News Flash

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे जुनेच चुकीचे, फसवे मार्ग आजही अनुसरायचे?

अशा नेत्याचे स्वागत ही लोकशाहीची पायमल्ली!

‘अवलक्षण’ हा अग्रलेख (३ मे) वाचला. खरे तर टर्कीच्या बाबतीत आपल्या देशाने ‘हात दाखवून अवलक्षण’ ओढवून घेण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे, हे आपल्या स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास माहीत असलेल्या कुणाच्याही सहज लक्षात येईल. यापूर्वीही आपल्या देशात अगदी असाच ‘हात दाखवून अवलक्षण ओढवून घेण्याचा’ फार मोठा प्रकार (टर्कीच्या बाबतीत) झालेला आहे, त्या ऐतिहासिक संदर्भाचा अनुल्लेख खटकला. तो ऐतिहासिक संदर्भ म्हणजे अर्थात ‘खिलाफत चळवळ’!

१९१९ ते १९२२ या काळातली ही चळवळ खरे तर जगभरच्या मुस्लिमांनी तुर्कस्तानच्या ओटोमन साम्राज्याला, तिथल्या ‘खलिफा’ला ब्रिटिशांपासून वाचवण्यासाठी उभी केलेली चळवळ होती. तिचा उद्देश तुर्कस्तानची ‘खिलाफत’ (खलिफाची राजवट, सत्ता) रद्द न करण्यासाठी, ब्रिटिश सरकारवर दबाव आणणे, हा होता. महात्मा गांधींना त्यामध्ये त्यांच्या ब्रिटिशांविरुद्ध चालू असलेल्या ‘असहकार आंदोलना’त हिंदू-मुस्लिमांना एकत्र आणण्याची ‘संधी’ दिसली आणि ते खिलाफत चळवळीचे खंदे पुरस्कर्ते बनले. त्यामध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्य किती साधले, हा संशोधनाचा विषय ठरेल, पण उलट भारतीय मुस्लिमांमध्ये वेगळे असल्याची, परकेपणाची (अलगाववाद, फुटीरता) भावना मात्र वाढीला लागली. (तुर्कस्तानचा खलिफा हा जगभरच्या मुस्लिमांचा अनभिषिक्त नेता मानला जात असे. शिवाय, ‘खलिफा’ हे पद धार्मिक तसेच राजकीय नेतृत्व दर्शवते.) खरे तर इथल्या मुस्लीम समुदायाला तिकडे टर्कीमधल्या ‘खलिफा’शी काही देणे-घेणे नव्हते, त्याची सत्ता शाबूत राहते की जाते, याच्याशी काही सोयरसुतक असण्याचे कारण नव्हते. पुढे, सुदैवाने तुर्कस्तानात केमाल पाशा या आधुनिक विचारांच्या सुधारणावादी निधर्मी शासकाचा उदय झाला आणि त्याने स्वत:च तिथली सुलतानी राजवट नि ‘खिलाफत’ संपुष्टात आणली. (इ.स. १९२४) यामुळे अर्थातच महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ‘खिलाफत’ आंदोलनाला हिरिरीने पाठिंबा देणारे बरेच पुढारी तोंडघशी पडले. असो.

पंतप्रधानांनी महात्मा गांधींना ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचे आद्य प्रवर्तक/ गौरवचिन्ह या स्वरूपात स्वीकारले आहे, ते योग्यच आहे; पण एकदा एखाद्या व्यक्तीला ‘महान’ म्हणून स्वीकारले, की तिच्या चुकांसह स्वीकारायचे, त्याच चुका आपणही पुन:पुन्हा श्रद्धेने(?) करत राहायचे, ही पद्धत कुठे तरी बंद करावीच लागेल. एकीकडे इतिहासात केमाल पाशा यांनी टर्कीला मुल्ला-मौलवींच्या जोखडातून मुक्त करून आधुनिक, सुधारणावादी बनवले, ज्यामुळे ‘खिलाफत’सारख्या परंपरावादी धार्मिक चळवळीचा फज्जा उडाला. आता इतिहासाने पुन्हा आपले वर्तुळ पूर्ण केलेय. एर्दोगनसारखे नेते टर्कीला पुन्हा इस्लामच्या दावणीला जुंपत आहेत आणि असे असताना पुरोगामी, सुधारणावादी, निधर्मी भारताचे पंतप्रधान त्यांच्याशी मैत्रीपूर्ण हस्तांदोलन करीत आहेत! हिंदू-मुस्लीम ऐक्याचे तेच लोभसवाणे स्वप्न आणि ते प्रत्यक्षात आणण्याचे तेच तेच जुने, चुकीचे, फसवे मार्ग, जे राष्ट्रपित्याने वापरून पाहिले, तेच आपण आजही अनुसरायचे का? इतिहासापासून आपण कधीच शिकणार नाही का? महात्म्याचे अनुसरण स्वच्छतेपुरते ठीक आहे. अल्पसंख्य अनुनयाच्या बाबतीत त्यांच्याकडून झालेल्या ऐतिहासिक चुका कटाक्षाने टाळणेच योग्य ठरेल.

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)

 

अशा नेत्याचे स्वागत ही लोकशाहीची पायमल्ली!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगन यांना मिठी मारल्याचे चित्र वर्तमानपत्रांतून झळकले. जणू हा इसम शांतिदूत आहे. तुर्कस्तानला आधुनिक लोकशाहीचे अंग देणाऱ्या केमाल पाशा यांच्या विचारांना या महाशयांनी तिलांजली दिली आहे. २०१६ साली यांच्या धोरणांविरुद्ध उठाव करणाऱ्या हजारो लोकांना सध्या जेलमध्ये डांबून ठेवले आहे. २००हून अधिक पत्रकार जेलमध्ये सडत आहेत. आधुनिक जागतिक इतिहासात हा इसम म्हणजे चाळीसच्या दशकातील जर्मनीचा हिटलर! अशा इसमाचे स्वागत लोकशाही राष्ट्राने करणे म्हणजे आपल्या ‘थोर संस्कृतीला’ व लोकशाहीला पायदळी तुडविणे होय. मोदी व भाजपची वाटचाल एर्दोगन यांच्या दिशेने होत आहे, असे अनेक विचारवंतांच्या लिखाणांतून दिसत आहे. ‘अवलक्षण’ या अग्रलेखाचे (लोकसत्ता, ३ मे) कौतुक अशासाठी की, या आधुनिक हिटलरची आपण लोकशाहीवादी वाचकांना वेळीच ओळख करून दिली.

– मार्कुस डाबरे, पापडी, वसई

 

शेतकऱ्यांचा दबावगट हे ‘मृगजळच’

‘शेतकऱ्यांचा दबावगट हवाच!’ हा राजू शेट्टी यांचा लेख (३ मे) वाचला. शेतकऱ्यांचे प्रश्न व त्या अनुषंगाने झालेल्या चळवळींच्या संदर्भाने एक गोष्ट स्पष्ट होते की सर्व शेतकऱ्यांसाठी र्सवकष असे धोरण न राबवल्याने शेतकऱ्यांनी स्वत:ला चळवळीपासून अलिप्त ठेवले. सगळा शेतकरी केंद्रस्थानी न करता केवळ पिकानुसार संघटनांनी काम केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. उदा. स्वाभिमानी शेतकरी संघटना उसाइतका जोर इतर पिकांसाठी लावताना दिसत नाही. आताही ‘तूर’ प्रश्नावर मराठवाडा-विदर्भात मोठा आगडोंब उसळला असताना संघटना ‘तेरी (की तुरी?) भी चूप, मेरी भी चूप’ भूमिका घेताना दिसत आहे. खरे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सत्तेपेक्षा विरोधात असतानाच मोठा दबावगट निर्माण केला होता. राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप किंवा शिवसेनेपेक्षा विरोधी पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पाळेमुळे होती. उसाच्या दरावरून साखर कारखानदार व सरकारला सळो की पळो करून सोडणारी संघटना सत्तेत गेल्यापासून ‘सत्ताधीश’ झाल्याचे ‘पारदर्शकपणे’ दिसत आहे. संघटनेची मुलूखमैदानी तोफ असलेले शेतकऱ्यांचे ‘लेकरू’ सदाभाऊ  खोत मंत्री झाल्यानंतर जी भाषा बोलत आहेत यावरून संघटनेचे भविष्य काय असेल याचा अंदाज येतो. यामुळेच सत्तेतील भाजप-शिवसेना जिल्हा परिषद निवडणुकीत चांगले यश मिळवीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वत्र पानिपत झाले.

– सचिन आनंदराव तांबे, पिंपळसुटी, ता. शिरूर (पुणे)

 

अशी नौटंकी काहीही उपयोगाची नाही

आंदोलने जरूर करावीत, पण त्यात माज नसावा. खासदार राजू शेट्टीसारख्या नेत्याने काही दिवसांपूर्वी कांदा रस्त्यावर फेकून आंदोलन केले. आता तूरडाळ फेकून आपला संताप व्यक्त केला. अन्नधान्याचा असा अपमान, अशी नासधूस करणे गैर आहे, हे सर्व दांभिक नेत्यांना कधी कळणार? शेतकऱ्यांविषयी यांना खरोखरच पुळका असेल तर यांनी आधी सत्ता सोडावी वा प्रश्न सोडवावा. अशी नौटंकी काहीही उपयोगाची नाही.

– दिलीप टोळकर, मुंबई

 

स्टेट बॅँकेची शुल्क आकारणी अन्यायकारक

स्टेट बँकेकडून बचत खातेदारांना मोबाइलवर संदेश येत आहे की,‘आपल्या बचत खात्यात कमीत कमी रुपये ५ हजार रुपये शिल्लक ठेवा. त्यापेक्षा कमी रक्कम असल्यास ५० टक्के कमी रकमेवर रुपये ५०, ७५ टक्के कमी रकमेवर रुपये ७५ दंड आकारण्यात येईल. वास्तविक स्टेट बँकेने बऱ्याच आस्थापनांकडे संपर्क साधून झिरो बॅलन्स बचत खाते उघडले आहे. काही खातेदारांनी निवृत्तीनंतर परत खाती उघडली आहेत, तर काही खातेदार अगदी सात ते आठ हजार पेन्शन घेतात. अशा परिस्थितीत खातेदारांना कमीत कमी ५ हजार रुपये शिल्लक ठेवण्यास सांगणे योग्य आहे काय?

तसेच खात्यातून तीनपेक्षा अधिक वेळा रोख काढल्यास प्रत्येक व्यवहारावर शुल्क आकारण्यात येईल असाही संदेश येत आहे. अशाने खातेदार एकदाच सर्व रक्कम काढेल व घरात ठेवील आणि रोख व्यवहार करायची प्रवृत्ती वाढेल. तरी स्टेट बँकेने यावर पुनर्विचार करावा. पेन्शनधारकांसाठी काही ठरावीक दिवस राखून ठेवावेत, जेणेकरून गर्दी कमी होईल.

– राजाराम चव्हाण, कल्याण (पूर्व)

 

मराठीला भाषेवर पुन्हा अन्याय

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतचे घोंगडे गेली अनेक वर्षे भिजत पडलेले आहे. वास्तविक हा दर्जा मिळण्याबाबत कराव्या लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता यापूर्वीच रंगनाथ पठारे यांच्या समितीने केलेली आहे. हा दर्जा देण्याच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आलेली आहे. त्यामुळे या मार्गातील सर्व अडथळे दूर झालेले आहेत. केवळ राजकीय अनास्था व पराकोटीची उदासीनता यामुळे १ मे या महाराष्ट्र दिनी याबाबत घोषणा न झाल्याने पुन्हा मराठीजनांचा विरस झाला आहे. तरी पार्लमेंट ते पंचायत अशी एकपक्षीय सत्ता असताना व मराठीचा कैवार घेणारा पक्ष सत्तेत सहभागी असताना दर्जा मिळण्यास होणारा विलंब निश्चितच खेदजनक आहे.

  – जयंत पाणबुडे, सासवड (पुणे)

 

याला कारणीभूत बालपणीचे संस्कार

‘भित्यापाठी भ्रमराक्षस’ या संपादकीयाच्या संदर्भातील ‘सडलेली समाजव्यवस्था..’ आणि ‘जादूटोणाविरोधी कायदा..’ ही दोन पत्रे (लोकमानस, १ मे) वाचली. दोन्ही पत्रांतील विश्लेषण वस्तुस्थितिदर्शक आहे. ते कोणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावे. हातचलाखीने चमत्काराचा आभास निर्माण करणाऱ्या बुवा-बाबा-बापूंना जादूटोणाविरोधी कायद्याने महाराष्ट्रात तरी काही प्रमाणात आळा बसला. आता या ढोंगी बुवा-बाबांनी ‘आध्यात्मिक गुरू’ या नावाने आपला फसवणुकीचा जुना धंदा पुढे चालू ठेवला आहे. हिंदूधर्मीय श्रद्धाळूंना जीवात्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, स्वर्ग, मोक्ष, शाश्वत आनंद असले शब्द भुरळ पाडतात. त्यामुळे धूर्त गुरूंच्या शाब्दिक फुलोऱ्याला सुशिक्षित तरुणही फसतात.

याचे एक मूलभूत कारण म्हणजे बालपणापासून मनावर होणारे देवाधर्माचे संस्कार. घरात, शाळेत, देवळात, वृत्तपत्रातील बातम्यांत, टीव्हीवरील मालिकांत यत्र तत्र सर्वत्र धार्मिक संस्कारांचा भडिमार होत असतो. या तर्कहीन संस्कारांमुळे मुलांच्या चिकित्सक बुद्धीचे खच्चीकरण होते. जी गोष्ट देव-धर्म-श्रद्धा यांच्याशी निगडित असते ती खरी मानायची. तिची चिकित्सा करायची नाही अशी एक भावना मुलांच्या मनात निर्माण होते. त्यामुळे ईश्वर, आत्मा, परमात्मा, स्वर्ग, पुनर्जन्म, मोक्ष असल्या भ्रामक गोष्टी खऱ्या आहेत, असे त्यांच्या डोक्यात ठसलेले असते. या कल्पनांच्या सत्यासत्यतेची चिकित्सा करावी, असे त्यांना कधीच वाटत नाही. त्यामुळे आध्यात्मिक गुरूंच्या भूलथापांना ते बळी पडतात.

– प्रा. य. ना. वालावलकर, पुणे

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2017 2:49 am

Web Title: loksatta readers letter part 21
Next Stories
1 वल्गना नकोत, कणखरपणा हवा
2 जड वाहनांना ‘द्रुतगती’वर एवढी शिस्त हवीच.. 
3 हे सडलेल्या समाजव्यवस्थेचे द्योतक तर नाही?
Just Now!
X