भौतिकदृष्टय़ा आपल्या समाजाचे नागरीकरण मोठय़ा प्रमाणात झाले असले तरी समाजाचे वैचारिक सांस्कृतिकीकरण म्हणावे त्या प्रमाणात झालेले नाही. त्यामुळे कोणताही विषय बौद्धिक पातळीवर समजून घेण्यापेक्षा, त्या विषयाचा भावनिक वापर करून भावना भडकावणे तुलनेने सोपे आहे. संजय लीला भन्साली प्रकरणातही तेच घडले.

वास्तविक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील कथित आक्षेपार्ह दृश्याने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातात, हे निकोप समाजाचे लक्षण खचितच नाही. इतिहास हा बहुअंगी विषय असल्याने त्यातील कोणत्या बाजूवर प्रकाश टाकायचा याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य निर्माता/ दिग्दर्शकाला असायला हवे. याच्याही उप्पर, जर त्या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये अथवा इतिहासाचा विपर्यास असेल तर त्याबाबत कायदेशीर कार्यवाही करण्याचे अनेक सनदशीर/ सांविधानिक मार्ग उपलब्ध आहेत, मात्र आपल्यासारख्या व्यक्तिपूजक व अस्मितांचे भांडवल करणाऱ्या समाजात अशा संयत मार्गाचा अवलंब केला जाण्याची शक्यता फार कमी आहे.

सामाजिक प्रगल्भतेचा अभाव, अस्मितांचे राजकारण करणारे तत्त्वशून्य राजकारणी, कायद्याचा हरवलेला धाक व न्याय मिळवण्यास होत असलेल्या विलंबामुळे न्यायालयावरील उडत चाललेला विश्वास या साऱ्यांचे फलित म्हणजे ही झुंडशाही होय.

कौस्तुभ तिलोत्तमा सोमकांत, लातूर

 

मागच्यांनो, स्वत:चे भवितव्य ओळखून थांबा!

‘उन्मादाचे अवतारशास्त्र’ हा अन्वयार्थ (३० जानेवारी) वाचल्यावर गर्दीचे मानसशास्त्र समजून घेण्याचा मोह आवरत नाही. मूलभूत गरजांपैकी संरक्षण ही एक महत्त्वाची गरज आहे. मग ती वैयक्तिक असो अथवा सामाजिक. समाजाचे संरक्षण म्हणजे आपले संरक्षण असे मानणारे गट वाढताना दिसत आहेत. मात्र हे गट समाजाचे संरक्षण या गोंडस नावाखाली प्रसिद्धी व स्वत:चा स्वार्थ साधण्याचा घाट घालताना दिसत आहेत. प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वासोबत आपले नाव जोडले की झाले ते मोकळे सामाजिक व्यासपीठावर स्वत:ची पाठ थोपटून घ्यायला. त्यांचा इतिहासाचा अभ्यास किती आहे, ही बाब याच्यापुढे क्षुल्लक ठरू लागली आहे. भावनिक मुद्दय़ांवर धिंगाणा घालणे हे आजकालच्या संस्कृतीचे लक्षण ठरत चालले आहे.

गर्दी जमा करा आणि आपला वैयक्तिक स्वार्थ साध्य करा. हे कोठे तरी थांबले पाहिजे, कारण गर्दीला स्वत:ची ओळख नसते, ती असते एक तर वादळासारखी नाही तर ठिणगीसारखी. विध्वंस हाच तिचा चेहरा असतो. त्या गर्दीतील म्होरक्यांच्या मागे असलेल्या डोक्यांनी विचार करून पाऊल उचलावे, नाही तर उगाच सरकारी रोषाचे बळी केवळ पाठीमागची डोकीच होतात. वैचारिक मतभेद असावेत, पण हे मतभेद सोडवताना उन्मादी गर्दीचा वापर होणे अपेक्षित नाही. विचारांचा विरोध विचारानेच व्हावा, त्यासाठी हात उचलण्याचे धारिष्टय़ न केलेलेच बरे.

महेंद्र धोंडीराम सूर्यवंशी, मुरूड (ता. जि. लातूर)

शिवसेनेने प्रभावी विरोधी पक्ष व्हावे

सन १९६६- मराठी माणसाच्या अस्मितेसाठी शिवसेना नावाचा पक्ष स्थापन, मोठय़ा संघर्षांमधून पक्षनेतृत्वाने आपला राजकीय प्रवास करून भारतीय राजकारणात आपला ठसा उमटवला; पण त्यांच्या पश्चात नेतृत्वहीन झालेला पक्ष आपल्या अस्तित्वासाठी आज झगडत आहे. १७ लोकसभा सदस्य व ६३ विधानसभा सदस्य असूनही बदलाला सामोरे जाण्यास हा पक्ष हतबल आहे. लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष हा सत्ताधारीपेक्षा काही कमी नसतो. तेव्हा हीच संधी समजून शिवसेनेने प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका वठवावी.

महेश कांबळे, वंदूर (कोल्हापूर )

 

मुंबईची सुरतबघवणार नाही..

‘कागदी काडीमोड’ हा अग्रलेख (२८ जानेवारी) वाचला. ‘भाजपबरोबर आजपर्यंत युती आल्यामुळे आज शिवसेनेची सडल्यागत अवस्था झाली आहे’ हा उद्धव ठाकरेंनी इतक्या वर्षांनंतर काढलेला भाजपशी मैत्रीच्या परिणामांचा निष्कर्ष जरी अतिशय योग्य असला तरी हे कळण्यास फार विलंब झाला. निवडणुकीनंतर सत्ता-सरकारसाठी युती करणे ठीक होते, परंतु निवडणूकपूर्व युती करून शिवसेनेने आपले शक्तिशाली संघटन अशक्त केले. शिवसेनेने सत्ताखुर्चीसाठी भाजपशी युती करून स्वत:ला छोटे करून घेतले, तर दुसरीकडे भाजपने मोठे होण्यासाठी शिवसेनेशी मैत्री करून सत्ता संपादली. हे सगळे शुद्ध राजकारण होते, ज्यात शिवसेना चुकली किंवा भाजपच्या धूर्त खेळात फसली. मनसेच्या मराठीकेंद्रित राजकारणाचा धसका घेत शिवसेनेने अजाणतेपणे आपली हिंदुत्वावरील पकड सैल केली आणि ध्रुवीकरणाच्या दुर्दैवी भूलभुलैयात नुकसान होणाऱ्या मराठी मतांवरच शिवसेना खिळून राहिली. भाजपने इथेच कमाई केली; परंतु आता मात्र या प्रतिकूल स्थितीत शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडणे आत्मघातकी ठरणार.

त्यामुळे आज कोणी किती जरी स्वाभिमानाचे बोल लगावले तरी सत्ताखुर्चीत टिकून राहत शिवसेनेने स्वबळाचे राजकारण साध्य होईपर्यंत, तूर्तास तरी स्वाभिमानाची भाषा बंद करून भाजपवर हा डाव पलटविण्यासाठी ‘कृती करून दाखविणे’ भाग आहे. बाळासाहेबांनंतर मराठी माणसाला शिवसेनेकडून अपेक्षा ठेवण्याइतपत मदत होत नसली तरी शिवसेना टिकणे व वाढणे हे मराठीहिताचे आहे, विशेष करून मुंबईत. नाही तर ‘मुंबईची सुरत’ बघवणार नाही, कारण इथे कुणी मराठी पुढे दिसणार नाही. बिल्डरांना विकलेल्या मुंबईतून हाकललेल्या मराठी माणसाला आपण जपू शकलो नाही याची खंत शिवसेनेला आता प्रत्येक निवडणुकीत वेदना देणार, एवढे निश्चित.

अजित कवटकर, अंधेरी पश्चिम (मुंबई)

 

पारदर्शकतेची हाकाटी आताच कशी पिटता?

मुंबई महापालिकेत भाजपने सेनेच्या मदतीने २० वर्षे सत्ता उपभोगली आणि आता पारदर्शकतेचा मुद्दा पुढे करून सेनेच्या गैरकारभाराबाबत हाकाटी पिटत आहेत. पालिकेत भाजपला आपली नगरसेवक संख्या वाढवायची आहे. त्याकरिता आयाराम-गयारामांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे व निष्ठावंत कार्यकर्त्यांना बूथ सांभाळण्याचे आदेश दिले जात आहेत.

स्वबळावर सत्ता मिळाली नाही तर कल्याण-डोंबिवली पॅटर्न पुन्हा राबविला जाईल. एकूण काय, निवडणुकीच्या प्रचारामध्ये ‘महाभारत’ घडेल. सख्खे भाऊ  पक्के वैरी होतील. वस्त्रहरणाचे प्रयोग २१ तारखेपर्यंत विनामूल्य पाहावयास मिळतील व करमणूकही होईल. निकालानंतर सर्व जण एकमेकांना सत्तेचा तिळगूळ देतील व पुढील पाच वर्षे सत्तेचा आस्वाद घेतील. विकासाचे मुद्दे बाजूला राहतील. खड्डेमुक्त-फेरीवालामुक्त मुंबई काही होणार नाही.

प्रवीण हिर्लेकर, डोंगरी (मुंबई)

 

 प्रवाशांना होणारे हे त्रास तरी थांबवा!

‘आव्हान पेलणार?’ हा अग्रलेख  (३० जाने.) वाचला. रेल्वेपेक्षा विमान, व बससेवेला प्रवासी अधिक प्राधान्य देत आहेत असे त्यात लिहिले आहे, ते खरेही आहे; कारण सध्या रेल्वेसमोर अनेक अडचणी आहेत, त्यामुळे सामान्य नागरिक रेल्वेपासून दुरावतो आहे. त्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षितता होय, कारण रेल्वेत अपरिचित सहप्रवाशांची संख्या जास्त असते. तसेच चोऱ्यांचे प्रमाणही वाढलेले आहे. पोलीस बंदोबस्त वाढविणे गरजेचे आहे, जेवणाची व्यवस्था अती खालावलेली असल्याने तात्काळ त्यामध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा कराव्यात, रेल्वे विभागातील बोकाळलेला भ्रष्टाचारसुद्धा कारणीभूत आहे, तृतीय पंथीयांची गुंडगिरी काही अंशी कारणीभूत ठरते. रेल्वेतील व्यावसायिकांची मुजोरी अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे सामान्य माणूस यापेक्षा चांगला पर्याय शोधत आहे. रेल्वे विभागाने तात्काळ या सुधारणा करण्यावर भर द्यावा तरच रेल्वे विभाग नफ्यामध्ये येईल.

प्रा. एस. डी. दराडे, औरंगाबाद

 

अपघातांमुळेही रेल्वे महसुलात घट

‘आव्हान पेलणार?’ हे संपादकीय (३० जाने.) येऊ  घातलेल्या अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेच्या प्राप्त परिस्थितीचा  उचित परामर्श घेणारा आहे. विशेष म्हणजे रेल्वेचे वाढते अपघात आणि त्यात होणारी प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी रेल्वेला आर्थिकदृष्टय़ा अधिकाधिक खड्डय़ात टाकत आहे. अलीकडचे  कानपूरनजीकच्या आणि आंध्रातील रेल्वे अपघातांकडे तर घातपाताच्या संशयाने पाहिले जात आहे. अशा वेळी मोठय़ा प्रमाणात असलेली (की पोसलेली?) रेल्वेसुरक्षा बलासारखी सुरक्षायंत्रणा काय करीत असते, हाही एक संशोधनाचा विषय आहे. एका आकडेवारीनुसार २०१४ या एकाच वर्षांत रेल्वे अपघातात २७५८१ लोक मृत्यू पावले. हे कशाचे द्योतक आहे?  तसेच आजकाल  लांब पल्ल्याच्या गाडय़ातून प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच झाले आहे. त्यामुळेही प्रवासी रेल्वे प्रवासापासून दूर जात आहेत.

 – प्रदीप शंकर मोरे, अंधेरी पूर्व  (मुंबई)

 

हात आदरानेही जोडले जातातच

‘आंबेडकरांच्या दैवतीकरणाचे काय?’ हे पत्र (लोकमानस, २६ जानेवारी) वाचले. कार्यालयातील आंबेडकरांच्या प्रतिमेला ‘देव’ मानून तिची ‘पूजा’ केली जाते, असे या पत्रातील म्हणणे, हे एक तर अभ्यास कमी पडल्याचे लक्षण आहे किंवा सरळ सरळ पूर्वग्रहदूषित वृत्तीचे. वर ‘पूजा करणाऱ्यांना थांबवण्याची हिंमत कोण करणार,’ असेही पत्रात म्हटले आहे. अशा वृत्तीला माझे सांगणे एवढेच की तसबिरीपुढे हात जोडणे म्हणजे श्रद्धा- पूजा एवढेच नसते. हात आदरानेही जोडले जातातच. हा आदर विशिष्ट वर्गालाच असावा असेही नाही. त्यासाठी डॉ. आंबेडकर यांचे कार्य माहीत हवे.

सचिन पवार, मुंबई

loksatta@expressindia.com