काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या परदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. वाढती बेकारी, नोटाबंदी अशा अनेक मुद्दय़ांवर सरकारवर आरोप  केले. त्यांनी रा. स्व.संघावरही टीका केली. देशातील सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दावर देशातील जनतेचे लक्ष असते. त्यामुळे टीका करताना तारतम्य बाळगणे आवश्यक असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात जाऊन आपली स्वतची प्रतिमा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील एकमेव लोकोत्तर नेता अशी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ७० वर्षांत भारतात काहीच झाले नाही, असे सांगितले. त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होते, अशी त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. पण मोदींनी परदेशात जाऊन टीका करताना कोण्या एका व्यक्तीचे नाव अथवा पक्षाचे नाव घेतले नाही.

लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरोपप्रत्यारोप होत राहणारच, यात शंका नाही. पण त्यासाठी कोणते व्यासपीठ निवडायचे याचा विचार होणे गरजेचे आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्याने परदेशात जाऊन आपल्या पक्षाची बाजू मांडताना परदेशातील व्यासपीठाचा वापर करून दुसऱ्या राजकीय पक्षांवर टीका करणे योग्य नाही. याचा विचार सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केला पाहिजे.

– सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)

 

प्रतिमासंवर्धनाचे ओझे लादणारी एकाधिकारशाही

‘पेट्रोल पंपावर नरेंद्र मोदींचे छायाचित्र लावण्यासाठी दबाव’ हे  वृत्त (२८ ऑगस्ट) वाचले. लोकसभेच्या पुढील निवडणुकीपूर्वी  देशभरातील पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यासाठी पेट्रोल पंपांवर सरकारी तेल कंपन्यांकडून दबाब येत असून जर छायाचित्र लावले गेले नाही तर पेट्रोल पुरवठा बंद केला जाईल अशी धमकीदेखील दिली जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केला आहे. एवढे करूनच सरकारी तेल कंपन्या थांबल्या नाहीत तर देशभरातील अशा पेट्रोल पंपांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जात, धर्म आणि त्यांच्या मतदारसंघाबाबतची अत्यंत गोपनीय व वैयक्तिक माहिती ही ‘कौशल्य विकास योजनेंतर्गत प्राथमिक शिक्षण योजनेसाठी त्यांची ओळख पटविणे,’ असे कारण देत या तेल कंपन्यांनी मागवली आहे. तसेच, दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबीयांना दिलेले एलपीजी योजनेची माहितीदेखील पंपावर लावण्याच्या सूचना दिल्या गेल्या असतील तर सरकार तेल कंपन्यांना हाताशी धरून पेट्रोल पंप चालक व कर्मचाऱ्यांना वेठीस धरून त्यांचा आपल्या राजकीय प्रचारासाठी वापर करून घेत असल्याचे प्रथमदर्शनी तरी स्पष्ट दिसत आहे.

मध्यंतरी सरदार पटेलांचा नियोजित पुतळा उभारण्यासाठी काही कोटींचा निधी तेल कंपन्यांकडून घेण्याचा आदेश पेट्रोलियम मंत्रालयाकडून आला होता आणि त्यासाठी याच तेल कंपन्यांनाही वेठीला धरण्याचे कारस्थान सरकारी पातळीवर घडले होते. अशा प्रकारचे सरकार आपल्या प्रतिमासंवर्धानाच्या कामांचे ओझे इतरांवर लादण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करण्याच्या कामात गुंतले असल्याचे खेदाने म्हणावेसे वाटते आणि ही एक प्रकारची एकाधिकारशाही लक्षणे नाहीत का?

– बाळकृष्ण शिंदे, पुणे

 

‘..शत्रू बरा’ वाटल्यास जबाबदारी कोणाची? 

‘हुकलेल्या संधींचा शाप’ हा अग्रलेख (२८ ऑगस्ट) वाचला. मुळातच पीडीपी आणि भाजपने एकत्र येऊन सरकार बनवणे हे या दोन्ही पक्षांच्या सत्तालोलुपतेचे प्रतीकच होते. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले दोन पक्ष जेव्हा सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतात तेव्हा त्यामागे आपल्या फायद्यासोबतच समोरच्या पक्षाचे नुकसान करणे हा उद्देश असतोच. भाजपने या प्रकरणी हे साधले. पीडीपीवर अनेक गोष्टींचे खापर फोडीत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. हे होणारच होते; तरी आशावादी दृष्टिकोनातून या सरकारचे स्वागतच केले गेले.

राजकीय पक्षांनी वेळ साधून एकमेकांना बदनाम करणे, उघडे पाडणे हे समजू शकते; पण त्यासाठी राज्याच्या जनतेचाच अपेक्षभंग करणे कितपत योग्य आहे? मोदींनी हे पाप केले आहे. ज्या राज्यात फुटीरतावाद्यांचे वर्चस्व आहे त्या राज्याची अशी फसवणूक करणे म्हणजे जखमेवर मीठ चोळून जखम भळभळती ठेवणे होय. असे करण्याने पीडीपीचे जे काही नुकसान झाले असेल त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नुकसान काश्मिरी जनतेचे पर्यायाने देशाचे झालेले आहे.

जाहीर केलेले प्रकल्प पूर्ण होणे तर दूरच; पण मार्गीसुद्धा लागलेले नाहीत. त्यासाठीची कारणेही सरकारची बदमाशी उघड करणारी आहेत. यात देशाच्या पंतप्रधानांचा सहभाग असावा हे या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. देशाच्या सत्ताधारी पक्षाचा व पंतप्रधानांचा असा अनुभव घेतल्यानंतर जर काश्मिरी जनतेला या देशात आपल्याला सापत्न वागणूक दिली जाते असे वाटू लागले आणि कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा या उक्तीनुसार तिला फुटीरतावादी, पाकिस्तान जवळचे वाटू लागले तर त्याला जबाबदार कोण?

– मुकुंद परदेशी, धुळे</strong>

 

आरक्षणाविषयी गैरसमज आणि आततायीपणा

‘सरकारला बहुसंख्याकांच्या प्रश्नाला भिडावेच लागेल’ या पत्रात असा निष्कर्ष काढला आहे की ‘बहुसंख्याक’ तरुण वर्गातील असंतोषाचे मुख्य कारण आरक्षणामुळे निर्माण झालेली विषमता हे आहे. परंतु हा वस्तुस्थितीचा पूर्ण विपर्यास आहे. एक तर पराकोटीची सामाजिक विषमता आपल्या देशात हजारो वर्षांपासून आधीच अस्तित्वात होती (व आजही आहे.) व त्यामुळेच वंचित वर्गाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षण अस्तित्वात आले. ही वस्तुस्थिती असताना आरक्षणामुळे विषमता आली असे म्हणणे म्हणजे कोंबडा आरवल्यामुळे सूर्य उगवला असे म्हणण्यासारखे आहे.

दुसरे असे की आरक्षणप्राप्त अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी यांची एकत्रित लोकसंख्या खुल्या वर्गातील लोकसंख्येपेक्षा कितीतरी अधिक आहे. म्हणून आरक्षण हा खरे तर वंचित अल्पसंख्याकांचा आहे. तरी, संख्येने अल्प असलेल्या या आरक्षण-विरोधकांच्या मनात आरक्षणाविषयी निर्माण केले गेलेले गरसमज दूर करण्यासाठी सरकारने त्यांना भिडावे हे योग्य होईल.

तिसरे, हे पकडले गेलेले बहुतांश जहाल हिंदुत्ववादी तरुण मुख्यत बहुजन समाजातील आहेत, ज्यांना आरक्षण उपलब्ध आहे. खरे तर त्यांना पढविलेल्या तथाकथित हिंदुत्वानुसार अल्पसंख्याक धर्म व मुख्यत पुरोगामी लोकांपासून ‘त्यांच्या’ हिंदुत्वास धोका निर्माण होत आहे असे त्यांच्या डोक्यात विविध तंत्रे वापरून ठसवले गेले आहे, हे तपासावरून दिसून येते. यास सर्वसामान्य हिंदूंचा खरे तर पािठबा नाही. परंतु त्यांच्या मौनामुळे या जहालांचे फावते आहे.  असे असताना, त्या तरुणांचाही संबंध आरक्षणाशी जोडणे हे केवळ विपर्यस्त व अनाठायीच नव्हे तर खोडसाळपणाचे व दिशाभूल करणारेसुद्धा वाटते.

 – उत्तम जोगदंड, कल्याण

 

सहिष्णु विधीतून विरंगुळ्याचा आनंद..

‘सत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य?’ हे पत्र (२७ ऑगस्ट) वाचले. सत्यनारायणाची पूजा हा हिंदू धर्मातला फार पूर्वापारचा किरकोळ स्वरूपाचा पण पारंपरिक पद्धतीने साजरा होत असलेला एक सहिष्णू स्वरूपाचा विधी असून तो शासकीय, खासगी, सार्वजनिक स्थळी नेहमी सामूहिक स्वरूपात आणि शांततेत उरकला जातो. तेथे सर्व धर्मीय, पंथीय हौशी प्रवृत्तीचे लोक सहभागी होत असतात. तेथे वर्षांचे बारा महिने सत्यनारायणाच्या पूजा घातल्या जात नाहीत. त्या विधीतून विरंगुळ्याचा आनंद लुटता येतो. मग अकारण दिशाभूल करणाऱ्या चच्रेला आमंत्रण कशाला देता?

– प्रणव देवरुखकर, गिरगांव (मुंबई)

 

इतर धर्मीय अशा नोटा उधळतात का?

बृहन्मुंबई वीजपुरवठा व वाहतूक (‘बेस्ट’) उपक्रमाच्या वडाळा आगारात गेल्या वर्षी सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त सादर केल्या गेलेल्या नृत्यामध्ये नोटांची उधळण केल्याप्रकरणी बेस्टने माधवी जुवेकरांचे निलंबन आणि अन्य कामगारांना बडतर्फ केल्याची बातमी वाचून समाधान वाटले. माधवी जुवेकर या एक उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांना विनोदी अभिनयाची चांगली जाण आहे. पण म्हणून आपण काही केले तरी लोक कौतुकच करतील हा भ्रम कलाकारांनी बाळगू नये. एकीकडे बेस्ट प्रचंड तोटय़ात असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे बेस्टचे अधिकारी नोटांची उधळण करतात. काय खरे मानायचे?  वास्तविक जुवेकर यांनीच या प्रकाराला आक्षेप घ्यावयास हवा होता. सभ्य महिलांवर सभ्य पुरुष नोटा उधळत नाहीत.

दुसरे म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेस अशी हिडीस नृत्ये करण्याची अनिष्ट प्रथाच पडून गेली आहे. अन्य धर्मीय त्यांच्या धार्मिक कार्यक्रमांत फिल्मी गाण्यांवर हिडीस नृत्य करून नोटा उधळतात का? आपल्याला धार्मिक कार्यक्रमाचे पावित्र्य जपता येत नसेल तर धार्मिक कार्यक्रम करूच नयेत. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र  या  सर्वजनिक उत्सवांतही थोडय़ाफार फरकाने हेच प्रकार चालतात आणि कोणालाच त्याचे काही वाटत नाही. असे कठोर पाऊल उचलल्याबद्दल बेस्टच्या महाव्यवस्थापकांचे आभार.

– किशोर गायकवाड, खारेगाव-कळवा (ठाणे)

 

मध्यमवर्गीयांवर बडतर्फीची कुऱ्हाड नको

नृत्यादरम्यान नोटा उडविण्याचा प्रकार काही नवा नाही. आपण चित्रपटांतून वगैरे अनेक वेळा पाहिलेही आहे. ‘बेस्ट’ प्रशासनाला ते गर वाटणे, चुकीचे वाटणे हा त्यांचा प्रश्न आहे, तर चुकीला माफी नाही हेही बरोबर. पण बेस्ट प्रशासनाने या मध्यमवर्गीय कलावंतांना थेट बडतर्फीचीच शिक्षा दिली ती मात्र भयंकर वाटते. प्रशासनाने पुन्हा विचार करावा व त्यांच्या भवितव्यात लक्षात राहील अशी शिक्षा जरूर करावी, पण बडतर्फ करू नये. कारण सारेच मध्यमवर्गीय कर्मचारी आहेत.

– विश्वनाथ पंडित, कोंडमळा (चिपळूण)

 

 

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers letter part
First published on: 29-08-2018 at 03:28 IST