दयामरण किंवा इच्छामरण हे इंग्रजी Euthanasia चे मराठी भाषांतर आहे. खरे तर यातील eu (चांगला) आणि thanatos (मरण) यातून ‘सन्मृत्यू’ असे भाषांतर करता येईल. त्यातून प्रतिष्ठेने आयुष्य संपवणे असा अर्थ जास्त चांगल्या प्रकारे ध्वनित होतो.
इच्छामरण ही कल्पना नवी नाही. भारतीयांनाही नवी नाही. महाभारतात भीष्मांना इच्छामरणाचा ‘वर’ मिळालेला होता. त्यामुळे युद्धात जखमी झाल्यावर उत्तरायण सुरू होईपर्यंत भीष्म शरपंजरी पडून राहिले होते, ही गोष्ट सर्वाना माहीत आहे. प्राचीन काळापासून अशा चांगल्या मरणाला धार्मिक मान्यताही होती, असे दिसते. उदा. जैन धर्मामध्ये ‘संथारा व्रत’ आहे. विनोबा भावे यांनी प्रायोपवेशन केले होते, अशी उदाहरणेही आहेत.
आत्ताच्या काळात ‘धर्मात नक्की काय सांगितले आहे? काय नतिक दृष्टीने योग्य आहे?’ याचा गोंधळही लोकांच्या मनात असतो. तसेच मुद्दाम घडवून आणलेल्या मृत्यूमुळे आपल्या कर्माची काही फळे भोगायची असतील तर ती राहून जातील आणि ती पुढच्या जन्मात भोगायला लागतील असा कर्मसिद्धांचा विचारही काही लोकांच्या मनात असतो.
व्यावहारिक दृष्टीने बघता सध्य:स्थितीत वैद्यकीय उपचार करणे हेच खूप महागडे झाले आहे याचाही विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे मुबलक पसा, मनुष्यबळ आहे, बरे होण्याची आशा आणि आयुष्य वाढवण्याची इच्छा आहे, ते लोक तर सर्व उपाययोजना करत राहतीलच. पण जे रुग्ण वेदनामय अवस्थेत आहेत, बरे होण्याची आशा नाही अशा अवस्थेत आहेत, ज्यांना सन्मानाने, प्रतिष्ठेने जीवन संपवायचे आहे, त्यांना हा हक्क मिळणे गरजेचे आहे.
ज्यांना सन्मृत्यूची इच्छा आहे, त्यांनी जेव्हा ते शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम असतील तेव्हाच या गोष्टीची तरतूद कायदेशीररीत्या करून ठेवण्याची सोय करणेही गरजेचे आहे.
– सुनेत्रा मराठे

भावनिक नाटय़ नको
मुळात दयामरण किंवा इच्छामरण या सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. इच्छामरण म्हणजे त्या माणसाची स्वतहून मरण मागण्याची इच्छा आणि दयामरण म्हणजे कुणी तरी दुसऱ्याने भावनिक दया दाखवून दिलेले मरण. पण मग ही दया दाखवणार कोण? हा हक्क कोणाला द्यायचा? आणि हे सर्व ठरवणार कोण? या तथाकथित दयेचा दुरुपयोगच होण्याची जास्त शक्यता वाटते. काहींच्या दृष्टीने भावनिकतेतून याकडे पहिले पाहिजे, पण मग यासाठी भावनिक नाटय़ किंवा प्रक्षोभ नको.
– विक्रम सोनवलकर, फलटण.

विद्यार्थ्यांना सहानुभूतीची गरज नाही
‘नीट नाटकाचा गोंधळ’ (२१ मे) ही बातमी वाचल्यानंतर आपण एका अनावश्यक गोष्टीवर भर देत आहोत आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्षित करीत आहोत असे वाटते. एकीकडे दोन-तीन हजार मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आणि दुसरीकडे दर्जेदार वैद्यकीय शिक्षण आणि त्यातून उपलब्ध होणारी रुग्णसेवा अशी ही लढाई आहे. अनेक डॉक्टर आपल्या पाल्यांना काहीही करून डॉक्टर करायचेच आणि पिढीजात व्यवसाय निश्चित करायचा आणि लग्नाच्या बाजारात कोटी कोटी हुंडा वसूल करायचा या मानसिकतेत आहेत. समाजहित डावलून त्यांना सहानुभूती दाखवण्याची मुळातच गरज नाही. आणि समजा एक वर्ष विद्यार्थी थांबला आणि नीट अभ्यास करून नीट परीक्षेला सामोरा गेला तर त्यात त्याचेच कल्याण आहे.
– देवयानी पवार, पुणे</strong>

सरकार काहीच शिकले नाही!
‘तंत्रशिक्षण संस्थांमधील पद भरतीचा निकाल रखडलेला’ (२० मे) हे वृत्त वाचल्यानंतर या क्षेत्रात अन्याय करण्याची परंपरा सरकारने अजूनही सुरू ठेवली आहे हे पाहून वाईट वाटले. आमच्या काळात ‘कंत्राटी शिक्षक’ हा शब्दप्रयोग नव्हता, पण आम्हाला तसेच वागवले गेले. १९६३ ते १९८३ या काळात माझ्यासारखे अनेक जण तात्पुरते राजपत्रित (वर्ग २) व्याख्याते म्हणून काम करत होते. धड कायमही केले नाही आणि काढूनही टाकले नाही. नंतर अनेक जण लोकसेवा आयोगातर्फे नेमणूक करून यायचे आणि आमच्यापेक्षा सेवाज्येष्ठतेत जास्त धरले जाऊन बढती, परदेशी शिष्यवृत्ती मिळवून आम्हाला मागे टाकायचे. २२ वष्रे नोकरी करून कुठेच कायम झालो नाही. शेवटी कंटाळून ती नोकरी सोडली, इतरत्र प्रगती केली, नाही तर माझा एखादा विद्यार्थी माझा साहेब झाला असता!
– प्रा. यशवंत भागवत, पुणे

सोक्षमोक्ष लावावा
मंत्रिमंडळातील अनुभवी आणि प्रभावी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचाराला साहाय्य करण्याचा आरोप होत आहे. एकाने तर त्यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. स्वत: खडसे यांनी हा प्रत्येक आरोप तत्काळ फेटाळून लावला असून, आरोप करणाऱ्यांनी त्यांच्याकडे असल्यास एखादा तरी पुरावा सादर करावा, असे आव्हान दिले आहे. आता खडसेंनी हे प्रकरण त्यांच्या परीने धसास लावावे. कारण बेछूट आणि बेलगाम आरोप करून एखाद्याचे राजकीय जीवन संपविण्याचा अधिकार कोणालाही असता कामा नये. अशा आरोप करणाऱ्यांना योग्य तो धडा मिळालाच पाहिजे. खडसे यांनी न्यायालयात जाऊन कायमचा सोक्षमोक्ष लावावाच. मात्र तसे न करता हे प्रकरण त्यांनी मध्येच सोडून दिल्यास, लोकांना काही तरी संशयास्पद आहे, असे म्हणण्यास वाव राहील.
– मोहन गद्रे, कांदिवली.

किल्ल्यांच्या पलीकडे विचारशक्ती जाणार कधी?
‘जे. जे. कला महाविद्यालयातर्फे रेल्वेला आराखडा सादर; १८०० कोटी रुपयांचा प्रकल्प, सात किल्ल्यांची प्रतिकृती उभारणार’ अशा मथळ्याची बातमी (लोकसत्ता, १३ मे) वाचली. या प्रस्तावित प्रकल्पाच्या मॉडेलचा फोटोही सोबत आहे.
मुंबईचे सी.एस.टी. स्थानक हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आहे. या वास्तूला हेरिटेज दर्जा मिळाला आहे. ब्रिटिशांनी, लंडनमध्ये बांधलेल्या रेल्वे स्थानकांच्या तुलनेत हे मुंबईतील स्थानक अनेक पटीने सुंदर आहे. खुद्द ब्रिटिश प्रजाजनांचेही मत असेच आहे. वास्तुशिल्पकलेच्या दृष्टीने अप्रतिम सौंदर्य लाभलेल्या वास्तूचाच एक भाग म्हणून १८व्या प्लॅटफॉर्मच्या बाजूच्या जागेवर रेल्वे भव्य इमारती उभ्या करणार आहे. उपरोक्त बातमीसोबत असलेला फोटो पाहून असे वाटते, की वास्तुशिल्पकलेविषयीची आमची अभिरुची सद्यस्थितीत खूपच खालावली आहे. मध्ययुगीन गड, किल्ल्यांच्या वास्तुशैली कल्पनेच्या पलीकडे आमची विचारशक्ती जाऊ शकत नाही का? सात किल्ल्यांच्या प्रतिकृती असलेल्या सात इमारती व त्यातील एका इमारतीवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा!
वास्तविक भारतात अनेक शहरामधून उत्तम भारतीय वास्तुशिल्पकार अनेक चांगल्या वास्तू उभारत आहेत. वास्तुशिल्प विद्यालयात आज अनेक विद्यार्थी असे आढळतात, की ज्यांच्याकडे उत्तम कल्पनाशक्ती आहे, सौंदर्यदृष्टी आहे. सर जे. जे. कला विद्यालयाऐवजी सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्याना या प्रकल्पाचा आराखडा सादर करण्यासाठी पाचारण करायला हवे होते, कारण हा प्रकल्प आर्किटेक्चर विषयाशी निगडित आहे.
खरे म्हणजे १८०० कोटी रुपयांच्या प्रकल्प उभारणीसाठी रेल्वेने राष्ट्रीय स्तरावर एक स्पर्धा आयोजित करायला हवी. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्टस् व काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांच्या सहयोगाने स्पर्धा आयोजित करून व्यावसायिक आर्किटेक्टस्कडून संकल्पना मागवायला हव्यात. तज्ज्ञांची एक निवड समिती नेमून त्यांच्या मदतीने, आलेल्या संकल्पनांतून एका संकल्पनेची निवड करून त्या संकल्पनेप्रमाणे प्रकल्पाची उभारणी झाली पाहिजे. तेव्हाच एक चांगला आधुनिक दर्जाचा वास्तुशिल्प प्रकल्प सी.एस.टी. परिसरात रेल्वेकडून उभारला जाईल. नव्या, तरुण होतकरू वास्तुशिल्पकारांना आपली कला प्रकट करायला संधी मिळेल. जनतेलाही वास्तुशिल्पकलेत काही नवीन पाहायला मिळेल.
सध्याचे रेल्वे मंत्री या विषयात जातीने लक्ष घालतील, अशी आशा करू या.
-भा. द. साठे, (वास्तुशिल्पकार)

भाजपची ध्येयाच्या दिशेने..
‘नायकांची निवडणूक’ (२० मे) या अग्रलेखात काढलेला पाच राज्यांतील निवडणूक निकालांचा अन्वयार्थ योग्यच आहे. या निवडणुकांबाबत आणखीही काही मुद्दे महत्त्वाचे वाटतात. प. बंगालमध्ये डाव्यांना साथ द्यायची आणि केरळमध्ये त्याच डाव्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची या कँाग्रेसच्या धोरणातली विसंगती मतदारांना खटकली असावी हे एक कारणही या दोन्ही राज्यांतील काँग्रेसच्या पराभवामागे असावे. तामिळनाडूमध्ये द्रमुकला काँग्रेसच्या मानाने बऱ्याच जास्त जागांवर विजय मिळाला. काँग्रेसची साथ द्रमुकला भोवलेली दिसते. द्रमुकने काँग्रेसला साथीला घेतले नसते तर जयललितांचा विजय इतका सुकर झाला नसता. आसाम आणि केरळमधून काँग्रेसची सत्ता गेल्याने ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या दिशेने भाजपने आणखी दोन पावले टाकली, असे या निवडणूक निकालांनी दर्शवले आहे.
– राजीव मुळ्ये, दादर