04 March 2021

News Flash

खटकणारे काही उल्लेख, काही अनुल्लेख..

जनचळवळीतील सहभागही उल्लेखनीय असतो.

आंध्र प्रदेशचा तंत्रज्ञ श्रीनिवास यांच्या अमेरिकेत झालेल्या हत्येची बातमी हाताळताना झालेले काही उल्लेख आणि अनुल्लेख खटकले.

भारतातील मोठय़ा प्रमाणात अनुदानित शिक्षण घेऊन येथील गुणवंत करीत असलेल्या देशांतराला आरक्षण जबाबदार आहे, असे म्हणणे हा भारतीय संविधानाप्रति अनादर दाखविणे आहे. एक तर ज्या खासगी क्षेत्रात हे तरुण काम करतात त्यात भारतातही अजून आरक्षण नाही. दुसरी आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे या आरक्षणाखाली नोकरी मिळालेले सर्व उमेदवार पात्र व गुणवंत नसतात, हे गृहीत तत्त्व. माझा अनुभव सांगतो की, तळागाळातून आलेले यातील बरेच जण चंगळवाद आणि ‘पैसे हेच मूल्य’ याचे शिकार नसतात. त्यांचा जनचळवळीतील सहभागही उल्लेखनीय असतो.

या हत्येप्रसंगी त्या उपाहारगृहात हजर असलेल्या मार्क नावाच्या ख्रिश्चन पाद्रीने दाखविलेले प्रसंगावधान आणि आस्था उल्लेखनीय होती. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि ख्रिस्तचरणी केलेली प्रार्थना तसेच ‘आम्हाला तुझी काळजी आहे’ असा आश्वासक भाव त्याच्या मृत्यूक्षणी त्याच्यार्प्यत पोहोचविण्यासाठी त्यांनी आणि आणखी दोन तरुण – व्हिन्स आणि स्किप- यांनी केलेला प्रयत्न नक्कीच उल्लेखनीय आहे. दुसरी उल्लेखनीय बाब म्हणजे किथ अँडरसन या सहायक अ‍ॅटर्नीने खुनी अ‍ॅडम प्युरिंटन याच्यावर जिल्ह्य़ाच्या न्यायालयात, ‘बेकायदेशीरपणे, हेतुपुरस्सर, पूर्वनियोजित कटाने खून’ केल्याचा गंभीर गुन्हा त्वरित दाखल केला. एवढेच नव्हे तर श्रीनिवासबरोबर असलेल्या आलोकच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही नोंदविला. त्यात आलोकसह १२० साक्षीदारांच्या नोंदी केल्या आहेत.

आता आपल्याकडील अशा बेकायदा खुनाच्या घटना बघा :

सोलापूरहून नोकरीसाठी आलेल्या मोईनुद्दीन या तरुण तंत्रज्ञाची पुण्यात भर दिवसा हॉकीच्या काठय़ांनी मारून हत्या करण्यात आली. एकही साक्षीदार नाही. बिननावी गुन्हेगारावर गुन्हा दाखल.

दादरी येथे ५२ वर्षीय अकलाखची काठय़ा-दगडांनी मारून हत्या आणि त्याच्या मुलाला मारहाण झाली. गोहत्येच्या सकृद्दर्शनी पुराव्यावर अकलाखवरच ‘एफआयआर’ दाखल.

नाशिकमध्ये बिहारी बांधकाम करणाऱ्या कामगारांचे हात कलम केले. परप्रांतीय कामगार चंबूगवाळे घेऊन निघून गेले. कित्येक दिवस बांधकाम ठप्प होते.

हा फरक भेदक वाटतो.

आम्ही काय बघावे, काय बोलावे आणि काय ऐकावे हे ठरविणाऱ्या रानटी शक्ती मोकाट सुटल्या आहेत. जगातील दोन मोठय़ा लोकशाहीची तुलना करताना भारतात लोकशाहीचा एकेक खांब धोक्यात तर नाही ना, अशी काळजी वाटते.

प्रभा पुरोहित, मुंबई

 

मानव तितुका एकचनाही, तोवर..

आज अमेरिकेत जे घडते आहे ते पाहिल्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष (१९६३-६९) लिंडेन जॉन्सन यांचे प्रसिद्ध वाक्य kThe world has narrowed into neighbourhood, but it has not widened into brotherhood (जग एकमेकांच्या शेजारी आल्याइतके लहान जरूर झाले, पण  बंधुभाव वाढण्याएवढे मोठे झाले नाही) आठवते. प्रवासाची आणि संपर्काची साधने यामुळे जग लहान होत चालले आहे, देश एकमेकांच्या जवळ येत आहेत हे मान्य केले तरी मानव तितुका एकच आहे हे मनात रुजण्याएवढी सांस्कृतिक प्रगती होणे अजून दूरच आहे हे कटू सत्य आहे. तोपर्यंत मुंबईतल्या काय किंवा अमेरिकेतल्या ‘भय्यां’चे प्राक्तन बदलणार नाही. प्रादेशिक अस्मिता किंवा भूमिपुत्र या संकल्पना घेऊन तात्कालिक फायद्याचे राजकारण करणारे पुढारी सर्वत्र निर्माण होताना दिसतात आणि ट्रम्प हे महासत्तेच्या प्रमुखपदी निवडून आल्याने त्याचे बृहद् रूप दिसू लागले आहे.

गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई).

 

अरब वाटले म्हणून हत्या

‘त्रिशंकू ‘भय्यां’चे प्राक्तन’ हा लेख  (२७ फेब्रु)अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे. संपादकीय शीर्षक केवळ आकर्षित करण्यास वापरले आहे. त्याचा अमेरिकेत घडलेल्या भारतीय नागरिकाच्या हत्येशी संबंध जोडण्यास समर्पक वाटत नाही. लेखात आहे की, श्रीनिवास तेलगू भाषिक मंडळाचा अधिकारी होता. म्हणून त्याचा बळी घेतला गेला आणि आंध्र प्रदेशातील लोकांच्या हत्या होतात ही पुष्टी योग्य नाही. ही हत्या एका अमेरिकन नेव्हीमधून निवृत्त झालेल्या माणसाने केली. त्याला हे भारतीय परदेशी/ अरब देशातील वाटले. त्याला भारतीय आणि त्यात ते तेलगू भाषिक आहेत हे माहीत नव्हते. हत्या झाली तेव्हा श्रीनिवास आणि त्याचे मित्र आपल्या कंपूत वावरत नव्हते किंवा ते आपल्या डबक्यात नव्हते, तर अमेरिकन स्पोर्ट्स बारमध्ये होते. हे त्याचे अमेरिकन संस्कृतीत सामावणे नव्हते का?

अमेया पाठारे, मुंबई

 

तरीही हत्या का होतात?

‘त्रिशंकू ‘भय्यां’चे प्राक्तन’ या अग्रलेखातून भारतीयांना आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. देशांतर्गत अन्याय- अत्याचारात शेकडो मारले जात असताना आपल्याकडे त्यावर फार चर्चा होत नाही, मात्र परदेशात एक जरी भारतीय मारला गेला तर गहजब केला जातो. अगदी परराष्ट्र मंत्रालयापासून मानवाधिकार आयोग चर्चेत उतरते. जणू भारत सरकारने यांना मोहिमेवर पाठविले होते अशा थाटात पीडितांची बाजू मांडली जाते. भारतात ६७४३ जाती आणि अनेक धर्मात विभागून लोक राहतात. ‘विविधता मे एकता’ असे आपण म्हणत असलो तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. जातीय अत्याचार खूप मोठा आहे. समानता आपल्याकडे कागदोपत्री आढळते. अमेरिकेत हा रोग नाही (पूर्वी असेलही). तेथे जातीसाठी माती खात नाहीत. तरीही हत्या का होतात?

नाना चालखुरे, चंद्रपुर

 

संस्कारांचा अभिमान वाटायला हवा

‘त्रिशंकू ‘भय्यां’चे प्राक्तन’ या अग्रलेखात (२७ फेब्रुवारी) गुणवंतशाही (मेरिटोक्रसी) ची आपल्या देशात असलेली आवश्यकता हा मुद्दा पटणारा आहे; परंतु बाकी मुद्दे अमेरिकेतील भारतीयांची जीवनशैली पूर्ण जाणून न घेता लिहिलेले दिसतात. मुळात मूळ अमेरिकन्स जेमतेम शालेय शिक्षण पूर्ण होत असतानाच निम्नस्तरीय नोकरी पत्करून संसाराला लागतात. महाविद्यालयीन शिक्षण महाग असते आणि डेटिंग, मुक्त लैंगिक व्यवहार या तेथील प्रचलित संस्कृतीमुळे त्यांच्यात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यात वेळ न घालविता वैवाहिक जीवन लवकर सुरू करण्याची प्रवृत्ती प्रबळ असते या वस्तुस्थितीचा या अग्रलेखात विचार केलेला नाही. याउलट भारतीय तरुणांनी प्रथम स्वदेशात उच्च शिक्षण पूर्ण केलेले असते व अमेरिकेत जाऊन तेथील एम.एस., एम.बी.ए. या पदव्या मिळविण्यासाठीदेखील ते अपार कष्ट घेतात. त्यामुळे त्यांना नोकरीत चांगल्या संधी मिळून त्यांचे जीवनमान मूळ अमेरिकन तरुणांपेक्षा उच्च दर्जाचे असल्याचे बरेचदा पाहावयास मिळते. आर्थिक दरी आणि जीवनमानातील हा फरक ही मूळ अमेरिकन्सच्या मनात भारतीयांविरुद्ध निर्माण झालेल्या असूयेची खरी कारणे आहेत, या एका महत्त्वाच्या वस्तुस्थितीचा उल्लेख अग्रलेखात झालेला नाही.

आपली जातीयता, आपल्याच समाजात रमण्याची वृत्ती तेथील भारतीय जपतात व अमेरिकन संस्कृतीत सामील होत नाहीत, असा आक्षेप अग्रलेखात आहे. मौंजीबंधन, केवळ भारतीयांशीच विवाह करणे या प्रवृत्तीस जातीय, संकुचित ठरवून अमेरिकन भारतीयांवर टीका केलेली आहे. तीदेखील योग्य वाटत नाही, कारण अमेरिकन संस्कृतीत सामील होण्यासाठी तेथे प्रचलित असलेल्या डेटिंग, मुक्त लैंगिक व्यवहार अशा प्रथा भारतीय अमेरिकन युवावर्ग प्रयत्न केला तरी अंगीकारू शकणार नाही. एकनिष्ठेवर आधारित असलेल्या विवाहसंस्थेचे शतकानुशतके रुजलेले संस्कार ते विसरू शकत नाहीत याचा खरे म्हणजे अभिमान वाटावयास हवा. प्रत्यक्षात तेथील भारतीयांचे वैवाहिक जीवन पाहून मूळ अमेरिकन्स त्यांचा हेवा करतात. मूळ अमेरिकन तरुण व भारतीय तरुणी असे विवाह झाल्यास दोघेही सुखी होतील, असे उद्गार मी काही मूळ अमेरिकन्सच्या तोंडून ऐकले आहेत.

ट्रम्प यांच्यासारखी व्यक्ती अध्यक्ष असल्यामुळे या सर्वाच्या प्राक्तनाबाबत व्यक्त केलेली चिंता आणि आपल्या देशात गुणवंतशाही यावी, ही व्यक्त केलेली अपेक्षा हे केवळ दोनच मुद्दे अग्रलेखाच्या जमेच्या बाजूस दिसतात.

विवेक शिरवळकर, ठाणे

 

गुणवंतांना येथेच सामावून घेण्याचे पाहावे

अमेरिकेतील भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भातील संपादकीय (२७ फेब्रु.) समर्पक आहे. आता तरी आपल्या देशातील काही गुणवंत मंडळी येथेच राहण्याचा विचार करतील असे वाटते. तसेही अलीकडच्या पिढीतील विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठीच डेव्हलप करणे हे एकमेव ध्येय असलेले असंख्य आईबाप समाजात आहेत; परंतु आता तरी अमेरिकेत घडणाऱ्या घटनांबद्दल सगळ्यांनीच गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. मायबाप सरकारने आपल्या गुणवंतांना येथेच कसे सामावून घेता येईल हे पाहावे. तसेच फक्त पैसाच हे एकमेव ध्येय ठेवून परदेशी गेल्यावर कदाचित ‘भय्यांचे’ जिणे नशिबी येऊ  शकते, हेही ध्यानी ठेवावे.

राम राजे, नागपूर [बदलती अमेरिकी धोरणे ओळखून सरकारने आपल्या देशातील संधी वाढवतील असे पाहावे, अशी अपेक्षा ठेवणारे पत्र अजित कवटकर (अंधेरी, मुंबई) यांनीही पाठविले आहे] 

 

असाही पारदर्शकपणा..

राज्यातील भाजप सरकारने संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा स्मारकावर पारदर्शकतेची शपथ घेऊन दिखाऊपणाचा नारळ फोडला. वास्तविक ज्या केंद्रातल्या भाजप सरकारने महाराष्ट्र विधानसभेचे मतदान आटोपताच बेळगावचे नामकरण ‘बेळगावी’ करण्यासाठी मान्यता देऊन समस्त सीमाभागातील मराठी जनांच्या जखमेवर मीठ चोळले, अशा पक्षातील हौशागवशांनी संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा स्मारकापुढे जाणे, हाच त्या स्मारकाचा खरा अपमान. त्याहीनंतर नुकतेच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचे नाटक झाले. विशेष म्हणजे त्यात सोमय्या, पुरोहित, मेहता हे पारदर्शक असल्याने दिसून येत नव्हते. मुख्यमंत्र्यांनी रायगडाच्या पायथ्याशीच, जिजाऊंच्या वाडय़ाजवळ जाण्यासाठी वेळ ठेवला असता, तर त्यांना आपल्या केंद्र सरकारचे पुरातत्त्व खाते किती पारदर्शक काम करते याची जाणीव झाली असती.

तरंग राजाध्यक्ष, बदलापूर

loksatta@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 3:36 am

Web Title: loksatta readers letter 266
Next Stories
1 अमेरिकेची वाटचाल घातक दिशेने
2 काजळी घालवण्यासाठी विचारवंतांनी पुढे यावे
3 ‘डॉक्टरी’ प्रयोगांची तरी चिकित्सा होऊ दे!
Just Now!
X