‘भाजपचा ‘शाहबानो क्षण’’ हा अग्रलेख (३ ऑगस्ट) वाचला. मतपेटीचे राजकारण करताना यापूर्वी काँग्रेसने ज्या चुका केल्या तो इतिहास दुर्लक्षित करून भाजपचे सरकार त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेसाठी नैतिकता सोडून दिली आहे. एकगठ्ठा मतासाठी धार्मिक आणि जातिवादास प्रोत्साहन दिले जात आहे. राजकीय नेत्यांची नैतिकता आता रसातळाला गेल्याने स्वत:च्या स्वार्थासाठी ते झुंडशाहीच्या बळावर केवळ विध्वंसाचे राजकारण करीत आहेत.

सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी धार्मिक तुष्टीकरणावर अधिक भर दिला आहे. समता आणि बंधुत्वाच्या नावावरच सामाजिक विषमता टिकवून ठेवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले जात आहेत. राजकीय पक्षांनी सत्तेसाठी समाजहिताला तिलांजली देऊन संपूर्ण समाजाला विनाशाच्या वाटेवर नेऊन सोडले आहे. राजकीय नेत्यांनी सत्तेच्या लालसेने समाजात वेळोवेळी पेरलेले हे विष संपूर्ण समाजासाठी निश्चितच घातक ठरणार आहे. झुंडशाहीचे राजकारण म्हणजेच विध्वंसाचे राजकारण. त्यातून केवळ विनाशच घडत असतो, हे सर्वच राजकीय पक्षांनी आणि जनतेनेही लक्षात ठेवले पाहिजे.

– तुकाराम माळी, उस्मानाबाद

 

दलित नेतृत्वाने हे समजून घ्यावे

‘भाजपचा ‘शाहबानो क्षण’’ हा अग्रलेख वाचला. तो सत्ताधारी नेत्यांना मार्गदर्शक ठरावा असाच आहे. सरकार तर चुकतेच आहे, पण त्यासोबत दलित नेतृत्व (आठवले, पासवान, आदी) सुद्धा चुकत आहे. कोपर्डीतील मुलीला जे हाल हाल करून मारले गेले त्यावरून कुणालाही संताप येणारच. तसेच ते एका जातीपुरते सीमित राहणार नाही हेही स्पष्ट आहे. सरकारला या गोष्टी कळत नसाव्यात असे नाही. तेव्हा दलितांनीच या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सरसकट सर्वच दलितेतर जाती दलितविरोधी झाल्यास त्याचा काय परिणाम होईल यावर दलित नेतृत्वाने अवश्य विचार करावा. ते त्यांच्या व देशाच्याही हिताचे ठरेल. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द झाल्यास दलितांच्या संतापाचा उद्रेक होईल असे वातावरण निर्माण होणेच मुळी धोक्याचे ठरते. त्याची नैसर्गिक प्रतिक्रिया इतर समाज अति-संतापाने देईल हेही स्पष्ट आहे.

सारांश म्हणजे, सगळ्यांनीच आपल्या मर्यादेत राहणे कधीही चांगले. राजकारण्यांचे डाव आजपर्यंत अनेक वेळा भारतीयांनी उद्ध्वस्त केले. तेव्हा आताही तसाच समंजसपणा दाखवणे इष्ट ठरेल.

– सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड

 

शेअर बाजारात भारतीयही नफा कमावतात

‘परदेशी गुंतवणूकदारांनाच शेअर बाजाराचा फायदा’ हे पत्र (लोकमानस, ३ ऑगस्ट) वाचले. पत्रलेखकाचा काही तरी गैरसमज झालेला दिसतो. शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांप्रमाणेच भारतीय गुंतवणूकदारसुद्धा- प्रमाण अत्यल्प असेल- गुंतवणूक करीत असतात व परकीयांप्रमाणेच नफा कमवत असतात. शेअर बाजारात कोणाही भारतीयाला गुंतवणूक करता येते. फक्त जोखीम पत्करण्याची मानसिकता, अर्थजगताचा अभ्यास व काही पथ्ये पळाली तर भारतीयही परकीयांप्रमाणे नफा कमावू शकतात, अगदी पत्रलेखकसुद्धा!

– आनंद चितळे, चिपळूण

 

बहुपडदा चित्रपटगृहांची मुजोरी थांबवावी

राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये १ ऑगस्टपासून बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील असे स्पष्ट आदेश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या महिन्यात दिले होते. तरीही औरंगाबाद शहरातील चित्रपटगृहांनी या आदेशाला चक्क केराची टोपली दाखविली आहे.  मिनरल वॉटर बाटली ५० रुपये तसेच इतर खाद्यपदार्थही तीन ते चारपट किमतीने विकणे सुरूच आहे. विचारणा केली असता शासननिर्णय आम्हाला अजूनही मिळाला नाही असे उद्दाम उत्तर दिले गेले. बहुपडदा चित्रपटगृहांना जीआर कसा मिळाला नाही? तरी संबंधित खात्याने लगेचच निर्णय लागू करून जनतेची होणारी लुबाडणूक त्वरित थांबवावी. अन्यथा जो जनक्षोभ उसळेल त्यास सरकारच जबाबदार राहील.

– शरद लासूरकर, औरंगाबाद

 

राज्यात सर्वत्रच वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

निव्वळ ठाणे, नवी मुंबई नाही तर राज्यात सर्वत्र वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे. एकीकडे वृक्षतोड करून रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येते.  मात्र लगेचच अनधिकृत फेरीवाले आणि वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमुळे परिस्थिती जैसे थे होते.

जनतेने कितीही तक्रारी केल्या तरीही या गोष्टीची दखल ना महानगरपालिका घेत, ना लोकप्रतिनिधी. त्यामुळे वाढत्या  वाहनांच्या वाढणाऱ्या रांगांची समस्या नजीकच्या काळात सुटेल असे वाटत नाही.

– अरुणा गोलटकर, प्रभादेवी (मुंबई)

 

पाठय़पुस्तकात जे आहे तेच बरोबर

‘आठवीच्या पुस्तकात प्रत्ययांचा थारेपालट’ हे पत्र (लोकमानस, ३ ऑगस्ट) वाचले. माझ्या मते जे आताच्या पाठय़पुस्तकात आहे तेच बरोबर आहे. इंग्रजी व्याकरण आपल्याला सोपं वाटलं म्हणून आपण ते स्वीकारलं होतं. त्यामुळे आता जे बरोबर आहे ते स्वीकारू या. यासाठी पत्रलेखकाने ‘अनमोल संस्कृत मराठी शब्दकोश (लेखक – जनार्दन विनायक ओक)’ पाहावा. शिवाय लघुसिद्धान्तकौमुदी सूत्र १/४/१०१ व ३/४ /७८ पाहावे!

– अलका भा. रानडे, बोरिवली (मुंबई)