News Flash

भावनांच्या झंझावातापुढे वाहवत न जाणे योग्य

मृत्यू ही दु:खदायक घटना असते आणि अकारण किंवा विद्वेषाने निरपराध दुसऱ्यावर मृत्यू लादला गेला असेल तर ती घटना अधिकच क्लेषकारक होते.

मृत्यू ही दु:खदायक घटना असते आणि अकारण किंवा विद्वेषाने निरपराध दुसऱ्यावर मृत्यू लादला गेला असेल तर ती घटना अधिकच क्लेषकारक होते. ‘‘सत्य जाणून घेण्यापेक्षा (डोळे मिटून) विश्वास ठेवणे लोकांना आवडते’’ हे ई. ओ. विल्सन यांचे वाक्य उद्धृत करून ‘भावनिक प्रतिक्रिया चटकन निर्माण होतात, विवेकपूर्ण विश्लेषण आणि वस्तुनिष्ठ कारणमीमांसेला दूर सारतात,’ असे ‘कॉन ऑफ प्रोपगंडा’ या अभ्यासात नमूद केले आहे.

पुलवामा जिल्ह्य़ातील दहशतवादी हल्ल्यानंतर भावनांचा क्षोभ होणे आणि त्यांचा मते मिळविण्यासाठी दुरुपयोग होणे सोपे असले, तरी खरे जबाबदार कोण हे निश्चित उमजल्याशिवाय पाकिस्तान इत्यादींविरुद्ध आगपाखड झाल्यामुळे विवेकबुद्धी अधिकच क्षीण होऊन लोकशाहीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. अपराधीसुद्धा शेवटपर्यंत गुन्हा नाकारतो असेच सर्वसाधारणत: दिसते. ‘पाकिस्तानने भारताकडून करण्यात आलेले आरोप नाकारले असून दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.’ (पुलवामा हल्ला हा ‘गंभीर चिंतेचा विषय’, पाकिस्तानने नोंदवला निषेध, १५ फेब्रु.) अशी पाकिस्तानने भूमिका घेतलीच आहे.

मागील वेळेचा हल्ला घुसखोरीविरुद्ध होता. भारतात आधीपासूनच असलेल्या दहशतवाद्यांनी या वेळी हे कृत्य केले आहे. त्यात पाकिस्तानी हात असल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला पटवून देता आले तरच देशाबाहेर जाऊन सर्जकिल स्ट्राइक करता येईल. असे करता आले नाही तर भक्तगणांनी उत्तेजित केलेल्या अपेक्षांमुळे उलटा परिणाम होऊन तोंडघशी पडावे लागेल.

निवडणुकीच्या तोंडावर अशा अशांततेची भीती पूर्वीच व्यक्त झाली होती. काही नेत्यांच्या मताने ही लढाई करणारे निव्वळ प्यादी असतात. काँग्रेस, भाजप आणि पाकिस्तानातील नेते याला अपवाद नाहीत. इराणबद्दल खोटी माहिती देऊन अमेरिकेने आपल्या सनिकांना पणास लावले. अनेक समस्यांवर तात्काळ आणि कायमस्वरूपी उपाय नसतात, या वास्तवाला सामोरे जात शक्य ते उपाय करणे आवश्यक आहे. भावनांच्या झंझावातापुढे वाहवत न जाणे ही आपली गरज आहे.

– राजीव जोशी, नेरळ

 

लष्करी कारवाई करणे गरजेचे

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ातील अवंतीपुरात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) बसवर आत्मघातकी दहशतवादी हल्ला करून पुन्हा एकदा ४० भारतीय जवानांचं रक्त सांडलं. या हल्ल्याने प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की पाकिस्तानच्या दुष्ट, निर्दय व अतिरेकी कारवायांनी काश्मीरच्या युद्धभूमीवर रोजच आपले बहादूर जवान धारातीर्थी पडत आहेत. तर  मरण पत्करणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहाण्याशिवाय हतबल झालेली सामान्य जनता काहीच करू शकत नाही. अशा संतापजनक परिस्थितीत भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी लष्करी कारवाई करणे गरजेचे आहे.

-प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (मुंबई)

(आकाश सानप – नाशिक, अनंत बोरसे – शहापूर, अमितकुमार सोळंके – अंबाजोगाई,  अतुल बाळासाहेब अत्रे – सिन्नर, मुरारी भालेकर –  चिंचवली ,दत्ता माने- लातूर, श्रीनिवास  स.  डोंगरे – मुंबई, वैभव मोहन पाटील – घणसोली, अल्पेश साठवणे – नागपूर, रमण दवते – डोंबिवली, अशोक आफळे -कोल्हापूर, विक्रम ब्रह्माजी गावडे – मुंबई, प्रदीप बोकारे – पूर्णा, जनार्दन नाईक – मुंबई, बाळकृष्ण िशदे – पुणे,  नरेंद्र लांजेवार – बुलडाणा,  मुरलीधर हरिश्चंद्र धंबा-डोंबिवली, शैलेश न. पुरोहित – मुंबई, यशवंत चव्हाण – सीबीडी बेलापूर  या वाचकांनीही पुलवामातील भ्याड हल्ल्याचा निषेध करणारी पत्रे पाठवली आहेत.)

 

नाटय़ संमेलनाध्यक्षांची मुलाखत रद्द का केली?

नाटय़ संमेलनात अध्यक्षांचा सालाबादप्रमाणे होत असलेला प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम अ.भा. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी रद्द करून काय साधले, हे रसिकांपुढे आलेच पाहिजे. मुलाखत न ठेवण्यामागे काही हेतू नाही, असेही ते म्हणतात. मग इतकी वष्रे परंपरेने चालत आलेला आणि नाटय़रसिकांच्या पसंतीस उतरत असलेला मुलाखतीचा कार्यक्रम अहेतू बंद करून वादास आमंत्रण का दिले जात आहे? प्रेमानंद गज्वी यांना भाषणातूनही विचार प्रकट करता येतील, अशी पळवाटीची ‘वाट’ कांबळींनी सुचवलेली आहे. गज्वी मुलाखतीतून कोणावर तोफ डागतील या भीतीपोटी हे घडत असावे असे गृहीत धरण्यास यातून वाव मिळतो. भाषणापेक्षाही मुलाखतीतून होणारा विविध विषयांवरील परामर्श केव्हाही अधिक बोलका ठरतो. गेल्या आठवडय़ात अमोल पालेकरांना भर सभेत भाषण करताना अडवण्यात आले. त्याचीच ही पुढची पायरी म्हणावी लागेल. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची ही गळचेपीच म्हणावी लागेल.

– नितीन गांगल, रसायनी

 

तिरकस वाक्याची प्रचीती

‘नाटय़ संमेलनाच्या आरंभाआधीच अध्यक्षांच्या मुलाखतीवर पडदा’ ही बातमी (१४ फेब्रु.) वाचली. ती वाचल्यावर जॉर्ज ऑर्वेल यांच्या Animal Farm या कादंबरीतील तिरकस वाक्याची प्रचीती आली. Defending democracy involves destroying all independence of thought. लोकशाहीचे संरक्षण म्हणजे सर्व स्वतंत्र विचारांचा नाश करणे..

 – अशोक वासुदेव बक्षी, सातारा

 

‘नोटा’संबंधी जागृती निर्माण होणे गरजेचे

‘‘नोटा’स्त्राचा परिणाम!’ हा विवेक वेलणकर यांचा लेख (१३ फेब्रु.) वाचला. ‘नोटा’मुळे उमेदवारांची मतदारांमध्ये नापसंती दिसून येतेच. निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा ‘नोटा’ला जास्त मतं मिळाल्यास त्या मतदारसंघातील निवडणूक रद्द करून पोटनिवडणूक जाहीर करावी. या वेळी पूर्वी उभे राहिलेल्या उमेदवारास मनाई करावी. सर्वच नवीन उमेदवार उभे करावेत. तरच ‘नोटा’चा उमेदवारांवर वचक निर्माण होईल. याकरिता निवडणूक आयुक्तांतर्फे निवडणूक नियमावलीत दुरुस्ती करावयास लागली तर करावयास हवी. तरच ‘नोटा’च्या मतदारांना योग्य तो लोकप्रतिनिधी निवडून दिल्याचे समाधान होईल.  यासाठी ‘नोटा’संबंधी जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. त्याकरिता निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला पाहिजे.

– विजय ना. कदम, लोअर परळ (मुंबई)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2019 12:04 am

Web Title: loksatta readers letter part 231 2
Next Stories
1 स्वत: किती सुधारण्याचा प्रयत्न केला?
2 पत्रकार परिषदेतून शंकासमाधान होऊ शकेल
3 लोकसंख्येच्या प्रमाणात नव्हे, निम्मे आरक्षण हवे!
Just Now!
X