News Flash

मानवाधिकार उल्लंघनाचा बळावलेला रोग

परधर्मीयाला जिवंत जाळून इतरांचीही अशीच गत केली जाईल, अशी उघड धमकी दिली जात आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली परधर्मीयाला जिवंत जाळून इतरांचीही अशीच गत केली जाईल, अशी उघड धमकी दिली जात आहे. एकामागून एक राज्यकर्तेच आपापल्या राज्यात सेन्सॉर बोर्ड प्रमाणित चित्रपट प्रदर्शित होऊ  देणार नाही, असे जाहीर करीत आहेत. राजस्थानमधील अल्वर येथे पोलीसच गोरक्षक बनून पुन्हा एकदा गाईंची अवैध वाहतूक करीत आहेत, असे सांगून गोळ्या घालून ठार मारीत आहेत. हे पाहून राष्ट्रीय मानवाधिकार दिनी शरमेने मान खाली घालून न्यायालयाचा सवाल विचारावासा वाटतो ‘कुठे चालला आहे आपला देश?’

असीम सरोदे यांनी म्हटल्याप्रमाणे (६ डिसें.) मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ नुसार त्वरित कार्यवाही करण्याची त्याचप्रमाणे ‘मानवी हक्क संरक्षण न्यायाधिकरण’ प्रस्थापित करण्याची गरज आहे. मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा हा रोग इतका बळावला आहे की त्यापासून या देशाला वाचविण्यासाठी ‘मानवी हक्क संरक्षण आयोग’ पुरा पडणार नाही. अन्यथा देशात अराजक माजून जंगलराज यायला वेळ लागणार नाही

– प्रभा पुरोहित, जोगेश्वरी (मुंबई)

विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याची गरज

‘काही बोलायाचे आहे..’ हा अग्रलेख (८ डिसें.) वाचला. देशाच्या बहिर्गत सुरक्षेबरोबर अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत भारताला म्हणावे तितके यश मिळवता आलेले नाही. नक्षलवाद्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघाला नाही. अनेक पक्षांची सरकारे आली, पण कोणी या प्रश्नांवर गांभीर्याने विचार केला नाही. नक्षलवाद का निर्माण होतो, त्यांच्या समस्या कोणत्या, त्यांची मागणी कोणती आदी प्रश्नांची कारणमीमांसा सरकारने केली पाहिजे. एकीकडे महासत्ता बनू पाहणाऱ्या भारतासारख्या देशाला अगोदर या प्रश्नावर तोडगा काढायला हवा. बंदुकीच्या गोळ्यांनी हे प्रश्न सुटणारे नाहीत. सरकारने त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यांच्याशी चर्चा करून विश्वासाचे वातावरण निर्माण करायला हवे. अन्यथा यांसारख्या समस्या देशाला सतावत राहतील.

– विक्रम कालिदास ननवरे, घोटी, ता. करमाळा (सोलापूर)

निषेध करण्यात भेदभाव कशाला?

पंतप्रधान मोदी यांना उद्देशून अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचा सर्व स्तरांवरून होत असलेला कडक निषेध स्वाभाविक आहे. अय्यर यांनी वापरलेल्या शब्दांनी पंतप्रधानपदाचा घोर अपमान झाला असून ते अक्षम्य कृत्य आहे यात तिळमात्र शंका नाही.

परंतु या संदर्भात गेल्या दोन-तीन वर्षांपासून समाजमाध्यमांतून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, लोकसभा सदस्य राहुल गांधी व सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, मायावती यांची प्रसृत झालेली हीन दर्जाची व्यंगचित्रे व त्यांच्याविषयी प्रमुख नेत्यांनी केलेली जाहीर वक्तव्ये अशीच हीन पातळीवरची होती. भारतीय सैन्यदलाचे राजकीयीकरण इतक्या थरावर पोहोचले की त्याची दखल लष्करप्रमुखांना घ्यावी लागली. असे असताना त्याचा निषेध करण्याचे भान कुणी ठेवले? निषेध करण्यात भेदभाव कशासाठी केला जातो?

– मुरली पाठक, विले पार्ले (मुंबई)

अंबड संगीतोत्सवातून साहित्यिकांनी प्रेरणा घ्यावी

‘प्रतिनिधी शुल्क भरूनच संमेलनाला उपस्थित राहावे’ हे वृत्त (७ डिसें.) वाचले. याआधी असेच आवाहन वाचून अंबड (जि.जालना) येथील ९० वर्षांची परंपरा असलेला आणि निधीअभावी दोन वर्षे खंड पडलेल्या श्री दत्त जयंती संगीतोत्सवाला पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. दिवंगत गायनाचार्य गोविंदराव जळगावकर यांनी सुरू केलेल्या या ग्रामीण महाराष्ट्रातील एकमेव संगीतोत्सवात कलावंतांनी विनामानधन येऊन गायन-वादन सादर करावे, असे आवाहन संयोजक आणि काही कलावंतांनीच पुढे येऊन केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. ३ व ४ डिसेंबर असा दोन दिवस संगीतोत्सव संपन्न झाला. यात जवळपास १५ कलावंत स्वखर्चाने सहभागी झाले. आवश्यक तो खर्च यजमान संस्था करतेच. आदरातिथ्य ही तर आपली संस्कृती आहे. संयोजनात मानधन खर्च हा मोठा असतो. तो कमी केला तर कुणापुढे हात पसरण्याची गरज पडत नाही, हे अंबडच्या रसिकांनी आणि मराठवाडय़ातील कलावंतांनी दाखवून दिले आहे. यापासून सर्वच क्षेत्रांतील मंडळींनी प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. बडोद्याच्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांना म्हणूनच प्रतिसाद मिळावा असे मनोमन वाटते.

– महेश माधव वाघमारे, बीड

आकाशवाणीत कशाकशाला परवानगी नाही?

आकाशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवरील ३ डिसेंबरच्या ‘इंद्रधनू’ कार्यक्रमात जुन्या मराठी चित्रपटांचा आढावा घेतला गेला. त्यात १९४० साली आलेल्या ‘वंदेमातरम्’ या चित्रपटाची माहिती सांगताना निवेदिकेने या चित्रपटाचे निर्माते पु. रा. भिडे, दिग्दर्शक राम गबाले, गीतकार गदिमा, संगीतकार बाबूजी वगैरे माहिती सांगितली. या संदर्भात मी फोन करून निवेदिकेला पु. रा. भिडे म्हणजेच लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक होत, अशी अधिकची माहिती सांगितली व ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवा, अशी विनंती केली. परंतु त्यांनी परवानगी नसल्याचे कारण सांगून तसे करण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर आपल्या निवेदनाच्या ओघात सदर चित्रपटापासून आपल्या दिग्दर्शकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या राम गबाले यांनी इतर कोणते चित्रपट दिग्दर्शित केले याचा सविस्तर तपशील सांगितला. या संदर्भात मला सदर वाहिनीबाबत माझ्याच बाबतीत सुमारे दोन वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आठवतो. त्या वेळी मी संत नरहरी सोनारांचा ‘देवा तुझा मी सोनार’ या रामदास कामतांनी गायलेल्या अभंगाची फर्माईश केली होती. तेव्हा निवेदिकेने जातीचा उल्लेख असलेली गाणी ऐकविण्यास परवानगी नसल्याचे सांगितले होते. त्यावर मी ‘आम्ही ठाकर, ठाकर’सारखी गाणी कशी ऐकवली जातात, असे विचारले असता त्यांच्याकडे उत्तर नव्हते. ही बाब मी त्या वेळच्या केंद्रप्रमुखांच्या फोन करून निदर्शनास आणली असता त्यांनी चौकशी करून कळवते असे म्हटले होते. परंतु आजतागायत काहीही कळवलेले नाही.  तेव्हा माझी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी याबाबत नक्की काय धोरण आहे ते स्पष्ट करावे.

– माधव बावकर, मुलुंड (मुंबई)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2017 1:15 am

Web Title: loksatta readers letter on various social issues
Next Stories
1 आपल्या दिशेची चार बोटे!
2 केंद्र व राज्य कृषी मूल्य आयोगाच्या भावात फरक कोणत्या कारणाने?
3 राज ठाकरेंच्या भूमिकेत पंतप्रधान?
Just Now!
X