‘हरती लढाई’ हा अग्रलेख (८ मार्च) वाचला. तिकडे ट्रम्प आले आणि इतरत्रही जगात थोडय़ा-फार फरकाने ट्रम्प प्रवृत्तीचेच लोक पुढे येत आहेत. म्हणजे येणारा काळ हा सामान्य जनतेची कठोर परीक्षा घेणारा असेल हे निश्चित. ट्रम्प ही एक व्यक्ती गृहीत धरल्यास जगात लहरी लोकांची कमी नाही, पण तीच एक राजकीय प्रवृत्ती म्हणून अभ्यास केल्यास अशा प्रवृत्ती अचानक सगळीकडेच कशा राजकीय पटलावर येत आहेत, यावर साधकबाधक चर्चा झाली पाहिजे. अशा प्रवृत्तींना राजकीय पटलावर आणणाऱ्या पडद्यामागील शक्ती कोणत्या याचा शोध जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यंत कोणत्याही समस्येचे समाधानकारक निराकरण करणे केवळ अशक्य आहे. हे असे असो किंवा तसे. काहीही असले तरीही जगात सगळीकडेच अशा प्रवृत्तीचा सुकाळ होणे हा केवळ योगायोग  नाही. सामान्य माणूस हतबलपणे पाहण्याशिवाय काहीही करू शकत नाही. जे काही करायचे ते फक्त शक्तिशाली लोकांनाच ठरवायचे आहे. त्यांनीही बघ्याचीच भूमिका घ्यायचे ठरवल्यास ‘भोग आपले ..भोगावेच लागतील!’ असेच म्हणावे लागेल.

          -सय्यद मारुफ सय्यद मेहमूद, नांदेड</strong>

 

लेनिन आणि पेरियार महानच

सध्या लेनिन यांच्याबद्दल अपप्रचार सुरू असल्याचे दिसून येते. त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लेनिन जुलमी होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल दोन शब्द लिहीत आहे. महात्मा गांधी (१८६९) व (लेनिन १८७०) यांचा जन्म जवळजवळ एकाच वेळी झाला; पण या दोन लोकोत्तर पुरुषांची भेट न होऊ  शकल्याबद्दल सुप्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ रोमा रोलाँ यांनी खंत व्यक्त केली होती. गोलमेज परिषदेहून भारतात परत येताना गांधींनी रोलाँ यांची भेट घेतली. त्या वेळी रोलाँ गांधींना म्हणाले, ‘‘तुमच्याप्रमाणेच लेनिन यांनी तत्त्वांशी कधी प्रतारणा केली नाही.’’

२२ जुलै १९०८ रोजी लोकमान्य टिळकांची रवानगी मंडालेच्या तुरुंगात करण्यात आली. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच टिळकांच्या जन्मदिनी त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबई शहरात उत्स्फूर्त हरताळ पाळण्यात आला. मुंबईच्या गिरणी कामगारांनी संप केला. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्या वेळी कामगार संघटित नव्हते; परंतु लोकमान्यांच्या शिक्षेच्या निषेधार्थ त्यांनी उत्स्फूर्त संप केला. त्या संदर्भात लेनिन म्हणाले की, जुलमी राजवटीविरुद्ध भारतीय जनतेत जागृती होत असल्याचे ते द्योतक होते. ते पुढे म्हणाले, ‘‘रशियाचा अपवाद सोडल्यास भारताइतकी गरिबी व उपासमार जगात इतरत्र कुठेही नाही.’’ स्वत: लोकमान्यांनाही लेनिन यांच्याबद्दल आदर होता. रशियात क्रांती झाल्यावर ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांवरून हे स्पष्ट होते. लेनिन यांनी शांतता व स्वयंनिर्णयाबाबत धरलेला आग्रह लोकमान्यांना विशेष भावला.

तमिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची नासधूस करण्यात आली. वास्तविक द्रविडी चळवळीचे जनक पेरियार म्हणजे तमिळनाडूचे जोतिबा फुलेच. स्वत: जोतिबांची महती काय सांगावी? डॉ. आंबेडकरांनी त्यांना गुरू मानले होते आणि सध्याच्या राज्यकर्त्यांचे तर आंबेडकर प्रेम ऊतू चालले आहे. तरीही भाजपचे नेते पेरियार यांचा पुतळा नको म्हणून आग ओकणार. दांभिक मोदी व शहा नंतर काहीही म्हणोत, शेवटी पोटातले ओठावर आलेच, असे भाजपच्या एकूण विचारसरणीच्या पाश्र्वभूमीवर म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

          – संजय चिटणीस, मुंबई

 

महापुरुषांचे विचार आत्मसात करा

ऐतिहासिक महापुरुषांकडून प्रेरणा मिळावी, नवीन पिढीला त्यांचा इतिहास समजावा म्हणून त्यांचे पुतळे उभारले जातात. मात्र या महापुरुषांचे विचार न स्वीकारता त्यांच्या जातीचे राजकारण केले जात आहे. पुण्यातील दादोजी कोंडदेव व  गडकरी यांचे पुतळे काढण्यात आले. त्रिपुरात लेनिन यांचा पुतळा तोडण्यात आला, तमिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली. त्यामुळे या पुतळ्यांतून प्रेरणा न घेता त्यांच्या नावाने रणकंदन सर्वत्र सुरू झाले आहे. वास्तविक  पुतळा कुणाचाही असो, तो नष्ट केला तरी त्यांचे विचार संपत नसतात. दुसरीकडे शिवरायांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याची उंची कमी केली, यासाठी विरोधी पक्ष कंठशोष करत आहे. राजकारणाची उंची कमी होत आहे. पुतळ्यापासून प्रेरणा घेण्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुतळ्यांचे प्रतीकात्मक राजकारण करण्यापेक्षा महापुरुषांचे विचार आत्मसात करणे जास्त गरजेचे आहे.

          – प्रशांत कुलकर्णी, मनमाड

 

एमपीएससी परीक्षेतील घोटाळा व्यापमपेक्षा मोठा!

एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये बोगस परीक्षार्थी बसवून नोकरी मिळवण्याच्या प्रकरणात काही आरोपींना अटक केली. हे सर्व आरोपी शासकीय सेवक म्हणून कार्यरत आहेत. आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार आतापर्यंत २३७ परीक्षार्थीसाठी डमी म्हणून यांनी परीक्षा दिली आहे म्हणे, परंतु ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.

एसआयटीने संशयित म्हणून ज्यांची चौकशी केली होती तेच लोक मुंबईत पुन्हा एकदा डमी म्हणून परीक्षा देताना पकडले होते. याचा अर्थ हे प्रकरण खूप वपर्यंत पोहोचलेले आहे. संशयित म्हणून असणारे लोकच चौकशीनंतरही अशी हिंमत करतात म्हणजे यांच्या पाठीमागे मोठे हात आहेत. या प्रकरणात एका उमेदवाराकडून परीक्षेस बसण्यासाठी २० लाख एवढी रक्कम घेतल्याची चर्चा आहे. मध्य प्रदेशमध्ये गाजलेल्या व्यापमपेक्षा हा घोटाळा मोठा असूनही सत्ताधारी आणि विरोधकही सभागृहात या विषयावर बोलायला तयार नाहीत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो तरुण दिवसरात्र अभ्यास करून कसेबसे पुण्यात दिवस काढत आहेत. जागा कमी त्यात स्पर्धा मोठी, असे असताना आता अशी प्रकरणे समोर आल्यानंतर या लाखो मुलांनी करायचे तरी काय?

बोगस परीक्षार्थी बसवून पदे मिळवणाऱ्या सर्वाना तात्काळ नोकरीतून काढून टाकावे आणि आरोपींना कठोर शिक्षा द्यावी.

          – सज्जन यादव, पोहनेर (उस्मानाबाद)

 

जनतेच्या प्रश्नांपेक्षा निलंबनाचा विषय महत्त्वाचा?

राज्यातील जनतेच्या प्रश्नांची तड लागावी यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन भरविण्यात येते, पण दर अधिवेशनात गोंधळ घालून अधिवेशनाचे कामकाज बंद पाडणे ही जणू परंपराच झाली आहे. याही वेळी केवळ एका विधान परिषद सदस्याचे निलंबन रद्द करण्यावरून हेच पाहायला मिळाले. जनतेच्या प्रश्नांपेक्षा निलंबनाचा विषय महत्त्वाचा होता का? एकमेकांची उणीदुणी काढून, विधानमंडळाचा आखाडा बनविला जात आहे. जनतेच्या पैशाचा चुराडा केला जात आहे. जनतेच्या प्रश्नावरून कुठलाही पक्ष किंवा सदस्य गंभीर असल्याचे दिसत नाही. कधी तरी हे जनतेचे नेते याचा गांभीर्याने विचार करणार की नाही? दर अधिवेशनाचे फलित काय, हे जनतेसमोर का मांडले जावे.

          -अनंत बोरसे, शहापूर (ठाणे)

 

पुण्यातील नाटय़गृहांची एवढी काळजी असेलच, तर..

‘पुनर्विकासासाठी बालगंधर्व रंगमंदिर पाडणार’ ही बातमी वाचून (३ मार्च) पुणे महानगरपालिकेच्या अचाट आणि अफाट कल्पनाविलासाचे कौतुक वाटले. १९६८ मध्ये बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू उभी राहिली तेव्हा पालिकेचा अर्थसंकल्प अवघा चार कोटी रुपयांचा होता. आजघडीला तो सहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असल्याने सत्ता आणि मत्तेच्या जोरावर कल्पनाविलासाचे वारू चौखूर उधळू लागल्याचे नवल नाही. साठच्या दशकात हे रंगमंदिर मात्र केवळ अर्थबळावर उभे राहिले नाही. त्यामागे पु. ल. देशपांडे नावाच्या अद्वितीय ‘परफॉर्मरची’ संपन्न अभिरुची आणि परिणत प्रज्ञा यांचे सांस्कृतिक बळ होते. या वास्तूचे सौंदर्य आणि प्रत्यक्ष वापर साधलेली लय प्रेक्षकांना दृश्यात्मक आणि कलात्मक अनुभव देते. बालगंधर्वात ‘रंगते’ तसे नाटक इतरत्र रंगत नाही, हा अनेक कलाकारांचा आणि प्रेक्षकांचा अनुभव आहे. पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प चार कोटींहून चारशे कोटी, चार हजार कोटी आणि या वर्षी सहा हजार कोटी रुपये झाला असला तरी बालगंधर्वच्या तोडीचे दुसरे रंगमंदिर उभे करणे माननीयांना जमले नाही. सगळ्याच गोष्टी पैशाने होत नाहीत. हे नाटय़गृह बालगंधर्वाचे जसे स्मारक आहे, तसेच ते पुलंचेही आहे, म्हणून त्याचे आहे तसे जतन केले पाहिजे. अर्थात गळके छत, दगा देणारे वातानुकूलन, अस्वच्छ वॉशरूम्स, सुमार दर्जाच्या खुच्र्या, उखडलेले फ्लोअरिंग, अ‍ॅकॉस्टिक्समधील त्रुटी यासाठी आंतरराष्ट्रीय मान्यतेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने काम केले पाहिजे आणि त्यासाठी सढळ हाताने पैसे खर्च केले पाहिजेत.

लंडनमधील शेक्सपीअरच्या काळातील चारशे वर्षांपूर्वीचे ग्लोब थिएटर त्यांनी जसेच्या तसे पुन्हा उभारले. ज्या झाडाचे लाकूड मूळ बांधकामात वापरले होते तेच लाकूड नव्या बांधकामासाठी वापरले. मूळच्या नाटय़गृहाचे छप्पर गवताने शाकारले होते, नव्याने तसेच त्याच जातीच्या गवताने शाकारले आहे. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी लक्षावधी पौंड खर्च करायला त्यांनी अनमान केला नाही. थिएटर कसे असावे याचे आपल्या नजीकचे दुसरे उदाहरण म्हणजे मुंबईचे एनसीपीए. अमेरिकेतील लिंकन किंवा केनेडी सेंटर ‘जुने’ झाले म्हणून पाडून टाकून तेथे नव्याने ट्रम्प टॉवर उभारण्याची कल्पनाही कोणाला शिवत नाही. जणू काही त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि आमचा खिसा खुळखुळतोय.

बालगंधर्वचे मूळ रूप आणि मूळचा अवकाश जतन करण्यासाठी पालिकेला खूप काही करता येण्यासारखे आहे. बालगंधर्व हे बागेतील नाटय़गृह आहे. त्याच्या आसपास झालेली अतिक्रमणे काढून टाकली पाहिजेत. पोलीस चौकीचे स्थलांतर दुसरीकडे केले पाहिजे. जलतरण तलाव बुजविला पाहिजे. महर्षी शिंदे पुलावर उभ्या असलेल्या वडापावच्या गाडय़ांना पर्यायी जागा दिली पाहिजे. सर्व वाहनांना मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्याऐवजी शेवटच्या गेटने मागच्या बाजूला पार्किंगची सोय करता येईल. पैसे खर्च न करताही एक गोष्ट नक्की करता येईल ती म्हणजे राजकीय वा राजकारणाचा गंध येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला रंगमंदिर भाडय़ाने देता येणार नाही अशी तरतूद करता येईल. नाटय़गृह पाडायचेच असेल तर कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाटय़गृहास अग्रक्रम द्यावा. इतक्या सुमार दर्जाच्या रंगमंदिरास यशवंतरावांसारख्या रसिक, मर्मज्ञ व्यक्तीचे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, वाङ्मयीन पुनरुत्थानाच्या पायाभरणीचे काम करणाऱ्या नेत्याचे नाव शोभत नाही. किमान यशवंतरावांचे एखादे उत्तम दर्जाचे पेंटिंग तरी तिथे लावावे. आता आहे ते पेंटिंग म्हणजे यशवंतरावांचे कॅरीकेचर आहे की काय, अशी शंका येते. चव्हाण नाटय़गृह त्यांच्या लौकिकास शोभेल असे हवे.

सहा हजार कोटींचा अर्थसंकल्प, जरी तो कृत्रिमपणे काहीसा फुगवलेला असला तरी मोठाच म्हणायचा! श्रीमंत लोकांचे श्रीमंत शहर ना पुणे म्हणजे. पालिकेने आणखी काही करावे. भरत नाटय़मंदिराची नवी वास्तू होणेही आवश्यक आहे. त्याच्या पुनर्बाधणीसाठी महापालिकेने पाच-सात कोटी रुपये खर्च करून नाटय़प्रेमींचा दुवा घ्यावा. नाही तरी सध्या पब्लिक प्रायव्हेटचा जमाना आहेच. तिथून पलीकडेच टिळक स्मारक आहे. जयंतराव टिळकांनी फार मेहनतीने ते उभारले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी व त्यांच्या आग्रहाखातर इतर राज्यांनी त्याला भरघोस मदत केली. त्याच्या नूतनीकरणासाठी असेच पाच-दहा कोटी रुपये बाजूला काढावेत. ते लोकमान्यांचे स्मारक आहे. टिळक हे देशातील पहिले अखिल भारतीय नेते. विद्यमान महापौर टिळक कुटुंबीय असल्याने माननीयांना कदाचित यासाठी राजी करू शकतील.

पुण्यात तमाशा व इतर लोककलांसाठी आर्यभूषणसारखा एक स्वतंत्र कलामंच असणे गरजेचे आहे. सभासमारंभासाठी टाऊन हॉलची पुण्यात कमतरता आहे. पूर्वी बाजीराव रोडवरील सध्या राणा प्रताप उद्यान असलेली जागा त्यासाठी मुक्रर केली होती. पैशाअभावी तेव्हा टाऊन हॉल उभा राहिला नाही. यानिमित्ताने त्याचाही विचार करायला संधी उपलब्ध झाली आहे. म्हणून बालगंधर्वच्या वाटय़ाला जाण्याऐवजी नवनिर्माणाच्या कोणत्या अनेक सर्जनशील शक्यता पुण्यात उपलब्ध आहेत त्याचा शोध आधी घ्यावा. पुणेकर नागरिकांना आवाहन केले तर सांस्कृतिक उद्यमशीलतेच्या शेकडो कल्पना ते सुचवू शकतील, कारण त्यांचे या शहरावर खरेखुरे प्रेम आहे.

          – सदा डुम्बरे, पुणे

 

हट्टाग्रही निष्कर्षांच्या भूमिकेला सनिकीकरणाचे विचार म्हणणेच योग्य

‘कलेचे सनिकीकरण’ या माझ्या (रविवार विशेष, २५ फेब्रु.) लेखावरील ‘कलेचे सनिकीकरण कसे शक्य आहे?’ ही प्रतिक्रिया (लोकमानस, २८ फेब्रु.) वाचली. त्यावरील माझे विचार –

१. बंदिस्त शासकीय विचारांमुळे निरनिराळ्या देशांतून पलायन करावे लागलेले लेखक आपल्याला माहीत आहेत. सनिकीकरणाच्या हट्टाग्रही अपेक्षा अशा पद्धतीने राबवल्या जात असतातच. हेकट विचाराला सत्तेची जोड मिळाली की ते घडते आणि घडणार. शोषितांच्या अनुभवावर आधारित असेल तेच फक्त साहित्य, असे म्हणण्यात इतर सर्व साहित्य प्रकारांचे ‘ठरवलेले’ भवितव्यही अध्याहृत असते. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांचे खून िनद्यच आहेत. पण कुणी जर असे म्हणू लागले की सर्वच लेखकांनी त्यांना आदर्श मानून त्यांचे विचार आत्मसात करून तशाच बलिदानाला तयार व्हावे, अन्यथा ते साहित्यिकच नाहीत (असे डॉ. गणेश देवी म्हणतात), तर ते स्वीकारता येणार नाही. कुणालाही आदर्श, गुरू वा अधिकारी न मानणारे खूप लेखक असतात. कला हे लढाईचे माध्यम आहे, असे काहींना वाटतही असेल, पण जगातले कित्येक मौल्यवान लेखक ती एक शहाणपणाकडे, परिपक्वतेकडे, सजगतेकडे जाण्याची प्रक्रिया मानतात. कलात्मक सर्जकतेतून समजूत आणि सामंजस्य यांनी युक्त असे मानवी जगण्याचे भान येणे हे महत्त्वाचे मानणारेही खूप लेखक आहेत. ते सगळे नाकारणाऱ्या आणि फक्त अमुक विचारांचेच आणि अमुक अनुभवांचेच असले पाहिजे साहित्य, अशा हट्टाग्रही निष्कर्षांच्या भूमिकेला सनिकीकरणाचे विचार, असेच म्हणावे लागेल.

२. मराठीत सततच ‘भूमिका घ्या’ असा लेखकांच्या कानीकपाळी धोशा लावणाऱ्यांची काय असते मांडणी? ‘फक्त अ थांबेलं’ असे म्हणण्याचा अर्थ ‘बाकीच्यांनी घरी जा’ असाच होतो. हे भूमिकावाले सर्व साहित्य प्रवाहांची आस्थेने दखल घेतात का? आणि ‘कलेचा मृत्यू’! तसे तर आयडिऑलॉजीचा म्हणजे विचारसरणीचा (म्हणजे भूमिकेचाच) मृत्यू, इथेही माणूस पोचलेला आहे. भूमिकावाले यांतल्या कशाची दखल घेऊ इच्छितात? या सर्व वैचारिक टप्प्यांसह कलानिर्मिती अखंड चालूच असते, हे एक सत्य आहे.

३. लेखक एक तर भूमिकावादी असतो किंवा व्यक्तिवादी, एक तर डावा असतो वा उजवा – असे विचार हे – साहित्य म्हणजे पूर्वनियोजित विचारांचा आविष्कार, या ‘भूमिकावादी’ विचारसरणीतूनच येतात. वर्डस्वर्थचे ‘शांततेतून पाहणे’, गाओ िझगझिआन या लेखकाने सांगितलेला ्िर२३ंल्लूी िॠं९ी – म्हणजे दुरून, तटस्थपणे पाहणे – हे समाजवादी वा व्यक्तिवादी, अशा द्वंद्वात बसवता येत नाही. आपल्या लोकशाही असलेल्या देशात सर्वच कलाप्रवाहांना खुला वाव असायला हवा.

४. मी म्हणतो ते सोडून बाकी कुणी साहित्यिकच नाहीत अशी उद्दाम, आक्रमक मांडणी करणाऱ्याला साहित्यातले काही कळत नाही, असे म्हणण्यात वावगे वा असभ्य काहीच नाही (तेही वर्षांनुवर्षे लेखन करणाऱ्या अनेकांना मूर्ख ठरवीत असतातच). त्यांच्या अध्यक्षीय भाषणात साहित्याबद्दल कोणती समज व्यक्त झालेली आहे? ‘ पेरिले ते उगवते। बोलल्यासारिखे उत्तर येते। तरी कर्कश बोलावे ते। किंनिमित्त॥’ हे महत्त्वाचे आहे.

असंख्य भूमिकांमुळे जगभर रणकंदन चालू आहे. कलेने आणि साहित्याने तेच िहसक काम जोमाने पुढे रेटत राहिले पाहिजे, असे म्हणण्यात सांस्कृतिक काय आहे? की या प्रश्नाची अशी मांडणी होऊ शकेल – ‘‘सांस्कृतिक कृती म्हणजे भूमिकांचे संघर्ष. जगात, माणसाच्या इतर अनेक कृतींतून जशी प्रचंड िहसा निर्माण होते तसेच सांस्कृतिक कृतींतूनही घडणे अटळ आहे. याला फार तर माणसाची अटळ शोकात्मिका म्हणता येईल!’’ म्हणजेच, भूमिकावाद हा माणसाला एका अटळ अशा निराशावादाकडे नेतो का? आणि या निराशावादात जगणे हेच सांस्कृतिक जगणे म्हणावे का? या प्रश्नावर तर आपण सर्वच जण गंभीरपणे विचार करू शकतो.

– चं. प्र. देशपांडे, पुणे

 

पुरस्कार मिळवणे हेच आपल्या कलाकारांचे मिशन..

‘पुरुष-स्तोत्राचा पराभव’ हा अग्रलेख (६ मार्च) वाचला. ऑस्कर आणि भारतीय चित्रपट पुरस्कार सोहळा यातील वेगळेपण दिसून आले. पुरस्कार सोहळ्यातील बक्षीस किंमत अथवा सोहळ्यांवर केलेला खर्च हे वेगळेपण नसून कलाकारांनी तेथील सरकारवर केलेली निर्भीड टीका हे ऑस्करचे मोठेपण. नाही तर आपल्या पुरस्कार सोहळ्यात- ‘अरे वा! आज नटीने किती छान साडी घातलीय, अमुकतमुक जोडी किती सुंदर दिसते’ याच तर्कशून्य गोष्टीची चर्चा होते. कोणी सामाजिक वा राजकीय विषयावर बोलतच नाही. देशात किती तरी प्रश्न आहेत. स्त्रियांचे शोषण, दलित जीव मुठीत घेऊन जगताहेत, वाढती आर्थिक विषमता, देशात एकोप्याचा अभाव.. अशा विषयांवर कुणीही तोंड उघडत नाही. बेधडक बोलणारे फक्त चित्रपटांत दिसतात, तेही कुणी तरी लिहिलेले संवाद फक्त वाचून दाखवतात. काळविटाची शिकार करणारे, फुटपाथवरील लोकांना चिरडणारे भाईजान, करचुकवेगिरी करणाऱ्यांनाच राजकीय पाठिंबा असल्यावर हे कसे सरकारवर ताशेरे ओढतील? तिकडे सरकार काहीही करो, आपला चित्रपट हिट झाला पाहिजे आणि पुरस्कार मिळाला पाहिजे हेच त्यांचे मिशन.

          – भूषण वाघमारे, आसनगाव (ठाणे)