‘वाळवंटी घाई..’ हा अग्रलेख (६ एप्रिल) वाचला. त्यात उसाच्या वारेमाप पिकाबद्धल चिंता व्यक्त करताना डाळी हा सुचवलेला पर्याय व त्याची झालेली वाताहत याचे सुतावाच केले आहे आणि महाराष्ट्राने ते अनुभवले आहे. शेतकरी ऊस पिकाला प्राधान्य का देतो याची पुढील काही कारणे आहेत.  इतिहासात ऊस पीक एखाद्या रोगाने पूर्ण गेल्याचे उदाहरण नाही. एकदा लागवड केल्यावर ३ ते ४ वर्षे खोडवा घेता येतो, दुसरे असे चारा पीक. सांगली येथील शेतकरी सात खोडवे घेतात. आंतर मशागत कमीतकमी असते. त्यात बहुतेक कामांचे यांत्रिकीकरण झाल्याने मजुरावरील अवलंबित्व कमी होते. ऊस हे पीक निसर्गाच्या टोकाच्या अवस्थेत तग धरून राहू शकते.अगदी आगीतसुद्धा शेतकऱ्याचे नुकसान न होणारे हे एकमेव पीक आहे.

अती पाऊस वा पाण्याच्या पाळीत अंतर पडले तरी त्याचा ताण सहन करण्याची ताकद उसामध्ये असते.  कारखान्याची नोंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना उसाच्या विक्रीची चिंता नसते. कारखाना सगळे सोपस्कार करीत असल्याने व्यवस्थापकीय ताण नसतोच. सहकार क्षेत्रात कर्जपुरवठा, एकहाती उत्पन्न, कारखाना क्षेत्रात शेतकऱ्यांची पत राहते. काही कारखाने उचल म्हणून लग्नाचे सर्व सामान देतात हीही एक जमेची बाजू आहे. त्यामुळेच उसाचे दर निम्म्यावर येऊनही त्या प्रमाणात ऊस क्षेत्र कमी झाले नाही. पर्यायी पिकाचा प्रयोग म्हणून तूर अनेक शेतकऱ्यांनी लावली, पण तो प्रयोग फसल्याने नाइलाजाने ते पुन्हा ऊस लागवडीकडे वळले.

– सुखदेव काळे, दापोली (रत्नागिरी)

 

भाजपचा ढोंगीपणा

‘भाजप खासदार या वेळेच्या अधिवेशनातील वेतन घेणार नाहीत’ ही बातमी (५ एप्रिल) वाचून हसावे की रडावे ते कळेना. यूपीएच्या काळात सुखराम यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून संसदेचे अख्खे अधिवेशन भाजप नेत्यांच्या गोंधळाने वाया गेले. हे सुखराम नंतर भाजपमध्ये येऊन वाल्मीकी झाले. त्या वेळी भाजपचे नेते अरुण जेटली हे सभागृहात गोंधळ घालणे हा आमचा अधिकार आहे, अशी भाषा करीत होते. आता मात्र भाजपवाले पगार घेणार नाही अशा वल्गना करतात. विरोधी पक्षात असताना गोंधळ घालूनही पगार व भत्ते मोजून घेणार आणि आता मात्र आम्ही किती चांगले असा आव आणणार. भाजपचा हा शुद्ध ढोंगीपणा झाला.

– जया रणशूर, नाशिक

 

..तरच न्याय होईल

‘सलमान तुरुंगात’ ही बातमी (६ एप्रिल) वाचली. न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकांमध्ये एक चांगला संदेश जाईल की न्यायालयापुढे श्रीमंत, गरीब, अभिनेता हे सर्व समानच आहेत. काळवीट शिकारप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा मिळाली, पण त्यासाठी २० वर्षे पूनमचंद बिश्णोई व समाज न्यायासाठी झगडत होता. त्या निर्णयामुळे त्या समाजाचे समाधान नाही झाले. कारण फक्त सलमानलाच शिक्षा झाली. पण त्याच्याबरोबर असणारे काही प्रमाणात दोषी आहेत ना? त्यांना निर्दोष का सोडले असावे हा प्रश्न आहे? काळवीटाचे आयुर्मान १५ वर्षेच आहे, पण न्याय मिळण्यासाठी २० वर्षे? हा निर्णय वरिष्ठ न्यायालयातही असाच राहिला तर खरा न्याय मिळाला असे म्हणता येईल.

– अमित प्रफुल्ल तांबडे, बारामती (पुणे)

 

हा वलयांकितांसाठी ‘धडा’च!  

चित्रपट आणि छोटय़ा पडद्यावर (बिग बॉसमध्ये) दबंगगिरी करणाऱ्या सलमानला लोकशाही काय असते याचा प्रत्यय येत आहे. लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. त्या व्यवस्थेने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली असता न्यायव्यवस्थेचा तडाखा बसतोच बसतो. या प्रकरणावरून सिनेजगतातील वलयांकित व्यक्तींनी बोध घेतला पाहिजे. कायद्याचा बडगा हा नियमानुसारच उगारला जात असल्याने त्यातून सुटका होणे शक्य नाही.

– मनीषा चंदराणा, सांताक्रूझ (मुंबई)     

 

न्यायाधीश कमी, हे कारण न पटणारे

‘न्याय झाला?’ या अन्वयार्थात (६ एप्रिल) सलमान खान हा त्याला ठोठावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयापर्यंत आव्हान देऊ  शकेल असे म्हटले आहे. ते वास्तवात घडणार यात शंका नाही. मात्र हा खटला निकालापर्यंत येण्यास २० वर्षे लागावीत यामागे न्यायालये आणि न्यायाधीश यांची कमी असलेली संख्या हे दिलेले कारण पटत नाही. या प्रकरणात सलमान खानचे सेलेब्रिटी स्टेटस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत पतंग खेळण्याचे लाभलेले सौभाग्य आणि नंतरच्या काळात त्यांच्या शपथविधी कार्यक्रमात विशेष आमंत्रित म्हणून दिसून आलेली जवळीक आणि त्यातून एकंदरच तपास यंत्रणांना मिळालेले संदेश या बाबी महत्त्वाच्या ठरल्या असतील असे का म्हणू नये? याप्रकरणी न्यायालयांची आणखी वर्षे खर्ची पडू नयेत असे वाटत असेल तर त्यावर एक उपाय म्हणजे पंतप्रधानांनी सलमान खान यास ‘गुन्हा केला आहेस काय?’ हा प्रश्न सत्यमेव जयते या ब्रीदवाक्यास अनुसरून विचारावा आणि त्यानेही सदसद्विवेक बुद्धीला स्मरून त्या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर द्यावे.

– मुकुंद नवरे, गोरेगाव (मुंबई)

 

बिष्णोई समाजाची बांधिलकी अनुकरणीय

सलमानविरोधी खटल्यातील दोघा बिष्णोई समाजातील साक्षीदारांनी आपली साक्ष न फिरवणे हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सलमानसारखा सेलेब्रेटी असल्याने त्यांना फितवण्याचे प्रयत्न नक्कीच झाले असणार. पण ते आपल्या साक्षीवर कायम राहिल्याने सलमानला तुरुंगात जावेच लागले. वाळवंटी भागात राहणारा हा समाज तिथली वनस्पती, वन्यजीव व नैसर्गिक जैवविविधता यांवरही तेवढेच प्रेम करतो, ही बाब अनुकरणीय आहे.

– अजित कवटकर, अंधेरी (मुंबई)