निर्वाहवेतन, स्वस्त औषधे देऊन व्याजकपात करा!

‘निर्मला, निर्गुणा, निराकारा’ या संपादकीयात सरकारचे धोरण हेलकावे उघड करताना, अर्थभानाची निकड अधोरेखित करण्यात आली आहे. स्वस्त कर्जे व ठेवींवर कमी व्याजदर यांचा मेळ पाश्चात्त्य जगाने घातला असला तरी तो येथे शक्य नाही. युरोपीय देशांत वा अमेरिकेत ज्येष्ठ नागरिकांना सरकारतर्फे निर्वाहवेतन, रास्त दरांत औषधे व वृद्धनिवासही उपलब्ध आहेत आपल्याकडे यातील काहीच नाही आणि येथील १६ कोटी वृद्धांपैकी दोन टक्के वृद्ध सोडले तर बाकीच्यांना अतिशय कमी निवृत्तिवेतन मिळते. त्यामुळे बचतीवरील व्याजदर हाच त्यांचा जीवनाधार आहे आणि तो कमी करणे हे कोणत्याही लोककल्याणकारी म्हणवणाऱ्या शासनास स्पृहणीय नाही.

–  विजय दांगट, पुणे</p>

दोन मुदतवाढींची (हास्यास्पद) कथा…

३१ मार्च या दिवशी आधार- पॅन कार्ड जोडण्याची ‘अंतिम मुदत’ होती, पण अपेक्षेप्रमाणेच मुदतवाढ मिळाली. याअगोदरही ती बऱ्याच वेळा मिळाली आहे. तरीही लोकांना दंडाची भीती दाखवून घाबरवण्याची सरकारी सवय पुन्हा दिसली. वास्तविक आयकर खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पार पाडणे जिकिरीचे आहे. त्यातच, अत्यंत नाजूक चणीची सरकारी संकेतस्थळे थोडा भार पडला की कोसळतात! तांत्रिक वा कायदेशीर अडचण नसेल तर दोन्ही सरकारी खात्यांनी (यूएआयडीएआय व प्राप्तिकर विभाग ) हे काम परस्परच का करू नये? दुसरी बाब ‘ऑटो-डेबिट’ची. ही सुविधा ग्राहकांपेक्षा कंपन्यांच्याच जास्त फायद्याची. काही घरगुती वस्तूंसाठी कर्ज देणाऱ्या कंपन्या कर्जफेडीनंतरही केवळ खाते संचालनाच्या नावाखाली दरवर्षी काही ठरावीक रक्कम परस्पर कापून घेतात. रक्कम जुजबी असली तरी लाखो ग्राहकांचे शेकडो कोटी रुपये कंपन्या परस्पर लाटतात, हे डाका घालण्यासारखेच नव्हे काय? आरबीआयने यालाही मुदतवाढ दिली… आनंदच आहे!!

– पृथ्वीराज जाधव, आळंदी-देवाची (जि. पुणे)

मोह या सरकारलाही आवरला नाही?

‘हीच पुरस्काराची वेळ?’ हा ‘अन्वयार्थ’ (२ एप्रिल) वाचला. रजनीकांत भारतातील सर्वोत्कृष्ट नटांपैकी एक आहेत याबद्दल प्रश्नच नाही, पण तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुका होत असताना हा पुरस्कार देऊन तेथील लोकांना खूश करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आहे. ज्या राज्यात निवडणूक असते त्या राज्यातील सुप्रसिद्ध व्यक्तीचा सन्मान करण्याचा मोह सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ देऊन मतांची आशा धरणाऱ्या काँग्रेसप्रमाणेच मोदी सरकारला आवरत नाही.

– प्रा. शुद्धोधन कांबळे, अमरावती</p>

व्यक्तिकेंद्रित, भावनिक राजकारणाचा वापर

दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना मिळाल्याची बातमी व त्यावरील टिप्पणी (२ एप्रिल) वाचली. कलाकारांच्या बाबतीत दक्षिणेकडील जनता मोठ्या प्रमाणात भावनिक आहे. त्यामुळे  रजनीकांत यांनी राजकारणाचे संकेत दिले त्याही वेळी त्यांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपने प्रयत्न केला. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजनीकांत यांनी राजकारणात न येण्याचा निर्णय घेतल्याने तमिळनाडूत रजनीकांत यांच्या खांद्यावर बसून प्रवेश करण्याचा भाजपचा यत्न फसला.

निवडणुकीसाठी येनकेनप्रकारेण प्रयत्न करणाऱ्या भाजपला व्यक्तिकेंद्रित भावनिक राजकारणाचा वापर कसा करायचा हे चांगलेच माहीत आहे. फाळके पुरस्कार रजनीकांत यांना ऐन मतदानाच्या आधी जाहीर होणे यात व्यक्तिकेंद्रित भावनिक राजकारणाला साद घालण्याचा प्रकार दिसतो.

–  सुरेखा मोहिते-काळे (गोंदवले, सातारा)

प्रश्न विचारायला हवे!

केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रकारांनी रजनीकांत यांच्या पुरस्काराच्या ‘टायमिंग’बद्दल विचारल्याने ते काहीसे चिडले, असे वाचण्यात आले. खरे तर निवडणूक आयोगाने अशा निर्णयावर स्वयंप्रेरणेने आक्षेप घेणे गरजेचे होते.  तथापि तमिळनाडूमधील सर्वच विरोधी पक्ष देखील या निर्णयाचे स्वागतच करणार आहेत, त्यांनी तसा विरोध केल्यास त्यांच्यावरच बूमरँग होईल. त्यामुळे हा विषय निवडणूक आयोगापर्यंत कुणा पक्षांनी नेलेला दिसत नाही!

रजनीकांत यांच्या कर्तृत्वाविषयी शंका नाही; तथापि पुरस्काराचे निवड मंडळ- ज्यामध्ये आशा भोसले, सुभाष घई, मोहन लाल, इत्यादी मान्यवर आहेत – त्यांनासुद्धा, तुमच्यावर काही राजकीय दबाव होता का? असा प्रश्न करणे गरजेचे आहे.  सध्याच्या एकूणच दहशतसदृश दबावाच्या वातावरणामुळे, पॅनेलकडूनही नकारार्थी उत्तर येणार, हे गृहीत धरले तरी, लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकेबाबत विचारणे, यात काहीच गैर नाही.

– राहुल म्हस्के, पुणे

गणित आणि साक्षात्कार (?)

गणिती तत्त्वज्ञ देकार्त यांच्याबद्दलचा लघुलेख (कुतूहल, १ एप्रिल) वाचला. त्यात एके ठिकाणी देकार्त यांना साक्षात्काराचा अनुभव देणारी स्वप्ने पडली असा उल्लेख असून कदाचित या साक्षात्कारसदृश स्वप्नामुळे देकार्तचे आयुष्य बदलले व त्यातून वैश्लेषिक भूमितीची कल्पना सुचली असावी, असे सूचित केले आहे. परंतु गणितासारख्या लौकिक, प्रत्यक्ष ज्ञानाच्या संदर्भात ‘साक्षात्कार’ हा शब्दप्रयोग अप्रस्तुत वाटतो. कारण ‘‘एखाद्या अतींद्रिय वस्तूच्या होणाऱ्या, पण प्रत्यक्षज्ञानाप्रमाणे थेटपणे होणाऱ्या ज्ञानाला साक्षात्कार म्हटले जाते. कोणत्याही अतींद्रिय वस्तूच्या थेट ज्ञानाला नेहमीच ‘साक्षात्कार’ हा शब्द वापरला जात नाही, तर एखादे सर्वव्यापक स्वरूपाचे किंवा मूलभूत तत्त्व, एखादे उदात्त, विराट तत्त्व किंवा वस्तू यांच्या थेट ज्ञानाच्या बाबतीत साक्षात्कार हा शब्द वापरला जातो. उदा., ब्रह्मसाक्षात्कार, ईश्वरसाक्षात्कार, आत्मसाक्षात्कार.’’ (संदर्भ : मराठी विश्वकोश)

त्यामुळे देकार्तला पडलेल्या स्वप्नांचे साक्षात्कार (वा अनुभूती!) या शब्दात वर्णन करणे गणिताच्या मूळ संकल्पनेलाच अध्यात्माच्या (स्पिरिच्युअलिझम) चौकटीत बसवल्यासारखे होईल. साक्षात्कार ही सर्व धर्मांतील एक मूलभूत संकल्पना असून तिची उत्पत्ती ईश्वर वा देवत्व या कल्पनेत सामावलेली आहे. कदाचित शब्दाचा कीस काढणे म्हणून याला दुर्लक्षितही करता येईल; परंतु अशा प्रकारच्या शब्दप्रयोगातून देकार्तच्या गणितीय ज्ञानाला व एकूणच गणिताला अतींद्रिय (ट्रान्सेन्डेटल) सदरात सामील करता कामा नये म्हणून हा प्रयत्न.

– प्रभाकर नानावटी, पुणे