‘रंगीला रतन’ या संपादकीयात (२७ जुल) जनाब इम्रान खान यांच्या विजयाने भविष्यातील भारत-पाकिस्तान संबंधांविषयी मांडलेली मते योग्य आहेत. परंतु जागतिक स्तरावरही  देशभक्ती, भ्रष्टाचार निर्मूलन इ. वल्गना करणारे सत्ता हस्तगत करीत आहेत. भारत, अमेरिका, रशिया, टर्कीनंतर आता पाकिस्तान. याचे एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे तथाकथित उदारवादी आíथक धोरणांमुळे ‘न भूतो..’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.  देशादेशांतील आणि देशांतर्गत आíथक विषमता, प्रचंड बेरोजगारी, कमालीचा भ्रष्टाचार, धार्मिक ध्रुवीकरण आणि संकुचित राष्ट्रवाद. त्यामुळे दहशतवादासारखा भयावह विषाणू जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. मुक्त अर्थव्यवस्थेला पर्याय नाही आणि भांडवलशाही हीच अंतिम आहे असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ही धोरणे अपयशी ठरल्याने देशोदेशी ‘उपटसुंभ’ सत्तेत निवडून येत आहेत. त्यापेक्षाही गंभीर समस्या आहे ती विश्वासार्ह पर्याय उपलब्ध नसल्याची. जगभरातील सामाजिक, राजकीय विचारविश्व आणि चळवळी यांच्यासमोर हे मोठे आव्हान आहे.

वसंत नलावडे, सातारा

 

पाकिस्तान आधी होता तसा आता नसेल

‘रंगीला रतन’ हा अग्रलेख वाचला. माजी क्रिकेटपटू इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित आहे.  इम्रान खान यांचे लष्कर, आयएसआय आणि मुल्ला-मौलवी यांच्यासोबत मधुर संबंध आहेत. त्यामुळे ते या संबंधांचा उपयोग भारताच्या विरुद्ध कसं करतात हे येणारी वेळच सांगेल. एवढे मात्र नक्की की त्यांच्या कारकीर्दीत पाकिस्तान आधी होता तसा नक्कीच नसेल.

त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे भारत-पाकिस्तान संबंध काश्मीरच्या अनुषंगाने नक्कीच बदलतील. हे पाहणे गरजेचे आहे की ते भारतावर सकारात्मकरीत्या परिणाम करतात की नकारात्मकरीत्या? जागतिक स्तरावर कट्टर धर्मवादी सत्तेवर येऊ लागले आहेत. जेव्हा अशी मंडळी सत्तेवर येतात तेव्हा ते त्यांच्या कट्टर विचारसरणीची अंमलबजावणी करताना दिसतात. त्यासाठी इंग्रजीमध्ये एक म्हण फार प्रसिद्ध आहे New Lords, new laws. तेव्हा आता हेच बघणे गरजेचे आहे की हा नवा गडी कशा प्रकारे राज्य करतो.

लोकेश सुधाकर मुंदाफळे, नागपूर

 

या वृत्तीला परीक्षाकेंद्रित शिक्षणपद्धतीच कारणीभूत

‘ज्ञानार्जनासाठी सोपा मार्ग नाही’ या शीर्षकाखालील पत्र (लोकमानस, २७ जुलै) वाचले. पत्रलेखकाने ज्या तीन ‘गुरूं’चा उल्लेख केला आहे त्यांना गुरू कोणत्या आधारावर म्हटले जाते तेच कळत नाही. पण  सुशिक्षित  लोकांच्याही रांगा अशा तथाकथित गुरूंच्या दाराशी लागतात. माझ्या मते या भाबडय़ा व भोळसट वृत्तीच्या मुळाशी आमची परीक्षाकेंद्रित शिक्षणपद्धती आहे. पुस्तकात दिलेल्या विषयांचा कसून अभ्यास करायचा व ती पोपटपंची जशीची तशी उत्तरपत्रिकेत उतरावयाची आणि उत्तम गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण करायची हे एकमेव लक्ष्य विद्यार्थ्यांपुढे ठेवले जाते. स्वतंत्र बुद्धीने ज्ञान मिळविण्याची शिकवणच त्यांना दिली जात नाही. मग विवेक, तर्क, वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक बुद्धी आदींचा अभाव असलेला तथाकथित सुशिक्षित वर्ग आपल्या आकांक्षापूर्तीसाठी खऱ्या ज्ञानाची कास धरण्याऐवजी अशा ‘गुरूं’च्या कच्छपी लागतो. त्यात त्यांचा फारसा दोष नसतो. ज्ञान म्हणजे काय याची संकल्पनाच त्यांच्या ठिकाणी रुजू दिली जात नाही.

भालचंद्र काळीकर, पुणे

 

एकलव्याचा उल्लेख हवा होता..

‘ज्ञानार्जनासाठी सोपा मार्ग नाही’ असा संदेश देणारं पत्र वाचलं. गुरूशिवाय प्रयत्नांची पराकाष्ठा करून, पण गुरू या संकल्पनेचा योग्य तो मान राखून ज्ञान मिळविलेल्या एकमेव एकलव्याचा उल्लेखही करायला हवा होता असे वाटते. कारण हे केवळ उदाहरण नाही तर प्रतीक आहे भारतीय संस्कृतीच्या महानतेचं! समाजात वर्चस्व असलेल्यांचा उदो उदो तेव्हाही होत होता, आजही होत आहेत. पण त्याच वेळेस एकलव्यासारख्या उपेक्षिताच्या कर्तृत्वाला योग्य तो मान दिला गेला. गुणांची कदर झाली. आणि महत्त्वाचे म्हणजे यथोचित प्रसिद्धीही मिळाली. आजच्या जाती-पाती, धर्माच्या पडद्यामुळे निर्माण झालेला असंतोष, असूया, दुराव्याच्या पाश्र्वभूमीवर ही वाखाणण्यासारखी घटना आहे. उल्लेखनीय आणि अनुकरणीयही!

अनिल ओढेकर, नाशिक

 

सहकारी दूध संघांनी ब्रॅण्ड तयार करावा

‘दूधदराचे आंदोलन संपले, प्रश्न कायम’ हा राजेंद्र जाधव यांचा लेख (२६ जुलै) वाचला. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या परताव्याच्या दुप्पट रक्कम ग्राहकाला द्यावी लागते हे दु:खद आहे. राज्यातील सहकारी दूध संघांनी स्पध्रेत टिकण्यासाठी एकत्र येऊन ब्रॅण्ड तयार करावा. नंतर राज्यातील मार्केट अमूल किंवा मदर डेअरीने गिळंकृत केले म्हणून रडू नये. उसाप्रमाणे दुधामध्ये रेव्हेन्यू शेअिरग मॉडेल आणण्याची गरज आहे. त्याला नेते विरोध करीत असतील तर तो विरोध मोडून सरकारने याची अंमलबजावणी करावी.

 –शरद भोसले, पुणे

 

.. तेव्हाच बाबासाहेबांच्या परिश्रमांचे चीज होईल

‘परिवर्तनवादी लढाईची नवी रणनीती हवी’ हा लेख (२६ जुलै) वाचला.  सरकारने आंबेडकरी जनता मोर्चे का काढत आहे, यावर विचार केला पाहिजे. या समाजात अजूनही प्रचंड प्रमाणात अज्ञान, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव आहे आणि आज गरज आहे ती या खऱ्या समाजाच्या शत्रूंना हरवण्याची. बाबासाहेबांचा शिक्षणच गरिबी मिटवू शकते यावर ठाम विश्वास होता. आता वेळ आलीये तो विश्वास सार्थ ठरवण्याची. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले या दोघांनीही जातीय राजकारण न करता समाजासाठी उच्च दर्जाचे शिक्षण पोहोचवण्याच्या विधायक कामी प्रयत्न करावे. बाबासाहेबांचे विचार पूर्ण समाजापर्यंत न्यावे. तेव्हाच बाबासाहेबांनी घेतलेल्या परिश्रमांचे चीज होईल.

विशाल तांबडे, तळेगाव (नाशिक)