जनतेत ‘पुन्हा एकदा’ कुतूहल जागे झाले. कुतूहल अशासाठी की, शरद पवारांच्या पन्नासहून अधिक वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात जनतेचे कुतूहल चाळवणारे भ्रष्टाचाराचे आरोप इतर काही महाभागांनीदेखील केले. या आरोपांची दखल घ्यावी अशी उक्ती मुंबई महानगरपालिकेचे त्या काळचे उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी १९९३ च्या दरम्यान केली. ‘शरद पवार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे ट्रकभर पुरावे आपल्याकडे आहेत,’ असे म्हणून त्यांनी जनतेचे भलतेच कुतूहल जागे केले आणि कोणी महान समाजसेवकच निर्माण झाल्याचा जनतेचा ग्रह झाला. पुढे या ‘उक्ती’ला कृतीची काहीच साथ नाही हे स्पष्ट होत गेले. इतके की, शेवटी खुद्द पवारांनीच खैरनारांना आव्हान दिले की, ‘पुरावे असतीलच तर ते कोर्टापुढे सादर करा’. कोर्टातील तो सुदिन बघण्याचे भाग्य जनतेला काही लाभले नाही आणि आज शरद पवार जेथे होते त्यापेक्षा किती तरी पुढे निघून गेले, तर खैरनार मात्र काळाच्या गर्तेत गेले.

पवारांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करणे तर दूर, कोर्टात त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराविषयी एक खटलादेखील कोणी चालवल्याचे आठवणीत नाही. मोदीही ते करू शकतील याची शक्यता नाही. खोटय़ा प्रचाराचे पातक मात्र त्यांच्या हातून घडले आहे.

या वेळी (लोकसभा निवडणुकीच्या वेळी) सत्तेवर येणे निश्चित असलेले भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदी वाऱ्याच्या लाटेवर स्वार होत हातात बेछूट आरोपांचा दांडपट्टा फिरवत ‘काका-पुतण्यांपासून’ महाराष्ट्राला मुक्त करण्याचे आश्वासन देत सुटले, तेव्हा जनतेचे कुतूहल कमालीचे जागृत झाले. ‘चला कोणी तरी माय का लाल’ अखेर मिळाला अशी आशा उत्पन्न झाली आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ती फलद्रूप झाल्याची भावनाच पसरली; पण मोदींनी तर साक्षात शरद पवारांचे बोट पकडून राजकारणात वाटचाल करीत असल्याचे सांगितले तेव्हा एक वैषम्यपूर्ण हास्याची लहरच महाराष्ट्रात पसरली. आधी जनसंघ आणि काहीशा कमी प्रमाणात आता त्याचा नूतन अवतार भाजप हे आम्ही म्हणजे अगदी साजूक तुपात तळून काढलेले स्वच्छ राजकारणी असल्याचा जो कांगावा करतात तो जनता पक्षाच्या कारकीर्दीपासून ते आतापर्यंत दीर्घगतीने खोटा असल्याचे सिद्ध होत आहे.

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बदलण्याचा निर्णय तर फारच किचकट ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. बुधवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात त्याचे पडसाद तर नक्कीच पडणार, पण टीका होईल ती जनतेला या निर्णयामुळे झालेल्या त्रासाची नसून या निर्णयाची कल्पना खऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या मंडळींना आधीच मिळाली होती का याविषयी असेल. तशी पूर्वसूचना या हितसंबंधीयांना मिळाली नसेलच असे एकंदर प्रतिक्रियेवरून तरी वाटत नाही. उन्हातान्हात ताटकळत उभे राहून स्वत:चेच पैसे मिळवण्यासाठी याचकाच्या भूमिकेत गेला आठवडाभर असलेल्या सामान्य जनतेची जी तगमग दिसते. तशी तगमग दक्षिण मुंबईसारख्या श्रीमंत परिसरात अजिबात दिसत नाही. काय असावे या मन:शांतीचे रहस्य हे जाणून घेण्यात जनतेला स्वारस्य आहे. जनतेच्या या असंतोषाला शरद पवारांसारखा कितीही अनुभवी माणूस नरेंद्र मोदींचे ‘बोट धरून’ उभा राहिला तरी त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही आणि याची सर्वात जास्त कल्पना खुद्द पवारांनाच असेल.

संजय जगताप, ठाणे

 

संघद्वेष आहे, त्यामुळे सावधगिरी हवी!

‘साखरसत्याचे प्रयोग’ हा अग्रलेख (१५ नोव्हेंबर) वाचला. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या मैत्रीचे अनेक पैलू अग्रलेखातून विस्ताराने मांडले आहेत. शरद पवार यांचा उपयोग मोदी देशहितासाठी करून घेतील असे वाटते, पण त्याच वेळी मोदींच्या सच्च्या अनुयायांना पवारांनी रा. स्व. संघाबद्दल जी बिनबुडाची वक्तव्ये गेल्या ३०-४० वर्षांत उधळली ती विसरता येणार नाहीत हेही मोदींनी विसरू नये असे वाटते, कारण तेही सच्चे स्वयंसेवक आहेत व त्यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यात असंख्य स्वयंसेवकांनी गेल्या निवडणुकीत रक्ताचे पाणी केले आहे. संघाबद्दलचा कमालीचा द्वेषभाव पवारांमध्ये आणि त्यांच्या अनुयायांत ठासून भरला आहे. त्यामुळे पवारांबद्दल खात्री देता येणार नाही. देशहितासाठी कोणाचाही उपयोग करून घेतलाच पाहिजे, पण सावध राहूनच घ्यावा, हेच सांगण्याचा हा खटाटोप.

श्रीनिवास जोशी, डोंबिवली पूर्व

 

मुंबईत गुजराती श्रीखंडपवारांमुळेच

‘साखरसत्याचे प्रयोग’ हा अग्रलेख (१५ नोव्हेंबर) भाजपच्या भाटांना किती पटेल सांगता येत नाही; मात्र तो वाचून मराठीभाषक वाचकांचे डोळे उघडावे. ‘भूखंडांचे श्रीखंड’ मुंबईत शरद पवार यांच्याच कारकीर्दीत झाले. त्या वेळचे जवळपास सर्व बिल्डर गुजराती भांडवलदार. मुंबईत बहुमजली इमारतीत राहणाऱ्यानी मांसाहार करावयाचा की नाही ते या बडय़ांनीच ठरवायचे, यासाठी वाट खुली करून दिली ती पवारांनी. याच पवार यांनी पूर्ण वसई- पालघर हा निसर्गरम्य भाग याच भांडवलदारांना उपलब्ध करून दिला. आदिवासींची जमीन जवळपास लुटली गेली. अनेक आदिवासी नेते या भांडवलदारांनी पोसले. आपल्या गुजराती भांडवलदारांना ज्या पवार यांनी जमिनी उपलब्ध करून दिल्या, त्या शरद पवार यांची वारेमाप स्तुती मोदी करतात यात कोणते नवल? पालघरमध्ये मुले कुपोषणाने मरण पावतात,  मराठवाडय़ात शेतकरी गळफास घेऊन जीवन संपवतात ते पवारांना दिसले नाही.

मार्कुस डाबरे, पापडी (वसई)

 

राजकीय लाभ होणार नाही

‘साखरसत्याचे प्रयोग’ हा अग्रलेख मोदी आणि पवार यांच्यातील भविष्यातील नातेसंबंधांचे नेमके काय स्वरूप असणार आहे यावर प्रकाश टाकतो. अर्थात, शरद पवार हे रसायन मोदी यांना वाटते आहे तेवढे मौल्यवान राहिलेले नाही. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते  स्पष्ट होईल.

महाराष्ट्राच्या दुर्दैवाने वसंतदादा, शंकरराव चव्हाण, राजारामबापू पाटील, शंकरराव कोल्हे यांच्यासारखे धुरंधर नेते आता काँग्रेसमध्ये नाहीत. त्यामुळे पवार आपोआपच उजवे ठरतात एवढेच. राष्ट्रवादीतील बहुसंख्य नेते हे घोटाळेबाज या प्रतिमेत पुरेपूर अडकले, त्यामुळे तो पक्ष खिळखिळा झाला आहे.

पवार यांचे नाव लवासा वगैरे प्रकरणात येत असले तरी ते राजकीय जीवनाच्या अंतिम टप्प्यात असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध जनमत फारसे तीव्र नाही. तरीही शरद पवार बरोबर असावेत असे मोदींना वाटत असले तरी यांचा फारसा राजकीय लाभ भविष्यात संभवत नाही.

गार्गी बनहट्टी, दादर (मुंबई)

 

राष्ट्रपती निवडणुकीची पावले?

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची एकमेकांवर स्तुतिसुमनांची बरसात वाचल्यावर असे वाटते की, शरद पवार यांना राष्ट्रपती करण्याच्या तर या चाली नाहीत ना? कारण शरद पवार यांचे देशातील सर्वच नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. स्तुतिसुमनांची बरसात ऐकल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळून चुकले असावे की, वरच्या राजकारण्यांनी गळ्यात गळा घातल्यावर खालच्या राजकारण्यांची कशी पंचाईत होते. तेव्हा गळ्यात गळे घालताना सामान्य पक्ष कार्यकर्त्यांचे काय होत असेल? याचा नेत्यांनी जरा विचार करावा.

श्रीनिवास . डोंगरे, दादर (मुंबई)

 

बंद करा ढकलगाडी’, घ्या परीक्षा..

‘नववीत अडीच लाख मुले अनुत्तीण’ (लोकसत्ता, १५ नोव्हेंबर) हे  वृत्त वाचले. राज्यातील शाळा, विद्यार्थी संख्या, शिक्षक यांच्या ‘युडास’ या प्रणालीकडून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीवरून गेल्या वर्षी नववी नापासांचे प्रमाण अडीच लाख असल्याचे त्या वृत्तात म्हटले आहे. शालेय शिक्षणाची स्थिती एवढी खालावेपर्यंत शिक्षण विभाग ढिम्म का राहिला? ढकलगाडी पद्धतीमुळे आजपर्यंत लक्षावधी मुले पुढे सरकत आली असली तरी त्यांची गुणवत्तेची पाटी कोरीच राहिली आहे. विद्यार्थ्यांत गुणवत्ताच नसेल तर त्यांच्याकडील गुणपत्रिकेस काहीच मूल्य उरत नाही. राज्याच्या शिक्षणाची आणि विद्यार्थ्यांची झालेली कठीण अवस्था पाहता आगामी काही वर्षांत याची झळ राज्याला बसणार आहे, कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान आहे. आळशी, ढ विद्यार्थी तयार करून काय साध्य करायचे आहे? सहामाही, वार्षिक आणि चाचणी परीक्षा घेत विद्यार्थ्यांना पास-नापास करण्याचे जुने धोरण योग्य होते.

कुणाल चेऊलकर, नाहूर (मुंबई )

 

..आणि हॉलीवूडचीही क्लिओपात्रा’!

‘नागरआख्यान’ या सदरातून जगातील अनेक जुन्या शहरांची इतिहासकालीन आणि सांप्रत परिस्थितीची दिली जाणारी माहिती रोचक असते. अलेक्झांड्रियाची क्लिओपात्रा या ‘नागरआख्याना’त क्लिओपात्राबद्दल लिहिलेली माहिती इतिहासाचे ज्ञान देणारी आणि तितकीच मनोरंजक आहे. नाइलची ही सम्राज्ञी जागतिक इतिहासाची कायमच कुतूहल विषय बनून राहिली आहे.

ही माहिती वाचत असताना सत्तरच्या दशकात पाहिलेल्या क्लिओपात्रा या हॉलीवूड चित्रपटाचे स्मरण झाल्यावाचून राहिले नाही. एलिझाबेथ टेलर या सौंदर्यवतीने साकारलेली क्लिओपात्रा अविस्मरणीय होती. क्लिओपात्रा नगरात प्रवेश करते तेव्हा नगरवेशीवर उसळलेला प्रचंड जनसमुदाय हा लक्षात राहिलेला प्रसंग. ‘कॉम्प्युटर ग्राफिक्स’ नसतानाच्या काळात खरीखुरी गर्दी जमविली गेली होती म्हणे.

डॉ. कैलास कमोद, नाशिक

loksatta@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2016 3:18 am

Web Title: loksatta readers letter 182
Next Stories
1 उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची थाप
2 कमी मूल्याच्याच नोटा व्यवहारात हव्यात
3 अविवेकाची काजळी जगभर पसरू शकते
Just Now!
X