‘मोदी जिंकले, केजरीवाल हरले!’ हा योगेंद्र यादव यांचा लेख (२७ एप्रिल) समाजामध्ये येत असलेले भान अधोरेखित करतो; एका विशिष्ट राजकीय पक्षाला लक्ष्य करीत असला तरी.

आंदोलक आणि आक्रस्ताळी मानसिकता ही बहुतेक वेळा स्व:केंद्रित किंवा आत्मकेंद्रित वृत्तीचा दाखला देते. केजरीवाल यांना ही वृत्ती चतुराईने वापरण्याचे आत्मभान नाही राहिले. मतदारांना नुसते गृहीत नाही धरले तर दावणीस बांधले. आम आदमी कसा खास बनत आहे याचा सुगावा मतदारांना अजून नाही लागला या भ्रमात केजरीवाल राहिले. मानभावीपणा आणि उथळ कैवार याची शिदोरी संपली आहे याचा अदमास होणाऱ्या पराभवांतून होणे पर्याप्त होते; परंतु अहंकारी व्यक्तिमत्त्वाला ते समजून घेणे आवडत नाही. केजरीवालांचे शिलेदार तर उसनवारीवर जगतात आणि केजरीवालांचा प्रकाश थोडा जरी तिमिरला तरी यांचा अस्त होतो अशी परिस्थिती असताना ही बांडगुळे काय दिवे लावणार! नको त्या पिपाण्या वाजवत ठेवल्या तर तो कर्कशपणा नकोसा होतो, अगदी तो आपला बाळ्या असला तरी! ती पिपाणी हातातून हिसकावली तरी जाते किंवा ती बंद होण्यासाठी कानाखाली वाजवली तरी जाते. अगदी तीच अवस्था केजरीवालांची झाली आहे.

तात्कालिक सुज्ञपणा किंवा स्वार्थी जाण ही अधिक धोकादायक असते, कारण हे अवसान कायमस्वरूपी पेलणे अशा व्यक्तिमत्त्वांना शक्य नसते.

मतदारांनी देऊ केलेली एकाधिकारशाही हा विरोधकांचा नाकर्तेपणा आहे. सत्तेत न राहतादेखील समाजाचे हित साधता येते जर इच्छा असेल तर, हे विरोधक कधी जाणणार! निवडून आणले तरच?

 – किरण इनामदार, मुंबई    

 

केवळ मुख्यमंत्री स्वच्छ असून काय उपयोग?

‘सेन्टर फॉर मीडिया स्टडीज’ने केलेल्या सव्‍‌र्हेनुसार महाराष्ट्र शासनाचा भ्रष्टाचारात चौथा क्रमांक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर एक स्वच्छ व निष्कंलक प्रतिमा असलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या राज्यकारभारात/ प्रशासनात आमूलाग्र बदल करेल, अशी जनतेची अपेक्षा होती. विशेषत:  गृह, सामान्य प्रशासन, नगर विकास आदी महत्त्वाचे व प्रचंड भ्रष्टाचारामुळे बदनाम असलेले विभाग मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवल्याने सुधारणेची अपेक्षा होती. वाहतूक पोलीस, महसूल, जलसिंचन विभाग, सा.बां. विभाग, एमआयडीसी, महानगरपालिका, सिडको, वीज वितरण येथे पैसे दिल्याशिवाय कामेच होत नाहीत, असा जनतेचा अनुभव आहे. प्रवीण दीक्षित यांच्यासारखा सचोटीचा अधिकारी निवृत्त झाला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा वचकच संपला. वरिष्ठांकडे दाद मागा, उपयोग शून्य. पूर्वीच्या सरकारपेक्षा आता काम करण्याचे दर वाढले आहेत.

मुख्यमंत्री स्वच्छ असून काय उपयोग? आता तर आंब्याच्या पेटीतून वा चेकने लाच घेण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. परवाच एक आयएएस अधिकारी ठाण्यात लाच घेताना पकडला. तुकाराम मुंढे, अश्विनी जोशी यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले तरच भ्रष्टाचार कमी होईल.

सुरेश वामन म्हात्रे, कळंबोली (पनवेल)

 

गोभक्तांनी हेही लक्षात घेणे महत्त्वाचे

भंडारा जिल्ह्य़ातील कोका अभयारण्यालगत गाईला मारल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी एका बिबटय़ाला लाठय़ाकाठय़ांनी मारून ठार केल्याची बातमी (२७ एप्रिल) वाचली. वास्तविक अरण्याचे काही नियम असतात आणि तेथे राहणारे प्राणी हे आपल्या स्वभावधर्मानुसार आणि आपल्या कक्षेत स्वत:चे अन्न मिळवत असतात आणि त्यांचा अधिकार निसर्गदत्त असतो. तेथे माणसाला हस्तक्षेप करण्याचे कारण नसते. सदर बातमीतील गावकऱ्यांचे कृत्य वाचल्यावर ‘सर्व राज्यांमध्ये गो अभयारण्ये उभारणार’ या केंद्र सरकारच्या घोषणेबद्दल मनात विचार आला. उद्या केंद्र सरकारने गाईंसाठी अशी अभयारण्ये खरोखर स्थापन केली तर त्या अरण्यांमध्ये बिबटे तर सोडाच, पण वाघांची संख्याही वाढू शकेल, कारण अन्नशृंखलेच्या नियमाप्रमाणे जे अन्न अधिक उपलब्ध असते त्यावर जगणाऱ्या प्राण्यांची संख्या आपोआपच वाढू लागते. म्हणजेच अधिक धान्य तेथे अधिक उंदीर, अधिक उंदीर तेथे अधिक साप अशी ती साखळी होय. यानुसार हरणे तेथे वाघ हे ओघानेच येते. आता हरणांच्या ठिकाणी गाईचा विचार केला तर तेही वाघाचे अन्न आहे हे मानावे लागेल. यास्तव गाईंसाठी अभयारण्ये स्थापन केल्यावर तेथे वाघांनी येऊन गाई मारल्या तर या वाघांना ठार मारण्यासाठी कोणी सरसावून चालणार नाही, तर ते सहन करावेच लागेल याची नोंद गोभक्तांनी घेणे महत्त्वाचे आहे.

मुकुंद नवरे, गोरेगाव (मुंबई)

खलनायक ते सुपरस्टार!

विनोद खन्ना यांना वाहिलेली ‘आदरांजली’ आणि ‘मन का मीत’ हा ‘अन्वयार्थ’ वाचल्यावर (२८ एप्रिल) विनोद खन्ना यांची दोन वैशिष्टय़े प्रकर्षांने जाणवली. एक म्हणजे चित्रपट कारकीर्द उत्तम चालली असताना ओशो (आचार्य रजनीश) यांच्या आध्यात्मिक विचारसरणीकडे ते कसे आणि का ओढले गेले? चित्रपट संन्यास घेऊन तब्बल पाच वर्षे रजनीश यांच्या आश्रमात ते राहिले. तेथील जीवनाचा कंटाळा आल्याने पुन्हा चित्रपटसृष्टीत तेवढय़ाच ताकदीने पुनरागमन करणे सोपे नाही. दुसरे म्हणजे रुपेरी पडद्यावर उत्तम खलनायक म्हणून सुपरहिट ठरल्यावर ते ‘लेबल’ पुसून रोमँटिक हिरो म्हणून ते नावारूपास आले. खलनायक ते सुपरस्टार हा त्यांचा प्रवास विलक्षण म्हणावा लागेल.

श्रीनिवास स. डोंगरे, दादर (मुंबई)

 

मोदींना आता प्रश्नांचे गांभीर्य कळले असेल..

छत्तीसगढमधील नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या २५ जवानांचे हत्याकांड झाले. मोदी सरकार काय करीत आहे? विरोधी पक्षात असताना म्हणायचे आमच्या हातात सत्ता द्या, काश्मीरचा प्रश्न तातडीने सोडवू, नक्षलवाद्यांना डोके वर काढू देणार नाही.  सत्तेवर आल्यानंतर सीमेवर रोज जवान मृत्युमुखी पडत आहेत तर नक्षलवाद्यांचा हिंसाचार सुरूच आहे. पी चिदम्बरम हे गृहमंत्री असताना सुरक्षा आणि विकास या दोन तत्त्वांचा आधार घेत प्रश्न कसे सोडवायचे, हे मनमोहन सिंग सरकारने दाखवले होते. पण मोदी सरकारने याकडे कानाडोळा केला आहे. विरोधी पक्षात राहून आम्ही हे करू, आम्ही ते करू हे बोलणे सोपे असते, पण सत्तेत आल्यावर ते करणे किती अवघड असते हे ५६ इंचाची छाती असणाऱ्या मोदी यांना आता कळले असेलच.

प्रा. जयवंत पाटील, भांडुप (मुंबई)