News Flash

संविधान गौरवगीते का प्रसारित होत नाहीत?

हिंदी-मराठी भाषेत यासंबंधी अनेक गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका, गाणी उपलब्ध आहेत.

प्रजासत्ताकदिनी आकाशवाणी, दूरदर्शन या सरकारी प्रसारमाध्यमांसह खासगी एफएम आणि दूरचित्रवाणी वाहिन्या देशभक्तीपर गीतांचे प्रसारण करतात अथवा अशा गीतांचा समावेश असलेल्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रप्रेम दर्शविण्यासाठी ‘मेरे देश की धरती’,  ‘वंदे मातरम्’, ‘जयोस्तुते’.. हे ठीक आहे; परंतु प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना, ‘स्वतंत्र’ भारताचा ‘प्रजासत्ताक’ भारतापर्यंतचा प्रवास कसा झाला, कोणत्या पार्श्वभूमीवर झाला, त्यात डॉ. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांचे कोणत्या प्रकारचे योगदान होते, स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्रींचे महत्त्व काय आहे.. थोडक्यात, भारतीय संविधानाची, आपल्या गणराज्याची जडणघडण कशी झाली हे सर्व प्रजासत्ताकदिनी मांडणे गरजेचे आहे. हिंदी-मराठी भाषेत यासंबंधी अनेक गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका, गाणी उपलब्ध आहेत.

मराठीत वामन कर्डक, हरेंद्र जाधव, लक्ष्मण केदार, श्रावण यशवंते, विठ्ठल उमप, गोविंद म्हशीलकर, श्रीधर आहोळ, हृदयनाथ सिन्नरकर, विठ्ठल वाघ, प्रल्हाद शिंदे यांची या संदर्भातील अनेक गाणी-रचना उपलब्ध आहेत. नव्या पिढीतील अनेक कवी-गीतकारांच्या रचना आजही लोकप्रिय आहेत. याचे प्रसारण कधीच होत नाही. स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर क्रांतिगीते आपण ऐकतोच, पण प्रजासत्ताकदिनी ‘संविधानाचा-गणराज्याचा लोकशाहीचा’ गौरव करणारी गाणी का प्रसारित केली जात नाहीत? की, वर उल्लेख केलेले कवी-गीतकार आंबेडकरी चळवळीच्या पार्श्वभूमीतून आलेले असल्यामुळे त्यांच्या गीतांना डावलले ‘जात’ असेल!

– पद्माकर कांबळे, पुणे

 

या सर्वाचा ‘अर्थ’ कसा लावायचा?

‘सारे कसे शांत शांत..!’  हा अग्रलेख (२५ जाने.) व याआधी ‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या बातम्या वाचून भारतातील गंभीर आर्थिक विषमता दिसून आली. बाजारातील नियमाप्रमाणे पैसा पैशाकडेच धाव घेतो आणि म्हणूनच सरकारनामक यंत्रणेने गरिबांच्या उन्नतीसाठी काम करायचे असते. फक्त चकचकीत रस्ते, इमारती, पुतळे व स्मारके बांधून ‘सब का साथ सब का विकास’ करता येत नसतो. आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी यातील फरक लक्षात घेऊनच काम करायला पाहिजे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत जर लाभ पोहोचत नसेल तर त्याला विकास म्हणता येईल का? रोजगार हमी योजनेला नावे ठेवताना त्यातून होत असलेल्या फायद्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाही तरी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेतील वाढ ही रोजगारविरहितच आहे. आतापर्यंतची सरकारे बदलली ती याच कारणांनी, परंतु या आर्थिक अस्वस्थतेला नेहमी मंडल, कमंडल, भ्रष्टाचार व जातीपातींचा मुलामा देण्यात येतो. यांचा प्रभाव असतोच. नाही असे नाही, परंतु तो तात्पुरता किंवा कमी प्रमाणात. आपण नक्की का अस्वस्थ आहोत हेच समजत नाही आणि त्या सर्वाची परिणती आरक्षणाचे मोर्चे, आंदोलने, दंगली यातून पुढे येते. भाषिक, प्रादेशिक अस्मिता वाढीला लागतात.

त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांत नोटाबंदीने अनेकांचे रोजगार हिरावले, छोटे उद्योगधंदे बंद पडले, बेरोजगारांच्या फौजा उभ्या राहिल्या. मात्र याच काळात श्रीमंतांची संपत्ती व राजकीय पक्षांच्या देणग्या मात्र घटण्याऐवजी वाढल्या. या सर्वाचा ‘अर्थ’ कसा लावायचा?

– अक्षय राऊत, पुणे

 

साप साप म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार

‘सारे कसे शांत शांत..!’ या अग्रलेखाद्वारे प्रचंड संपत्ती निर्माण करणारे अब्जाधीश म्हणजे जणू काय गुन्हेगारच आहेत असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या बाबतीत महत्त्वाचे हे आहे की, हे अब्जाधीश काही रातोरात कुठलेही कष्ट न करता अब्जाधीश झालेले नाहींत. धीरूभाई अंबानी एका पेट्रोल पंपावर काम करत असत. अशा परिस्थितीतून कुठलीही उद्योगधंद्याची पूर्वपीठिका नसताना साडय़ांच्या व्यवसायापासून ते तेलशुद्धीकरण आणि मोबाइलच्या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून त्यांनी त्यांच्या व्यवसायाची वाढ केली. त्यामागे दूरदृष्टी तसेच कष्ट होते. त्यांची पुढची पिढीही त्याच उत्साहाने काम करताना दिसतेय. ‘पोस्टकार्डापेक्षा दूरध्वनी स्वस्त होईल’ असं ते म्हणाले, तेव्हा इतर किती जणांना तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आवाका जाणवला होता? त्यामुळे अंबानी, टाटा, बिर्ला, बजाज किंवा महिंद्र यांच्यासारख्यांच्या संपत्तीत होणाऱ्या वाढीचे वैषम्य किंवा चिंता वाटण्याऐवजी कौतुकच व्हायला हवे. इतर सामान्य माणूस त्याची संपत्ती मोठय़ा प्रमाणात वाढवू शकत नाही. कारण त्याच्याकडे या उद्योगपतींसारखे व्यावसायिक कौशल्य नसते.

जगातल्या कुठल्याही देशांत थोडय़ाच व्यक्तींमध्ये उद्योजक बनून प्रचंड संपत्ती निर्माण करण्याची क्षमता आणि धडाडी असते. या परिस्थितीला विनाकारण विषमता म्हणणे म्हणजे साप साप म्हणून भुई थोपटण्यासारखं आहे!

– राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)

 

अपमानित होऊनही भाजपची याचना अनाकलनीय

‘युती व्हावी ही उद्धव ठाकरेंचीही इच्छा- चंद्रकांत पाटील’ ही बातमी (२५ जाने.) वाचली. स्वत:ला युतीतील मोठा भाऊ  समजणारा भाजप खरे म्हणजे एवढा अगतिक का झाला आहे ते कळायला मार्ग नाही. २०१४ ला हे दोन भाऊ  वेगळे होऊन निवडणुका लढले आणि आधी ठरल्याप्रमाणे निवडणुकीनंतर एकत्र आले. गेली साडेचार वर्षे सत्तेत एकत्र असूनही एकमेकांना नेहमी पाण्यात पाहणारे हे दोन पक्ष पुढील विधानसभा निवडणुका भले वेगवेगळ्या लढवतीलही, परंतु निवडणुकीनंतर एकत्र येतील हे जनता पुरेपूर जाणून आहे. आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटते की महत्त्वाची खाती स्वत:कडे असूनही जनतेसमोर केलेल्या कामांच्या आधारे निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी हा मोठा भाऊ अनेक अपमानानंतरही छोटय़ा भावाकडे याचना करतो. त्यामुळे अशी शंका येते की, भाजपला सत्ता जनतेची सेवा करायला हवी आहे की आणखी कशासाठी?

– मिलिंद य. नेरलेकर, डोंबिवली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:04 am

Web Title: loksatta readers letter part 215 2
Next Stories
1 काँग्रेसला नक्कीच बळ मिळेल!
2 आगरकरांनी विटंबना जिवंतपणीच सोसली!
3 शिक्षक भरतीच्या आश्वासनाची वर्षपूर्ती
Just Now!
X