‘आयुर्वेद हे ‘शास्त्र’ आहे?’ या पत्रवजा लेखात (लोकसत्ता, ७ जून) आयुर्वेद हे शास्त्रच नाही, असे प्रतिपादन आहे. संपूर्ण लेखात या प्रतिपादनाच्या समर्थनार्थ ज्यावर वाद-विवाद होऊ शकेल असा एकही मुद्दा मांडलेला नाही. वात, कफ, पित्त हे आयुर्वेदाचे मूलभूत तत्त्व कालबाह्य आहे हे लेखकाने त्याचे ‘मत’ म्हणून लेखाच्या अकराव्या परिच्छेदात मांडले आहे. बाराव्या परिच्छेदात आयुर्वेदाची पाश्चात्त्य मेडिकल सायन्सच्या आधारावर पुनर्रचना केली पाहिजे, असे सुचविले आहे. आधीचे दहा परिच्छेद आपण उच्च दर्जाचे वैज्ञानिक असून आपली विपश्यनेतील प्रगती आणि काश्मीर शैव-परंपरेनुसार झालेली कुंडलिनी जागृती व इतर वैयक्तिक माहिती देण्यात खर्ची पडले आहेत. लेखात जे मांडावयाचे आहे त्याच्याशी या माहितीचा काही संबंध दिसत नाही.

आज अनेक भारतीय आणि पाश्चात्त्य शास्त्रज्ञ आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करीत असून त्यात आयुर्वेदाच्या तात्त्विक (सांख्य-दर्शन), आणि पद्धती-शास्त्रीय बाजूंची कसून आणि अभिनिवेशरहित चिकित्सा होत आहे याचा लेखकर्त्यांस विसर पडलेला दिसत आहे. पाश्चात्त्य मेडिकल सायन्सच्या ज्या क्वांटिफिएबल आणि मेजरेबल अशा पद्धतीची लेखक भलावण करीत आहे, त्याच्या मर्यादाही पाश्चात्त्य वैज्ञानिकच दाखवीत आहेत. त्याबद्दलची कुठलीही साधकबाधक चर्चा न करणारा आणि केवळ सनसनाटी निर्माण करणारा हा लेख आहे.

  – शरद देशपांडे, पुणे

 

छंद ठीक, पण आयुर्वेदाचा अभ्यास हवा

खरे म्हणजे ‘आयुर्वेद हे शास्त्र आहे?’ अनिलकुमार भाटे यांच्या ‘पत्रलेखा’ला अनुल्लेखानेच मारावे असे वाटले. पण काळ सोकावू नये म्हणून हा प्रपंच.

एकंदरीतच लेखातील आत्मप्रौढीपर लिखाण बघता लेखकाचा प्रवास योगशास्त्राच्या कदाचित यम-नियम या प्रारंभिक पायरीपर्यंत होणे शिल्लक आहे असे वाटते. त्यामुळे समाधी अवस्थेपर्यंतच्या केलेल्या वल्गना हास्यास्पदच. केवळ छंद म्हणून अभ्यास केल्यावर आणखी काय अपेक्षा ठेवणार म्हणा! शास्त्रीय संकल्पना व परिभाषा न समजून घेता केवळ संस्कृतचे ज्ञान उत्तम म्हणून भारतीय शास्त्रे व आयुर्वेद कळला (?) असे म्हणणे म्हणजे ‘इंग्लिश उत्तम आहे म्हणून मला स्र्ँ८२्रू२ कळले,’ असे म्हणण्यासारखे आहे! असो.

– वैद्य माधव सुभाष भागवत, [एम. डी. आयुर्वेद].

 

शीर्षक दिशाभूल करणारे

‘आयुर्वेद हे ‘शास्त्र’ आहे ?’ या लेखातील तीनचतुर्थाश भाग हा लेखकाविषयी आहे. एकचतुर्थाश भागातील अध्र्या भागात आयुर्वेदशास्त्राविषयी मतप्रदर्शन आहे. मग या लेखाला ‘आयुर्वेद हे शास्त्र आहे?’ शीर्षक हे लेखकाने दिले असेल वा ‘लोकसत्ता’ने – ती वाचकांची दिशाभूल आहे.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य आपल्या देशात असल्यामुळे कुणी काहीही लिहू शकतो, पण म्हणून सगळेच लिखाण प्रकाशित केले जात नाही. एखाद्या शास्त्राबद्दल अधिकारवाणीने लिहिण्याचा लेखकाचा अधिकार तपासून पाहिला जातो. उद्या मी अभियांत्रिकी शाखेवर अधिकारवाणीने लिहिले तर ‘लोकसत्ता’ माझा लेख प्रकाशित करेल काय?

– साधना आशुतोष कुलकर्णी [ प्राध्यापक, कायाचिकित्सा; रा. तो.आयुर्वेद महाविद्यालय] अकोला</p>

(‘नॅशनल  इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन’ (निमा) तसेच ‘निमा स्टुडंट्स फोरम’ या संघटनांसह ‘बीएएमएस ग्रॅज्युएट्स असोसिएशन’ या संघटनांनी ‘आयुर्वेद हे शास्त्र आहे’ या लेखावर आक्षेप घेणारी प्रसिद्धीपत्रके ‘लोकसत्ता’कडे पाठविली आहेत. ‘आयुर्वेदाला ‘बांडगूळ’ म्हण्णाऱ्या लेखकाने भारत देश सोडून अमेरिकेतून आम्हाला ज्ञान शिकवू नये’ असे ‘निमा’च्या पत्रकांत नमूद असून ‘महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन’ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनीही सदर लेखातील मुद्दे टाकाऊ व आक्षेपार्ह असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

‘विज्ञानभान’ या मालिकेतील आजच्या (९ जून) लेखासह १२ व २६ मे च्या लेखांत आयुर्वेदाच्या पुनरुज्जीवनाविषयी चर्चा सुरू करण्यात आली, तिचा आणि भाटे यांच्या पत्रलेखासह अन्य प्रतिक्रियांचा पाठपुरावा करणारे विचार वा मुद्दे मांडणाऱ्या निवडक प्रतिक्रियांना पुढील आठवडय़ात स्थान मिळेल.     – संपादकीय विभाग, लोकसत्ता. )

 

..मग पर्यायी पिकांना प्रोत्साहन कसले?

केंद्र सरकारने सुमारे साडेआठ हजार कोटींचे पॅकेज साखर उद्योगासाठी देऊ केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखान्यांनी थकवलेली देणी या ‘विशेष’ पॅकेजमधून भागविता येतील. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, परंतु यातून इतरही काही परिणाम संभवतात. साखरेच्या विक्रमी उत्पादनाने भाव घसरले अशा परिस्थितीत येत्या वर्षांत उसाचा पेरा कमी होण्याची शक्यता होती आणि तेलबिया (ज्याची देशांतर्गत मोठी गरज ही आयातीतून भागविली जाते.) व डाळी (ज्यावर सरकारने वाढीव आयातशुल्क लावले आहे आणि ज्यांच्या निर्यातीस प्रोत्साहनाचे धोरण अवलंबिले आहे.) या पिकांकडे कल वाढणे अपेक्षित होते. परंतु गेल्या काळात तुरीचा उडालेला फज्जा आणि आता सरकारने पॅकेज देऊ केल्याने पुन्हा ‘ऊस’ हेच निश्चित उत्पन्न देणारे पीक म्हणून पेरा वाढेल. याचा परिणाम मुख्यत्वे दुष्काळी भागात जाणवू शकतो.

एकुणात याही सरकारचे साखर उद्योग आणि दुष्काळी भागात पर्यायी पिकांना प्रोत्साहन देण्याबाबतचे धोरण म्हणजे ‘बोलाचाच भात अन्..’ अशाच प्रकारचे आहे असे दिसते.

– प्रसाद डोके,औरंगाबाद.

 

आपल्या राजकारण्यांचे अंतिम लक्ष्य कोणते?

फक्त महाराष्ट्र व उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशातील राजकारण्यांच्या हालचालींचा अभ्यास केला तरीही, अंतिम लक्ष्य ‘निवडणूक जिंकणे’ हे आहे की ‘राष्ट्राची प्रगती साधणे’ हे आहे असा संभ्रम सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होणे अत्यंत स्वाभाविक आहे. आपले डोळे व कान उघडे ठेवून विचारपूर्वक निर्णय घेण्याची  बुद्धी भारतीयांना लाभावी ही प्रार्थना.

– अ.वा. कोकजे, गिरगाव (मुंबई)