‘दशक्रिया चित्रपटाला ब्राह्मण महासंघाचा विरोध’  ही बातमी (१६ नोव्हें.) वाचली.  या प्रबोधनपर चित्रपटाला  विरोध अपेक्षितच होता. ‘शहाण्यांचा मूर्खपणा-अर्थात आपले प्रेतसंस्कार’ या सुधारकातील लेखात आगरकर लिहितात, ‘‘..हिंदूंनो! तुम्ही इतके गतानुगतिक का होता? असे मेषासारखे का वागता? जिवंत माणसाच्या आहारास लागणारे पदार्थ मृताला अर्पण करता याचा अर्थ काय? आत्म्याला तोंड, पोट असे अवयव असतात का? खुळ्यांनो असे पोराहून पोर कसे झालात? मतिमंद ब्राह्मणांनो! बाप मेला तर मुलाने क्षौर करावे असा हट्ट का? दाढी-मिशा काढून तोंड असोल्या नारळासारखे गुळगुळीत केले आहे, डोक्यावरील गळक्या मडक्यातून पाणी अंगावर पडते आहे, कमरेला एक पंचा, बाकी उघडाबंब असे मुलाचे नटणे मृत बापाच्या आत्म्याला आवडते हे तुम्हाला कोणी सांगितले?  [संपूर्ण आगरकर  खंड १, वरदा प्रकाशन, पुणे, लेख क्र.२३ मधून]  तसेच चार्वाकांनी दोन सहस्र वर्षांपूर्वी म्हटले आहे-

ततश्च जीवनोपायो ब्राह्मण: विहितस्तु इह । मृतानां प्रेतकर्माणि न तु अन्यद्विद्यते क्वचित् । (आणि हे सगळे विधी ब्राह्मणांनी आपल्या उपजीविकेसाठी रचले. नाहीतर हे निर्थक प्रेतसंस्कार कदापि रूढ झाले नसते.)

हे सगळे पटण्यासारखे आहे. पिंडदान, दहावे-बारावे-तेरावे-चौदावे, मासिक श्राद्ध-वर्षश्राद्ध असले प्रकार केवळ पैसे उकळण्यासाठी आहेत हे स्पष्ट दिसते.  सर्वाधिक लुबाडणूक करणारी अंधश्रद्धा म्हणजे अंत्यसंस्कार. या प्रकारामुळे अनेक जण कर्जबाजारी होतात. या श्रद्धेचे निर्मूलन व्हायलाच हवे.  इथे देहदान सर्वोत्तम. ते नको तर  विद्युत-दाहिनीत दहन करावे. कोणतेही विधी करू नये. आपल्या श्रमाची कमाई वाया घालवू नये. विधी केले नाहीत तर कोणाचे काही वाईट होत नाही. समाज काही म्हणत नाही. अनेक जण तुमचे अनुकरण करतील. स्वबुद्धीने विचार करावा.

– प्रा. य. ना. वालावलकर

 

त्यांना का नाही जीवन जगायला मिळत?

एका कंपनीत ट्रेनी इंजिनीअर म्हणून मी अलीकडेच रुजू झालो. मला तिथं खूप विचित्र अनुभवावयास मिळालं. जसा कंपनीत प्रवेश केला तसा मला चकचकीत, ‘पॉलिश्ड’ अनुभव आला. ‘फॉरेन’मध्ये आल्यासारखं वाटायला लागलं. सगळीकडे पाश्चात्त्य पद्धतीचा अनुभव आला.  नंतर आम्हा सर्वाना कंपनीच्या मनुष्यबळ अधिकाऱ्यांबरोबर खास डिनरसाठी नेण्यात आलं. तिथं उच्च दर्जाचं अन्न ठेवलेलं होतं. सर्वानी आपापलं वाढून घेतलं आणि जेवायला सुरुवात केली. घरामध्ये चटणी-भाकरी खाणारा मी तिथं संकोचून जेवायला लागलो. जेवताना आवाजसुद्धा करीत नव्हतो. अचानक मनात एक विचार आला. आपण आणि आपल्या आजूबाजूचं हे सगळं एवढं चकचकीत जीवन जगत असताना मराठवाडय़ातील, विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्या का कराव्या लागतात? त्यांना का नाही आपल्यासारखं जीवन जगायला मिळत?

डोळ्यांतलं पाणी डोळ्यातल्या डोळ्यातच पुसलं. आवंढा हळूच गिळला आणि निमूटपणे जेवायला लागलो. खरंच खूप वाईट वाटलं या विषमतेबद्दल..

– दादासाहेब व्हळगुळे, कराड</strong>

 

बँक कर्मचारी नेते तेव्हा गप्प का बसले?

‘बँकिंगच्या लोकशाहीकरणाची गरज’ हा लेख (१६ नोव्हें.) वाचला. राष्ट्रीयीकृत बँकांच्या बुडीत कर्जामुळे बँकांसमोर सध्या भांडवल पर्याप्ततेचे संकट उभे टाकले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकांच्या वार्षिक  ताळेबंदात थकीत कर्ज न दाखविण्याच्या  कृतीस अटकाव तर केलाच शिवाय अशा बुडीत कर्जासाठी नफ्यातून २०१७ अखेर तरतूद करावी असा आदेशच काढला. म्हणून बँकांच्या नफ्याचा भ्रमाचा ‘भोपळा’ फुटला व बुडीत / संशयित कर्जाची आकडेवारी उघड झाली. ‘जनतेचा पैसा जनतेच्या भल्यासाठी’ अशी आता मांडणी करणाऱ्यांनी जेव्हा हे कर्ज दिले जात होते तेव्हा किंवा बँकांच्या संचालक मंडळातील कामगार युनियनच्या प्रतिनिधीने त्याविरुद्ध कधी आवाज उठविल्याचे ऐकिवात नाही. कर्मचाऱ्यांच्या पगार व अन्य सुविधांवरील भरमसाट खर्च व तंत्रज्ञानातील भांडवली गुंतवणुकीमुळे बँकांच्या नफाक्षमतेत कमालीची घट झाली आहे. आता अर्थकारण जनतेस समजावून सांगणाऱ्यांनी प्राप्त परिस्थितीत आपला पगार कपात करण्याऐवजी ठेवीदारांच्या खिशात हात घालणे अधिक सोयीचे वाटले. यातून व्यवस्थापनाचा व लाभार्थी कर्मचाऱ्यांचाही दृष्टिकोन दिसला.

बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची ‘पन्नाशी’ जवळ येत असताना बुडीत कर्जाच्या या आर्थिक अनागोंदीमुळे एकूण बँकांतील निर्णयप्रकियेबाबतच गंभीर प्रश्न उपस्थित व्हावेत, ही बाब या क्षेत्राबाबत लेखकाचा दृष्टकोन दर्शवण्यास पुरेशी आहे. आता ‘लोकशाहीकरण’ करावे म्हणजे नेमके काय करावे? ज्ञात माहितीची जंत्री देण्याऐवजी लेखकाने ठोस उपाय सुचवले असते तर अधिक योग्य झाले असते.

– लक्ष्मण संगेवार, नांदेड</strong>

 

..तर कुणीही जखमींना मदत करणार नाही

‘फिर्यादीच आरोपी असल्याचे उघड’ या बातमीत (१० नोव्हें.) उल्लेख केलेल्या मोईझ शेखने जखमी व्यक्तीला ताबडतोब दवाखान्यात नेण्याचे सौजन्य दाखविले आहे. एवढेच नाही तर एका दवाखान्याने (नेहमीप्रमाणे) जबाबदारी झटकल्यावर दुसरीकडे नेऊन जखमीला उपचार मिळावेत असे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. शेख याच्या गाडीने जखमी झालेली व्यक्ती उपचार घेत आहे. यापूर्वी एका अपघातात अशाच खान नावाच्या प्रसिद्ध व्यक्तीच्या गाडीखाली अनेक व्यक्ती मरण पावल्या होत्या. त्या वेळचे त्या आरोपीचे वर्तन अनेकांना आक्षेपार्हही वाटले होते. अतिशय विलंबाने आणि लोकेच्छेच्या दबावाखाली सुरू झालेल्या सुनावणीच्या वेळी या खानाने अनेकदा त्याची साक्ष बदलली व शेवटी आरोपी खान गाडी ‘चालवीतच नव्हता’ असे ‘सर्वानुमते’ ठरले.

मात्र त्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांनी आपली साक्ष मरेपर्यंत बदलली नाही त्यामुळे निकालाची तारीख पुढेपुढे जात राहिली. शेवटी एकदाचे पाटील मृत झाल्यावरच निकाल लागून खान निर्दोष सुटला. दोन प्रकरणांत तसे अनेक फरक आहेत, पण सर्वात मोठा फरक म्हणजे शेख यांनी अत्यंत जबाबदार वर्तन केले आहे. त्याचे कौतुकच करायला हवे. आरोपी सामान्य असेल तर पोलीस आणि न्यायालायीन व्यवस्थेकडून मिळणाऱ्या संभाव्य वागणुकीच्या भीतीने शेख गोंधळले असतील तर ते समजून घेतले पाहिजे. असे केले नाही तर पुन्हा अनेक वर्षे कुणीही जखमी व्यक्तींना मदत करणार नाही. हे निदान पोलिसांनी आणि न्यायालयाने तरी लक्षात घ्यावे, अशी विनंती करावीशी वाटते. शेवटी ‘सत्यमेव जयते’ हे देशाचे घोषवाक्य नेहमीप्रमाणे खान प्रकरणातही सिद्ध झालेच आहे म्हणा!

– श्रीनिवास बेलसरे, ठाणे