डाव्या पक्षांची अवस्था मार्मिकपणे मांडणारा ‘करात करंटे’ हा अग्रलेख (२३ जानेवारी) वाचल्यानंतरही, सीताराम येचुरींना विरोध करणारे प्रकाश करात ‘करंटे’असे म्हणणे योग्य ठरत नाही असे वाटले. लेखातच उल्लेख केल्याप्रमाणे प्रकाश करात हे केरळातील डाव्या गटाचे नेतृत्व करतात आणि केरळची राजकीय परिस्थिती पाहिली तर डाव्यांचा प्रमुख विरोधी पक्ष हा काँग्रेसच आहे, तेथे संघ किंवा भाजपची ताकद फक्त संघटनेपुरती मर्यादित आहे. त्यामुळे केरळात काँग्रेसला सोबत घेऊन चालणे हे डाव्यांना राजकीय फायद्याचे ठरणार नाही हे तितकेच खरे आहे आणि पश्चिम बंगालचा विचार करता तेथे काँग्रेसचे अस्तित्व इतर पक्षांपेक्षा कमी आहे. त्यामुळे सीताराम येचुरी यांचाच आग्रह काँग्रेसला सोबत ठेवण्याचा आहे असे दिसते.

आज डाव्यांचा प्रभाव सर्व भारतभर कमी अधिक प्रमाणात दिसतो, देशातील अनेक राज्यांमध्ये व त्यातही मोठय़ा शहरांत संघटनांच्या माध्यमातून डावे पक्ष जिवंत असल्याचे दिसते, त्यांना दिशा देऊन पक्ष वाढविण्यासाठी काम करणे गरजेचे आहे, परंतु ते करताना दिसत नाहीत. एखादा विषय ताणून धरायचा व शेवट न करता मध्येच सोडून द्यायचा या अशा प्रकारामुळे डाव्यांची वाताहत झालेली दिसते.

काँग्रेसला गाडूनच देशातील डाव्या पक्षांचा पहिला मुख्यमंत्री (ईएमएस नंबुद्रिपाद) हा केरळ राज्यातूनच झालेला आहे हा इतिहास दुर्लक्षित करून चालणार नाही. डाव्यांची विचारधारा ही भांडवलशाहीविरोधी राहिलेली आहे आणि काँग्रेससुद्धा भांडवलदारांच्या बाजूचाच पक्ष आहे, त्यामुळे काँग्रेससोबत न जाणे ही प्रकाश करातांची भूमिका योग्य आहे. त्यांना करंटे वगैरे शब्द वापरणे उचित ठरत नाही. तसे पाहिले तर सगळेच राजकीय पक्ष हे सामान्यजनांसाठी आजपर्यंत करंटेच ठरले आहेत.

अमोल पालकर, अंबड (जि.जालना)

राजकीय सत्य नाकारणारा हट्टीपणा

‘करात करंटे’ हे संपादकीय समर्पक वाटले. आजची राजकीय परिस्थिती पाहता डावे पक्ष काही स्वबळावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षास नामोहरम करू शकतील, याची किंचितही शक्यता नाही. करात यांच्या कर्मदरिद्री दृष्टिकोनामुळे सीताराम येचुरी यांना राज्यसभेवर पुन्हा पाठविण्याची आयती चालून आलेली संधी घालविली गेली. वास्तविक आज भाजप अनेक राज्ये पादाक्रांत करून राज्यसभेतील आपले बहुमत स्पष्टपणे वाढवीत असताना येचुरी यांच्यासारख्या कुशल संसदपटूची गरज देशाला आहे.

येचुरी यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांना प्रसारमाध्यमांतही महत्त्व दिले जाई व त्याचा फायदा डाव्यांना लोकसंग्रह करण्याकरिता झाला असता. परंतु कर्मठ पोथीनिष्ठेबरोबरच आजच्या राजकीय परिस्थितीचे सत्य मान्य न करण्याचा हट्टीपणा, यामुळे डावे आपली उरली-सुरली पतही घालवून बसतील.

कौ. बा. देसाई, फातोर्डा (मडगांव, गोवा)

मतलबी नीतिभ्रष्टांपेक्षा पोथीनिष्ठश्रेयस्कर !

अधूनमधून रुचीपालट म्हणून साम्यवादी पक्षांना टपल्या मारणे ही ‘लोकसत्ता’ची जुनी संपादकीय परंपरा आहे. ‘करात करंटे’ या अग्रलेखातून ती पाळण्याचे कर्तव्य बजावल्याचे स्पष्ट होते. मार्क्‍सवादी पक्षात सगळेच बुद्धिमान आणि विचारवंत असतात हे विधान (बहुधा उपरोधाने) केले असले तरी ते वास्तव आहे हे नाकारता येणार नाही. भाजपमधले सगळेच बुद्धिमान आणि वाचाळ आहेत, त्यापेक्षा हे लक्षण निश्चितपणे उजवे आहे. फक्त काळ्या-पांढऱ्या रंगात समाजाचे आणि परिस्थितीचे आकलन करणारा हा पक्ष नाही. ‘राजा बोले आणि प्रजा डोले’ असा नंदीबलांचा कळप इथे नसतो. कोणत्याही मुद्दय़ाचे सम्यक आकलन होण्यासाठी चर्चा करणे, उघडपणे मतभिन्नता व्यक्त करणे आणि लोकशाही पद्धतीने निर्णय घेणे याला ‘गोंधळ घालणे’ असे म्हणणे गैर आहे.

वेद-पुराणातल्या चमत्कृतीपूर्ण, ‘फॅण्टसी’युक्त धार्मिक पोथ्यांवर निष्ठा बाळगणाऱ्या, सत्तेसाठी वाटेल त्याच्याशी मतलबी संग करणाऱ्या नीतिभ्रष्टांपेक्षा ‘कार्ल मार्क्‍स’सारख्या अभ्यासक विचारवंताने लिहिलेल्या ‘पोथ्यां’वर सत्त्वशील निष्ठा असणारे पोथीनिष्ठ, आज निष्ठा हे मूल्यच कालबाह्य़ झालेले असताना निश्चितच जास्त श्रेयस्कर ठरतात.

काँग्रेसशी सहकार्य करावे की स्वतंत्रपणे लढावे हा निर्णय दर वेळी तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असतो. यशातल्या आपल्या पक्षाच्या संभाव्य सहभागापेक्षा धर्माध आणि भांडवलदारधार्जण्यिांचा पराभव जास्त महत्त्वाचा असतो, त्या वेळी इतर पक्षाशी सहकार्य करणेच जास्त शहाणपणाचे वाटले तर त्यात गैर नाही. आपला जीव केवढा आणि बहुमत आपल्यासाठी सोपे नाही या वास्तवाची जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच तर सहकाऱ्यांची चर्चा होते. महात्मा गांधींना आणि त्यांच्या पर्यायी विकासवादाला आज समर्थन नाही याचा अर्थ तो टाकाऊ ठरत नाही. त्याचे महत्त्व आजच्या मतदारांना उमजत नसेल तर त्यांच्यासारखे कपाळ करंटे तेच असेच म्हणावे लागेल.

प्रमोद तावडे, डोंबिवली

अतार्किक कोंडीत मराठी तरुणवर्ग ..

‘भयावह असर’ हा अग्रलेख (२० जाने.) आणि पी. चिदम्बरम यांच्या ‘समोरच्या बाकावरून’ या स्तंभातील ‘(पुन्हा) देवांचे सोहळे आबाळली बाळे’ (२३ जानेवारी) या लेखातील ‘असर’चे विश्लेषण करणारी आकडेवरी अस्वस्थ करणारी. २.४ कोटी मुलांपैकी आठवीपर्यंत ५० लाख, तर बारावीपर्यंत ७० लाख मुले शिक्षणातून गळतात म्हणजे उरलेली १.२ कोटी उच्च शिक्षण घेतात, असे स्पष्ट होते. गळालेल्यांचे काय होते याबरोबरच, उरलेल्या- उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे काय याचे अवलोकन केले तर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल.

‘लोकसत्ता’ने २१ जानेवारीच्या अंकात पहिल्या पानावर पाच विषयांत पदव्युत्तर आणि पीएच.डी. केलेल्याला महिना सहा हजार पगार आणि तेही प्राध्यापक म्हणून, हे वास्तव मांडले होते. हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर आदी शेतीत प्रगत तालुक्यातील ४० खेडय़ांमधील उच्च शिक्षित (वैद्यकीय वगळता सगळ्या ज्ञान शाखांत अगदी एमबीए, एमएससी, एमटेक इ.) ग्रामीण तरुणांचे केलेले सर्वेक्षण प्रसिद्ध झाले आहे. त्यापैकी बहुतेक जण शेती उत्तम करीत असून गाडी, बंगला अशी भौतिक समृद्धीही निर्माण केली आहे. विवाह होत नाहीत हा या तरुणांचा मोठा प्रश्न आहे. कारण शेतकऱ्याला कोणी-अगदी शेतकरीसुद्धा मुलगी देत नाहीत. या तरुणांपैकी काहींनी पस्तिशी पार केली असून लग्नाचा विचार सोडून दिला आहे. अशी ही परस्परविरोधी दोन टोके, उच्चशिक्षित वर्गाची. मेकॉलेला नाव ठेवत ठेवत आपण जीवन जगण्याची कला विकसित करणारी शिक्षण पद्धती निर्माण करण्यात आणि श्रमाची प्रतिष्ठा राखण्यात, गांधीजींच्या देशात, अपयशी ठरलो.

जे १.२ कोटी ‘शिक्षणबा’, ते मजूर म्हणून शेती, रस्ते, बांधकाम, मासेमारी अशा उपयुक्त सेवा देत असतो. त्यांपैकी काही जण राजकीय पक्षाचे झेंडे मिरवीत गुजराण करतात. या वर्गाचे उपद्रवमूल्य ग्रामीण शहरी दैनंदिन जगण्यात पदोपदी प्रत्ययास येते आणि त्याचे पडसाद माध्यमांतून दिसून येतात. एकीकडे शिक्षण असून नीट नोकरी नाही तर दुसरीकडे शिक्षण आहे, नोकरीपेक्षा सशक्त भौतिक जीवन जगण्याची आर्थिक कुवत आहे पण प्रतिष्ठा नाही अशा अताíकक कोंडीत उच्चशिक्षित मराठी तरुणवर्ग फार मोठय़ा प्रमाणात सापडला आहे. याला आपला, प्रयोगशीलता हरवलेला समाजसुद्धा तितकाच जबाबदार आहे.

सुखदेव काळे, दापोली (रत्नागिरी)

आत्मीयताआहे? मग हमीभाव कुठे

अन्य राज्यांमध्ये शेतकऱ्यांना शेतातील माल निघाल्याबरोबर हमीभाव देण्यात येत आहे. महाराष्ट्रात मात्र एक महिना होऊनही तुरीला हमीभाव नाही. तेच इतर पिकांबाबत.. आज रोजी क्विंटलमागे १,८०० रुपये कमी भाव देऊन व्यापारी/ दलाल तूर खरेदी करीत आहेत. अशा वेळी कुठे जाते सत्ताधाऱ्यांची शेतकऱ्यांविषयीची आत्मीयता? सरकार नेमके करते तरी काय?

नितीन निमकर, पुणे

वेदशास्त्रात नाहीम्हणून खोटे?

‘डार्वनिचा उत्क्रांतिसिद्धान्त खोटा’ अशी बातमी अनेक वृत्तपत्रांत झळकली. (२० जाने.) एका वृत्तपत्रात या बातमीचा तीन कॉलमी मथळा पाहून वाटले डार्वनिचा सिद्धान्त मोडीत काढणारे संशोधन अखेर सप्रमाण सिद्ध झाले. बातमी वाचल्यावर वस्तुस्थिती उलगडली.

‘डार्वनिचा सिद्धान्त खोटा’ हे उद्गार काढणारे केंद्रीय मंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी दोन निरीक्षणे नोंदवली आहेत. ती अशी : (१) माकडे ही मानवाचे पूर्वज आहेत असे डार्वनि सांगतो. मात्र वेदशास्त्रात अशी कुठेही नोंद नाही. (२) जेव्हापासून लिहिण्याची कला अवगत झाली तेव्हापासून आजपर्यंत कोणीही असे लिहिले नाही की, मी जंगलात गेलो, तिथे एक माकडीण माणसाला जन्म देत होती असे पाहिले.

डॉ. सत्यपाल सिंह यांची ही दोन्ही निरीक्षणे खरी आहेत! पण त्यांवरून ‘माकड हा मानवाचा पूर्वज नाही. मानव प्रथमपासून मानवरूपातच भूतलावर आला’ असे मुळीच सिद्ध होत नाही. आर्केमेडीजचे नियम वेदशास्त्रात नाहीत, म्हणून ते खोटे आहेत का? ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ हे वेदात नाही. म्हणून ते विधान खोटे ठरते का? तसेच जे जे वेदात आहे ते सर्व सत्य आहे का? ‘सूर्य प्रकाशमान व्हावा म्हणून इंद्राने पृथ्वी निर्माण केली’ असे वेदवाक्य आहे (ऋग्वेद : मंडल:-: २, सूक्त:- १३, ऋचा:- ५ ). म्हणून ते सत्य मानायचे का?

वेदांची रचना इ. स.पू. ५००० ते इ. स.पू. २००० या कालखंडात झाली. त्या काळच्या माणसाचे ज्ञान आजच्या माणसाच्या ज्ञानाच्या तुलनेत अगदीच अल्प होते. त्यामुळे आजची अनेक सत्ये वेदात नसणे तसेच वेदांतील अनेक विधाने असत्य असणे स्वाभाविक आहे. त्या काळच्या ज्ञानाची ती मर्यादा आहे. ‘पृथ्वी स्वत:च्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून सूर्य-चंद्र आणि अन्य सर्व खगोल पूर्वेला उगवतात आणि पश्चिमेला मावळतात असे दिसते’ हे जसे आज सर्वमान्य सत्य आहे, तितकाच डार्वनिचा उत्क्रांतिवाद सर्वमान्य आहे.

प्रा. य. ना. वालावलकर, पुणे

loksatta@expressindia.com