22 January 2021

News Flash

किरीट सोमय्या आता गप्प का?

‘खडसेंबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील’ असे म्हणून फडणवीस यांनी आपली सुटका करून घेतली आहे.

राज्यातील आणि देशातील भ्रष्टाचार वा गरव्यवहार शोधून काढण्याचा ठेका आपल्याकडेच असल्याचा आव आणून प्रत्येक प्रकरणात सतत वृत्तवाहिन्यांवर झळकणारे खा. किरीट सोमय्या खडसे प्रकरणावर मात्र गप्प का आहेत? राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर सरकारी जमीन बळकावण्याचे आणि आपल्या पदाचा गरवापर करण्याचे आरोप होत असताना किरीट यांचे मौन सामान्य जनतेला खूप काही सांगून जाते. आणि समजा, जर का सदर आरोप बिनबुडाचे असतील तर हे खासदार खडसेंच्या मदतीला धावून का गेले नाहीत, हाही समजून घेण्याचा विषय आहे. भुजबळ आणि शिवसेना सत्तेत असलेल्या मुंबई मनपा प्रशासनाच्या भ्रष्टाचाराबद्दल भविष्यवाणी करताना जी तत्परता दाखवली गेली तीच घाई खडसे यांच्या बाजूने वा विरोधात का दाखवत नाही? खडसे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे किरीट यांना वाटते की काय, हे तरी त्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे. का ‘आपला तो बाब्या नि दुसऱ्याचं ते करट?’
– सुरेश पाटील, भांडुप (प)

पराभूतांचे पुनर्वसन
वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी राज्यसभा/विधान परिषदसाठी निवडलेल्या उमेदवारांवर नजर टाकली तर यात निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्यांचाच भरणा दिसून येतो. कपिल सिब्बल, जयराम रमेश, प्रफुल्ल पटेल, पी. चिदम्बरम, नारायण राणे इ. ठळकपणे नजरेत भरतात. असे करताना या लोकांविरुद्ध जनतेने निवडणुकांत नोंदवलेल्या मतांचा आपण अनादर करतो आहोत याचे भान कुणालाही नाही. हे म्हणजे पराभूतांचे पुनर्वसनच आहे. दोन वर्षेपूर्तीच्या सरकारी आयोजनांवर टीकेची झोड उठवताना दोन वर्षांपूर्वीच्या दारुण पराभवानंतर पक्षबांधणीसाठी आपण कोणती पावले उचलत आहोत हे जनतेला सांगणे आपले कर्तव्य आहे याची जाणीव विरोधी पक्षांना अजिबात नाही. जोपर्यंत पक्ष जनतेशी जोडला जाणार नाही तोपर्यंत तो सत्तेपासून दूरच राहील हे बहुधा आता लक्षात आले असेल, अशी आशा करू या.
– अरुण पराडकर, सांगली

भाजपचे चुकलेच.!
‘खडसेंबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील’ असे म्हणून फडणवीस यांनी आपली सुटका करून घेतली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदार होते. खडसे हे सर्वात ज्येष्ठ दावेदार, बहुजनांत जनाधार असलेले व खान्देशचे. तुलनेने कनिष्ठ असलेले फडणवीस यांची निवड झाली ती केवळ पक्षश्रेष्ठींमुळेच. जेव्हा पक्षवाढीसाठी अनुकूल राजकीय हवामान आहे तेव्हा खडसेंसारखा जनाधार असलेल्या नेत्यावर कारवाई करण्याची वेळ येते हे पक्षाचे दुर्दैव; पण यावर उपाय म्हणून अन्य पक्षातील गणंग आणून त्यांना पक्षात मानाचे पान देणे हा आत्मघात ठरेल. विधान परिषदेसाठी उमेदवार निवडताना भाजपने हीच चूक केली आहे. हा पेचप्रसंग सोडविण्यासाठी मोदी आता बारामतीस प्रयाण करतील असे दिसते.
– प्रमोद प. जोशी, ठाणे

सुगम्य भारताचे आव्हान
मोदी सरकारने दोन वर्षे पूर्ण केल्याप्रीत्यर्थ केल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून ‘सुगम्य भारत योजना’ माहीत झाली. दृष्टिहीन किंवा चाकांच्या खुर्चीच्या साहाय्याने फिरणाऱ्या नागरिकांचा विचार तरी झाला याबद्दल सरकारचे अभिनंदन केले पाहिजे; परंतु अंमलबजावणीमध्ये ‘सुगम्य भारत’चा ‘स्वच्छ भारत’ होऊ नये म्हणून काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आज मोठय़ा शहरांमध्ये अगदी धडधाकट माणसांनासुद्धा चालायला पदपथ (शिल्लक असलेच तर) आणि रस्ते अत्यंत धोकादायक झाले आहेत. गटारांची तुटकी झाकणे, उखडलेल्या फरशा, अर्धवट सोडून दिलेले बांधकाम, आडव्या जाणाऱ्या अनधिकृत नळजोडण्या यामुळे पदपथ धोकादायक आहेत. ठाण्यासारख्या शहरात तर वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूनेच चालवायची असतात हा नियमच रद्द केला असावा असे वाटते, ज्यामुळे रस्ता जीव मुठीत घेऊनच ओलांडावा लागतो. धडधाकट सामान्य माणसांची ही परिस्थिती असताना ‘सुगम्य भारताचे’ स्वप्न सत्यात उतरवण्याचे आव्हान सरकार कसे पेलवणार?
– विनीता दीक्षित, ठाणे

धरणाखाली गेलेली मंदिरे पुनप्र्रस्थापित करावीत
इजिप्तमधील नाईल नदीवर आस्वान धरण बांधल्यामुळे अबु सिम्बल देवळे (नुबिया स्मारके) पाण्याखाली जाणार हे कळल्यावर युनेस्कोच्या मदतीने ती उंच जागेवर हलवण्यात आली. आपल्या महाराष्ट्रातील पळसनाथसारखी काही प्राचीन देवळे धरणाखाली गेली आहेत. धरणे कोरडी झाल्यावर ही देवळे उत्तम स्थितीत पाहायला मिळतात. सरकार निरनिराळ्या लोकप्रिय पण निर्थक गोष्टींवर नाहक पैसे खर्च करते. ही देवळे प्रत्येक वीट, चिरा पद्धतशीर हलवून चांगल्या जागेत पुनप्र्रस्थापित करणे अवघड असले तरी अशक्य नाही.
– यशवंत भागवत, पुणे

वाळूत मारल्या रेघा..
गिरीश कुबेर यांचा ‘एक जखम वाहती.’ हा लेख (अन्यथा, २८ मे) माहितीपूर्ण आहे. त्या काळातील युरोपीय महासत्तांच्या ‘गुर्मी’ची त्यातून चांगली कल्पना येते. युद्ध जिंकण्याच्या दोन वर्षे आधीच या महासत्तांनी ‘वाळूत रेघा’ मारल्या होत्या, पण लेखात दिलेल्या काही माहितीत किरकोळ तपशिलाची गफलत आहे. अमेरिका एके काळी ब्रिटनच्या साम्राज्याचा एक भाग होती, हे खरे आहे; पण ती स्थिती १७७५च्या आधीची होती. त्यानंतर अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले व १७८३ पर्यंत चालले. म्हणजेच, सायमन-पिको कराराच्या सव्वाशे वष्रे आधीची ही घटना आहे. त्यामुळे तिचा या कराराशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध नाही. केमाल पाशा (अतातुर्क) हा पहिल्या महायुद्धात (१९१४ ते १९१८) लढत होता; तो त्या वेळी सन्यात होता. लेखात उल्लेख आहे तसा तो ऑटिमन साम्राज्याचा सम्राट नव्हता. ते साम्राज्य महायुद्ध संपल्यावर लयाला गेले. १९१९ ते २२ हा केमाल पाशाने टर्कीमध्ये केलेल्या क्रांतियुद्धाचा काळ आहे. त्याने टर्कीत ‘रिपब्लिक’ सुरू केले. मात्र या किरकोळ गफलतीमुळे मुख्य माहितीला काही बाधा पोहोचत नाही.
– सुभाष स. नाईक, सांताक्रूझ (मुंबई)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 2:45 am

Web Title: loksatta readers letter 58
टॅग Readers Letter
Next Stories
1 स्वातंत्र्यवीरांचे विचार-आचरण समग्रपणे पाहण्याची तयारी आहे?
2 आरोप खोटे ठरल्यावरच पुन्हा मंत्री व्हा!
3 चिकित्सा.. अडलेली आणि टाळलेली..
Just Now!
X