‘पन्नाशीतले प्रौढत्व’ (२४ जानेवारी) या अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे ‘तीन दशके संसार झाल्यानंतरही जोडीदाराविषयी सेनेच्या मनात इतकी कटुता का, याचे उत्तर भाजपच्या वर्तनात आढळते..’ हेच मुळी चुकीच्या समजुतीवर आधारित आहे असे वाटते. ‘जे पेरले तेच उगवले’ या म्हणीप्रमाणे जेव्हा ‘मराठीच्या’ राजकारणापासून भाजपनेच सुरू केलेल्या ‘हिंदुराष्ट्र’ या मोहिमेमुळे शिवसेनेची चलती होती, तेव्हा माननीय अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या सौम्य व सहनशील नेतृत्वाचा संधी मिळेल तेव्हा तेव्हा जाहीरपणे अपमान केला जात होता, हे कसे विसरता येईल?

‘कमळाबाई’ असे हिणवत झालेल्या अपमानानंतरही पडत्या काळात मूग गिळून कसे गप्प बसणे हा त्या महान नेत्यांच्या सहनशीलतेचा धडा सेना नेतृत्व शिकण्याच्या मन:स्थितीत नाही त्याला भाजप काय करणार? त्या वेळी शिवाजी पार्कातील जाहीर सभेत ‘कमळाबाई’ हा हंशा व टाळ्या मिळवणारा विनोदी शब्द असायचा, थोडीथोडकी नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे विनाकारण झालेल्या अपमानाचा सूड भाजप योग्य वेळ येता घेऊ शकते हे सेना नेतृत्वास कळत नसेल तर त्यात दोष कुणाचा? जाहीर अपमाननाटय़ सेनेने सुरू केले त्याची परिणती सद्य:परिस्थितीत झाली, हे तरी नेतृत्व मान्य करेल काय?

दुसरा मुद्दा असा की, भारतीय राजकारणात काँग्रेसच्या घराणेशाहीविरोधात सर्वप्रथम आवाज उठवून त्या वेळी राजकीय भूकंप करणाऱ्या पक्षानेच, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आदित्य ठाकरे यांना शिवसेना नेतेपदी बढती दिली! पक्षनेतृत्व व राजकारण हा एक व्यवसाय झाला आहे आणि त्यात राजकीय चातुर्य, अनुभव व जनतेचे नेतृत्व करण्याची कुवत याला दुय्यम स्थान दिले जात आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. नेतृत्व घरात जन्माला येत नसते तर ते जनतेच्या मनात- कार्याने रुजवावे लागते हे सत्य स्वीकारायला भारतीय लोकशाहीला आणखी किती काळ वाट पाहावी लागणार?

– प्रवीण आंबेसकर, ठाणे

 

‘अचानक जादू’ झाली तर?

शिवसेना २०१९ मधील निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आनंदाची गोष्ट आहे. परंतु यामुळे प्रश्न पडतो की, गेल्या वर्षी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने प्रसृत करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनाचे काय? त्या निवेदनात म्हटले होते की, २०१९ची लोकसभा निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढेल व त्या निवेदनावर उद्धव ठाकरे यांचीही स्वाक्षरी होती. शिवाय, २०१४चा इतिहास आपल्यासमोर आहेच. त्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागताच शिवसेना विरोधी पक्ष म्हणून वावरली. परंतु नंतर अचानक जादू व्हावी त्याप्रमाणे सेना सत्तेत जाऊन बसली. सबब आता शिवसेनेने ‘एकला चालो रे’ची घोषणा केली असली तरी या निर्णयाला सेना चिकटून राहीलच याची शाश्वती काय? त्यातही काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकसभेची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास शिवसेना-भाजप खरोखर वेगवेगळे लढतील का, हा कळीचा मुद्दा आहे.

– जयश्री कारखानीस, मुंबई

 

कृपया फक्त विकासाच्या मुद्दय़ावर लढा

‘पन्नाशीतले प्रौढत्व’ (२४ जानेवारी) हा संपादकीय लेख वाचला. मुळातच शिवसेनेची अवस्था ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली आहे. मग ती ‘सत्तेला लाथ मारण्या’ची गोष्ट असो, की ‘राजीनामे खिशात घेऊन फिरण्या’ची! अगोदर असे म्हणायचे आणि नंतर सत्ता भोगायची, हेच वारंवार झाले. त्यामुळे ही घोषणाही हास्यास्पद वाटते. आज रोजी महाराष्ट्रात असा एकही पक्ष नाही की त्याची स्वबळावर सत्ता येईल. त्यामुळे निवडणुका झाल्या की युतीसुद्धा होईल आणि आघाडीसुद्धा. पण, फरक एवढाच असेल की ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांना चांगली खाती आणि ज्यांना कमी जागा मिळाल्या त्यांना दुय्यम खाते. परंतु या पत्रानिमित्ताने सर्व पक्षांना एकच सांगणे आहे की, स्वबळावर लढा किंवा युती/आघाडी करून; पण कृपया फक्त विकासाच्या मुद्दय़ावर लढा. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शेतमालाला भाव, महागाई या विषयावर काहीतरी बोला. नाहीतर काही दिवसांपूर्वी कुणी तरी १५० जागांचे स्वप्न पाहिले होते, त्यांना कशाबशा ९९ मिळाल्या, तशा ६३च्या ३६ होऊ नयेत.

– राजू केशवराव सावके ,वाशिम (अकोला)

 

हिंदुत्वाच्या भल्यासाठी युतीने लढणे इष्ट

‘पन्नाशीतले प्रौढत्व’ (२४ जानेवारी) या अग्रलेखाचा सूर शिवसेनेच्या स्वबळाचे अभिनंदन करणारा असल्याने आश्चर्यजनक वाटला. स्वबळाची ही भाषा ‘विनाशकाले..’ ठरणारी असल्याने, खरे तर युतीच्या वाटाघाटीत दबावतंत्र म्हणून हा निर्णय असेल तर तो अभिनंदनीय ठरू शकेल याचा विचार झाला पाहिजे. हिंदुत्वाच्या भल्यासाठी दोन्ही पक्षांनी आपापल्या चुका दुरुस्त करून युतीनेच निवडणुका लढविणे काळाची गरज आहे.

– प्रदीप करमरकर, ठाणे

र्मापेक्षा भाषा-संस्कृतीसाठी लढावे!

शिवसेनेने स्वतच्या हाताने नुकसान करून घेतले आहे, हेच ‘पन्नाशीतले प्रौढत्व’ (२४ जानेवारी) वाचल्यानंतरही वाटले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कैक मित्रांसोबत सेना जन्माला घातली; ती मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी. महत्त्वाचे म्हणजे मराठी भाषकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी. शिवसेनेच्या उभारणीत हिंदूंसह मुसलमान, ख्रिश्चन जनताही होती. वसईसारख्या भागातील मराठी भाषक ख्रिश्चन तरुण सेनेत शेकडो होते. १९८५ साली बाळासाहेबांच्या कपाळावर प्रमोद महाजन यांनी भगवा टिळा लावला. परिणामत सेना हिंदू-हिंदू करीत आजही लढत आहे. संघाच्या धार्मिक चक्रात सापडल्यामुळे सेना आहे तेथेच उभी आहे; फायदा भाजपला झाला. या उलट दक्षिण भारतातील अनेक राज्यस्तरीय पक्ष भाषा, संस्कृतीच्या रक्षणासाठी लढले, आजही लढत आहेत. त्यांची राजकीय सत्ता अबाधित राहिली. भाईंदर सेनेच्या हातातून गेले, वसईत मराठी भाषकांची संख्याच घसरत आहे. याकडे जर शिवसेनेने वेळीच लक्ष दिले नाही तर हिंदू राहू द्या, सेनाच अस्तित्वात उरणार नाही. धर्मावर आधारित राज्ये टिकत नाहीत हा जगाचा इतिहास आहे. यातून उद्धव ठाकरे यांनी धडा शिकावा.

– मार्कुस डाबरे , पापडी (वसई)

 

चुरस होणारच.. पण निकालानंतर?

‘पन्नाशीतले प्रौढत्व’ (२४ जानेवारी) हे संपादकीय वाचले. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत, शिवसेनेचे नवनिर्वाचित नेते आदित्य ठाकरे आणि इतरांचे अभिनंदन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करताना शेतकऱ्यांना कर्जमाफी, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे, असे मुद्देही मांडले.  शिवसेनाप्रमुखांसारखेच उद्धवजीदेखील महाराष्ट्रभर सभा घेत असून त्यांच्या सभांना मोठा जनसमुदाय येत आहे. मात्र निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजप नेतृत्व पंतप्रधानांसह अखिल भारतीय नेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि सत्तेच्या जोरावर प्रचारासाठी उतरणार हे नक्कीच. शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील कार्य टिकून असल्यामुळे, निष्ठावंत शिवसैनिक आजही कार्यरत असल्यामुळे शिवसेनेला स्वबळावर येण्याचा मार्ग काही प्रमाणात सुकर होऊ शकेल. फक्त उमेदवारी जाहीर होताना बंडाळी, नाराजी निर्माण होऊ नये याची नेतृत्वाने खबरदारी घ्यावी. भाजपने दिलेल्या आश्वासनांचे ‘लाभार्थी’ जाहिरातींतच दिसतात, प्रत्यक्ष दिसत नाहीत; त्यामुळे भाजपलाही निवडणूक सहज सोपी होऊ शकत नाही. तरीही, स्वबळ की आघाडी हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजू शकेल.

 – विजय ना. कदम, लोअर परळ

 

‘लव्ह जिहाद’च्या प्रोपगंडाला चपराक

‘एनआयएला वैवाहिक दर्जाच्या तपासाचा अधिकार नाही’ हे वृत्त (लोकसत्ता, २४ जाने.) वाचले. पती-पत्नीच्या संसारात समाज कसे विष कालवितो याचे उदाहरण म्हणजे हादिया-शफीन प्रेमविवाह प्रकरण होय. या प्रकरणात नवरा-बायको ओरडून सांगताहेत आम्हाला एकत्र राहायचे आहे, पण व्यवस्था त्यांना विभक्त करण्यासाठी पूर्ण ताकदीने जोर लावत आहे. त्यांनी आंतरधर्मीय विवाह करण्याचा ‘गुन्हा’ केला असे समाजाला वाटते आणि बोचते. एकाच महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणारे हे भिन्नधर्मीय प्रेमिक. मुलीकडच्यांचा विरोध स्वाभाविक होता. त्याला ‘लव्ह जिहाद’चे राजकीय वळण देऊन सामाजिक कलह निर्माण केला गेला. त्याचा राजकीय फायदा संपूर्ण देशात घेण्यात आला. मात्र पति-पत्नीने न्यायालयीन लढा हिमतीने दिला. त्याचे फळदेखील त्यांना मिळण्याची शक्यता आहे. सध्या देशात असहिष्णुता निर्माण केली जात आहे. या असहिष्णुतेचे बळी हे दाम्पत्य ठरू नये याची काळजी व्यवस्थेने घेण्याची गरज आहे. अर्थात, सद्यकाळात अशी अपेक्षा ठेवणेदेखील भाबडेपणाचे आहे. राजकारणासाठी प्रोपगंडा गरजेचा असला तरी त्याचा अतिरेक समाजस्वास्थ्य बिघडवतो. समाजस्वास्थाचा विचार करून प्रोपगंडाला चपराक दिल्याबद्दल न्यायालयाचे अभिनंदन.

– सलीम सय्यद, सोलापूर

 

भारतीय तरुणांपुढले भयाण वास्तव..

‘(पुन्हा) देवांचे सोहळे, आबाळली बाळे’ हा स्तंभलेख (२३ जानेवारी) वाचला. ‘असर’ने दिलेली आकडेवारी भारताचे भयाण वास्तव डोळ्यांसमोर आणून देणारी आहे. ज्या तरुणांच्या बळावर हा देश ‘२०२० सालची महासत्ता’ होऊ पाहत आहे, त्यांचे भविष्य अंधारात असल्याचे भासत आहे. ‘शिकून काय करायचे?’ असे म्हणणारी पिढी उद्या कदाचित प्रच्छन्न बेरोजगारीची शिकार होईल; तेव्हा त्यांना सद्य:स्थितीत सावरणे हीच प्राथमिकता डोळ्यांसमोर ठेवून महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणे औत्सुक्याचे ठरेल..

– प्रवीण भोमकर, कोल्हापूर</strong>