एक स्वतला अखिल भारतीय म्हणवणारा राष्ट्रीय पक्ष आणि एक प्रादेशिक म्हणूनच राहण्याची शक्यता असणारा पक्ष यांच्यातली युती केव्हा तरी तुटणारच होती. ती इतकी वष्रे टिकली हेच नवल म्हणायला हवे .बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्माच असा होता आणि भाजपला त्या काळात सेनेची गरज होती. आता मोदीलाटेपासून बदललेल्या परिस्थितीत भाजपमध्ये हयात वेचलेल्यांना ‘सन्मानाने’ बाजूला सारण्यात आले तिथे बाळासाहेबांशिवाय असलेल्या सेनेचा निभाव कसला लागतो?

युती तुटली ही इष्टापत्ती किंवा ब्लेसिंग इन डिसगाईज ठरू शकेल. सेनेने आपल्या मूळ उद्दिष्टांशी आपली बांधिलकी घट्ट केली आणि लोकांना ते ‘दाखवून द्यावे न लागता’ पटले तर पुन्हा लोक सेनेकडे वळतील यात शंका नाही. कारण भाजपबाबत भ्रमनिरास होण्यास सुरुवात झालेली आहे  ‘सब का साथ’चा नारा देणाऱ्यांना आपल्या सहकारी पक्षाचीही साथ मिळवता येत नसेल तर त्यांच्या घोषणा म्हणजे शब्दांचे बुडबुडेच नाहीत तर दुसरे  काय? उठल्याबसल्या संस्कृतीचा जप करणाऱ्या लोकांजवळ आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना अडगळीत टाकण्याची मानसिकता असेल तर ते सेनेशी कृतज्ञतेने वागतील ही अपेक्षा करणे निर्थकच म्हटले पाहिजे. कथनी आणि करणी यातील अंतर न ओळ्खण्याएवढी जनता भोळसट नसते हे सर्वच पक्षांनी लक्षात घ्यायला हवे हा मुद्दा महत्त्वाचा .

गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

 

शिवसेनेची वाटचाल गैरलागूठरण्याकडे

‘कागदी काडीमोड’ हा अग्रलेख (२८  जाने.) वाचला. या अग्रलेखावरून आपल्याच ‘एक लाट तोडी त्यांना..‘ या २७ सप्टेंबर २०१४ रोजीच्या अग्रलेखाचे स्मरण झाले. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीआधी सेना-भाजप आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडय़ा तुटल्याच्या पाश्र्वभूमीवर लिहिलेल्या या अग्रलेखात हे दोन्ही घटस्फोट नसíगक आहेत, असे प्रतिपादन करण्यात आले होते.

आता उण्यापुऱ्या अडीच वर्षांतच, अगोदर ‘नसíगक’ म्हटलेल्या घटस्फोटाची आता ‘कागदी काडीमोड’ असे म्हणून बोळवण करणे, हे म्हणजे सगळेच राजकीय पक्ष (विशेषत: शिवसेना) संधिसाधूपणे कितीही कोलांटउडय़ा बिनदिक्कतपणे कशा मारतात, त्याचे विदारक उदाहरण आहे. शिवसेनेचा योग्य आणि परखड समाचार अग्रलेखातून घेतला आहे. शिवसेना त्यातून काही बोध घेईल अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थच आहे. आपल्या ताकदीचा विचार न करता फुगणाऱ्या बेडकाची मानसिकता सतत बाळगणारी शिवसेना दिवसेंदिवस ‘गरलागू’ ठरण्याकडे वाटचाल करते आहे, हे मात्र नक्की.

शलाका शशिकांत मोरये, विलेपाल्रे (मुंबई)

 

सर्वच पक्षांना जागा दाखवून द्यावी

‘कागदी  काडीमोड’ हा अग्रलेख  वाचला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने युतीसाठी एकत्र येऊ  घातलेल्या दोन पक्षांचा काडीमोड (कागदी) झाला एकदाचा. परत एकदा तेच ते आरोप-प्रत्यारोप, तीच जुनी भ्रष्टाचाराची प्रकरणे, तीच गलिच्छ भाषा, तेच खालच्या पातळीवरचे राजकारण इत्यादींचा भडिमार सामान्य जनमानसाला सहन करावा लागणार. एकीकडे सत्तेत स्थान मिळवण्यासाठी भाजपला पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे पाठीत खंजीर खुपसला, २५ वर्षे सेना सडली अशी स्वाभिमानाची भाषणे ठोकायची. एवढाच स्वाभिमान असेल तर जसा आता काडीमोड घेतला तसा सत्तेतूनही घ्यावा, पण नाही. सेनेने नेहमीच सत्तेत राहून विरोधाची भूमिका घेतली आहे. उद्या जर भाजपला महापालिकेत गरज (चुकून) भासलीच तर त्या वेळी सेना पाठिंबा देईलच यात शंका नाही. आता मात्र मुंबईकरांनी सर्वच पक्ष व नेत्यांना जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. दोन-पाच जागांसाठी भुक्कड नेत्यांना आयात करणाऱ्या भाजपलादेखील.

श्रीकांत ब. करंबे, गणेशवाडी (करवीर)

 

निवडक कामे इतरांना सोडण्यातील अर्थहुशारी

‘‘मेड इन ’चा मोह!’ हा  गिरीश कुबेर यांचा  लेख (अन्यथा, २८ जाने.) वाचला. अमेरिकी अध्यक्षांची स्वदेशीची हाक कशी भोंगळ आहे हे समजून घेताना एका मुद्दय़ाचा आवर्जून उल्लेख आवश्यक आहे. ‘देशाने मोठे होताना काही कामं इतरांसाठी सोडायची असतात, कारण ती स्वत: करण्यात शहाणपणा नसतो’ हे खरे आहे. परंतु त्यामध्ये आपली ऊर्जा जाऊ  नये (घराची साफसफाई मोलकरणीवर सोडून नोकरीला बाहेर पडण्याप्रमाणे) किंवा त्या गोष्टी इतरांनी बनवल्यास स्वस्तात पडतात यापेक्षा किती तरी सखोल असे आर्थिक शहाणपण असते. ते म्हणजे इतर देशांची क्रयशक्ती वाढवून आपल्या देशातील उद्योगविस्ताराला जागतिक अवकाश मिळवून देणे. माहिती-तंत्रज्ञान सेवा भारतातून घेतल्यामुळे भारतातील मध्यमवर्गाची क्रयशक्ती किती वाढली हे आपण अनुभवलेले आहे. त्या सेवा इतक्या वरवरच्या होत्या की त्यातून गुगल किंवा ओरॅकलसारख्या कंपन्यांना स्पर्धा निर्माण होईल असे काहीही भारतात निर्माण झाले नाही; परंतु वाढलेल्या क्रयशक्तीमुळे आणि ‘आयटी अवेअरनेस’मुळे कित्येक अमेरिकी कंपन्यांना भारतात मोठी बाजारपेठ मिळाली. (भारतातून कापूस किंवा चरख्यावर कातलेले सूत आयात करून त्यापासून मॅन्चेस्टरमध्ये बनवलेले कापड / कपडे भारतात विकण्याचाच तो या शतकातील अवतार आहे.) गुगलपासून पिझ्झाहटपर्यंत आणि इंटेल / अ‍ॅपलपासून सिस्कोपर्यंत अनेक कंपन्यांना भारतातून प्रचंड धंदा मिळाला. भारतात मध्यमवर्गाचा विमानप्रवास इतका वाढला की भारतीय विमानप्रवास कंपन्यांकडून अमेरिकेतील बोइंग कंपनीला कित्येक वर्षे पुरतील इतक्या ऑर्डर्स मिळालेल्या आहेत. आता त्या विमानांची देखभाल करण्यासारखे तुलनेने वरकड काम ते भारतातच करून घेणार आहेत, जेणेकरून ही प्रक्रिया चालूच राहील.  अत्यंत हुशारीने बेतलेली ही जागतिकीकरणाची प्रक्रिया ट्रम्प थांबवतील असे वाटत नाही. तसे केल्यास त्यात जास्त नुकसान अमेरिकेचेच आहे. न जाणो, तसे झाल्यास आपले प्रगती साधण्याचे ‘सोपे दोर’ कापले जाऊन ती आपल्याकरिता एक इष्टापत्तीही ठरू शकते.. अणुस्फोटानंतर भारतावर घातलेल्या र्निबधांप्रमाणे.

प्रसाद दीक्षित, ठाणे

 

भाजपने चांगली संधी गमावली

शासकीय कार्यालयांतील देव-देवतांच्या प्रतिमा बाहेर काढण्याबाबतचे परिपत्रक रद्द झाल्याची बातमी (२८ जाने.) वाचली. राजकीय फायद्यासाठी अशा शासकीय परिपत्रकांना केराची टोपली दाखवण्याची पद्धत काही नवीन नाही. पण या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली असती तर भाजपची जी हिंदुवादी, धर्माध अशी जनसामान्यांत प्रतिमा आहे ती पुसली गेली असती. पण काही बुरसटलेल्या विचारांच्या नेत्यांमुळे हे परिपत्रक मागे घेऊन भाजप सरकारने ही संधी गमावली आहे. त्याचबरोबर सर्व शासकीय इमारती धर्मनिरपेक्ष करण्यासाठी व संविधानाची बूज राखण्यासाठी लढा दिलेल्या अधिकाऱ्यासच चौकशीच्या कक्षेत आणून आपली आहे ती प्रतिमा सरकार मलिन करून घेत आहे. बुद्धिजीवी लोकांनी अशा अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मागे उभे ठाकले पाहिजे.

भारत धर्मनिरपेक्ष असला तरी आज बऱ्याच शासकीय कार्यालयांत गेले की देव-देवतांचे फोटो पाहून ‘कुठे नेऊन ठेवलेत आपले राष्ट्रीय महापुरुष?’ असा प्रश्न पडतो. एकूणच हे परिपत्रक मागे घेतल्यामुळे धर्मसत्तेपुढे राजसत्ता झुकली असा वाईट संदेश जनसामान्यांत पोहोचला.

अक्षयकुमार भि. देवके, नांदेड

 

वाहतूक नियमांची जबाबदारी पालकांवरही

‘सर सलामत मगर हेल्मेट की मिजास’ ही जयंत नारळीकरांनी मांडलेली व्यथा (रविवार विशेष, २९ जाने.) अगदी रास्त असून वाढती वाहने आणि वाहने चालविताना कायदे मोडणे हे अपघातांचे मुख्य कारण आहे. फक्त एक्स्प्रेस वेच नव्हे शहरातही होणाऱ्या बाइक रेसेस, एका दुचाकीवर तीन तीन जण बसणे, वाहने भरधाव हाकणे, अगदी चार चाकी वाहनेसुद्धा मुलामुलींनी भरलेली जात असतात तेव्हाही पोटात गोळाच उठतो. त्यात पुन्हा सध्या मुलगा/ मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर ऐपतीप्रमाणे बाइक, गाडी दिली जाते. पण गाडी काळजीपूर्वक चालव असे अजिबात सांगितले जात नाही. वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी असतात याची बाळगुटी घरातूनही दिली गेली पाहिजे.

माया हेमंत भाटकर, चारकोप (मुंबई)

 

भारतातील बालमृत्यू दर लज्जास्पद!

‘जे जे रुग्णालयामध्ये रोबोटिक शल्य चिकित्सा’ ही बातमी (२८ जाने.) वाचली.  एकीकडे सरकारी रुग्णालयामध्ये कॅथ लॅब, रोबोटिक शस्त्रक्रिया, डायलिसिस युनिट, ट्रान्सप्लाण्ट युनिट अशा मोठमोठय़ा गोष्टींचा गाजावाजा होत असताना सामान्य रुग्णाला मात्र साध्या जीवनावश्यक वैद्यकीय सुविधांसाठी झगडताना बघायला मिळते. जागतिक स्तरावर भारताचा बालमृत्यू दर आजही लज्जास्पद आहे. आपल्या शेजारील श्रीलंका, थायलंडसारख्या देशांनी मूलभूत वैद्यकीय सुविधांमध्ये केलेली प्रगती आपणास बरेच काही शिकवून जाते.

डॉ. सचिन पावसकर, खेरवाडी (मुंबई)

 

बाबासाहेबांच्या कार्याचा अपमान नको

‘डॉ. आंबेडकरांच्या दैवतीकरणाचे काय?’ हे पत्र (लोकमानस, २६ जाने.) वाचले. अखंड आधुनिक भारताचे प्रणेते म्हणून बाबासाहेबांची जगात ओळख आहे. विविध जाती, धर्म, पंथ, संस्कृती असलेल्या भारत देशाला संविधानाद्वारे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्त्वांवर देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान, अनमोल कार्य त्यांनी केले. घटनेत सर्वच समाजातील घटकांसाठी तरतूद करून ठेवली. या युगपुरुषाने अस्पृश्यांनाच नव्हे तर, स्पृश्यांनाही पुनीत केले. मी प्रथम भारतीय अन् अंततही भारतीय आहे अशी व्यापक राष्ट्रवादाची, राष्ट्रप्रेमाची भूमिका मांडली आणि पत्रलेखक त्यांना विशिष्ट समाजाचेच का मानतात? आंबेडकरी आणि आंबेडकरवादी अनुयायी बाबासाहेबांना देव मानत नसून, आपले मुक्तिदाता, उद्धारकर्ता बापच समजतात. ६ डिसेंबरला चत्यभूमीवर जो प्रचंड भीमसागर उसळतो तो बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठीच. बाबासाहेब हे एकमेव असे अजरामर दिग्विजयी, जागतिक कीर्तीचे, विद्वत्ता लाभलेले महान नेते आहेत. त्यांचे दैवतीकरण करून, त्यांच्या महान जागतिक कार्याचा अपमान करू नका.

मिलद भि. कांबळे, विरार