व्यासंगी संपादक दिवंगत गोिवदराव तळवलकर यांच्या कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन भिडणाऱ्या वृत्तीकडे लक्ष वेधू इच्छितो. एप्रिल २०१५मध्ये त्यांचे दोन लेख प्रकाशित झाले. हे लेख प्रा. वेंकट धुलिपाला लिखित ‘क्रिएटिंग ए न्यू मदिना’ या पुस्तक परीक्षणाच्या निमित्ताने लिहिले होते. तळवलकरांचा ‘भारताची फाळणी’ या विषयाचा गाढा अभ्यास होता. प्रा धुलिपाला यांनी फाळणीच्या बऱ्याच अगोदर ज्या घटना घडल्या त्यावर नव्याने पुढे आलेल्या दस्तावेजाच्या आधारे नवीन प्रकाश टाकला.   भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी पाकिस्तानात गेले असता त्यांनी महमद अली जिना हे सेक्युलर होते असे धाडसी विधान केले. यावर देशात त्या वेळी गहजब झाला. तळवलकरांनी मात्र प्रा. धुलिपालांनी जी ऐतिहासिक तथ्ये समोर आणली, त्या आधारे अडवाणींच्या विधानांचा कठोरपणे आढावा घेतला. अडवाणींनी जिनांना सेक्युलर ठरविताना त्यांच्या ११ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेला उद्देशून केलेल्या भाषणाचा दाखला दिला. असे करीत असताना धुलिपालांनी उल्लेख केलेल्या २५ जानेवारी १९४८ च्या जिनांच्या भाषणाकडे दुर्लक्ष केले. या कृतीवर तळवलकरांनी कठोर टीका केली.  सिंध बार असोसिएशनपुढे केलेल्या भाषणात जिनांनी धर्माला राजकारणापासून वेगळे ठेवण्याच्या त्यांच्या आधीच्या भाषणात मांडलेल्या भूमिकेचा त्याग केला. जिनांना इस्लामिक लोकशाहीबरोबरच विकासाचे इस्लामिक आíथक मॉडेल हवे होते. शरियत कायदा हाच पाकिस्तानी संविधानाचा पाया राहील, असे आग्रही प्रतिपादन या भाषणादरम्यान केले. शरियतचा त्याग करणे याला त्यांनी मिस्चिफ असे संबोधले होते. (पृ.- ४८५)  लेखाच्या समारोपात  ऐतिहासिक तथ्यांचा सूक्ष्म व र्सवकष अभ्यास न करता केवळ एका भाषणाचा दाखला देत अडवाणींनी काढलेला निष्कर्ष कसा चुकीचा आहे याची अधिकारवाणीने त्यांनी मांडणी केली.

सतीश भा. मराठे, नागपूर

 

असे खासदार निवडून येणे दुर्दैवी

‘शिवसेना खासदाराची गुंडगिरी’ ही बातमी (२४ मार्च) वाचली. आपल्या देशातील खासदाराने किंबहुना शिवसेनेच्या उन्मत्त व मुजोर लोकप्रतिनिधीने केलेले कृत्य वाचून संताप आला. असे लोकप्रतिनिधी निवडून येणे व अशांना निवडून देणे देशाचे दुर्भाग्यच. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची अधोगती त्यांच्या मृत्यूनंतर जलद गतीने होत आहे. यास कारण पक्षाचे सध्याचे नेते, मंत्री, आमदार, खासदार वगैरे व काही प्रमाणात त्यांच्यावर अंकुश ठेवू न शकलेले पक्षप्रमुखसुद्धा. राज्याला भेडसावणारे ज्वलंत प्रश्न संसदेत मांडण्याऐवजी विमानात आरामशीर जागा मिळाली नाही म्हणून हे खासदार अधिकाऱ्याला मारहाण करतात, याला काय म्हणावे. उद्धव ठाकरे यांनी अशा मारकुटय़ा खासदाराची ‘हा माझा मर्द मावळा आहे’ अशी भलामण न करता कडक शब्दांत त्यांना तंबी द्यावी. पुन्हा असे कृत्य केल्यास खासदार रवींद्र गायकवाड यांचा राजीनामा घ्यावा.

– सुनील देशपांडे, ठाणे

 

कठोर कारवाई आवश्यक

राज्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्सना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण करण्याचे प्रकरण ताजे असतानाच एका मराठी खासदाराने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चप्पलप्रसाद देऊन वर त्याचे निर्लज्ज समर्थन करण्याची घटना सुसंस्कृत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राला नक्कीच शोभादायक नाही. हल्ली लोकांची सहनशीलता अतिच नाजूक झाली असून कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली असल्यास्तव त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही तसेच न निपजतील तरच नवल. तेव्हा अशा प्रसंगी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच आवश्यक तेथे समुपदेशन करून अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पावले उचलणे जरुरी आहे.

डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर (मुंबई)

 

संस्कृतिविकासाच्या प्रेरणेलाच सुरुंग

‘उदारमतवादावरचे ओरखडे’ हा अग्रलेख (२४ मार्च) वाचला. माणूस हा मुळात प्राणीच होता/ आहे. म्हणजे एकाला मारून दुसरा जगतो (जीवो जीवस्य जीवनम्) या निसर्गनियमापासूनच संस्कृती म्हणून जे काही आपण म्हणतो त्याची सुरुवात झाली. असे मारत आणि वार चुकवत जगण्यात कोणाचाच दूरगामी फायदा नाही याची जाणीव विकसित झाल्यावरच संस्कृतिनिर्मितीला चालना मिळाली असावी. अशा मारामाऱ्या बंद करण्याकरिता मग सर्वानीच काही पथ्ये पाळायची या भावनेतून नियम-कायदे तयार होऊन संस्कृतीची वीण घट्ट होत गेली आणि त्यातून टोळ्या, वस्त्या, गावे आणि मग देश निर्माण झाले. दुर्दैवाने ज्या दूरगामी फायद्याच्या विचारामुळे पशुवत जिण्यापासून संस्कृतीचा विकास होत गेला/ केला गेला, त्या विचारांचाच विसर पुढे ‘विकसित’ देशांना पडला. (ब्रेग्झिट हे तात्कालिक फायद्यापायीच घडले.) आपल्या तात्कालिक स्वार्थापायी त्यांनी जे जे केले त्यातून अनेक इतर देश आणि त्यातील ‘मनुष्यप्राणी’ देशोधडीला लागले. सर्वाचाच दूरगामी स्वार्थ साधणे या संस्कृतिनिर्मितीच्या पायाभूत प्रेरणेलाच सुरुंग लागल्यावर मनुष्याच्या आदिम प्रेरणा जागृत होऊन त्याचा परत पहिल्यासारखा ‘प्राणी’ होणार हे ओघानेच आले; कारण निसर्गनिर्मित मूळ रचना तीच आहे.

एकल-दहशतवादाचा उगम, शहराच्या बजबजपुरीत ‘पेशन्स’ हरवल्यामुळे क्षुल्लक वादातून होणारे खून, परिणामांची तमा न बाळगता होणारी कोवळ्या वयातलीही गुन्हेगारी, या सगळ्यांकडे अशा दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. अनोळखी लोकांच्याही चांगुलपणावरचा विश्वास, कुटुंब ते देश आणि देशांचे समुदाय ही सारी उत्क्रांत व्यवस्था आपल्याच फायद्याकरिता असते हा विश्वास, हा संस्कृती टिकण्याचा पाया आहे. त्यालाच सुरुंग लागल्यास इमारत पडायला वेळ लागणार नाही.

प्रसाद दीक्षित, ठाणे 

 

सरकार बदलले तरी टोलचा झोल सुरूच

टोल दरवाढीसंदर्भातील बातमी वाचली आणि ‘अच्छे दिन आनेवाले है’ या मोदींच्या आश्वासनाची आठवण झाली. मुंबई-पुणे महामार्गावर जवळपास २० टक्के वाढ कोणत्या आधारावर करण्यात आली? ठेकेदाराचा हा मनमानी कारभार सुरू आहे. वसुलीचे लक्ष्य व  कालमर्यादा लक्षात घेऊन त्याचे गणित जुळणेसुद्धा आवश्यक आहे. मुदतीपूर्वी वसुलीचे उद्दिष्ट साधून नंतर मुदतीपर्यंत सर्वसामान्यांची लूट करणे हेच दिसून येत आहे. टोलमुक्तीच्या घोषणा भाजपने निवडणुकीच्या वेळी दिल्या होत्या. भाजपचे सरकार येऊनही टोलमधील झोल थांबलेला नाही. याकडे सत्वर गांभीर्याने लक्ष दिले नाही तर सरकारला नक्कीच जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल.

पुरुषोत्तम कृ. आठलेकर, डोंबिवली