‘कृष्ण चतुर्थीला विशेष महत्त्व नाहीच!’ हे पत्र (लोकमानस, १३ फेब्रुवारी) वाचले. एकूण जगाचा किंवा मानवी जीवनाचा विचार केवळ भौतिक दृष्टीनेच करायचा, तिथे भावभावना, श्रद्धा अशा गोष्टींना काहीही महत्त्व नाही/ नसावे असा रोख त्यातून दिसतो. पण भोळ्या-भाबडय़ा गणेशभक्तांना अंगारकीच्या मोठमोठय़ा रांगांच्या त्रासातून वाचवण्याच्या उत्साहाच्या भरात, पत्रलेखक महोदयांनी त्यांच्या पूर्ण ‘भौतिक विचारसरणी’ची दुसरी बाजू (व्यत्यास, प्रतिपक्ष) काय आहे, ते विचारात घेतल्याचे दिसत नाही.

पत्रलेखकाच्याच पद्धतीने विचार केल्यास असे म्हणता येईल की, आपण सध्या सौर कालगणनेवर आधारित इंग्रजी कॅलेंडर वापरतो. त्यात कुठल्याही वर्षांत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर असे ३६५ दिवस, दर वर्षी एकदा निश्चितपणे येतातच (अपवाद फक्त २९ फेब्रुवारीचा, जी फक्त लीप वर्षांत, चार वर्षांतून एकदाच येते.). अगदी त्याचप्रमाणे, चांद्रमासावर आधारित सगळ्या तिथ्यासुद्धा शक कालगणनेनुसार वर्षांतून एकदा येतातच (तिथे अपवाद ‘अधिकमासा’चा). आता आपले बहुतेक सार्वजनिक सण (आणि अर्थात सुट्टय़ा) हे कुठल्या ना कुठल्या पौराणिक/ ऐतिहासिक घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरे केले जातात (उदा. अंगारकी चतुर्थी – अंगारक दैत्याचा श्रीगणेशाने केलेला वध). कोटय़वधी लोकांच्या भावभावना, श्रद्धा, आनंद, त्या विशिष्ट तारखा/ तिथींशी जोडलेला असतो. निव्वळ भौतिक दृष्टीने विचार केल्यास, घटना जेव्हा मुळात घडली, तेव्हाच तितकेच काय ते त्या दिवसाचे महत्त्व! (बाकी स्मृती, भावभावना इ. महत्त्वाचे नाहीत.) उदाहरणार्थ, भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट १९४७. बाकी १९४८ पासून, ते आजतागायत (आणि पुढेही) १५ ऑगस्टचे ‘दर वर्षी’ महत्त्व काय? शून्य?! अगदी त्याच पद्धतीने, असंख्य महापुरुषांचे जन्मदिवस, पुण्यतिथ्या, ऐतिहासिक, पौराणिक घटनांचे स्मृतिदिन, प्रेषितांचे जन्मदिन, एवढेच काय, पण सामान्य लोकांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, रौप्यमहोत्सवी/ सुवर्णमहोत्सवी सोहळे, ..असे सर्वच निर्थक/ ‘कमी महत्त्वाचे’(?) ठरते.

जर ‘कृष्ण चतुर्थीला विशेष महत्त्व नाहीच’,- तर दुसऱ्या कोणत्याही तिथी/ तारखेला (उदा.- गोकुळाष्टमी, महावीर जयंती, बुद्धपौर्णिमा, नानक जयंती, ख्रिसमस (२५ डिसेंबर), २६ जानेवारी, ३० जानेवारी, ऑगस्ट क्रांतिदिन..) महत्त्व का, कशासाठी ते तार्किकदृष्टय़ा सांगणे कठीण आहे.

संपूर्ण विश्व नि मानवी जीवन केवळ भौतिक नियमांनीच चालते, बाकीच्या गोष्टींना, भावभावना, श्रद्धा इ.ना महत्त्व नाही, असे मानल्यास अनावस्था ओढवेल. त्यामुळे भौतिक, तार्किक दृष्टिकोनाचा अतिरेक नको, एवढेच म्हणावेसे वाटते.

श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)

 

लाखांची पोशिंदीश्रद्धाच! खगोलशास्त्र नव्हे

‘कृष्ण चतुर्थीला विशेष महत्त्व नाहीच!’ हे लोकमानसमधील पत्र (१३ फेब्रु.)वाचले. अंगारकीचा खगोलशास्त्रीय व स्वबुद्धीने प्रत्येकाने कसा विचार करावा हे उत्कृष्ट पद्धतीने पत्रलेखकांनी सांगितले आहे, परंतु असा विचार जर प्रत्येकाने केलाच तर अंगारिकेला देवळासमोरील शेपटासारख्या रांगेचे व आत भरभरून वाहणाऱ्या तिजोरीचे काय? भारतात शैक्षणिक शाळांपेक्षा देवळांची संख्या निश्चितच जास्त आहे. जे पालक दिवसेंदिवस रांगेत उभे राहून आपल्या पाल्यास इंटरनॅशनल शाळेत भरती करण्याचा अट्टहास करताहेत तेच मंदिरासमोरील रांगेत देवदर्शनासाठी तिष्ठत आहेत!

या जनतेच्या श्रद्धेचे बाजारमूल्य कित्येक कोटींचे आहे. या श्रद्धेला जरी अवकाशातील खगोलशास्त्रीय दुर्बिणीतून पहिले तरीही जमिनीवर उघडय़ा डोळ्यांनी दिसणाऱ्या उकडीचे मोदक, माव्याचे मोदक-पेढे, हार, दूर्वा-फुले, उदबत्त्या, देवळांसमोरील उपाहारगृह, खानपान टपऱ्या, रिक्षा-टॅक्सी, पैसे घेऊन चपला सांभाळणारे स्वयंसेवक, कॅशलेसच्या दिवसात गणपतीसमोरील दान पेटीत पडणारे करोडो रुपये व तथाकथित गणपतीच्या रक्षक पुजारी इत्यादींच्या रोजीरोटीचा प्रश्न कसा सोडवायचा? हे सांगण्यास पत्रलेखक बहुधा विसरले असावेत! भारतात फारच कमी लोकांना समजणारे खगोलशास्त्रीय विज्ञान नव्हे तर लाखोंची पोशिंदी ‘श्रद्धा’ ही समाजात जगलीच पाहिजे हे पत्रलेखकांस सांगणे आवश्यक आहे!

प्रवीण आंबेसकर, ठाणे.

 

देशभक्ती साथ नाही ना दिली!

‘अमर्त्य अडाणी’ हा अग्रलेख वाचला (१३ फेब्रु.) अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या कर्तृत्वावर भाजपच्या पश्चिम बंगाल अध्यक्षांनी चिखलफेक केली, यात दोष या नेत्याला देता येणार नाही. एकदा सत्तेत गेले, की माणसे सत्ताधीश होतात म्हणजे कोणालाच जुमानत नाहीत. त्यातही पाशवी बहुमत असल्यावर तर बोलायलाच नको! (तब्बल ८०० वर्षांनी हिंदूंचे) मोदी सरकार स्वबळावर सत्तेत आल्यापासून हेच सुरू आहे. जेव्हा असहिष्णुतेच्या मुद्दय़ावरून साहित्यिकांनी ‘पुरस्कार वापसी’ सुरू केली त्याही वेळी बऱ्याच साहित्यिकांची यथेच्छ निंदानालस्ती भक्तांकरवी केली गेली होती.

आता नोबेल पारितोषिक विजेते असलेल्या अमर्त्य सेन यांनी नोटाबंदीसारख्या ‘देशभक्ती’च्या कामात साथ देण्याऐवजी इतर अर्थतज्ज्ञांप्रमाणे मोदी सरकारवर टीकेची झोड उठवल्यामुळे मोदींची प्रतिमा जगभर मलिन झाली होती; त्यामुळे सेन यांना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागणार होतेच (नशीब त्यांचे- ‘पाकिस्तानात जा’ म्हणून नाही सांगितले!) कारण सर्वशक्तिमान प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांनीच कधी हा असला विधिनिषेध पाळला नाही (ताजे उदाहरण राज्यसभेत डॉ.मनमोहन सिंग यांच्यावर ज्या भाषेत टीका केली, त्याचे) त्यामुळे घोष यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? राहिली गोष्ट वाजपेयी-अडवाणींच्या मोठेपणाची; तर वाजपेयी सध्या सक्रिय राजकारणातून निवृत्त आहेत व अडवाणी सध्या मुरली मनोहर जोशींसमवेत पक्षात ‘सर्वोच्च मार्गदर्शक पदा’च्या विजनवासात आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्यायला वेळ कोणाला आहे?

सचिन आनंदराव तांबे, पिंपळसुटी (शिरूर, जि. पुणे)

 

अटलजींचे औदार्य अंगीकारणे अनिवार्य

‘अमर्त्य अडाणी’ या अग्रलेखात (१३ फेब्रुवारी) नोंद घेण्यासारखी बाब होती ती म्हणजे अटलजी आणि अडवाणी यांचा करण्यात आलेला उल्लेख. वैचारिक मतभेद बाजूला ठेवून अटलजी व अडवाणीजी या दोघांमध्ये अमर्त्य सेनसारख्या ‘इंटलेक्च्युअल’ म्हणून गणल्या जाणाऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याची असलेली हातोटी ही पहिल्यांदाच समोर आली आहे. इथे सत्ताधारी आता देशातील आपल्या विरोधात असलेल्या वैचारिक फळीला उद्ध्वस्त करायला बसलेत असे दिसत आहे. नरेंद्र मोदींना खरोखर देश पुढे जायचे असेल तर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील उदारता आणि सहिष्णुता आत्मसात लवकर करावी लागेल.

अमेय फडके, कळवा (ठाणे)

 

महबूबउलहक यांचेही योगदान

जगाला कल्याणकारी अर्थशास्त्राची देणगी देणाऱ्या अमर्त्य सेन यांच्या कार्यावर व त्यांच्या बुद्धिमत्तेविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या बालिश विधानांचा समाचार घेणे आवश्यकच होते. मात्र या अग्रलेखात मानव विकास निर्देशांक (ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स) चा उल्लेख करताना, केवळ अमर्त्य सेन यांचेच नाव घेणे हे पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ महबूब-उल-हक यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. कारण मानव विकास निर्देशांकाचे रचनाकर्ते म्हणून महबूब-उल-हक यांचे योगदानही अमर्त्य सेन यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे. काही अर्थशास्त्रीय पुस्तकांमध्ये तर ‘मानव विकास निर्देशांकाचे जनक’ म्हणून महबूब-उल-हक यांचेच नाव आपणास आढळून येते.

एका बुद्धिवंताचा गौरव करताना, त्याच क्षेत्रात तितक्याच योग्यतेचे योगदान देणारा दुसरा बुद्धिवंत दुर्लक्षित राहू नये, यासाठी हा पत्रप्रपंच.

स्वप्निल गणपतराव पाटील, करंजवडे (वाळवा, जि. सांगली)

 

अमर्त्य यांच्यावर बौद्धतत्त्वज्ञानाचाही प्रभाव

‘अमर्त्य अडाणी’ (१३ फेब्रुवारी) या अग्रलेखात सेन यांच्या संस्कृत भाषेच्या अभ्यासाचा उल्लेख केला आहे. तो रास्त आहेच; पण सेन यांच्यावर असलेल्या बौद्ध धम्म आणि तत्त्वज्ञानाच्या प्रभावाचाही उल्लेख केला असता तर बरे झाले असते. सेन यांनी वेळोवेळी आपल्या मांडणीतून बुद्ध विचारांचा गौरव केला आहे. त्यामुळे त्यांच्या या वैशिष्टय़ाची दखल घेतली असती तर अग्रलेख अधिक वास्तववादी झाला असता.

प्रा. प्रवीण घोडेस्वार, नाशिक

 

समंजस प्रतिक्रिया भाजपकडून मिळेल?

‘अमर्त्य अडाणी’ हा अग्रलेख वाचला. (१३ फेब्रु.)आइन्स्टाइनच्या वचनाचा उपयोग करून त्यात राजकारण्यांना आपली जागा दाखवून दिली आहे, हे विशेष भावले. घोष यांनी सेन यांच्यावर मुक्ताफळे उधळताना विचार करणे गरजेचे होते; पण विचार करून बोलतील ते राजकारणी कसले? सेन यांनी मात्र विनयशील व लोकशाहीला साजेसे उत्तर देऊन मनाचा मोठेपणा दाखवला आहे. देशाच्या प्रगतीत आपले योगदान किती, हे राजकारण्यांनी एकदा स्वत:च स्वत:ला विचारावे. स्वत:च्या भाषेचा आणि देशाचा यथोचित अभिमान असणाऱ्या सेन यांच्यावरील मुक्ताफळांबाबत भाजपमधील आजचे वरिष्ठ नेते समंजस प्रतिक्रिया देतील काय?

हेमलता वाघराळकर, ठाणे

 

दुर्जनच दिसण्याची साथ महाराष्ट्रातही..

‘अमर्त्य अडाणी’ .. हा अग्रलेख भाजपच्या मन:स्थितीवर चांगलाच प्रकाश टाकणारा आहे. जेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले की ते पचवणेदेखील कठीण जाते. जसे दुयरेधनाला एकदा दरबारात विचारले की येथे किती सज्जन माणसे आहेत. साऱ्या दरबारावर दृष्टिक्षेप टाकत तो उत्तरला, मला तर सारेच दुर्जन दिसताहेत. तसेच काही भाजपच्या नेत्यांचे झाले आहे. आपल्याला विरोध म्हणजे तो देशद्रोहीच. अमर्त्य सेन यांना अडाणी संबोधून दिलीप घोष यांनी आपण कोणत्या लायकीचे आहोत, हेच जगाला दाखवून दिले आहे. दुर्दैवाने या रोगाची साथ महाराष्ट्रात देखील पोहोचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे शिकार झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या  निवडणूक-प्रचारात त्यांचाही तोल जाऊ  लागला आहे. त्याच्या तोंडी असलेली भाषा, मुख्यमंत्र्यांना शोभत नाही.

प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, वेसावे (मुंबई)

loksatta@expressindia.com