12 December 2017

News Flash

‘ब्रेन वॉश’पेक्षा, आधी स्वतला सुधारा!

भारतीय जनमानस कोणत्याही परिस्थितीत आपले वैयक्तिक स्वातंत्र्य हिसकावू देईल, असे मला वाटत नाही.

लोकसत्ता टीम | Updated: July 19, 2017 2:27 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नवी घोषणा (लोकसत्ता, १८ जुलै) पाहून  ‘..भिंतीला तुंबडय़ा लावी’ ही म्हण आठवली. पन्नासेक वर्षांपूर्वी ‘समाजवादी’ नावाचे समाज उद्धाराचे ठेकेदार, हिंदू सणवार/ परंपरा यांविरुद्ध चाळीचाळींत जाऊन कंठशोष करीत, मग काँग्रेसी सर्वधर्मसम‘भाव’वादी एका ठरावीक धर्माचे लांगूलचालन करू लागले. ज्या महात्म्याच्या जिवावर सत्ता भोगत होते, त्याची तत्त्वे धाब्यावर बसवून महसुलासाठी, मतांसाठी  देशी ‘जागृती’ गाळू लागले. आणि ज्या कट्टर हिंदुत्ववाद्यांनी पुण्यात ‘चहा प्यायला’ (त्या काळात चहा पिणे हा पण धर्मद्रोह समजला जायचा) म्हणून लोकमान्य टिळकांनाही प्रायाश्चित्त घ्यायला फर्मावले, त्यांचेच हे  वारसदार आज ‘मोदीजी चहा विकायचे’ म्हणून १२ इंच छाती फुगवून सांगत आहेत!

वास्तविक संघातील किती जणांची मुलं नातवंडे  स्थानिक भाषेतील माध्यमात शिक्षण घेत आहेत? किती जणांची मुले, मुली, सुना ‘यूएस’मध्ये स्थायिक आहेत? याचाही गोषवारा द्या ना! लोकांचे ‘ब्रेन वॉश’ करण्यापेक्षा एकदा स्वत:ला सुधारा. समाज काळाप्रमाणे बदलतो, काल व्हॅलेंटाइन डेला विरोध करणाऱ्या संघटनांचे कार्य करते आज ग्रीटिंग्ज, भेटवस्तूंचे स्टॉल लावून चांगला व्यवसाय करत आहेत. हिंदू संस्कृतीला कोणतेही बंधन नाही, कोणतीही लिखित संहिता नाही, एकच आहे की, ‘फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहणे’..

आम्ही गणपतीला पडदा लावून गौरीला मटणाचा नैवेद्य दाखवतो, अनेक जातींच्या कुलदैवतांना तर बोकड आणि दारूचा नैवेद्य लागतो. होळीला देशावर बायका घराबाहेर पडत नाहीत; तर कोकणात होळीची पूजा-नैवेद्य झाल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाहीत, आमचा धर्म गल्लीगणिक, घरागणिक बदलतो तरी आम्ही कट्टर हिंदू आहोत.

कसे वागावे, कसे आचरावे हे शिकवायला खूप संतसाहित्य उपलब्ध आहे.. त्यात गल्लीबोळांत दादा, बापू, बाबा, आई, माई यांचा सुळसुळाट आहेच, त्यात संघाचे पोपटपंची कार्यकर्ते आम्ही घरात काय करावे हे शिकवायला नकोत. आधी तुमच्या नेत्या-कार्यकर्त्यांना शिकवा. महाराष्ट्राचा केक कापून ‘विदर्भ वेगळा’ काढला तेव्हा तुमचा धर्म कोठे गेला होता?

आतापर्यंत मराठी लोकांवर कोणी केला नसेल एवढा मोठा तो आघात होता.

लोक स्वत: काय ते ठरवतील. नोटाबंदी करून लिटमस टेस्ट केली, आता टेस्ट टय़ूब टेस्ट करता काय? ही एकप्रकारे मुस्कटदाबी आहे. असेच चालत राहिले तर पुढील २५ वर्षांत परत बायका घरात बसतील, डोक्यावर पदर, बोडकी करणे, अगदी सतीची चालसुद्धा परत येईल आणि त्याला सुंदर धार्मिक मुलामापण दिला जाईल. पुरुषांनी आपली थोबाडे बंद ठेवली आणि तथाकथित नेत्यांच्या हो ला हो म्हटले की ते स्वैराचार करायला  मोकळे झाले, हा जगाचा इतिहास आहे. भारतीय जनमानस कोणत्याही परिस्थितीत आपले वैयक्तिक स्वातंत्र्य हिसकावू देईल, असे मला वाटत नाही.

कमलाकर मोरेश्वर जोशी, परळ (मुंबई)

 

कुटुंब, समाजासाठी संवाद गरजेचाच

‘वस्त्र असो द्यावे देशी.. केक न कापावा वाढदिवशी!’ या घोषवाक्यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुटुंब समाज प्रबोधनाची बातमी वाचली. हा खरोखरीच एक स्तुत्य उपक्रम आहे आणि त्याची अत्यंत गरज आहे. आजकाल कौटुंबिक संवाद हरवत चाललेले आहेत. संवाद झालेच तर मोबाइल, संगणक/ लॅपटॉप या माध्यमांतून. त्यामुळे परस्परांशी बोलणे, संवादातून होणारे हावभाव, त्यातून निर्माण होणारी माया/ आपुलकी हीदेखील हरवत चालली आहे. पर-संस्कृतीला विरोध न करता आपली संस्कृती जपून, ती अधिक कशी व्यापक होईल याचा विचार आणि आचरण करणे ही खरोखरीच भविष्याची गरज आहे. कारण संवादातूनच एकमेकांचे विचार, मते प्रकट होत असतात. त्यातून सुशिक्षित-सुदृढ कुटुंबव्यवस्था साकारत असते. स्वाभाविकच त्याचे समाजव्यवस्थेवर सुद्धा प्रतििबब उमटत असते. म्हणूनच एकूणच कुटुंब आणि समाजव्यवस्था पाहता अशा प्रबोधनाची नितांत गरज आहे.

पुरुषोत्तम कृ. आठलेकर, डोंबिवली.

 

प्रसारासाठी मूल्ये वलयांकितव्हावीत

मुळात विदेशी संस्कृती काही ब्रिटिशांनी घरोघरी जाऊन प्रबोधन केल्यामुळे पसरलेली नाही. जेत्यांची भाषा, संस्कृती, आचारविचार हे आपोआपच ‘रोलमॉडेल’च्या स्वरूपात बघितले जातात आणि म्हणूनच स्वीकारलेही जातात. संघाला ज्या भारतीय मूल्यांचा प्रसार करायचा आहे, ती अशीच ‘वलयांकित’ कशी होतील याचा संघाने गंभीरपणे विचार केला पाहिजे. प्रबोधन मुद्दाम करून होत नाही, ते नकळत आणि आपोआपच व्हावे लागते हे प्रचारभान संघाने दाखवायची गरज आहे.

प्रसाद दीक्षित, ठाणे

 

विमानतळांवरही ज्योतिषी ठेवणार की काय?

मध्य प्रदेश सरकारने बाह्य़रुग्ण विभागात ज्योतिष्यांमार्फत रोगनिदान करण्यासाठी सेवा उपलब्ध केल्याची बातमी (लोकसत्ता, १८ जुल ) वाचली. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर धर्मग्रंथ, धार्मिक प्रतीके, ज्योतिष, देवदेवता आदी बाबींचे स्तोम वाढल्याचे दिसते. या बाबींचे समर्थन आणि प्रदर्शन सरकारी पातळीवरून होताना दिसते. वास्तविक माणूस व्यक्तिगत आणि सामजिक पातळीवर या गोष्टींबाबतच्या आस्था आणि श्रद्धा जपतच असतो, हे जितके खरे तितकेच आज प्रगत आधुनिक वैद्यकशास्त्राने अनेक दुर्धर आणि असाध्य रोगांवर उपचार शोधून ते नियंत्रणात आणले आहेत हेही खरे. त्या उपचारांचा लाभ हजारो रुग्णांना – लोकांना होतो आहे.

सुश्रुत, चरक या पुरातनकालीन महान वैद्यकांनी विकसित केलेली औषधोपचार आणि शस्त्रक्रियेची पद्धती आजदेखील जगन्मान्य आहे. आपल्या देशात अनेक थोर समाजसेवकांनी अंधश्रद्धानिर्मूलनासाठी आपले आयुष्य वेचून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविला. रुग्णसेवेबरोबर असा ज्योतिषविषयक सल्ला देण्याचा चुकीचा पायंडा पाडणे हे या सर्व लोकांच्या कार्याचा आणि संशोधनाचा अपमान करण्यासारखेच आहे .उद्या रेल्वे स्थानक आणि विमानतळावर प्रवाशांसाठी अशी सेवा उपलब्ध झाल्यास नवल वाटायला नको!

रविराज गंधे, गोरेगाव (मुंबई).

 

संरक्षणमंत्री तरी लवकर नेमा..

‘डोकलामची डोकेदुखी’ हा संतोष कुलकर्णी यांचा लालकिल्ला सदरातील लेख (१७ जुल) वाचला. भारत व चीनचे सन्य भूतानमधील डोकलामच्या निमित्ताने एकमेकांपुढे उभे ठाकलेल्या परिस्थितीत, अतिशय संवेदनशील झालेल्या संरक्षण खात्याला स्वतंत्र मंत्रीच नाही ही खरी डोकेदुखी झाली आहे.

देशापेक्षा छोटे गोवा राज्य मोठे समजून, संरक्षणमंत्री पर्रिकरांना गोवा ‘सर’ करायला पाठवले (पर्रिकर संरक्षण खाते चांगले सांभाळत होते.).

तिन्ही दलांच्या प्रमुखांच्यावर एक प्रमुख नेमून सारी पुनर्रचना करण्याची योजना तरी लवकरात लवकर अमलात आणावी. कुठच्याही समस्येवर समिती नेमण्याची घाई असते (लेफ्ट. जन. शेकटकर समिती). परंतु त्यांनी दिलेल्या अहवालावर निर्णय घेण्यास दिरंगाई का होते? ज्येष्ठ  विचारवंत अनुभवी नेत्यांची पक्षात उपेक्षा होताना दिसून येते.

चीनची एकाधिकारशाही झोपाळ्यावर झुलत बसणारी नाही हे लक्षात ठेवायला हवे.

श्रीनिवास स. डोंगरे, दादर, मुंबई

 

इतिहास समजण्यासाठी चित्रपट कापू नये..

काँग्रेसची बदनामी आणीबाणीच्या काळात झालीच. आता  बदनामीचा मुद्दाच नाही; फक्त नवीन पिढीला आणीबाणी म्हणजे काय असते व तिचे देशावर झालेले गंभीर व दीर्घ परिणाम तसेच इंदिराजींनी त्यासाठी केलेले अवाजवी प्रताप समजणे हे इतिहास म्हणून आवश्यक आहे. पाठय़पुस्तकातील धडे, ‘इंदू सरकार’ हा चित्रपट आणि अन्य काही गोष्टींबद्दल काँग्रेसने न हसविणारे विनोद करणे म्हणजे त्यांचा पाय अजूनही अपयशाच्या खड्डय़ात जातो आहे याचे लक्षण, हे तरी भान ठेवावे आणि ‘इंदू सरकार’ हा चित्रपट जसाच्या तास प्रदíशत होऊ द्यावा.

अमोल करकरे, पनवेल

 

वादामुळे प्रसिद्धी मिळेल, प्रतिभेचे काय?

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ‘इंदू सरकार’ या आगामी चित्रपटातील इंदिरा गांधी-संजय गांधी यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह चित्रणाबद्दल पुण्यापाठोपाठ नागपूरला उग्र निदर्शने करण्यात आली. निरीक्षण केले तर असे आढळेल की, मधुर भांडारकर, संजय भन्साळी आणि करण जोहर यांच्याच चित्रपटांबद्दल जनतेत वारंवार रोष निर्माण होतो. भन्साळी यांनी राणी पद्मावतीला बदनाम केले. जोहर यांनी महमद रफी यांची टिंगल केली आणि आता भांडारकर यांनी इंदिरा गांधींबद्दल काही तरी विपर्यस्त दाखविले आहे. यापूर्वी महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, लोकमान्य टिळक, भगत सिंह या थोर व्यक्तींवर चित्रपट येऊन गेले, पण त्या वेळी चुकूनही अशी ओरड झाली नव्हती. मग आताच का व्हावी? अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली आम्ही काहीही करू शकतो ही गुर्मी त्यामागे आहे.

प्रतिभावंत गीतकार-दिग्दर्शक गुलजार यांनी १९७५ साली सुचित्रा सेन-संजीव कुमार या अव्वल कलावंतांना घेऊन इंदिरा गांधी यांच्याच जीवनाशी साधम्र्य राखणाऱ्या कथेवर ‘आँधी’ हा चित्रपट निर्माण केला होता. त्यावर काही काळ बंदी आलीही होती; पण तो प्रदíशत झाल्यावर त्यात आक्षेपार्ह असे काहीच आढळले नव्हते. उलट गुलजार यांच्या क्लासिक चित्रपटांमध्ये तो कायमचा अग्रभागी जाऊन बसला. भांडारकर, भन्साळी आणि जोहर हे तिघे गुलजार यांच्या प्रतिभेच्या जवळपास तरी जाऊ शकतील काय? तेव्हा चित्रपट प्रमाणन मंडळाने ‘इंदू सरकार’बद्दलच्या आपल्या भूमिकेवर (२० कट) ठाम राहावे; त्याशिवाय हा चित्रपट संमत करू नये, असे प्रामाणिकपणे वाटते.

अनिल रा. तोरणे, तळेगाव दाभाडे

loksatta@expressindia.com

First Published on July 19, 2017 2:27 am

Web Title: loksatta readers letter 298