‘कानकोंडेपणाची कानगोष्ट’ हे संपादकीय (१६ डिसें.) वाचले. निर्बंध घातलेल्या गोष्टीच सर्वाना पाहायला जास्त आवडतात. त्यामुळे निर्बंध घालण्यापेक्षा चांगल्या-वाईटाची जाणीव करून देऊन एक जबाबदार व्यक्तिमत्त्व बनवणे हे जास्त फायदेशीर ठरेल. जर त्याला स्त्री-पुरुष संबंध याविषयी योग्य माहिती असेल तर साहजिकच त्याला त्याचे तितके आकर्षण राहणार नाही. लैंगिक बाबतीत खुलेपणा नसणे हे लैंगिक बाबीकडे ओढले जाण्याचे एक प्रमुख कारण आहे. जी गोष्ट सहजसाध्य नसते, माणूस तिच्याकडे ओढला जातो हे नैसर्गिक आहे. यामुळे जाहिरात बंद करण्यापेक्षा त्याच्या सादरीकरणात बदल करावा. नियंत्रणाने कुठल्याही गोष्टीवर कधीही उपाय निघत नाही.

– सहदेव निवळकर, सेलू (परभणी)

 

.. मग प्राचीन शिल्पेही झाकून ठेवणार?

‘कानकोंडेपणाची कानगोष्ट’ हे संपादकीय  वाचले. मुळातच लैंगिकतेविषयी एकंदर आपला दृष्टिकोन ‘बीभत्स’ आणि मध्ययुगीन आहे. माहिती प्रसारण मंत्रालयही त्याला अपवाद नाही. खरे तर कंडोमविषयी उत्पन्न होणाऱ्या बालसुलभ मनातील प्रश्नांना उत्तरे द्यायची ही एक चांगली संधी आहे आणि याकडे फक्त सेक्स एवढय़ाच संकुचित दृष्टिकोनातून न बघता ‘लैंगिक’ शिक्षण- प्रबोधनातून बघण्याची आवश्यकता आहे. आजच्या लहान मुलांना मोठे झाल्यावर यातून जावेच लागणार असेल, तर त्याविषयी ‘लहान मुलांवर दुष्परिणाम’ होतो हा गहजब करण्याची गरज नाही.  दारू विकत घेताना आपण जेवढी सहजता दाखवतो तेवढी सहजता कंडोम विकत घेताना दाखवत नाही. लैंगिकता आपल्या- कडील अनेक प्राचीन शिल्पांतही दिसत असते. मग तीही झाकून ठेवणार का?

– बाळकृष्ण शिंदे, पुणे</strong>

 

‘त्या’ औषधांच्या जाहिराती आक्षेपार्ह नाहीत?

‘कानकोंडेपणाची कानगोष्ट’ हा अग्रलेख वाचला. ज्या विचारसरणीचे लोक आज सत्तेत आहेत त्यांच्याकडून असे निर्णय अपेक्षितच. त्यामुळे नवल वाटले नाही. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतोय. याबाबतच्या सर्व निर्णयकर्त्यांना एक बाब लक्षात आणून द्यावीशी वाटते. लैंगिकता, स्टॅमिना वाढवणारी शेकडो प्रकारची आयुर्वेदिक औषधे आज बाजारात उपलब्ध आहेत. सर्व माध्यमांवर या औषधांच्या जाहिरातींचा भडिमार चालू आहे. त्यातली वाक्ये, दृश्ये, चित्रे निर्णयकर्त्यांना आक्षेपार्ह वाटत नाहीत काय? या औषधांनी खरोखरच योग्य परिणाम साधला जातो काय? या औषधांमध्ये खरोखरच शतप्रतिशत आयुर्वेदिक पदार्थ असतात काय? या औषधांचे खरोखरच दावा केल्याप्रमाणे बाह्य़ परिणाम (साइड इफेक्ट) नाहीत काय? याचीही उत्तरे निर्णयकर्त्यांनी शोधण्याचा प्रयत्न करावा. तरी पण ज्या प्रो. र. धों. कर्वे यांनी संततिनियमनाच्या साधनांचा जवळजवळ ऐंशी वर्षांपूर्वी प्रचार व प्रसार केला, त्यांचे एक वाक्य नमूद करतो- ‘अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा किंवा इतर वस्तूंचा गुण नसून तो फक्त तसा आरोप करणाऱ्यांच्या मेंदूचा गुण होय!’

– हेमंत श्रीपाद पराडकर, चिराबाजार (मुंबई)

 

कलावंतांनी राजकीय भूमिका घ्यावी, पण..

‘कलावंतांनो, राजकीय भूमिका घ्याच’ या आवाहनावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र, राजकीय वा सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेऊ  इच्छिणाऱ्या कलावंतांना एक  विनंती आहे. स्वप्नाळू, आदर्शवादी जगाच्या बाहेर या व वास्तववादी भूमिका घ्या.  ‘‘माझ्याकडे बंदूक असती तर मी अमुक तमुक नेत्याला गोळी घातली असती’’ किंवा ‘‘मी या क्षेत्रात आले नसते तर मदर तेरेसा यांच्याबरोबर काम करावयास गेले असते’’ असली वक्तव्ये टाळ्या मिळविण्यापुरतीच उपयोगाची असतात. वास्तवात कोणी सौंदर्य स्पर्धा विजेतीने मदर तेरेसा किंवा बाबा आमटे यांच्या आश्रमात जाऊन महिनाभर राहिल्याचे ऐकिवात नाही.  ‘मैं डॉक्टर बन के गरीबों की सेवा करना चाहता हूं/ मिलटरी में भरती हो कर देश की रक्षा करना चाहता हूं’ असले संवाद लिहिणे सोपे असते. पण मनोरंजनाच्या जगातील कोण्या प्रसिद्ध नट-नटीच्या अपत्याने वैद्यकीय पदवी घेऊन करिअर केल्याचे ऐकिवात नाही. गरिबांवर फुकटात उपचार करणे तर दूरच. तसेच, कोणी स्टार-अपत्य आयएएस, आयपीएस, सुरक्षा दले यात दाखल झाल्याचे पण उदाहरण सापडत नाही. काही कलावंतांनी राजकारणात उडी घेतली, पण प्रगल्भ राजकारण करत लक्षात राहील अशा दर्जाचे राजकारण वा प्रशासन कोणीही केले नाही. तेव्हा, राजकीय व सामाजिक भूमिका अवश्य घ्या, पण दुर्गाबाई भागवत यांनी सरदार सरोवर धरणाच्या  बाबतीत मुद्दय़ांचा नीट अभ्यास करून भूमिका घेतली, तसे करा.

-चेतन पंडित, पुणे

 

बँक ग्राहकांनी मग कुणाकडे बघायचे?

‘अर्थव्यवस्थेतील मैलाचा दगड’ आणि ‘आर्थिक अनागोंदीला आमंत्रण’ हे दोन्ही लेख (रविवार विशेष, १७ डिसें.) सामान्य बँक ठेवीदारांच्या, विशेषत: निवृत्त ठेवीदारांच्या पोटात गोळा आणणारे आहेत. काही दशकांपूर्वी निवृत्त मंडळी सहकारी बँकांमध्ये ठेवी ठेवून येणाऱ्या व्याजावर आरामात जीवन कंठायचे, कारण १५% पर्यंत व्याज मिळत असे. आज चित्र बदलले आहे. आता ७% व्याजही मुश्किलीने मिळते. तशात जर ठेवी असुरक्षित झाल्या तर सामान्य बँक ग्राहकांनी कुणाकडे बघायचे? करोडो रुपयांचे एनपीए करून विजय मल्या सुखाने लंडनमध्ये राहतो आहे आणि कष्टाने पैसे मिळविलेल्या सामान्य माणसाला बँकेतील ठेवी असुरक्षित होतील की काय असे वाटणे हा जीवघेणा व्यत्यास आहे. सामान्य माणसाला चिंतेत ढकलणारा आहे. आजही शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करायला सामान्य माणूस घाबरतो. त्यातच बँकेतील ठेवीही असुरक्षित झाल्यासारखे भासले (कारण तसे नाही असे ठासून सांगितले जात आहे.) तर सामान्य निवृत्त माणसाने गुंतवणूक कुठे व कशी करायची, कसे जीवन कंठायचे, हेही सांगितले जाणे गरजेचे आहे.

– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

 

गाभाऱ्यात जाण्यासाठी सोवळ्याची सक्ती गैर

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात पुरोगामी नेते डॉ. भारत पाटणकर यांना सोवळे नेसले नसल्याने मज्जाव करण्यात आला. त्यावरून बरीच वादावादी झाली तरीही त्यांना प्रवेश मिळाला नाही. बऱ्याच मंदिरांतील गाभाऱ्यात आजही सोवळे नसेल तर अडवले जाते. ही पूर्वापार प्रथा आहे असे त्याचे समर्थन केले जाते. बरे सर्व मंदिरांत ही प्रथा आहे असेही नव्हे. सर्व शक्तिमान समजल्या जाणाऱ्या परमेश्वराच्या पावित्र्याला अशा गोष्टींमुळे काही बाधा होईल ही गोष्ट विचारी जनांना पटणार नाही. स्वच्छता पाळण्यासाठी पादत्राणे घालून जाऊ  नये हे ठीक आहे. तसेच आक्षेपार्ह पेहराव करून जाऊ  नये हे पटणारे आहे; पण मंदिर प्रशासनाकडून सोवळ्याचा आग्रह धरणे सयुक्तिक वाटत नाही. यापूर्वी महिलांच्या गाभारा प्रवेशासाठी आंदोलन केले गेले. शेवटी न्यायालयाने हस्तक्षेप करून महिलांना गाभाऱ्यात प्रवेश मिळवून दिला. तशीच मोहीम सोवळ्याने प्रवेश करण्याची प्रथा मोडीत काढण्यासाठी राबवणे गरजेचे झाले आहे.

– नितीन गांगल, रसायनी

 

‘लांब हातांच्या’ अन्य मंडळींवरही लिहावे

‘‘लांब हातांची’ माणसं..’ हा लेख (रविवार विशेष, १७ डिसें.)  वाचला.  तो वाचत असताना लेखकाला लांब हातांचे वर्णन आखडत्या हाताने लिहिण्याची कसरत करावी लागली असावी असे वाटते. प्रत्येक सुभ्यात असे लांब हात अस्तित्वात आहेत. खरे तर राजकारणेतर क्षेत्रांतदेखील अन्यत्र असे लांब हात कार्यरत असतात; परंतु प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या कुठे न कुठे तरी त्यांची नाळ राजकारण्यांशी जुळलेली असते. त्यावर लिहावे तेवढे थोडेच आहे म्हणून ही लेखमाला सढळ हाताने क्रमश: स्वरूपात लिहून वाचकांना आणखीन काही प्रभावी लांब हातांची ओळख करून द्यावी असे वाटते. हा लेख वाचताना नुकतीच मुख्यमंत्र्यांनी केलेली फटकेबाजी आठवली. राज ठाकरे यांना उद्देशून माझे व्यंगचित्र जरूर काढा, नाक मोठं दाखवा, कान लांब दाखवा, परंतु पोटावर जास्त कुंचला फिरवू नका, अशा आशयाचे मिस्कील वक्तव्य करून खसखस पिकवली. हात लांब दाखवा, असे जर मुख्यमंत्री चुकून म्हणाले असते तर हा लेख वाचून एकच हल्लाबोल झाला नसता कशावरून?

– गिरीश धर्माधिकारी, औरंगाबाद

 

वर्णविद्वेषाचा पराभव ते परिवर्तनाचा विजय

‘सभ्यतेचा विजय’ हे संपादकीय (१५ डिसें.) वाचले. या वेळी अलाबामाच्या निवडणुकीत सभ्यतेचा विजय झाला, असे अग्रलेखात म्हटले आहे. कर्मठपणात रिपब्लिकन नेते पुढे असतात हे सर्वश्रुत आहे, मात्र याला काही अपवादही आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या एका उमेदवाराने एके काळी अमेरिकेत प्रचंड वादळ निर्माण केले होते. त्याचे नाव होते अलाबामाचे गव्हर्नर जॉर्ज वॉलेस. या राज्याच्या इतिहासात डोकावले असता एकाच व्यक्तीच्या ठिकाणी दोन टोकांच्या विचारसरणी व कृती कशा नांदू शकतात याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. जॉर्ज वॉलेस यांची १९५८ साली अलाबामाच्या गव्हर्नरपदी  निवड झाली. त्यांनी चार वेळा अध्यक्षीय निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला होता. १९६८ च्या निवडणुकीत  वॉलेस यांना दक्षिणेकडील ५ राज्यांत मताधिक्य मिळाले होते. याआधीच्या निवडणुकीत मात्र प्राथमिक फेरीत वॉलेस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळण्यास्तव लढत दिली होती.

जून १९६३ मध्ये वॉलेस यांनी श्वेत विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या अलाबामा विद्यापीठात बिगरश्वेत आफ्रिकी अमेरिकन विद्यार्थ्यांना नामांकनपत्र भरून देण्यास कडाडून विरोध केला होता. यासाठी त्यांनी या विद्यापीठाला घेराव घातला होता. १९७२ च्या अध्यक्षीय निवडणुकीत प्राथमिक फेरीतील प्रचारादरम्यान एका युवकाने वॉलेस यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.  १९८० साली त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीत उडी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर त्यांच्यात आमूलाग्र परिवर्तन झाले. ज्या सिव्हिल राइट्स नेत्यांचा त्यांनी सतत विरोध केला त्यांची वॉलेस यांनी नंतर माफी मागितली. १९८३ साली वॉलेस पुन्हा एकदा अलाबामा राज्याचे गव्हर्नर म्हणून निवडून आले. आपल्या कार्यकाळात त्यांनी सर्वात जास्त बिगरश्वेत आफ्रिकी अमेरिकन लोकांच्या राजकीय नेमणुका केल्या. या घटनेचा मथितार्थ हाच की अलाबामा राज्य कर्मठपणासाठी कुप्रसिद्ध असले तरी आमूलाग्र परिवर्तन घडून आलेला माणूसही याच राज्याने पाहिला आहे.

– सतीश भा. मराठे, नागपूर</strong>