News Flash

वादाला खतपाणी घालण्यासाठीच नव्या मंत्रालयाची स्थापना!

फडणवीस सरकारने ओबीसी मंत्रालयाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

फडणवीस सरकारने ओबीसी मंत्रालयाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. हे नवे मंत्रालय ओबीसींच्या भल्यासाठी तयार केले जात आहे की, मराठा-कुणबी वादाला तोंड फोडण्यासाठी? काही लोक ठक्कर समितीच्या अहवालाचा दाखला देत सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत, मात्र मग गेली दोन वष्रे सरकार झोपले होते का? की मराठा-कुणबी मोच्रे निघायला लागले म्हणून ही फितुरशाही! त्यात विशेष म्हणजे फडणवीसांनी हे खातेदेखील स्वत:च ठेवून घेतले. त्यातच सरकारने हा निर्णय घेताना जी काही कमालीची गुप्तता बाळगली, ते मात्र कौतुकास्पद. कारण सरकारलासुद्धा या ठिणगीवरून आगीची भीती असणारच. यासोबतच आता महाराष्ट्रातील इतर अनेक समाजदेखील स्वतंत्र मंत्रालयाची मागणी करतील ते वेगळेच. मात्र या सरकारच्या कावेबाजीला मराठा व कुणबी समाज नेते काय प्रतिक्रिया देणार व मराठा क्रांती मूक मोर्चाची पुढची दिशा कशी असणार, याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असणार.

अभिषेक राजेंद्र देशमुख, अमरावती

 

मोदींचा उद्दामपणा हा धोक्याचा कंदील

‘..गांधी आडवा येतो?’ हा अग्रलेख (२८ डिसें.) वाचला. आपल्या संसदीय लोकशाहीत विरोधी पक्ष किती तगडा आहे त्यावर सत्ताधारी नेतृत्व अथवा पक्ष लोकशाहीप्रमाणे वागतो का हुकूमशाहीकडे झुकतो हे अवलंबून असते हे आपण इंदिरा गांधींच्या जमान्यापासून अनुभवतो आहोत.

नेतृत्वगुण हे मुळातच अंगी असावे लागतात, ते मारून मुटकून आणता येत नाहीत. राहुल गांधी यांच्या अंगी असामान्य नेतृत्वगुण आहेत याची कुठलीही चुणूक इतक्या वर्षांत कधीही या देशाने अनुभवलेली नाही, उलट प्रत्येक कसोटीच्या वेळी हा ‘नेता’ राजकीयदृष्टय़ा किती पोरकट आहे हेच सिद्ध झाले आहे. नरेंद्र मोदी यांचे उद्देश कितीही चांगले असले तरी त्यांचा उद्दामपणा हा संसदीय लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना धोक्याचा कंदील दाखवीत आहे. अशा वेळी नोटाबंदीच्या निमित्ताने विरोधी पक्षांच्या हाती मजबूत एकजूट करण्याची सुवर्णसंधी आली होती, पण नुसतेच अननुभवी नव्हे तर चक्क ‘राजकीय बिनडोक’ असलेल्या राहुलबाबा आणि सार्वजनिक नळावर कचाकचा भांडणाऱ्या बाईच्या प्रतिमेत असणाऱ्या ममतामाता यांच्या पुढाकाराने विरोधी पक्षांची एक मजबूत एकजूट होईल अशी अपेक्षा बाळगणेच चुकीचे होते आणि तसेच झाले.  दुर्दैवाची गोष्ट अशी की संसदीय लोकशाहीच्या बुरख्याआडून या देशाच्या राजकारणाची पावले नरेंद्र मोदींच्या रूपात हुकूमशाहीकडे पडत आहेत आणि याला नेतृत्वहीन विरोधी राजकीय पक्षदेखील तितकेच जबाबदार आहेत!

प्रदीप अधिकारी, माहीम (मुंबई)

 

 राहुल गांधींमुळेच पक्षाला उतरती कळा

‘..गांधी आडवा येतो?’ या अग्रलेखात (२८ डिसें.) काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी चुका सुधाराव्यात असे म्हटले आहे. एक गोष्ट ध्यानात घ्यावी की या गोष्टीस आता वेळ झालेला आहे. काँग्रेसला उतरती कळा लागली ती राहुल गांधी पक्षाचे उपाध्यक्ष झाल्यापासूनच. त्याच काळात प्रियंका गांधी यांना ‘पक्षाचा नवीन चेहरा’ म्हणून जनतेसमोर आणावे, असे काँग्रेस वरिष्ठांचे म्हणणे होते, परंतु ही गोष्ट धुडकाविण्यात आली ती सोनियांकडूनच. अर्थात पक्षातील नेत्यांनीही स्वत: शांत राहणेच पसंत केले. तसा तो काँग्रेसचा नियमच. परिणामी राहुल गांधींवर जनतेकडून खाटसभेतील ‘खाटा’ पळवून नेण्यापर्यंत नामुष्की ओढवली. राहुल गांधी यांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी व्यक्तिकेंद्री (मोदींविरोधात) केलेली टीका. यातून मोदींचाच प्रचार व भाजपला फायदा झाला. काँग्रेसमधील नेत्यांनाही ही गोष्ट उमगली असावी म्हणूनच त्यांनी तोंडे उघडून हळूहळू प्रियंका गांधींना पक्षाचा चेहरा म्हणून समोर आणण्याची खेळी सुरू केली आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार मोहीम. आता प्रियंका गांधी काँग्रेससाठी किती प्रभावशाली ठरतात हे बघण्यासारखेच असेल!

विशाल चव्हाण, शिर्डी

 

जनतेची नाडी ओळखण्याऐवजी मानापमान!

‘..गांधी आडवा येतो?’ हे संपादकीय  विरोधी पक्षांच्या दळभद्रीपणावर प्रकाश टाकणारे आहे. एकत्र येण्यासाठी यापेक्षा अजून एखादी संधी भविष्यात येईल असे वाटत नाही. आलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात. आपला इगो, मानापमान, ज्येष्ठता बाजूला ठेवावी लागते, हे साधे तत्त्व या राजकीय धुरीणांना, त्यातही राहुल गांधी यांना समजू नये हे दुर्दैवी आहे. सरकारविरोधी, त्यातही मोदीविरोधाची सुप्त लाट जनतेत पसरली आहे. हजारो व्यवसाय, उद्योगधंदे डबघाईला आले आहेत. शेतकरी, कामकरी, मजूर, हमाल यांना रोजगार मिळेनासे झाले आहेत. निश्चलनीकरण करूनही काळ्या पशाचे व्यवहार उघडकीस येताहेत. हे तर हिमनगाचे टोक आहे. एटीएम बंद पडले आहेत. आपलाच पसा बँकेतून मिळू शकत नाही. जनतेची नाडी ओळखणे ही खरी काळाची गरज असताना दिल्लीत मानापमानाचे नाटक चालू असेल तर लोक या तथाकथित धुरीणांना कधीही क्षमा करणार नाही.

रामचंद्र राशिनकर, अहमदनगर

 

समाजकंटकांमुळेच नियम बदलावे लागले..

पी. चिदम्बरम यांचा लेख (समोरच्या बाकावरून, २७ डिसें.) वाचला. त्यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे न पटणारे आहेत : १) अमेरिका व युरोपमध्ये बऱ्याच प्रमाणावर रोख रक्कम वापरून व्यवहार केले जातात हे जरी खरे असले तरी तेथे लहानात लहान व्यवहाराचीसुद्धा रीतसर पावती दिली जाते. या पावतीवर आकारल्या जाणाऱ्या कराचे संपूर्ण विवरण दिलेले असते. त्यामुळे अशा व्यवहारातून काळा पसा निर्माण होण्याची शक्यता नसते.  २) वेळोवेळी केंद्र सरकार व रिझव्‍‌र्ह बँक यांना नियम बदलणे केवळ परिस्थितीमुळे भाग पडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण नोटाबंदी जाहीर होताच अनेक समाजकंटकांनी त्या नियमांतून पळवाटा शोधून काढल्या. ३) रोकडविरहित याचा शब्दश: अर्थ लावणे चुकीचे ठरेल, कारण सगळे व्यवहार रोकडविना करणे कधीही शक्य नाही. परंतु मोठय़ा रकमेचे व मुख्यत: सोने व घर खरेदीसारखे व्यवहार, ज्यामधून काळे धन करणे शक्य आहे असे सर्व व्यवहार रोकडविरहित होणे अनिवार्य आहे.

गरव्यवहार करताना सापडलेल्या व्यक्तींना ताबडतोब कठोर शासन होणे आवश्यक आहे. अन्यथा हर्षद मेहता प्रकरणाप्रमाणे दोन तपांनंतर आरोपी सामान्य शिक्षेनंतर सुटणार असेल तर अशी मोहीम भविष्यात यशस्वी होणार नाही याचे भान सरकारनेही ठेवले पाहिजे.

सतीश गुप्ते, काल्हेर (ठाणे)

 

गरीब विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा

यावर्षी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. ती चालू असतानाचा ढिसाळ कारभार हा विद्यार्थ्यांना त्रासदायक तसेच महाग पडत आहे. शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असूनही मुदतवाढ दिली गेली नाही. तसेच अर्ज केलेल्यांपकी हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अपात्र केले गेल्याची यादी संकेतस्थळावर लावून तेथील प्रशासनाने हात झटकले. यातील पात्र असणारे पण ऑनलाइन प्रवेश अर्जात त्रुटी असणाऱ्यांना येत्या परीक्षेस बसता येणार नाही. ३०० रुपये त्रुटी निवारण शुल्क हा आर्थिक भरुदड बसणार आहे. गरीब कुटुंबातील तसेच काम करत शिक्षण घेणाऱ्या निम्म्यापेक्षा अधिक उमेदवारांना संगणक हाताळता येत नसल्याने सायबर कॅफेवाले अवाच्या सवा शुल्क घेतात. कोणतीही पर्यायी व्यवस्था केंद्रांवर नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असून त्यांचे पूर्ण वर्ष वाया जाणार आहे. याचा विचार करून उच्चशिक्षण विभागानेच गरीब विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा.

अजित पाटील, नाशिक

 

हा योगायोग समजावा की..

क्रीडाविषयक दोन बातम्यांनी (२८ डिसें.) लक्ष वेधून घेतले. आयओएमने भ्रष्टाचारसम्राट सुरेश कलमाडी आणि अभय चौटाला या दोघांची आजीवन अध्यक्षपदी निवड केली. सर्वच्या सर्व १५० सभासदांनी एकमताने ही निवड केली. कारण स्वच्छ आहे. कलमाडी, चौटाला यांच्या काळात या सर्व मंडळींना परदेश दौऱ्यावर  पाठवण्यात आले होते. असे िमधे आयओएमचे सभासद आता परतफेड करीत आहेत.  सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. दुसरी बातमी एमसीए जिमखान्याचे अनधिकृतपणे ‘शरद पवार अकादमी’ असे केले. जिवंतपणी आपले एखाद्या वास्तूला नाव देताना पवारांसारख्या नेत्यांनी विरोध करू नये, याचे आश्चर्य वाटले. एकेकाळचे हे गुरू-शिष्य एकाच दिवशी बातमीत यावेत, हा योगायोग समजावा की विनाशकाले विपरीत बुद्धी!

प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, वेसावे (मुंबई)

 

संमेलनात मातृभाषा समृद्धीवर विचार व्हावा

मराठी साहित्य संमेलनावर वारेमाप खर्च होतो. संमेलने भरविण्याची आवश्यकता राहिली आहे का? अशी विविध मते दरवर्षीच्या साहित्य संमेलनाच्या आधी व्यक्त होत असतात. साहित्य संमेलनांमधून कोणत्या विषयांवर प्राधान्याने चर्चा होणे आवश्यक आहे याबाबत यशवंतराव चव्हाण आणि श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी पूर्वी व्यक्त करून ठेवलेले विचार महत्त्वपूर्ण आहेत. साहित्यिकांची जबाबदारी या आपल्या भाषणात यशवंतराव म्हणतात की, ‘‘कोणत्याही क्षेत्रातील मूलभूत संशोधन हाती घेण्याचा प्रयत्न ज्या भाषेत होतो तीच भाषा ज्ञानभाषा होऊ शकते. हे काम इंग्रजीसारख्या भाषांमधून होते. मराठी भाषेचा तुमचा, आमचा अभिमान खऱ्या अर्थाने पहिल्या प्रतीचा राहणार असेल तर मूलभूत संशोधनाचे काम मराठीतही झाले पाहिजे. तशी परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे.’’ ज्ञानकोशकार केतकर यांनी एका भाषणात असे म्हटले होते की, ‘‘भाषा जगेल तरच त्यातील साहित्य वाढेल. हे लक्षात ठेवून साहित्य संमेलनात भाषेच्याच स्थर्यासंबंधाने विचारविनिमय केला पाहिजे. साहित्य संमेलनापुढील कार्य म्हणजे केवळ काव्य आणि नाटक याविषयी चर्चा करण्याचे नाही, तर भाषारक्षण हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या पाश्र्वभूमीवर वरील दोन महनीय व्यक्तींचे विचार महत्त्वपूर्ण आहेत.

ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण

loksatta@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:38 am

Web Title: loksatta readers letter 217
Next Stories
1 खिल्ली कसली उडवता? स्वागत करा..
2 मुख्यमंत्री शंकराचार्याशी सहमत आहेत?
3 मजा करा राजे हो!
Just Now!
X