आपण आज महाराष्ट्र राज्यस्थापनेचा ५७ वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. मोठा सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात आजही मूलभूत सुविधा सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. छत्रपती शिवरायांचे ‘रयतेचे राज्य’ असणाऱ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना योग्य हमीभावासाठी संपावर जावे लागत आहे. देशाला नवी शिक्षणाची दिशा दाखवणाऱ्या महात्मा फुले यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात शाळा बंद करण्याची वेळ येत आहे. आजही आरोग्य सुविधा ग्रामीण भागात योग्य प्रकारे उपलब्ध होत नाहीत. महाराष्ट्राने रस्ते, वीज, जलसिंचन, उद्योग, माहिती तंत्रज्ञान, ग्रामस्वच्छता क्षेत्रात जे काम केले ते नक्कीच अभिमानास्पद आहे पण त्याच वेळी शिक्षण, आरोग्य, शेती या क्षेत्रात आणखी सुधारणा करण्याची महाराष्ट्राला आवश्यकता आहे.

संकेत राजेभोसलेशेवगाव (अहमदनगर).

उपद्रव नाही, हेच यश

‘यशाहूनही..’ हा अग्रलेख (३० एप्रिल) पंतप्रधानांच्या चीन दौऱ्याचे वास्तववादी विश्लेषण  करणारा वाटला. आपल्यापेक्षा चीन प्रत्येक बाबतीत किती तरी पटीने मोठा आहे हे लक्षात घेता त्याच्याकडून आपल्या पदरात लगेच फार काही पडेल, अशी अपेक्षा बाळगणेच बालिशपणाचे ठरावे; मग पंतप्रधानपदी राजीव गांधी असू देत, मोदी असू देत की भविष्यात अजून कोणी असू देत. आधीच बलवान त्यात पुन्हा वर्चस्ववादी वृत्ती असा दुहेरी संगम असलेल्या चीनशी आपला संगम होणे जवळपास अशक्यच! असे असूनही पंतप्रधानांनी त्या दृष्टीने चालविलेले प्रयत्न (भलेच येणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून का होईना !) नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत. या सर्व भेटी गाठीतून भारताला चीनची बाजारपेठ उपलब्ध झाली तर फार काही पदरात पडले असे होईल. शिवाय डोकलाम न चिघळण्याची आशा ठेवायला हरकत नसावी. अर्थात नागाला नागपंचमीला दूध पाजले म्हणजे तो नंतर डंख मारत नाही, असे काही नसते!

व्यवहारात जे बलवान, धनवान असतात त्यांच्याकडून काही पदरात पडेल यासाठी प्रयत्न करताना फार अपेक्षा न ठेवता; त्यांच्यापासून काही उपद्रव होणार नाही इतपत जरी यश मिळाले तरी चालते. चीनशी वागताना हेच लक्षात घ्यावे लागेल.

मुकुंद परदेशी, धुळे

चीनसंदर्भातील अनेक ताज्या घटना नाटय़मय..

‘यशाहूनही..’ या संपादकीयात पंतप्रधान मोदीच्या वर्तमान चीन दौऱ्याच्या फळांकडे लक्ष न देता ‘यशाहूनही प्रयत्न सुंदर’ असे पाहावे हे भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी सुचविले असल्याचे निर्देशित केले आहे. मागील पंचवीस वर्षांतील दोन्ही देशांतील संबंध सुधारणाचा तपशील देत नुकत्याच उद्भवलेल्या डोकलाम व लडाख परिसरातील तणावाचाही उल्लेख करीत याबाबत चीनच्या पूर्वापार वर्तनाकडे लक्ष वेधले आहे.

गत महिन्यातील अमेरिका- चीन- उत्तर कोरिया संदर्भातील वेगाने घडलेल्या घटना व चीनच्या बदललेल्या भूमिकेकडे मी लक्ष वेधू इच्छितो. विषेशत: क्षी जिनिपग यांच्या अमर्याद कार्यकालावर तिथल्या व्यवस्थेने मोहोर उमटविल्यावर क्षी म्हणाले, ‘रक्त सांडून आम्ही आमच्या भूमीचे रक्षण करू’ तद्नंतर उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने चीन-भेटीनंतर ‘स्वयंस्फूर्तपणे’ केलेली अण्वस्त्र चाचणीबंदी घोषणा, १९५३ नंतर प्रथमच सीमेवर जाऊन दक्षिण कोरियाच्या अध्यक्षाची घेतलेली भेट. यातून तवान, उत्तर कोरिया व जपानच्या प्रश्नाचे निमित्त करून ‘दक्षिण चीनच्या समुद्रा’त अमेरिकन हस्तक्षेपास वाव मिळू नये यासाठी हे सारे चीननेच आखलेले डावपेच असावेत, असे दिसते. ट्रम्प यांनी मालावर अतिरिक्त जकात आकारून चीनची केलेली व्यापारी कोंडी लक्षात घेतली तरीही, भारत व्यापारी व आर्थिकदृष्टय़ा चीनवर मात करू शकेल असे चित्र आज नाही. पण अखेरीस दोन शेजारी राष्ट्रांतील संबंध म्हणजे प्रत्यक्षात मानवी शेजाऱ्यांसारखे माजघरातील इशाऱ्यांवरून तोच तो वादाचा विषय चच्रेत उकरण्यासारखे नसतात हेच खरे.

 – लक्ष्मण संगेवार, नांदेड

भाजपने केतकरांना कोर्टात खेचणेच योग्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी कुमार केतकर यांनी वापरलेल्या ‘तोतया ’ या शब्दाच्या संदर्भातले पत्र वाचले (लोकमानस, ३० एप्रिल) मोदींविषयी केतकरांना असलेल्या  द्वेषामुळे कोणता शब्द कोठे वापरावा याचे भान त्यांना राहिले नसावे आणि म्हणून ते मोदींना ‘तोतया ’ पंतप्रधान म्हणाले आहेत. केतकरांनी ‘खरा’ पंतप्रधान कोण याचा खुलासा करावा. ते न झाल्यास भाजपने (पत्रात अपेक्षिल्याप्रमाणे ) त्यांना कोर्टात खेचणेच योग्य होईल.

श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

कोणत्या तोंडाने कायदेशीर कारवाई करणार?

‘कायद्यानुसार ‘तोतया’ शब्दाचा नेमका अर्थ काय?’ (लोकमानस, ३० एप्रिल) असा प्रश्न एका पत्रलेखकाने उपस्थित केला आहे. शब्दाचे अर्थ काढण्याचे काम कायद्याचे नाही. शब्दाचा अर्थ त्याच्या व्यवहारातील वापरावरून, संदर्भावरून ठरतो. त्यानुसार ‘तोतया’ या शब्दाचा अर्थ ‘खोटा’ असा नाही तर तो ‘कमअस्सल’ किंवा ‘बनावट’ असा आहे. त्यामुळे ‘खरा’ पंतप्रधान कोण?’ हा प्रश्नच अप्रस्तुत ठरतो. पंतप्रधानांनी त्यांचा दर्जा किती अस्सल प्रतीचा आहे हे आजवरच्या त्यांच्या वक्तव्य आणि कर्तृत्व यातून पुरेसे स्पष्ट केलेच आहे.

‘आपण स्वत: जे आहोत, त्यापेक्षा दुसरेच कोणी तरी आहोत, असे दाखवणे आणि त्याद्वारे इतरांची (जनतेची) जाणीवपूर्वक फसवणूक करणे’ हा एकच अर्थ जर योग्य असेल तर तो त्यांच्या गुजरात मॉडेल पासून अनेक शेख-महम्मदी निर्णयांपर्यंत अगदी चपखल लागू होतो. नरेंद्र मोदी या व्यक्तीने स्वत:च आपल्या वर्तणुकीने पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेचा आणि देशाच्या सर्वोच्चपदाचा अवमान देश-विदेशात केला आहे. कुमार केतकरांच्या विधानात नवे असे काहीही नाही. तेव्हा उगा शब्दच्छल करणे व्यर्थ आहे. दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर, रेणुका चौधरी अशांसारख्यांची परंपरा तर काँग्रेस पक्षापेक्षा सांप्रत भाजपमध्ये अधिक उज्वल आहे. अशा भाजपस्थित वाचाळ विद्वानांची यादी खूपच लांब होईल. तेव्हा भाजप कोणत्या तोंडाने कुमार केतकर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करेल?

–  प्रमोद तावडे, डोंबिवली

तोतयाऐवजी चपखल शब्द शोधणे आवश्यक

कायद्यानुसार ‘तोतया’ शब्दाचा नेमका अर्थ काय? हे पत्र (लोकमानस, ३० एप्रिल) वाचले. पुण्यात ‘२०१४ नंतरचा भारताचा विकास – किती खरा किती खोटा?’ या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि कॉँग्रेसचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी आपल्या मुद्देसूद भाषणाचा शेवट मोदींचा उल्लेख ‘तोतया’ पंतप्रधान असा केला. तो सर्वश्री गैर असाच म्हणावा असा असला तरी केतकरांनी केलेल्या या उल्लेखामागील महत्त्वाचे कारण पत्रलेखकाने शिताफीने सोयीस्करपणे टाळले आहे. या संदर्भात, जेव्हा मोदींनी स्वत:ला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून २०१४ साली प्रस्तुत केले – आणि तशी घोषणाही केली गेली (अबकी बार मोदी सरकार) तेव्हा प्रथमच, निवडणूक आयोगासमोर निवडणूक लढताना भरावयाचा आपल्या वैवाहिक संदर्भातील रकाना मोदी यांनी ‘विवाहित’ म्हणून भरला होता. लोकसभेच्या या निवडणुकीआधीच त्यांच्या पत्नी जशोदाबेन या गेली कैक वर्षे कोठे आणि कशा राहतात, याची माहिती इंटरनेट-पत्रकारांनी प्रत्यक्ष जशोदाबेन यांच्याशीही बोलून दिली होती. बहुधा, विरोधकांच्या हाती आयते ‘कोलीत’ मिळून पंतप्रधान होण्यासाठी ‘अपशकुन’ होऊ नये, ही खबरदारी चाणाक्ष मोदी यांनी घेतली आणि म्हणून प्रथमच आपण विवाहित आहोत, अशी खरी माहिती दिली होती. मात्र गुजरातचे दोनही वेळा मुख्यमंत्री असताना त्यांनी, आपण विवाहित असल्याची माहिती निवडणूक आयोगासमोर दडवली होती. या मागील कारण माहीत नाही, तो त्याचा वैयक्तिक मामला असला तरी त्यांनी आपण जशोदाबेन यांच्याकडून रीतसर कायदेशीर घटस्फोट घेतला आहे असेही काही वास्तव दिसत नाही. तेव्हा आपल्या वैवाहिक स्थितीबद्दलच्या खासगी माहितीचा रकाना -आयोगाने तशी मागणी केली असतानाही- रिकामाच ठेवणे, हे संवैधानिक पदावरील एखाद्या व्यक्तीने घटनात्मक अधिकार असणाऱ्या दुसऱ्या सार्वभौम संस्थेपासून दडवणे हे नक्कीच भूषणावह नाही.

तसेच, ‘जीएसटी संपूर्ण देशात जरी लागू झाला तरी माझ्या गुजरातमध्ये तो आपण लागू होऊ देणार नाही,’ अशी भूमिका मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जीएसटीबाबत सातत्याने घेत होते. आता मात्र पंतप्रधान झाल्यावर जीएसटी लागू करून ‘जीएसटी ही भारतवर्षांतील एक ऐतिहासिक घटना आहे,’ असे जनतेला ऐकवतात, हे कसे? मोदींच्या काटकोनात बदललेल्या या भूमिका, त्याच्या ‘तोतया’ पंतप्रधान उल्लेखामागे आहे. तेव्हा तोतया हा शब्द अवाजवी असला तरी त्याऐवजी समर्पक चपखल शब्द पत्रलेखकाने इथे सुचविणे आवश्यक होते. कारण लेखकाचा मुख्य आक्षेप हा ‘तोतया’ या शब्दाला आहे. असो.लेखकाने मोदी या व्यक्तीपेक्षा पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा येथे मांडला आहे. तेव्हा एका पंतप्रधानाने देशाच्या पहिल्या पंतप्रधानावर भर संसदेत यथेच्छ टीका करावी, तसेच एका महिला (मोदी हे भाषणात आधार कार्ड ही भाजपची योजना आहे असे म्हणाले म्हणून रेणुका चौधरी यांना हसे आवरले नसेल; तरीही पंतप्रधान पदावरील व्यक्तीच्या ‘अभ्यासपूर्ण’ भाषणात कोणी असा व्यत्यय आणणे तसे चुकीचेच. ही चूक भाजप विरोधात असताना वारंवार करत आला आहे) खासदाराचा रामायणातील राक्षसी पात्राच्या अनुषंगाने संसदेत अपमान करावा हे पदाला शोभते का? भाजप (मोदी महिलांचा खूपच आदर करतात) नेत्यांनी तर रेणुका चौधरी यांचा उल्लेख शूर्पणखा असा केला. यावर मोदींनी काही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. ही उदाहरणे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेचे अवमूल्यन करणारी नाहीत का? आपल्या पदाची आपण काळजी घेणे हे जास्त जबाबदारीचे आहे. चिकित्सा करणे हा गुणधर्म चांगला असला तरी ती एकांगी मात्र नसावा. संदर्भ देताना सर्व गोष्टींचा साधकबाधक विचार होणे गरजेचे आहे.

बाळकृष्ण शिंदे, पुणे

loksatta@expressindia.com