‘फडणवीस.. हे कराच!’ हे संपादकीय (२४ ऑगस्ट) वाचले. मुंबई शहराची एकूणच परिस्थिती ही केविलवाणी होत चाललेली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात देशात वास्तव्यास उत्तम दहा राज्यांत मुंबईचा क्रमांक तीनवर जरी असला तरी मागील एक वर्षांचा आढावा घेतला तर अवस्था खरेच चिंताजनक आहे. यात शासन व प्रशासन नक्कीच जबाबदार आहे. कारण आरोप, प्रत्यारोप, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व सत्तेचे राजकारण यामध्येच मश्गूल झालेले आहेत. कर भरणाऱ्या नागरिकांना प्राथमिक सुविधा मिळणेसुद्धा कठीण होत चाललेले आहे. विकासाला होणारा विरोध, आरक्षणाच्या माध्यमातून समाजात पसरत असलेली विषमता, वाढती लोकसंख्या, सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्था, रस्ते, त्याचे नियोजन, स्मारके, त्याला लागणारा निधी, त्यापेक्षा शहर नियोजनावर जास्त भर देणे अत्यंत गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरुषोत्तम कृ. आठलेकर, डोंबिवली

 

शॉर्टसर्किट टाळण्यासाठी हे करावे

‘बहुतांश आगी शॉर्टसर्किटमुळेच’ ही बातमी (२३ ऑगस्ट) वाचली. शॉर्टसर्किट टाळण्यासाठी एमसीबी (Miniature Circuit Breaker), ईएलसीबी (Earth Leakage Circuit Breaker) हे विद्युत यंत्रणेत आवश्यक आहेतच. त्याचबरोबर शॉर्टसर्किटमुळे लागणाऱ्या आगी ‘आर्क फॉल्ट (AFCI) बसविल्याने या घटना टाळता येतील. अमेरिकेत शॉर्टसर्किटने होणाऱ्या आगी टाळण्यासाठी  ‘नॅशनल इलेक्ट्रिककोड’प्रमाणे एएफसीआय बसविणे अनिवार्य केले आहे. कॅनडा, जर्मनी याही देशांत एएफसीआय बसविणे बंधनकारक आहे. या उपकरणामुळे विद्युत ठिणग्यांचा सुगावा लागताच संबंधित यंत्रणेचा वीजपुरवठा ताबडतोब बंद होतो व आगीचा धोका टळतो. याचे महत्त्व ध्यानात घेऊन वीज नियामक आयोग, वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या यांनी ‘विद्युत पुरवठय़ाच्या अटीं’ मध्ये आवश्यक ती दुरुस्ती करून गगनचुंबी इमारती, मॉल, मोठय़ा आस्थापना, इ. ठिकाणी एएफसीआय बसविणे बंधनकारक करावे व त्यायोगे भविष्यातील असे धोके टाळता येतील.

श्रीनिवास म. मुजुमदार, चारकोप (मुंबई)

 

हा निष्कर्ष कशाच्या आधारावर?

‘प्रतिनिधित्व: खरे की नावालाच?’ हा सुखदेव थोरात यांचा लेख (२४ ऑगस्ट) वाचला. इतक्या थेटपणे त्यांनी दलित-आदिवासींसाठी ‘निराळ्या मतदारसंघा’चे केलेले समर्थन पाहून सखेदाश्चर्य वाटले. डॉ. आंबेडकरांचे नाव घेतले म्हणजे एखादी गोष्ट अनचॅलेंजेबल होऊन जाते असे नाही. ‘निराळ्या मतदारसंघा’चा धोका गांधीजींमधील द्रष्टय़ा पुरुषाने ओळखला होता. म्हणूनच त्यांनी दलित-आदिवासींसाठी ‘निराळे मतदारसंघ’ होऊ न देता ‘राखीव मतदारसंघां’चा न्यायोचित, पण सर्वसमावेशक असा पर्याय निवडला. त्यामुळेच कदाचित असेल की हिंदू धर्म जरी तुटला तरी देशाचा आणखी तुकडा पडला नाही. कारण मुस्लिमांसाठी दिलेला ‘निराळा मतदारसंघ’ आणि त्यानंतर झालेली फाळणी हा इतिहास सर्वज्ञात आहे. ‘निराळ्या मतदारसंघा’त केवळ आपल्याच जातिवर्गाची मते मिळवायची असल्याने जो जितका भडक, आगलाव्या तो तितका जास्त लोकप्रिय, असे साधे समीकरण आहे आणि हे सर्वच जातिवर्गाना लागू होते.

महाराष्ट्र विधानसभेतील अनुसूचित जातींच्या राखीव मतदारसंघात २०१४ मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचे आकडेवारी देऊन विश्लेषण करताना थोरात म्हणतात की, ज्या अर्थी हे निवडून आलेले उमेदवार भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे आहेत, त्या अर्थी या अनुसूचित जातींच्या आमदारांना ‘आपल्या मूलभूत तत्त्वांशी तडजोड करावी लागते’, ‘आदर्शाना मुरड घालावी लागते’. थोरात या निष्कर्षांवर कसे काय पोहोचले?

अमित पाटील, औरंगाबाद

 

स्मारकाऐवजी वाजपेयींच्या नावे योजना सुरू करा

‘वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक बांधणार’ ही बातमी (२३ ऑगस्ट) वाचली. मुंबईत लोकांना राहायला जागा नाही. त्यामुळे खरे तर नव्याने स्मारक बांधायची गरजच नाही. उद्या कोणा व्यक्तीने जर त्या स्मारकाची विटंबना केली तर पुन्हा राज्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होतील. पूर्वेकडील राज्यात भाजपची सत्ता आल्यावर त्यांनी लेनिनचा पुतळा पाडला. याचे पडसाद म्हणून दाक्षिणात्य राज्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यावर दगडफेक केली. भारतात आता जेवढी स्मारके आहेत तेवढी भरपूर आहेत. जी आहेत त्यांचीच निगा राखण्यात आपल्याला अपयश आले आहे. स्मारक बांधून काही होणार नाहीए. एरव्ही त्या पुतळ्यांकडे कोणाचेच लक्ष नसते. अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक बांधण्यापेक्षा त्यांच्या नावाने ‘योजना’ सुरू करा. कोणता तरी कार्यक्रम घ्या. त्यांच्या नावे लेखक किंवा कवी यांना पुरस्कार देण्याचे सुरुवात करायला पाहिजे. त्यांचा आदर्श घ्यायला हवा.

आकाश सोनावणे, विहिघर, नवीन पनवेल</strong>

 

प्रचलित मराठी शब्दच वापरावेत

‘मराठीच्या शुद्धतेचा अतिरेकी आग्रह कशाला?’ व ‘भाषा नष्ट होणे समाजाची संस्कृती नष्ट होणे असते’ ही पत्रे (लोकमानस, २४ ऑगस्ट ) वाचली. भाषाशुद्धी याचा अर्थ शब्दांची क्लिष्टता नसावी हे मान्य, पण आज जे शब्द प्रचलित आहेत व त्या शब्दांचा अर्थ जरी सारखा असला तरी काही शब्द असे आहेत की ते मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात व आपली संस्कृती व्यक्त होते. पत्रलेखकाने उदाहरण म्हणून मराठीतील आई, माय, माउली किंवा प्रेम, ओलावा, जिव्हाळा आपुलकी वगैरे शब्द दिले आहेत. प्रसंग, काळ, वेळ पाहून भावना व्यक्त करण्यासाठी अर्थ एकच असला तरी योग्य शब्दाचा वापर करावा लागतो, तरच त्या वाक्याचा परिणामकारक अर्थ व्यक्त होतो.

मराठी भाषेत अन्य भाषिक शब्द आले आहेत हे जरी खरे असले तरी जे शब्द प्रचलित आहेत व ज्या शब्दांमुळे नेमका अर्थ व्यक्त होत असेल तर तोच शब्द वापरणे योग्य ठरते. उगाच माता, जननी म्हणजे आई म्हणून सदासर्वकाळ सर्वत्र आई हाच शब्द वापरून चालणार नाही.

आनंद चितळे, चिपळूण

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers letter part 35
First published on: 25-08-2018 at 03:45 IST