‘पित्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलाला वेळ नाही’ ही बातमी आणि त्या अनुषंगाने लिहिलेला ‘नाण्याची तिसरी बाजू..’ हा अग्रलेख (११ नोव्हें.) वाचला. आपल्या समाजाची जडणघडण हीच मुळात ‘मानव हा समूहाने राहणारा प्राणी आहे’ या उक्तीप्रमाणे झाली आहे. वर्षांनुवर्षे जपलेले बंध आता हळूहळू सैल होऊ  लागले असून त्याचे काहींना दु:ख होईल, तर काही जण ‘कालाय तस्मै नम:’ म्हणून गप्प बसतील. मुळात मानव हा एक प्राणी आहे आणि मानवेतर प्राण्यांमध्ये पिल्लांना त्यांचे आईवडील एका विशिष्ट टप्प्यावर सोडून देतात हेही आपल्याला माहीत आहे; परंतु मानव जातीचे संस्कार मानवाच्या पिल्लांवर होतात आणि मानवी पिल्लांवर असलेले मात्यापित्याचे प्रेम वर्चस्व गाजवण्यात कधी बदलते हे कळतच नाही आणि या पिल्लांचे लग्न झाले की, प्रत्येकाच्याच अहंकाराला धुमारे फुटतात. सल्ले द्यायची आणि माझेच कसे बरोबर आहे ते सांगण्याची चढाओढ सुरू होते आणि त्यात संपूर्ण कुटुंबाचीच घुसमट होत राहते.

पक्षी एका क्षणी आपल्या पिल्लांच्या पंखांमध्ये बळ येण्यासाठी त्यांना घरटय़ाबाहेर ढकलतात आणि सुरुवातीला धडपडणारी ती पिल्ले थोडय़ाच वेळात आकाशात स्वच्छंद विहार करू लागतात, आपले भोजन आपणच शोधून काढतात, आपले उर्वरित आयुष्य आपणच जगतात. हे सर्व मानव समाजामध्ये होते का? प्रेमापायी आईवडील मुलांवर असंख्य बंधने घालतात जी पुढे पुढे मुलांना जाचक वाटू लागतात आणि तिथेच संघर्षांची पहिली ठिणगी पडते. ही बंधने, त्यापायी दिल्या जाणाऱ्या असंख्य सूचना, भलभलत्या अपेक्षा, या सर्व गोष्टी मुले स्वत:च्या पायावर उभी राहून कमवायला लागली तरी चालू राहतात. त्यातूनच पुढे ‘वेगळे राहणे’ हा विचार बळावतो आणि एकदा वेगळे राहायला लागले की आपसूकच ओढ कमी कमी होत जाते. काही सुज्ञ पालक मात्र काळाची पावले वेळीच ओळखतात आणि मुलांच्या संसाराची ऊठसूट दखल घेणे थांबवतात. ‘वानप्रस्थाश्रम’ म्हणजे तरी दुसरे काय? पण हीच संकल्पना आपण विसरलो आहोत आणि आपल्याच नशिबाला दोष देत आहोत. शेवटी म्हटल्याप्रमाणे ‘वास्तव स्वीकारणे’, ‘इदं न मम’, हीच ती तिसरी बाजू जी स्वीकारायला आपण भितो.

– अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

 

कौटुंबिक विसंवाद संस्कृतीसाठी हानीकारकच

‘नाण्याची तिसरी बाजू..’ हा अग्रलेख वाचला. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांच्या काळात मूल्यशिक्षण अभ्यासक्रमामध्ये असावे आणि स्कोअरचा विषय म्हणून नाही, तर समाजमन सुसंस्कृत होण्यासाठी असा प्रयत्न केला होता; पण नुसतेच उत्तम फ्रेममधून, चकचकीत घरांमधून आदर्श कुटुंबव्यवस्था चित्रपटात दाखवून कसे चालेल?

कौटुंबिक विसंवाद आपल्या संस्कृतीसाठी हानीकारकच आहे. कितीही भौगोलिक सुधारणा आपण स्वीकारल्या तरी मूळ मानसिकता तीच आहे. आपण यासाठी काय करू शकतो हा महत्त्वाचा विषय आहे. कौटुंबिक सुसंवाद हा जबरदस्तीने करायचा विषय नाही. पाश्चिमात्य म्हणत म्हणत आता हा विषय आपल्या घरापर्यंत आला आहे. त्यावर वेळीच उपाय केले पाहिजेत.

– धनश्री दत्तात्रय देव, नांदेड

 

एकच मुलगी असलेले आईवडील सुखी!

‘नाण्याची तिसरी बाजू..’ हे शनिवारचे संपादकीय वाचले. एकाकी आईबाप आणि माणुसकीशून्य मुले या दोन बाजूंखेरीज हल्ली मला ‘वेगळीच’ सुखी कुटुंबे दिसली ती म्हणजे एकच मुलगी असलेले आईवडील. ‘‘तुमचे बरे आहे. मुलीचे लग्न करून दिले की मोकळे, सेकंड इनिंग खेळायला. नाही तरी मुलांपेक्षा मुलीच प्रेमळ, काळजी घेणाऱ्या असतात,’’ असे संवाद समारंभातून नातेवाईकांच्या तोंडी असतात. उतारवयातील आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी मुलगी झाल्यापासूनच तयार असते. त्यामुळे अशा पालकांचा उराशी बाळगलेल्या अपेक्षांचा भंग होत नाही. शेवटी आपले मूल असेल तेथे शारीरिक, मानसिक निरोगी राहावे, हीच खरी उतारवयातील माफक मानसिक ऊब बाळगावी.

– श्रीनिवास स. डोंगरे, दादर (मुंबई)

 

निदान जाहिरातीपुरती तरी खरी कामे दाखवा!

सध्या केंद्रातील मोदी सरकारच्या पावलावर पाऊल टाकत फडणवीस सरकारकडून जाहिरातींचा मारा जोरदार सुरू आहे. सरकार करत असलेली कामे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरात करणे यात काही वावगे नाही. त्यामुळेच ‘मी लाभार्थी’च्या जाहिरातींचा मारा सर्वच माध्यमांवर सुरू आहे. मात्र यातही बोगसपणाच दाखवला जात आहे. उदा. पुरंदरच्या शांताराम कटके या शेतकऱ्याचा परस्परच जाहिरातीसाठी वापर केला जे काम मागच्या सरकारच्या काळात झाले होते त्याचे श्रेय विद्यमान सरकार घेऊ  इच्छित आहे. पुण्यातील एका महिलेला मिळालेल्या सुविधेचेही हेच दुखणे. तीच बोंब ‘जलयुक्त शिवार’साठीही झाली. सातारा जिल्ह्य़ातील आमिर खान यांच्या ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे झालेली कामे जलयुक्त शिवारच्या नावावर खपवली जात आहेत. यावरून एक लक्षात येते, सरकार कुठे तरी लपवाछपवीचे काम करत आहे. निदान जाहिरातीपुरती तरी खरी कामे करावी किंवा दाखवावी.

– सचिन आनंदराव तांबे, पिंपळसुटी, ता. शिरूर (पुणे)

 

शिक्षण क्षेत्रातील चित्र बदलणे आवश्यक

‘शिक्षक म्हणजे वेठबिगार नव्हेत!’ हा लेख (रविवार विशेष, १२ नोव्हें.) शिक्षकांची न्यायपूर्ण बाजू मांडणारा आहे. हल्ली सरकारी असो वा खासगी शाळांमधील शिक्षक हे वेठबिगारांसारखे राबत असतात हे सत्य आहे आणि त्यात अध्यापनाव्यतिरिक्तच्या कामाचा बोजा अधिक असतो. त्यामुळेच किमान सरकारी शाळांमध्ये तरी विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच नसतात आणि म्हणूनच मग इयत्तेबरहुकूम विद्यार्थ्यांची प्रगती नसते. वस्तुत: शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नेमलेले असतात आणि त्यांचे ते काम पूर्ण होऊन वेळ उरला तरच इतर कामे त्यांना दिली गेली पाहिजेत; पण आता परिस्थिती बरोबर उलटी आहे. इतर कामे करून वेळ उरलाच तर विद्यार्थ्यांना शिकविले जाते. उत्तम नागरिक घडविण्यासाठी हे चित्र बदलणे अत्यावश्यक आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांचे शिल्पकार म्हटले जाते हे विसरून चालणार नाही.

– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

 

पोलिसांमधील संवेदनशीलता हरवत चालली..

सांगलीच्या अनिकेत कोथळे याच्यावर कोठडीत करण्यात आलेले अत्याचार (थर्ड डिग्री) वाचून अंगावर काटा उभा राहिला. नेहमी पोलिसांमधील माणुसकीच्या ‘रम्य’ कथा आपण वाचतो; पण अशा काही पोलिसांच्या मनात हैवानदेखील लपलेला असतो आणि तो अशा प्रकारे उघडकीस येतो. विशेष म्हणजे विश्वास नांगरे पाटील यांच्या आधिपत्याखालील अधिकारी असे वागायला धजावतो याचा अर्थ अशा नावाजलेल्या अधिकाऱ्याचा ‘किमान’ धाक त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांना राहिलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. असे कोणते अदृश्य हात अशा प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी असतात, की दुसऱ्याला कायद्याची भीती दाखवणारे स्वत: कायद्याला भीत नाहीत. पोलिसांना आता माणुसकीचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे का, असा प्रश्न पडतो आहे. ही बातमी वाचतानाच मुंबईत स्तनपान करणाऱ्या महिलेला गाडीसकट टोइंग करत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. एकूण पोलीस संवेदनशीलता हरवत चालले आहेत अशी लक्षणे आहेत.

– उमेश मुंडले, वसई 

 

‘आधार’ मिळवण्यात व जोडण्यातही अडचणी

‘आधार कार्डाविषयी संभ्रम’ ही बातमी (११ नोव्हें.) वाचली. बातमीमध्ये ‘आधार’ देणाऱ्या केंद्रांची यादी दिलेली आहे; परंतु त्यामधील ऐरोली, सेक्टर ५ मधील देना बँकेने ‘आधार’ देण्यास नकार दिला. मोठमोठय़ा शहरांमध्ये केवळ एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच मोजक्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असल्यामुळे नागरिकांचा नाहक वेळ व श्रम खर्च होत आहे. एका फेरीमध्ये काम होत नाही. एकदा अर्ज देऊन मग परत येण्याची अपॉइंटमेंट दिली जाते. वृद्ध माणसे अथवा लहान बालके यांच्यासाठी तर हे जास्तच त्रासदायक आहे. पासपोर्ट काढणे आज सहजसोपे झाले आहे. तशीच काहीशी सुविधा जर ‘आधार’साठी सुरू केली तर नागरिकांची होणारी परवड थांबू शकेल.

ज्या अडचणी ‘आधार’ मिळवण्यात येत आहेत तशाच  ‘आधार’ जोडण्यातदेखील येत आहेत. मी एक मोबाइल कंपनीच्या स्टोअरमध्ये गेलो होतो.  माझ्या दोन्ही हातांच्या सर्व बोटांचे ठसे घेऊन झाले; परंतु जुळणी होऊ शकली नाही. त्यामुळे सिम कार्डाला आधार जोडण्याचे काम राहूनच गेले. आता पुन्हा दुसऱ्या स्टोअरमध्ये जाऊन प्रयत्न करावा लागेल. बँकेत मात्र केवळ आधार कार्डाची छायाप्रत दिली आणि बचत खात्याची जुळणी झाली. हीच पद्धत मोबाइल संदर्भातदेखील अनुसरता येणार नाही का? मूळ व्यक्ती मूळ आधार कार्डासह उपस्थित असूनही केवळ बोटांचे ठसे जुळत नाहीत म्हणून त्याचे काम होणार नाही का? मग त्याला इतर सुविधांपासून वंचित ठेवणार का? ‘आधार’ कार्डाशी सिम कार्डाबरोबरची जुळणी ३१ डिसेंबपर्यंत करायची आहे; परंतु माझ्या समस्येचे समाधान जर तोपर्यंत झाले नाही तर माझे सिम कार्ड १ जानेवारीपासून बंद करणार का?

– निशिकांत मुपीड, कांदिवली (मुंबई)

 

मूळ विषयाचा संदर्भ डावलून केवळ हेत्वारोप

‘बौद्ध धर्म  व आक्रमक इस्लामी : दुसरी बाजू’ हा लेख (रविवार विशेष, १२ नोव्हें.) मूळ विषयाचा संदर्भ डावलून हेत्वारोप करणारा वाटला. रवींद्र साठे यांच्या मूळ लेखातील विषय इस्लामच्या आक्रमणाने बौद्ध धर्म भारतात कसा लयाला गेला एवढाच आहे, परंतु त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जोंधळे यांनी हिंदुत्ववाद, गोरक्षण, ताजमहाल, बाबरी मशीद इ. विषयाशी संबंधित नसलेले मुद्दे चर्चिण्यातच लेखाचा बहुतांश भाग वाया घालवला आहे. वैष्णव आणि शैव धर्माच्या प्रसारामुळे बौद्ध धर्म हळूहळू नाहीसा झाला, असे बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याचा पुरावा देताना इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या आक्रमक आघातानंतरही जर हिंदू धर्म टिकू  शकला, तर बौद्ध धर्म मात्र हिंदू धर्माच्या प्रसारामुळे लयाला गेला यातला विरोधाभास लेखकाला स्पष्ट करता आलेला नाही. म्हणून इस्लाम आणि बौद्ध धर्मातली तेढ वाढवण्याचा मूळ लेखावर केलेला आरोप हा विनाकारण धार्मिक विद्वेष निर्माण करणारा वाटतो.

– राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)