‘आतून पोखरलेले जाळे..’ या संपादकीयात (११ जाने.) महाराष्ट्रातील नागरी स्वराज्य संस्थांमधील धोरणांचा सावळागोंधळ अचूकपणे मांडण्यात आला आहे. राज्यात ‘सत्ताधारी’ सातत्याने आपल्या सोयीने राजकीय हस्तक्षेप करून आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यामागे आपलाच राजकीय पक्ष नागरी भागात विनासायास कमी वेळात बळकट होऊन विरोधी पक्षातील नेतृत्व मोडीत काढण्याचा स्वार्थी हेतू असतो. परंतु यामुळे संबंधित नागरी भागाचा विकास खुंटत असून उमलणारी शहरे बकाल होत चालली आहेत.

त्याकरिता केरळ (जेथे आलटून-पालटून सत्तांतर होते) राज्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे. केरळने नागरी संस्थांसाठी लोकपाल (ऑम्बुड्समन) आयोगाची नियुक्ती केली आहे. पालिकांचे सर्व नियंत्रण त्या स्वायत्त संस्थेमार्फत केले जाते. त्यावर मर्जीतील निवृत्त सनदी अधिकारी नेमता येत नाही तर उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचीच नियुक्ती करता येते.

हा लोकपाल दोषींना शिक्षासुद्धा करू शकतो. देशात अशी यंत्रणा असलेले केरळ हे एकमेव राज्य आहे. जगात ब्रिटनमध्ये अशी व्यवस्था अस्तित्वात आहे. आता स्वत:ला प्रगत व पारदर्शक म्हणवणारे मुख्यमंत्री ज्यांच्याकडेच नगरविकास विभाग आहे ते अशा पद्धतीने निर्णय घेण्याची इच्छाशक्ती दाखवू शकतात का?

– मनोज वैद्य, बदलापूर (जि.ठाणे)

 

विखंडनाच्या अधिकारांमधील बदलही चिंताजनकच

‘नगराध्यक्षांना सुरक्षा कवच!’ (लोकसत्ता, १० जाने.) ही बातमी वाचली.

कायदेशीरपणे लोकशाहीचा गळा कसा दाबावा हे भाजपकडूनच शिकावे. आता नगराध्यक्षांना अडीच वर्षे काहीच धोका नाही. त्यात त्यांना वित्तीय अधिकार देऊन अधिकच बळकट करण्यात आले आहे. आता असहाय विरोधी पक्ष एकीकडे तर वित्तीय अधिकाराचे सामर्थ्य व अविश्वास ठरावापासून बचावाचे कवच लाभलेले नगराध्यक्ष एकीकडे असेच केविलवाणे चित्र सर्वत्र दिसेल. त्यात सरकारी ध्येयधोरणांशी विसंगत असलेले ठराव विखंडनासाठी सरकारकडे पाठविण्याची जबाबदारी टाकली ती मुख्याधिकारी या सर्वात असहाय अधिकाऱ्यावर! नगराध्यक्षपदी राजकीय व आर्थिक पाठबळ असणारी स्थानिक व्यक्ती असणार; तर मुख्याधिकारी असणार बाहेरून आलेली, कोणतेही राजकीय/ आर्थिक पाठबळ नसलेली, बदली/निलंबनाची टांगती तलवार डोक्यावर असलेली असहाय व्यक्ती! अशा परिस्थितीत नगराध्यक्षांना सोयीचे असणारे ठराव विखंडनासाठी जाणे जसे शक्यच नाही तसेच विरोधकांना सोयीचे असणारे ठराव विखंडनासाठी न जाता लागू होणेही शक्यच नाही. मग तिथे सरकारी ध्येयधोरणांशी सुसंगत असणे, विसंगत असणे हा मुद्दा गौणच ठरणार!

याआधी हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असत. कुठलाही सनदी अधिकारी एखाद्या नगराध्यक्षांना घाबरून अथवा त्यांच्या दबावाखाली काम करणे अशक्यच. त्यामुळे नगराध्यक्षांना व सत्ताधारी पक्षाला मनमानी कारभार करणे थोडे कठीणच होते. सरकारने या निर्णयाने ‘आपल्या नगराध्यक्षांची’ ती अडचणसुद्धा चुटकीसरशी दूर करून टाकली!

– मुकुंद परदेशी, धुळे</strong>

 

अभय कशाला? अंकुश कुणावर?

‘आतून पोखरलेले जाळे’ (११ जाने.) हा संपादकीय लेख वाचला. ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही’ असलेला भारत हा देश व त्यातील महाराष्ट्र हे एक पुढारलेले राज्य. याच राज्यातील नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतून घेण्याच्या निर्णयाचे परिणाम म्हणजे सत्ताधारी पक्षाला झालेला फायदा व ‘नगराध्यक्ष एका पक्षाचा व तेथील बहुसंख्य नगरसेवक विरोधी पक्षाचे’!

या राजकीय परिस्थितीमुळे राज्य सरकारने नगराध्यक्षांना दिलेले संरक्षण आत्मकेंद्रित वाटते. कारण बहुमतापेक्षा सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष अधिक असलेल्या राज्य सरकारने नगराध्यक्षांना काम करता यावे यासाठी अधिकार त्यांच्या हाती एकवटणे व त्यांच्यावर अडीच वर्षे अविश्वास ठराव मांडता न येणे असा घेतलेला ऐतिहासिक निर्णय नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराला अभयच नव्हे तर एक प्रकारचे प्रोत्साहन आहे. त्याचप्रमाणे अविश्वास ठराव दाखल करण्याची प्रक्रियादेखील फार किचकट असल्याने लोकशाहीचा प्रवास एका वेगळ्याच मार्गाने चालला आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्याच्या अहवालावरून लोकप्रतिनिधीस बडतर्फ करण्याचा सरकारला असलेला अधिकार म्हणजे विरोधी पक्षाच्या नगराध्यक्षांवर एक प्रकारे अंकुश ठेवण्यासारखे आहे.

– गणेश गदादे, श्रीगोंदा (अहमदनगर)

 

प्रेमाला लैंगिकतेतून मुक्त करण्याची गरजह्ण

समलैंगितेशी संबंधित असलेल्या अनुच्छेद ३७७ची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी संबंधित प्रकरण व्यापक खंडपीठाकडे वर्ग करण्याची पुरोगामी भूमिका घेतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन!

या विषयावर भारतीय समाजाने नेहमीच दुटप्पी व ढोंगी भूमिका घेतली आहे. ज्या अर्थी विवाह ही त्या व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे त्याअर्थी कोणी, कोणाची आपल्या जीवनसाथी म्हणून निवड करावी यामध्ये समाजाने, धर्माने अथवा तथाकथित ‘संस्कृतीने’ पडण्याची मुळीच गरज नाही. मात्र आजपर्यंत धर्म, संस्कृती, नतिकता यांसारखी व्यक्तिसापेक्ष तत्त्वज्ञानाच्या आधारे या बाबतीत दखलअंदाजी करण्यात आली. जगाच्या पाठीवर असा कोणताही धर्म अथवा संस्कृती नाही जी व्यक्तींमधील प्रेमाऐवजी त्या व्यक्तीच्या लैंगिकतेला प्राधान्य देते.

मात्र ब्रिटिशकालीन भारतात १८६० मध्ये मेकॉलेने तयार केलेल्या कायद्याच्या आधारे आजपर्यंत भारतात या प्रकारच्या संबंधांना ‘गुन्हा’ ठरवण्यात आले. (त्या अर्थाने मेकॉलेचे स्वप्न पूर्ण झाले असे म्हणावे लागेल!). ज्या वसाहतवादाचे व तत्संबंधित कायद्याचे जोखड आपण वाहत आहोत तो कायदा ब्रिटनने कित्येक दशके अगोदरच रद्द केलेला आहे हे विशेष!

सध्या झुंडशाहीचा काळ आहे. या दृष्टीने बहुसंख्य असलेल्या ‘संस्कृतीरक्षकांचा’ विचार करणेही क्रमप्राप्त ठरते. ‘संस्कृती म्हणजे नक्की काय?’ याबाबत एकमत आढळत नाही. तरीदेखील प्राचीन ग्रंथ-वाङ्मय, शिल्प, कला, प्रथा-परंपरा यांचे एकत्रित गाठोडे म्हणजे संस्कृती अशी व्याख्या केली, तर भारतीय संस्कृती एवढे समलैंगिकतेचे समर्थन करणारी क्वचितच दुसरी कोणती संस्कृती असेल!

सातव्या शतकामध्ये वराहमिहीर लिखित ‘बृहत्संहितामध्ये’ समलैंगिकतेचा ‘तृतीय प्रकृती:’ असा उल्लेख केलेला आढळतो . हिंदू धर्मामध्ये वेदांनंतर ज्या स्मृतींना स्थान आहे त्यातील  ‘नारद स्मृतीमध्ये’ समलैंगिकतेचे अनेक उदाहरणे अहेत. खजुराहो येथील मंदिर शिल्पे अजूनही भारतीयांच्या सर्वसमावेशक लैंगिकतेची साक्ष देतात. अमीर खुस्रो, मीर तकी मीर यांच्या समलैंगिक प्रेमावर आधारित कित्येक कथा व काव्य जगप्रसिद्ध आहे. पुराणांमध्येदेखील काही कथा- ज्या रूपकाच्या माध्यमातून लिहिल्या गेल्या आहेत – दिवसा (विष्णूचा मोहिनी अवतार) समलैंगिकता भारतीयांना नवीन नाही, हेच सूचित करतात.

समलैंगिक व्यक्तीविषयी वाटणारी ओढ जन्मजात असते. त्यात अनैसर्गिक असे काहीही नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील हे प्रमाणित केले आहे. माणसाव्यतिरिक्त सिंह, वाघ, डॉल्फिन, माकड इ.सारख्या सस्तन प्राण्यांच्या पंधराशेहून अधिक प्रजातींमध्ये समलैंगिक संबंध पाहायला मिळतात. निसर्गात सहज दिसणाऱ्या या गोष्टींना अनैसर्गिक कसे म्हणता येईल ?

भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद २१ अन्वये प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा, अनुच्छेद १४ अन्वये कायद्यासमोर समानतेचा अधिकार प्रदान केलेला आहे. हे त्या व्यक्तीचे मूलभूत हक्क आहेत. ते कोणताही कारणास्तव नाकारता येणार नाहीत. मात्र ज्या वेळी अधिकार कायद्याची भाषा येते त्या वेळी कटुता निर्माण होते. त्यामुळे खरी गरज आहे ती म्हणजे बहुसंख्य समाजाने त्या अल्पसंख्याक समाजाला स्वत:मध्ये समावून घेण्याची. प्रेमाला लैंगिकतेतून मुक्त करण्याची..

– कौस्तुभ तिलोत्तमा सोमकांत, लातूर

 

महासंगणकाच्या बढाया मारल्या तरी ‘सूर्या’खाली अंधार!

पुण्यातील भारतीय हवामान संशोधन विभागात आठ  जानेवारी २०१८ रोजी एक सूर्य मावळला आणि नवा सूर्य उगवला! २८ फेब्रुवारी २०१४ साली उद्घाटन झालेला ‘आदित्य’ या ३५० कोटींपेक्षा अधिक किमतीचा सुपर कॉम्प्युटर ‘बाय बॅक’ तत्त्वाने भंगारमध्ये टाकत त्याची जागा नवीन (चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत) ४५० कोटी रुपयांच्या निधीतून आणलेल्या ‘प्रत्युष’ने घेतली!  ‘प्रत्युष’ हेदेखील सूर्याचेच नाव, हे विशेष.

एक पेटाफ्लॉप संगणकी क्षमता म्हणजे प्रति सेकंद एक दशलक्ष अब्ज फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स होय. ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’ येथे ‘प्रत्युष’ या देशातील पहिल्या, चार पेटाफ्लॉप्स क्षमता असलेल्या सुपर कॉम्प्युटर (एचपीसी) प्रणालीचे उद्घाटन डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते झाले जी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. या समारंभानंतर जनतेच्या कररूपातून गोळा केलेल्या निधीतून सर्व मंत्री आणि प्रकल्प संचालक यांच्यासाठी (नेहमीप्रमाणे) दुपारच्या ‘शाही’ भोजनाची सोय करण्यात आली.

‘प्रत्युष’ सुपर कॉम्प्युटरमुळे येत्या वर्षभरात मान्सून, जलवायूचा अंदाज अधिक अचूकपणे वर्तविता येणार आहे. तसेच, गावपातळीवरील हवामान अंदाज देणे शक्य होणार आहे, अशी घोषणा केली गेली. याद्वारे आगामी दोन वर्षांत स्थानिक हवामानाची ही माहिती देशभरातील जवळपास ९.३ कोटी शेतकऱ्यांना संदेशरूपात (एसएमएस) पाठविण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. यात हे एसएमएस पाठविणारी यंत्रणा ‘प्रत्युष’मध्ये कार्यान्वित नाही आणि नऊ कोटी लोकांच्या मोबाइलला ही माहिती पाठविण्यासाठी ती कुठून घेणार हे गौडबंगाल आहे.

याबाबत घोषणा करताना याचे प्रकल्प संचालक डॉ. सूर्यचंद्र राव यांच्याकडून हे सुपर कॉम्प्युटर फक्त मॉडेल्स ‘रन’ करण्यासाठी असून प्रत्यक्ष हवामान भाकीत हा कसा करणार हे अद्याप ठरलेले नाही हे समजून घेण्यास मंत्रिमहोदय कमी पडले.

जवळपास २.४ कोटी शेतकऱ्यांच्या मोबाइलवर हवामानाचा अंदाज वर्तविणारा संदेश पाठविल्यामुळे दरडोई उत्पन्नात वाढ होताना दिसून येत आहे. ‘प्रत्युष’च्या नवीन प्रणालीमुळे भारतातील ३७३ किमीचा आणि जगाच्या १२७१२ किमीच्या चौरस प्रदेशाचा वेध घेणे शक्य होणार आहे. परिणामी गाव आणि तालुका पातळीवरील उष्णतेची लाट, चक्राकार स्थिती, त्सुनामी, वीज पडणे, अतिवृष्टी असे हवामानविषयक अंदाज अचूकपणे देणे शक्य होणार आहे, असेही डॉ. हर्ष वर्धन या वेळी म्हणाले.

‘प्रत्युष’ या एचपीसी प्रणालीमुळे हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणाऱ्या देशांच्या क्रमवारीत जपान, ब्रिटन, अमेरिका या देशांनंतर भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. असे असले तरी हजारो शेतकऱ्यांच्या दरवर्षी होणाऱ्या भारतातील आत्महत्या अचूक हवामान माहिती मिळाल्याने थांबतील याची कुठलीही ‘गॅरंटी’ हवामान खाते देऊ  शकत नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

‘आदित्य’चे नाव बदलून ते ‘प्रत्युष’ झाले तरी ‘सूर्य’बदल नाही आणि हवामानबदल घडून येईल अशी आशा ठेवायलादेखील हरकत नाही. मात्र मंत्री आणि हवामान संशोधन केंद्राने तोपर्यंत कितीही बढाया मारल्या तरी ‘सूर्या’खाली अंधारच आम जनतेस दिसत आहे हेच खरे!

– किरणकुमार जोहरे, पुणे</strong>

 

शस्त्रखरेदी सौद्यांवरून राजकारण नको!

‘बासनातले संरक्षण’ हा लेख (१० जानेवारी) देशाची सुरक्षा ही प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जबाबदारी आहे; परंतु भारताचा इस्रायलशी फिस्कटलेला सौदा ही गोष्ट खरोखर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. अद्यापही कुठल्याही राज्यकर्त्यांला अशी गोष्ट चांगल्या प्रकारे हाताळता आली नाही. तेव्हा यावरून देशांतर्गत राजकारणात, एकमेकांवर कुरघोडी करून देशाच्या सुरक्षेचा प्रश्न सुटणार नाही. फिस्कटलेल्या सौद्यांमुळे राष्ट्रीय सुरक्षेसह आंतरराष्ट्रीय संबंधाचा प्रश्न ऐरणीवर येऊ नये, अशी अपेक्षा.

– विकास गोरखनाथ खुरमुटे, कंडारी बु. (बदनापूर, जि. जालना)

 

 

विवेकानंदांचे ओढूनताणून पुरोगामीकरण अनावश्यक!

‘विवेकानंदांचा ‘ईश्वरवाद’’ हा ११ जानेवारीचा लेख वाचला. वेदांत, संन्यास, अशा शब्दांची ‘मागासलेपणा’शी मनोमन, घट्ट सांगड घालून, जे तथाकथित पुरोगामी विचार मांडले जातात, त्याचा हा नमुना म्हणावा लागेल. निदान विवेकानंदांच्या बाबतीत तरी ही मांडणी अजिबात योग्य नसल्याचे दिसून येते.

(१) ‘विवेकानंद हे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पूर्ण संन्यासी नव्हते’ – हे वस्तुस्थितीला धरून नाही. १८८५-८६च्या सुमारास रामकृष्ण परमहंसांच्या अखेरच्या आजारात नरेंद्र (विवेकानंद) व इतर काही शिष्यांनी त्यांची सेवाशुश्रूषा केली. आपला अंतकाळ समीप आल्याचे कळताच श्री रामकृष्णांनी शक्तिपात मार्गाने आपली सारी आध्यात्मिक शक्ती नरेंद्राला दिली. त्याच वेळी त्यांना आपल्या इतर शिष्यांची काळजी घेण्यास व इतर शिष्यांना विवेकानंदांचे नेतृत्व स्वीकारण्यास सांगितले. विवेकानंद व हे शिष्य, यांना त्याच वेळी रामकृष्णांनी स्वत: भगवी वस्त्रे प्रदान केली. अशा तऱ्हेने आध्यात्मिक दृष्टय़ा संन्यासाची, शिष्यत्व स्वीकाराची प्रक्रिया जरी रामकृष्णांकडूनच पूर्ण झाली असली, तरीही त्यांच्या महासमाधीनंतर (१६ ऑगस्ट १८८६) त्याच वर्षी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला विवेकानंद आणि इतर आठ शिष्यांनी अधिकृतपणे – हिंदू परंपरेनुसार – संन्यास दीक्षा घेतली होती.

(२) ‘हिंदू धर्मात संन्यासी जनतेपासून दूर असतात’ – हे विधानही अपुऱ्या माहितीवर आधारित आहे. फार लांब कशाला, खुद्द आद्य शंकराचार्याचे उदाहरण पुरेसे आहे. तसेच स्वामी रामतीर्थ, महर्षी दयानंद, परमहंस योगानंद, अलीकडच्या काळातील वासुदेवानंद सरस्वती, श्रीधरस्वामी ही लोकसंग्रह करणाऱ्या, जनतेत मिसळणाऱ्या संन्याशांची उदाहरणे प्रसिद्ध आहेत. हिंदू धर्मानुसार संन्यासाने एका ठिकाणी जास्त काळ (तीन रात्रीपेक्षा जास्त) राहू नये, म्हणजेच सतत भ्रमण करीत असावे, असेच अभिप्रेत आहे. त्यामुळे विवेकानंदांनी परिव्राजक म्हणून (स्वत: व त्यांच्या शिष्यांनीही) भ्रमण केले, तर त्यात पारंपरिक संन्यासाहून काही वेगळे केले, असे होत नाही.

(३) ‘विवेकानंदांनी कुठे तरी मठ स्थापून आराधना न घेता…परिव्राजक स्वरूपात (केवळ) भ्रमण  केले..’  हेही वस्तुस्थितीला धरून नाही. उलट रामकृष्णांच्या महासमाधीनंतर लवकरच त्यांनी  ‘बारानगर’ येथे एका पडक्या वास्तूत पहिला मठ स्थापला, जी पुढील रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन या संस्थेची पहिली वास्तू ठरली. या बारानगर मठात त्यांनी व इतर शिष्यांनी पहिले काही महिने केवळ आध्यात्मिक साधना (जप, ध्यान इ.) केली. एक मे १८९७ रोजी कलकत्ता येथे रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन (मुख्यालय बेलूर मठ), हिमालयात मायावती (अलमोरा जवळ) येथे अद्वैत आश्रम, तसेच मद्रास येथेही  एक मठ स्वामी विवेकानंदानी स्थापला.

(४)  विवेकानंदांना ‘निर्गुण ईश्वरभक्त’ म्हणणे, हे तर अजिबात पटणारे नाही; कारण वस्तुस्थिती तशी नाही. अमेरिकेतील आपल्या व्याख्यानांतून त्यांनी तथाकथित ‘निर्गुण उपासने’वर तर्कशुद्ध कठोर टीका केलेली आहे. एके ठिकाणी ते म्हणतात, ‘ईश्वराच्या अनन्तत्वा’ची कल्पना (ध्यान) करताना, ज्याच्या मन:चक्षुंपुढे अथांग पसरलेला सागर, किंवा अनंत आकाश यांपैकी काहीच येत नसेल असा मनुष्य संभवत नाही. अथांग सागर किंवा अनंत आकाश या शेवटी, अगदी निश्चितपणे ‘प्रतिमा’च आहेत! त्यामुळे प्रत्येक जण, स्वत:ला निर्गुण उपासक म्हणवणारासुद्धा, खरे तर प्रतिमापूजक / सगुण उपासकच आहे!’ सगुण उपासनेचे मर्म इतक्या थोडक्यात, पण अचूकपणे विवेकानंदांनी सांगून ठेवले आहे.

(५) ‘विवेकानंद हे हिंदूंचे नसून भारतीयांचे आहेत.’ – हे विधान हिंदू विचारसरणीचे नमुनेदार (टिपिकल) उदाहरण आहे. एक सच्चा हिंदूच असे मत स्वीकारू शकतो, मांडू शकतो. मात्र हे म्हणत असताना, किती ख्रिश्चन, मुस्लीम किंवा इतर पोथीनिष्ठ / एकेश्वरवादी धर्माचे अनुयायी विवेकानंदांना ‘आपले’ म्हणू शकतील, याचाही  विचार व्हायला हवा.

थोडक्यात, विवेकानंद, जे आहेत, जसे समजले गेले आणि समजले जातात, ते अगदी तसेच – ‘महान’ आहेत. त्यांना ‘पुरोगामी दृष्टीने  महान’ (?) ठरवण्यासाठी ओढूनताणून – मानवतावादी, धर्मनिरपेक्षतावादी, समन्वयवादी, प्रगतीवादी किंवा निर्गुण भक्तीवादी वगरे ठरवण्याची काहीही जरुरी नाही.

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली पूर्व (मुंबई)