‘समरसतेची संध्या’ हा अग्रलेख (२२ जुलै) वाचला. दलितांवरच्या अत्याचारांच्या बातम्या विषेशत्वाने येत आहेत व गाय हे त्याचे कारण असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या पशूचे महत्त्व किती वाढवायचे याला मर्यादा आहेत. आपला मतदारसंघ गाई व बैल हे नसून सामान्य माणसे आहेत हे सत्ताधारी पक्षाला व त्याच्या पारिवारिक संघटनांना लवकर समजेल तर बरे.

दलितांवरचे अत्याचार हे सर्वच पक्षांच्या राजवटीत होत आले आहेत. पण वर्तमान राजवट ही हिंदुत्वाचे प्रेम असणारी आहे. तेव्हा अधिक सावधानतेने कारभार करण्याची गरज आहे. बजरंग दलानेदेखील माकडांप्रमाणे न वागता वज्रहनुमान मारुतीचा आदर्श ठेवण्याची गरज आहे, अन्यथा त्याच्या बोलवित्या धन्यासंबंधीच नजीकच्या भविष्यात शंका निर्माण होणार आहे.

रवींद्र कुलकर्णी, डोंबिवली.

 

विराटचे तरी जतन करा!

‘अभिमानाची मानहानी’ हा अन्वयार्थ (२५ जुलै ) वाचला. लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या देशातील समृद्ध, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जतन करण्याबाबत हेळसांडच अनुभवास येते. त्यात बऱ्याचदा नागरिकही कारणीभूत असतात. लेखात हा विषय मांडताना आपण विमानवाहू नौका विराटची तुलना सुनील गावसकरांच्या क्रिकेट कारकीर्दीतील सोन्याचा क्षण हरवून टाकण्याशी केली हा अन्वय पटण्यासारखा नाही. सुनील गावसकर महान क्रिकेटपटू आहेत यात शंकाच नाही. त्यांच्याबद्दल आदरच आहे. ‘दूरदर्शन’ने हरवलेले क्षण कदाचित परत मिळवता येतील, पण विराटचे तसे नाही. तिचे जतन व्हावे. विक्रांतप्रमाणे विराटचे दर्शन घेऊन तिच्या पराक्रमाचा संवाद होईल.

व्यंकटेश चौधरी, नांदेड.

 

सॉफ्टबँक ही बँक नव्हे

‘अन्यथा’ सदरातील ‘यंत्र (मानव)युग’ हा लेख (२३ जुलै) वाचला. लेखात सॉफ्टबँक या कंपनीचा उल्लेख बँक असा झाला आहे, ते चुकीचे आहे. सॉफ्टबँक ही जपानमधील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. बँक व्यवसायाचा काडीचा संबंध नाही. मी जपानी भाषांतरकार आहे. सर्वच वृत्तपत्रे जपानी संदर्भ वापरताना चुका करत आहेत. ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखातही एकदा जपानी पंतप्रधानांचे नाव चुकीचे लिहिले होते. ते अ‍ॅबे नसून आबे हवे असे मीच ई-मेलने कळवले होते.

हर्षद फडके, पुणे.

 

धर्म नाकाराल, पण जात?

मिलिंद मुरुगकर यांचा ‘झाकीर नाईक वि. सेक्युलॅरिझम’ हा लेख व त्यावरील पत्रांच्या अनुषंगाने आणखी एक मुद्दा. नरहर कुरुंदकर म्हणतात त्याप्रमाणे, मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्माच्या व्यक्तीने फक्त देव नाकारला की तो धर्म आणि धर्मग्रंथ या दोन्हींच्या कचाटय़ातून सुटतो. पण हिंदू धर्मात निरीश्वरवादी अनेक दर्शने आहेत आणि प्रमाण असा एकच एक धर्मग्रंथही नाही. देव आणि सर्व धर्मग्रंथ जरी अमान्य केले तरी जातींच्या कचाटय़ातून सुटणे जवळपास अशक्यच! म्हणून हिंदू माणसाला दुसरा धर्म न स्वीकारता अहिंदू होणेही अशक्यच! म्हणूनच आंबेडकरांनी बौद्घ धर्म स्वीकारला असावा. धर्म बदलला तरी जात सुटायला अनेक पिढय़ा जाव्या लागतील हेही स्वीकारावे लागते.

सुभाष आठले

 

ही पुलंच्याच शब्दांची पुण्याई

‘लोकसत्ता’ १७ जुलैच्या अंकातली ‘ती फुलराणी’ नाटकाविषयीची बातमी वाचून सुखद धक्का बसला. नाटकाच्या सुवर्णमहोत्सवी प्रयोगाच्या दिवशीच मुखपृष्ठावर एवढी प्रसिद्धी दिल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद! आता मुद्दा पु. ल. देशपांडे यांच्या लिखाणातल्या मोडतोडीचा. नाटकाचा दिग्दर्शक म्हणून मला स्पष्टीकरण करणं आवश्यक वाटतं. मुळात ‘ती फुलराणी’ हे नाटक करायचा प्रपंच करण्यामागचा हेतूच पु. ल. देशपांडेंची भाषा. तिच्यातच मोडतोड करून आम्ही आमच्या मूळ हेतूलाच सुरंग लावू का? पण काळानुसार, पुनरावृत्ती टाळण्यासाठी पहिल्या प्रवेशात छोटंसं संकलन आवश्यक वाटलं, ते केलं आहे. ज्यामुळे नाटय़परिणामात वाढच होतं. ४० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या नाटकात वर्तमान काळानुसार काही छोटे बदल करणं गरजेचं असतंच.

मुळात नाटक ही प्रयोगशील कला आहे. एकही शब्द बदलायचा नाही या अटीवर ठाम राहिलं तर कोणतीच जुनी नाटकं आज रंगमंचावर येणार नाहीत. ज्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया ‘लोकसत्ता’ने दिल्या आहेत त्यांनी नाटक बघितलेलं नाही. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी ‘आपल्याला जनरल प्रतिक्रिया विचारली होती,’ असं स्पष्टीकरण केलं आहे. रत्नाकर मतकरी यांनी तर तसं लेखी लिहून दिलं आहे. माननीय ठाकुरांनी नाटक बघून खटकलेल्या गोष्टी रंगपटात येऊन आम्हाला सांगितल्या असत्या तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्या बदलांविषयीची आमची भूमिका त्यांना पटवून दिली असती. मागच्याच काही वर्षांत पु. ल. देशपांडेंच्या साहित्यावर भन्नाट कलाकृती बनत असताना हेच सन्माननीय वतनदार कुठे होते? ‘ती फुलराणी’ हेच नाटक एका सन्माननीय दिग्दर्शकांनी स्वातंत्र्य घेऊन केलेलं आणि मोठय़ा संस्थेने निर्मिती केलेलं-  जे ‘यूटय़ूब’वर तरुण आणि भावी पिढीसाठी उपलब्ध आहे ते यांना थांबवता येईल का? आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने हे नाटक करत आहोत. रसिक प्रेक्षक नाटकाला भारावून दाद देत आहेत. ही केवळ पु. ल. देशपांडे यांच्याच शब्दांची पुण्याई आहे.

राजेश देशपांडे

 

नमस्कारही करायचा आणि उपमर्दही?

पुलं आणि सुनीताबाई यांच्या दातृत्वाचा आणि सामाजिक बांधिलकीचा अनुभव त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा आला. पुलंच्या हातून जी निर्मिती झाली त्याच्यावर त्यांच्या पश्चात कोणी इतरांनी अडवणूक अथवा पैसे करू नयेत आणि त्याचा आनंद समाजाने घ्यावा अशीच या उभयतांची इच्छा होती. म्हणूनच सुनीताबाईंनी त्यांच्या मृत्यूनंतर पुलंच्या सर्व नाटकांचे हक्क समाजासाठी खुले केले म्हणजेच पुलंचं कुठचंही नाटक करण्यासाठी कुणाचीही परवानगी लागणार नाही. मानधन द्यावे लागणार नाही, पण त्याचबरोबर पुलंच्या साहित्याचा कस कायमच अत्यंत काटेकोरपणे जपणाऱ्या सुनीताबाईंनी कलावंतांकडून अशी रास्त अपेक्षा ठेवली, की पु. ल. देशपांडे लिखित नाटकाचे प्रयोग करताना त्या नाटकाच्या मूळ संहितेत कुठल्याही कारणास्तव शब्दाचाही बदल करू नये. थोडक्यात कायद्यानुसार त्यांनी ‘कॉपी’ करायचा ‘राइट’ खुला केला, ‘वाटेल तसे बदल’ करण्याचा नाही.

असा बदल आढळल्यास त्याला विरोध करून पुलंचे शब्द जपायची जबाबदारी सुनीताबाईंनी पुलंप्रेमी सुजाण प्रेक्षक, रसिक, टीकाकार किंबहुना संपूर्ण समाजावर सोपवली. लेखकाने घातलेल्या मर्यादा कलाकारांनी का व कशा पाळाव्या ह्य़ावरचे सुनीताबाईंचे विचार पुलंच्याच नाटकातील एका कलावंताला लिहिलेल्या पत्रात दिसतात – या कलाकाराच्या कौतुकाबरोबर कानउघाडणी करताना सुनीताबाई लिहितात – ‘‘कालच्या प्रयोगात तुझ्या कामात जो फरक पाहिला तो मला फार खटकला. त्या कॅरेक्टरला सोडून तू अगदी चुकीचा अभिनय केल्याचे जाणवले.. कॅरेक्टरच्या मर्यादा सांभाळून फार सुंदर अभिनय करण्याची ताकद तुझ्यात असताना तू प्रेक्षकांचा चीप प्रतिसाद मिळवण्याच्या मागे अचानक का लागलास कळलं नाही.. याची गरज काय? दृष्ट लागावी असा संयमित अभिनय करून सुजाण प्रेक्षकांकडून शाबासकी मिळवणारा तू एकाएकी अशी बफूनरी का सुरू केलीस?.. ही नुकतीच सुरुवात वाटली म्हणून मुद्दाम तुला जागं करायला अत्यंत आपुलकीने आज मी हे लिहीत आहे. तू अनेक नामवंतांपेक्षा खूप मोठा नट आहेस हे विसरू नकोस. तुला ह्य़ा चीप ट्रिक्स शोभत नाहीत. एकदा त्या अंगवळणी पडल्या की मग संपलं- म्हणून आताच सावध हो. लोक हेही बरं म्हणतील. आंधळी स्तुती करतील.. त्या त्या कॅरेक्टरला पूर्ण न्याय द्यायला आवश्यक त्या मर्यादेच्या बाहेर डोकावण्याचा मोह तुला पडायला लागलाय अशी मला काल भीती वाटली म्हणून अत्यंत जिव्हाळ्यापोटी मी तुला हे लिहीत आहे. लेखक आणि डायरेक्टर म्हणून भाईने विचारपूर्वक काही भाग एडिट केला. त्यात तुझ्या चार ओळी काढल्या. त्या तू का घेतोस? हे चूक नाही का? प्रत्येक पात्राने असाच स्वत:चा भाग केला तर कसे होईल? हे रंगभूमीवरच्या नीतीला सोडून आहे. त्या चार ओळींनी तू काहीही मिळवत नाहीस, फक्त मोठं काही तरी गमावतोयस. लेखक आणि दिग्दर्शकाचा विश्वास! भाईच्या पायाला हात लावून नमस्कार करायचा आणि त्याने घालून दिलेल्या मर्यादांचा उपमर्द करायचा या दोन गोष्टींचा मेळ तू कसा घालतोस? सबंध नाटकाचा तू एक घटक आहेस. भाईने प्रत्येक घटकाचा स्वतंत्र आणि सगळ्या युनिटचा एकत्रित विचार करून नाटक बसवले. आता सुटय़ा सुटय़ा घटकांनी थोडीशी लिबर्टी घेणं हेसुद्धा ते युनिट विस्कळीत करायला हातभार लावल्यासारखं आहे..’’

अलीकडच्या काळात दूरदर्शन, रंगभूमी आणि चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमांत पुलंच्या कलाकृती पुन्हा नव्या स्वरूपात आल्या व येत आहेत. हे पुलंच्या साहित्याचा ताजेपणा आणि जिवंतपणा याचेच लक्षण आहे. पुलं आणि सुनीताबाईंच्या इच्छेचा मान राखून पुलंचे किंवा त्यांच्या कलाकृतीचे नाव वापरायचे असल्यास माध्यम बदलले म्हणून किंवा तशाच कुठच्याही कारणास्तव पुलंच्या मूळ कलाकृतीच्या संहितेत, शब्दात, संवादात, व्यक्तिरेखांत, कथेच्या गाभ्यात कुठलाही फरक/ बदल होऊ नये. असा बदल करायचा असल्यास ‘पुलंच्या कलाकृतीवर आधारित रूपांतर’ असे म्हणून ते करणाऱ्या लेखकाचे व कलाकृतीचे नवीन नाव असणे योग्य. या संदर्भात शरद तळवलकरांनी सांगितलेला पुलंचा बोलका किस्सा –

पुलं, शरद तळवलकर आणि वसंतराव देशपांडे पुलंच्या घरी गप्पा मारत असताना किल्लेदार नावाचे एक गृहस्थ आले – म्हणाले, ‘‘माझ्या मते गडक ऱ्यांचं ‘एकच प्याला’ हे नाटक दोनतृतीयांश बरोबर असून एकतृतीयांश चूक आहे. ते एक तृतीयांश मी सुधारून आणलंय.’’ पुलंनी वहीचं पहिलं पान उघडलं. संगीत एकच प्याला – लेखक राम गणेश गडकरी. एवढं वाचून पुलं त्या गृहस्थाला म्हणाले, ‘‘काय हो, एकतृतीयांश तुम्ही कुठं सुधारलंय? राम गणेश गडकरीऐवजी राम गणेश किल्लेदार असं करायला पाहिजे.’’

दिनेश ठाकूर, पुणे