‘कुतूहल’ सदरातील शिरीष वृक्षावरील लेख (२१ व २२ मार्च) वाचून माहितीत भर तर पडलीच, पण भलेबुरे संस्कृती-विशेष कसे ठायी ठायी दिसतात तेही जाणवले. विलायती शिरीषाची फुलं दिसण्याच्या बाबतीत जरी उजवी वाटली तरी सुगंधाच्या बाबतीत आपुला शिरीष भाव खाऊन जातो असे लेखात म्हटले आहे. आपले गावठी गुलाब, बकुळ, जाई-जुई, प्राजक्त, चाफा, निशिगंध, रातराणी अशा अनेक देशी फुलांची तुलना बोगनवेल, बहावा, जरबेरा, कान्रेशन, मे-फ्लॉवर, चिनी गुलाब, टय़ुलिप्स अशा विदेशातून जगभर पसरलेल्या फुलांशी केली तरी हेच दिसते. अनेक देशी फुलांचे आयुर्वेदिक उपयोगही (उदा. गुलकंद) आपल्याला माहीत असतात. फळांच्या बाबतीत चेरी, स्ट्रॉबेरी, किवी, पीच अशी दिसायला आकर्षक अनेक विदेशी फळे आहेत, पण रंग, गंध, चव आणि आहारमूल्य अशा सगळ्या गुणांचा समुच्चय घेऊन येणाऱ्या ‘आपल्या’ आंब्याला तोड नाही. दिसायला अत्यंत बेढब अशा फणसाचेही तेच! अंगी अनेक गुण असूनही दिखाऊ बडेजाव करणे जमत/आवडत नसल्यामुळे अनेक भारतीय लोक परदेशी लोकांच्या तुलनेत प्रभाव पाडू शकत नाहीत असे दिसून येते; त्याचीच प्रचीती फळाफुलांच्या जगातही येते की काय असा गमतीदार विचार मनात येतो. (विलायती शिरीष आपल्याकडे जितक्या प्रमाणात लावला गेलाय तितक्या प्रमाणात आपला शिरीष का लावला नाही अशी खंतही लेखात दिसतेच!) शिरीषाच्या वाळलेल्या शेंगा खुळखुळ वाजतात म्हणून त्यांना ‘वूमन्स टंग’ म्हणतात! काही गोष्टी मात्र कुठच्याही संस्कृतीमध्ये अगदी ‘तश्श्याच’ असतात हेच खरे!
– विनीता दीक्षित, ठाणे

लग्नाच्या मोसमातच सराफी कामगारांची दैना
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेतच, त्यात आता सराफी काम करणाऱ्या कामगारांचीही परिस्थिती अवघड झाली आहे. तीन आठवडय़ांपासून सराफांचा संप सुरू आहे. खरे तर नवीन कायद्याचा परिणाम १२ कोटींहून अधिक उलाढाल असणाऱ्या बडय़ा सराफी व्यावसायिकांवर होणार आहे, पण सरकारवर दबाव वाढावा म्हणून त्यांनी सर्वच सराफांना वेठीस धरले आहे. ऐन लग्नाच्या हंगामात सराफी दुकाने बंद असल्यामुळे हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने या कामगारांच्या भवितव्याचा विचार करावा. सराफी संघटनांनीही लहान व्यापाऱ्यांचा विचार करावा.
– मनीषा नागरे, नागपूर</strong>

बोंबा मारणाऱ्या सर्वानीच हे लक्षात घ्यावे
‘देऊन टाका दर्जा’ हा ‘उलटा चष्मा’ वाचताना (२३ मार्च) एक गोष्ट लक्षात आली की होळी न पेटवता शिव्यांची लाखोली वाहून सदासर्वकाळ शिमगा कोण आणि का करतात. ज्यांना परिस्थिती बदलता येत नाही त्यांना निदान इतरांवर त्याचे खापर फोडून आपण काहीतरी करत आहोत असे खोटे (कृतक आणि लटके) का होईना समाधान मिळत असावे. ‘विधायक नही तो विनाशक सही’ ही केवळ संसदेतील किंवा विधानसभेतील विरोधी पक्षीयांचीच नव्हे तर सर्व सामान्यांचीही मनोवृत्ती असते. त्यातूनच बस किंवा गाडीमध्ये आवेशात गटागटात चर्चा रंगतात. त्याचीच सुधारित आवृत्ती वाहिन्यांवर होणाऱ्या चर्चात्मक कार्यक्रमात दिसते. एकूण काय तर बारमाही चालणाऱ्या शिमग्यापाठीमागे नाकत्रेपणाचे कवित्व अथवा टीका करण्याचे कर्तृत्व आहे हे बोंबा मारणाऱ्या आपण सर्वानीच लक्षात घ्यायला हवे!
-गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

शाब्दिक दहशतवाद नको
‘इस्लामची इभ्रत’ हे संपादकीय (२५ मार्च) वाचले. अग्रलेखाच्या आशयाशी दुमत असण्याचे कारण नाही, परंतु त्यात वापरलेल्या संज्ञा (टर्मिनॉलॉजी) ही थोडी खोडसाळ वाटावी अशी आहे. स्वत:च्या कृष्णकृत्यांना धार्मिक वेष्टण लावून त्याचे उदात्तीकरण व्हावे, या उद्देशाने काही गुंडदेखील धर्माचे नाव घेत असतात. त्यांच्या गुंडगिरीला आपणही ‘इस्लामी’ वगरे शब्द वापरून एकप्रकारे अप्रत्यक्ष मदतच करत असतो. खरे म्हणजे त्या गुंडांना पूरक असा हादेखील एकप्रकारचा शाब्दिक दहशतवादच म्हणावा लागेल. िहदू धर्मीयांचे धर्मातर घडवून आणणाऱ्या ख्रिश्चन नन्सवर बलात्कार करणाऱ्यांना जसे कुणी  बलात्कार’ किंवा ‘आध्यात्मिक बलात्कार’ संबोधत नाही, तसेच तथाकथित मुस्लिमांनी काही वाईट केल्याची जबाबदारी ‘चंदा’ मिळविण्याकरिता काही मुस्लीमसदृश संघटना उचलत असल्या तरीही त्यांना ‘इस्लामी दहशतवाद’ संबोधले जाऊ शकत नाही. कारण इस्लाम हा शब्द ‘सलाम’ शब्दापासून तयार झालाय. सलाम म्हणजे सलामती, शांती. त्यामुळे ‘इस्लामी दहशतवाद’चा अर्थ ‘शांतीपूर्ण दहशतवाद’ असा विसंगतीपूर्ण ठरतो. सदर अग्रलेखात ‘इस्लाम या समस्येने ग्रासलेले..’ असेही आक्षेपार्ह विधान करण्यात आले आहे. या विधानावरून दुसऱ्या एखाद्या समाजाने ‘खळ्ळ खटॅक’ केले असते. परंतु इस्लामी शांतीवादी शिकवणीचाच हा परिणाम आहे की आम्ही फक्त वैचारिक प्रतिवाद करत आहोत. प्रसिद्धी माध्यमांच्या खोचक, बोचक शब्दावलीचा ‘शाब्दिक दहशतवाद’देखील कडवेपणाच्या आगीत कधी कधी तेल ओतण्याचे काम अनवधानाने करत असतात. यापुढे काळजी घ्यावी, ही विनंती!
– नौशाद उस्मान, कुर्ला (मुंबई)

शिवजयंती तिथीप्रमाणेच हवी!
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे आज (२६ मार्च) जयंती आहे. ते एक नित्य प्रेरणेचा स्रोत आहेत. काही लोक शिवजयंतीचा उगाच घोळ घालत आहेत. आपण दिवाळी, दसरा, पाडवा हे सर्व सण तिथीप्रमाणे साजरे करतो. तसेच रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, भगवानबुद्ध जयंती, गुरू नानकदेव जयंती – हेदेखील तिथीप्रमाणेच साजरे करतो. स्वत: छत्रपती महाराजांनी, जे जे स्वत्त्व नष्ट करणारे ‘परके’ होते ते ‘परकी’ नष्ट करून पुन:स्वत्त्व स्थापित केले! उदा. फारसी/अरबीमधून चालणारा बहुतेक सर्व राज्यव्यवहार- महाराजांनी तो स्व-भाषेत – म्हणजे मराठीत चालू केला. मराठीबरोबर तिथी व शके आलेच! िहदूंचे जे जे परकीयांनी नष्ट/भ्रष्ट केले, ते ते महाराजांनी पुनरुज्जीवित केले! या पाश्र्वभूमीवर महाराजांची जयंती ही तिथीप्रमाणेच साजरी व्हायला हवी!
– राजेश पाटील, पुणे</strong>