मानधन मिळत नसल्याने अंगणवाडी सेविकेची आत्महत्या केल्याची बातमी (लोकसत्ता, ११ जून)  वाचून वाईट वाटले. सहा-सहा महिने राज्य सरकार मानधन जर देणार नसेल, तेही तुटपुंजे तर लोकांनी जगायचे कसे?

जी अवस्था अंगणवाडी सेविकांची आहे, तीच गत आज महाराष्ट्रातील १३,००० सार्वजनिक ग्रंथालयांतील कर्मचाऱ्यांची आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने मार्च २०१८ मध्ये या ग्रंथालयांना शंभर टक्के अनुदान देणे अपेक्षित होते त्या ठिकाणी फक्त ४५ टक्के अनुदान दिलेले आहे. उरलेले ५५ टक्केअनुदान राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना मिळणे बाकी आहे. ४५ टक्के अनुदानातून फक्त ४५ टक्के मानधन; तेही सहा महिन्यांतून एकदा. सहा-सहा महिने काम करूनही मानधन मिळत नाही हे फार वाईट आहे.

अंगणवाडी सेविकांसारखाच आता सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनीसुद्धा आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा का, असा प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहतो आहे.. तुटपुंजे का असेना पण अनुदान हे काहीही झाले तरी वेळेवरच मिळाले पाहिजे.

एन. एम. लांजेवार, बुलडाणा

प्रतिमेपेक्षा प्रतिभाच मोठी हवी!

निती आयोगातून स्मृती इराणी यांची गच्छन्ती झाल्याची बातमी (लोकसत्ता, ११ जून) वाचली. या सन्माननीय ताई जेव्हा मनुष्यबळ विकासमंत्री झाल्या तेव्हापासूनच वादांच्या केंद्रस्थानी राहिल्या. केवळ आपल्या प्रतिमेच्या जोरावर यांनी भाजपमध्ये आपले स्थान मिळविले, पण मिळविलेले स्थान कायम ठेवण्यासाठी जी गुणवत्ता लागते ती यांच्यात नसल्यामुळे आधी मनुष्यबळ मंत्रालय नंतर माहिती व प्रसारण खाते सोडण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आणि आता निती आयोगाचे निमंत्रित सदस्यपद गमवावे लागले.

स्वत:ची शैक्षणिक पात्रतादेखील नीट सांगता येत नसताना केवळ बोलघेवडेपणामुळे यांना मनुष्यबळ विकासासारखे महत्त्वपूर्ण खाते मिळाले. वास्तविक भाजपमध्ये सुषमा स्वराज यांच्यासारख्या अनेक प्रतिभावान व्यक्ती असतानादेखील अशा प्रतिभाशून्य लोकांचे महत्त्व का वाढविले गेले, हे कळत नाही. शेवटी हेच खरे की प्रतिमेपेक्षा प्रतिभाच मोठी असते. प्रतिमा तात्कालिक असते, प्रतिमेने मिळविलेले टिकवून ठेवण्यासाठी प्रतिभा कामी येते. प्रतिभा मिळविण्यासाठी अथक परिश्रम व साधना आवश्यक असते.

प्रा. दिनेश जोशी, लातूर

घटकपक्षांपुढे भाजपला नमते घ्यावे लागणार

‘घटकपक्षांमुळे भाजप बेजार’ हा ‘लालकिल्ला’ सदरातील महेश सरलष्कर यांचा लेख (११ जून) राजकीय सद्य:परिस्थितीवर झणझणीत प्रकाश टाकणारा वाटला. यश मिळवणे जेवढे अवघड, त्यापेक्षाही मिळालेले यश पचवणे आणि पाय जमिनीवर ठेवणे अधिक अवघड आहे, याची प्रचीती अखेर भाजपला आली हेही नसे थोडके. खरे तर लोकशाहीत, सत्ताधारी पक्षाबरोबर मजबूत विरोधी पक्षदेखील महत्त्वाचा असतो, पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या भाजपला यशाची कावीळ झाली होती, समोरचे काही दिसतच नव्हते. लोकसभा निवडणुकीत २०१४ मध्ये मिळालेले यश, पुन्हा मिळणे अश्यक्यप्राय गोष्ट आहे, हे भाजपच्या काही अविवेकी, अविचारी नेत्यांच्या लक्षातदेखील आले नाही. ‘रालोआ’तील घटकपक्षांना ज्या तऱ्हेची वागणूक देण्यात आली, त्यामुळे दुखावलेले मित्रपक्ष, येत्या निवडणुकीत आपल्या मागण्या (अगदी अवास्तव असल्या तरी) मान्य करून घेणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जसे कराल तसे भराल!

जे विरोधी पक्ष २०१४ मध्ये विखुरलेले होते, त्यांना एकत्र आणण्याचे महान(?) कार्यही भाजप नेत्यांचेच! मायावती आणि यादव एकत्र येतील असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते, पण भाजपच्या अविचारी नेतृत्वाने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. हे सुदृढ लोकशाहीस एक चांगले पाऊल म्हणता येईल. सरतेशेवटी सर्व राजकीय पक्षांना एकच सांगावेसे वाटते, भारतीय जनतेस गृहीत धरू नका!

प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, वेसावे (मुंबई)

लिखाणातील पोकळपणा उघड करण्याची गरज..

‘आयुर्वेद हे शास्त्र आहे का?’ हा अनिलकुमार भाटे यांचा पत्रलेख (८ जून) वाचला. असल्या लेखांतील अत्यंत फुटकळ आरोपांच्या खंडनासाठी शक्ती खर्ची घालणे नको वाटते. पण तद्दन दर्जाहीन व अशास्त्रीय लेखांना मोठय़ा प्रमाणात फूटेज मिळाले की लेखातील पोकळपणा उघड करण्याची गरज जाणवू लागते. लेखाचा ७० टक्के भाग हा लेखकाने स्व-ओळखप्रीत्यर्थ वापरला आहे. त्याचे खंडन मी काय करणार बापडा! पण विथ ऑल डय़ू रिस्पेक्ट, ‘समाधि प्राप्त झालेल्या मनुष्या’च्या बोलीमध्ये एवढा अहंभाव असेल असे मान्य करणे अवघड आहे. काही प्रश्न स्वाभाविकपणे समोर येतात. विपश्यना आणि इतर उपासना पद्धतींचा अभ्यास एकत्र करण्याबद्दल पूज्य गोयंकागुरुजींचे काय मत होते? स्वत:ला ‘अव्वल’ योगी म्हणणे हेच मुळात ‘योगी’ या परिभाषेच्या पात्रतेच्या परिभाषेमध्ये बसते का? ‘मी श्रद्धावान् नाही’ असे घोषित करताना हेही स्पष्ट करावे की जी कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी लेखकाने ‘शक्तिपात’ करवून घेतला ती ‘क्वांटिफायेबल’ व ‘मेजरेबल’ या मापदंडांमध्ये बसवून लॅब्जमध्ये लेन्सखाली तपासून पाहिली काय? असो. माझा रोख व्यक्तीपेक्षा प्रवृत्तीवर असल्याने त्या मुद्दय़ांवर येतो.

मुद्दा १ : ‘मी साधनेच्या दरम्यान अनेक उच्च दर्जाचे अनुभव घेतले, त्यातला कुठलाही अनुभव आयुर्वेदाशी जुळत नाही. + अध्यात्मसाधनेमधला कुठलाच अनुभव तीन दोषांवर आधारलेला नाही.’

उत्तर : अशा ‘अनुभवां’बद्दल आयुर्वेदामध्ये प्रत्यक्ष उल्लेख कुठे आहे हे सांगण्याची तसदी घ्यावी. साधना कशी करावी याचे वर्णन करणे हे आयुर्वेदाचे मूळ प्रयोजन नव्हे. हे म्हणजे ‘मी फुटबॉलच्या खूप मॅचेस पाहिल्या आहेत पण कोहलीला त्यातले काहीच जमत नाही’ असे म्हणण्यासारखे आहे. आयुर्वेदाच्या मूलभूत संकल्पनांशी अजिबात नसलेला संबंध दिसायला इथे सुरुवात होते.

मुद्दा २ : ‘आजीबाईचा बटवा म्हणजे आयुर्वेद नव्हे कारण आयुर्वेद त्रिदोषांवर आधारित आहे.’

उत्तर : मग आजीबाईचा बटवा कशावर आधारित आहे हे सांगावे. पोट दुखायला लागल्यानंतर िहगाचा लेप लावणे याचे स्पष्टीकरण कोणती ‘पॅथी’ देते हेही कृपया सांगावे. बाळगुटीतील भिन्नभिन्न औषधांचा कार्यकारण भाव त्रिदोष सोडून इतर परिभाषांद्वारे स्पष्ट करून दाखवावा.

मुद्दा ३ : आयुर्वेद व योग यांचा परस्परसंबंध नाही.

उत्तर : जर चरक संहितेचा सामान्य अभ्यास जरी असता तर लेखक हे विधान करण्यास धजावले नसते (एकूणच आयुर्वेदाबद्दल वात-पित्त-कफ या तीन शब्दांव्यतिरिक्त काहीच माहीत नसल्याचे लेखातून स्पष्ट होत आहे). मी योगशास्त्रातील तज्ज्ञ नाही, मात्र ‘योगे मोक्षे च सर्वासां वेदनानां अवर्तनम्’ असे आयुर्वेद सांगतो हे नक्कीच सांगू शकतो. आयुर्वेद आणि योग यांचा परस्परसंबंध कळण्यासाठी एक झलक म्हणून वैद्या प्रमा जोशी यांच्या एका ब्लॉगची लिंक (charakameemansa.wordpress.com Þ) पाहावी, विशेषत: त्यातील ‘वायुविवेक’ या लेखाचे पारायण करावे. योगशास्त्रातील ‘प्राण’ आणि आयुर्वेदातील ‘वायु/वात’ या संकल्पनांची याहून सुंदर तौलनिक मांडणी पाहावयास मिळणार नाही.

मुद्दा ४ : ‘तंत्रविद्या आणि आयुर्वेद यांचा संबंध नाही कारण तंत्रविद्य्ोची काश्मीर शैविझम ही परंपरा मला ज्ञात आहे.’

उत्तर : पण मुळात आयुर्वेदशास्त्र ज्ञात आहे का? तरच तुलना करण्याची नतिक पात्रता येऊ शकते. ‘तंत्रा’चा नेमका अर्थ स्पष्ट  केला असता तर बरे झाले असते. रसशास्त्रासारखी आयुर्वेदाची शाखा तंत्रविद्य्ोच्या किती जवळ आहे ही माहिती करवून घेणे गरजेचे वाटते. शब्दच्छलच करायचा असेल तर, चरक संहिता हीदेखील मुळातील ‘अग्निवेश तंत्र’ आहे

मुद्दा ५ :  ‘आयुर्वेदाचा सर्व वेदसाहित्याशी काहीच संबंध नाही.’

उत्तर : संपूर्ण वेदसाहित्य म्हणजे कोणकोणते ग्रंथ हे स्पष्ट  करावे आणि कुतूहल असल्यास ‘आयुर्वेद का बृहत् इतिहास’ हे प्रियव्रत शर्मालिखित पुस्तक नजरेखालून घालावे. त्यातील संदर्भ हे लेखकाने ‘आपल्या’ वेदसाहित्यासोबत जुळत आहेत का याची प्रांजळ खातरजमा करावी. यावर पुढील चर्चा त्यानंतरच करणे न्याय्य ठरेल.

मुद्दा ६ :  वात, पित्त, कफ हे कालबाह्य़ आहेत कारण यांचे मोजमाप करता येत नाही.

उत्तर : दोषांचे मोजमाप करण्यासाठी आयुर्वेदामध्ये ‘अनुमान’ प्रमाण सांगितले असून त्याचा हेतू ‘अपचार’ अर्थात् रोगांचे आहार-विहारात्मक कारण होय. वेदशास्त्रातील रहस्ये लेखकास माहिती असल्याने न्यायशास्त्रोक्त प्रमाणविचार माहीत असेल हे गृहीत धरून सदर वाक्य लिहीत आहे. ‘वेदने’चेही मोजमाप करता येत नाही, तिचाही समावेश ‘शास्त्रा’त करणार नाही का?

आयुर्वेद हे कालबाह्य़ आहे का आणि त्याच्या पुनर्रचनेची गरज आहे का, याबाबत चर्चा करण्यासाठी आयुर्वेदातील त्रिदोषाहून जरा अधिक संकल्पना माहिती असलेले खरेखुरे ‘डॉक्टर्स’ खूप आहेत. असो.

वैद्य प्रयाग सेठिया, पुणे

पारंपरिक विज्ञानात प्रगती हवीच

‘विज्ञानभान’ या रवीन्द्र रु. पं. यांच्या सदरातील ‘आयुर्वेद : आव्हाने व शक्याशक्यता’ हा लेख (९ जून) वाचला. आयुर्वेद व आधुनिक विज्ञान यांची सांगड कशी घालता येईल याची चर्चा त्यांनी या लेखात केली आहे. या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे चीनची पारंपरिक विज्ञानातील प्रगती थक्क करणारी आहे. आयुर्वेद या विषयावर गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा व वादविवाद चालू आहेत. मात्र याचा भावी पिढीला कसा फायदा होईल यांचा विचार होताना दिसत नाही. माहितीची देवाणघेवाण व निरंतर संशोधन यामुळे ते साध्य होऊ शकते.

विश्वास काळे, नागोठणे (जि. रायगड)

loksatta@expressindia.com