‘ठेवीदाराला जेव्हा जाग येते..’ या लेखात (१५ डिसें.) मंगेश सोमण यांनी ठेवीदारांच्या शंकारूपी भीतीचे निराकरण करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमची साक्षरता वाढण्यास मदतच होईल. त्यांच्या लेखातील शेवटचा परिच्छेद महत्त्वाचा वाटतो. आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी ठेवीदारांनी आपली ‘आर्थिक निरक्षरता व बचतीच्या निर्णयप्रक्रियेतला आळशीपणाचा’ प्रयत्नपूर्वक त्याग करायला शिकले पाहिजे, मग भले त्यांचे वय कितीही असो. आपल्या मनात सर्वसाधारणत: अज्ञानापोटी भीती निर्माण होते. सरकारी बँका कधीच बुडणार नाहीत व त्या बुडाल्याच तर आर्थिक अराजक माजेल हा समज खोटा ठरत आहे. पण अजूनही असेच वाटते की, विद्यमान सरकार चोर सोडून संन्याशालाच फाशी देत आहे. कोटय़वधी रुपयांची थकीत कर्जे वसूल करण्याचा काहीच मार्ग नाही का?  छोटय़ा खातेदारांकडून कर्जवसुली होण्याची खात्री पटल्यावरच त्याचे कर्ज मंजूर होते. छोटी छोटी कर्जे वसूल करण्यासाठी गुंड एजंट नेमले जातात असा अनुभव मी  घेतला आहे. मग हा नियम मोठय़ा कर्जदारांना लागू नाही का?

– राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली

 

‘तुझ्याबिगर करमेना’, पण ‘ हाय रे जुळेना.’

‘नवे निश्चलनीकरण’ हा अग्रलेख (१४ डिसें.) व त्यावरील जळजळीत प्रतिक्रिया (लोकमानस, १५ डिसें.)वाचल्या. तसेच  ‘जनमत चाचण्यात भाजप विजयी!’  ही बातमी वाचल्यावर ‘स्वरसम्राज्ञी’ या संगीत नाटकातील ‘कशी केलीस माझी दैना,  मला तुझ्या बिगर करमेना’ या विद्याधर गोखले (संगीतकार पं. नीलकंठ अभ्यंकर) यांच्या गाण्याची आठवण झाली.  निश्चलीकरण, वस्तू व सेवा कर अंमलबजावणी आणि आता मुदत ठेवींवरही असलेला सरकारचा डोळा असलेले विधेयक या सारखे धक्कादायक निर्णय केंद्र सरकार घेते.  जनतेने आशेने मोदी सराकरला निवडून दिले पण सरकारला मात्रजनतेच्या प्रेमाचे काहीही सोयरसुतक नाही असेच जाणवते. थोडक्यात ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना, अनुराग त्याचा माझा, हाय रे जुळेना’ या चालीवर तमाम भारतीय जनतेची घालमेल अवस्था सध्याच्या बधीर सरकारला कळूनदेखील वळत नाही अशी झालेली आहे. महागाई, विषमता, दारिद्रय़ आदी बाबतीत सध्याचे शासन अव्वल दर्जा गाठत असताना फटके पडूनही निस्सीम प्रेम करणाऱ्या, परंतु झोप उडालेल्या जनतेला दिलासा देणे तर सोडा साधी फुंकर देखील घालण्यात सध्याचे सरकार अपयशी ठरलेले आहे.

– अ‍ॅड. किशोर रमेश सामंत,भाईंदर

 

अज्ञानातून बाहेर पडायला हवे

बुधवारच्या उत्तररात्री अनेकांनी उल्कापात  पाहिला. ‘उद्या मिथुन राशीतून उल्कावर्षांव होणार’ अशी बातमी वृत्तपत्रांत होती. काही जणांशी बोलताना लक्षात आले की, ‘हा वर्षांव म्हणजे फेथन लघुग्रह पृथ्वीपासून १.५  कोटी किमी अंतरावर आल्यामुळे मिथुन राशीतून निखळून पृथ्वीवर आलेले तारे!’ अनेकांचा असा चुकीचा समज झाला असणे शक्य आहे. खरे तर हा उल्कावर्षांव म्हणजे फेथन लघुग्रहातून निसटून पथ्वीकडे येणारे दगड. पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यावर घर्षणामुळे ते पेट घेतात. बराचसा भाग जळून जातो. उरलेला दगड पृथ्वीवर पडतो. तो दगड म्हणजे उल्का. पृथ्वीवरून आकाशाकडे पाहताना या वर्षांवाच्या पाश्र्वभूमीवर मिथुन रास दिसते एवढेच. कुठल्याही राशीचे पृथ्वीपासून अंतर ५० हजार अब्ज किमीपेक्षा अधिक असते. इतक्या दूर असलेल्या राशींचा इथल्या माणसांच्या जीवनावर परिणाम होतो आणि ज्योतिषांना तो समजू शकतो, असे मानणे हास्यास्पद आहे.  आपण या अज्ञानातून बाहेर पडायला हवे.

– प्रा. य. ना. वालावलकर

 

प्रशासकीय सेवेतील लेखक

‘व्यक्तिवेध’ या सदरात (१२ डिसें.) लक्ष्मीकांत देशमुख यांचा परिचय करून देताना त्यांच्या प्रशासकीय पदाचा उल्लेख केला आहे. मराठी साहित्यात प्रशासकीय क्षेत्रातील सध्या थोडे लोक लेखन करतात. त्यात दिलीप पांढरपट्टे (सध्या धुळे जिल्हाधिकारी) हे एक असून त्यांनी मराठी गझल, कथा आणि ललित लेखन विपुल आणि कसदार केलं आहे.  कोमसापच्या रत्नागिरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषविले आहे. महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी उपमन्यू चटर्जी इंग्रजीत लेखन करतात. त्यांची अ‍ॅन इंग्लिश ऑगस्ट ही गाजलेली कादंबरी. तिच्यावर हिंदी चित्रपटही निघाला होता. इतिहासात डोकावताना प्रसिद्ध लेखक सेतुमाधवराव पगडी निजाम राजवटीत महसूल अधिकारी होते. हिंदीतले कवी अशोक वाजपेयी भारतीय प्रशासकीय सेवेतील आणखी एक उदाहरण.  मराठी साहित्यात शिक्षकी पेशा आणि त्यातही प्राध्यापकांचा वरचष्मा दिसून येतो. त्या परिप्रेक्ष्यात देशमुख यांची अध्यक्ष म्हणून निवड होणं दखलपात्र.

– सुखदेव काळे, दापोली

 

रोहिंग्यांच्या व्यथा ऐकून पोप फ्रान्सिस गहिवरले..

‘परराष्ट्र धोरणाची दिशा’ हा संकल्प गुर्जर यांचा लेख (१४ डिसें.) वाचला. त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्या म्यानमार – बांगलादेशच्या भेटीसंदर्भात केलेले विधान अपूर्ण आहे. दोन्ही देशांना भेटी देण्याआधी पोपनी रोहिंग्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्यानमार सरकारने ती अमान्य केली. त्यामुळे पोपचा नाइलाज झाला. ‘‘मला संवादाचे दरवाजे बंद करायचे नव्हते. जे मला जाहीर सभेत बोलता आले नाही त्याबद्दल (रोहिंग्यांच्या प्रश्नाबाबत) मी खासगीमध्ये म्यानमारच्या नेत्यांशी  बोललो,’’ असे पोपनी नंतर पत्रकारांना सांगितले. बांगलादेशामध्ये पोप फ्रान्सिस रोहिंग्यांच्या प्रतिनिधींना जाहीर सभेत भेटले. त्यांच्याशी त्यांनी वार्तालाप केला. या वेळी त्यांना अश्रू आवरले नाहीत. ‘‘तुमचा ज्यांनी छळ केला, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आणि जगाच्या उदासीनतेबद्दल मी क्षमा मागतो,’’ असे सांगून पोप म्हणाले, ‘‘आज देवाला रोहिंग्या या नावानेही ओळखले जाते. The presence of God today is also called Rohingyas. यापेक्षा पोपनी जास्त काय बोलायला हवे होते?

– फादर फ्रान्सिस दिब्रिटो, वसई

 

वसंतदादांनी ‘यत्ता’ दडवली नव्हती!

शिक्षण कमी असूनही महाराष्ट्राचा कारभार वसंतदादा पाटील यांनी उत्तम सांभाळला, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाची चर्चा कशाला, अशा अर्थाचे पत्र (लोकमानस, ६ डिसेंबर) वाचले. मुळात वसंतदादा हे स्वातंत्र्यसैनिक. ब्रिटिश पोलिसांची चौकी लुटताना त्यांच्या कमरेत गोळी लागली होती.  यशवंतराव चव्हाण व धनंजयराव गाडगीळ यांच्यानंतर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ उभी केली. या पाश्र्वभूमीचा वसंतदादांनी कधी जाहीर उल्लेख केला नाही, तसा उल्लेख करून मते मागितली नाहीत. शिवाय, दादांनी आपली ‘यत्ता’ कधी लपविली नव्हती. मग मोदींनाच आपल्या शिक्षणाची जाहीर चर्चा का नको वाटावी?

– अ‍ॅड्. विजय भोसले, खेड (रत्नागिरी)