‘क्षमस्व, रोकड संपली आहे!’ (१२ मे) या मथळ्याखालील राज्यातील एटीएम यंत्रांच्या सद्य:स्थितीचा आढावा वाचला. एकूणच राज्यातील ग्रामीण तसेच शहरी बँकांच्या एटीएममधून होणाऱ्या अनियमित व बव्हंशी ठप्प झालेल्या रोकडपुरवठय़ाने ग्राहकांची परवड होत आहे. एकाहून अधिक प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या स्टेट बँकेच्या ‘एसबीआय इन टच’सारख्या मानवरहित म्हणवता येतील अशा शाखाही त्यास अपवाद नाहीत. विशेष म्हणजे रोकड संपलेली असतानाही कित्येक एटीएम विजेचा अपव्यय करीत तासन्तास चालू राहतात, तर काही ठिकाणी मशीन चालू ठेवून ग्राहकांचा रोष टाळण्यासाठी बिनदिक्कत शटर्स खाली ओढलेली दिसतात.

रोखीची चणचण संपेपर्यंत बॅँकांनी एक उपाय म्हणून ज्या ठिकाणी एकाहून जास्त एटीएम मशीन्स उपलब्ध आहेत, अशा शहरी भागात आपापल्या मशीन्सचे ‘फक्त शनिवारी चालू, फक्त सोमवारी रोकड मिळेल..’ असे वर्गीकरण करून त्यानुसार रोकडपुरवठा करावा. असे वार लावून वाटणी केल्यास सर्व एटीएम दररोज चालू ठेवण्याची गरज भासणार नाही. निदान प्रत्येक एटीएमला अधूनमधून पोटभर नोटा तरी मिळतील. तक्रारींचे काय, त्या तर दररोजच्याच आहेत. त्यात काय एवढे!

गिरीश धर्माधिकारी, औरंगाबाद

 

एमपीएससीमध्ये कार्यक्षम अधिकारी नेमावेत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या वर्ग १, वर्ग २च्या स्पर्धा परीक्षेच्या पॅनलमध्ये आयएएस दर्जाचे अधिकारी असतानाही त्यांच्याकडून प्रश्न काढण्यात सतत चुका होत आहेत. जेमतेम १०० प्रश्न काढायचे असतात आणि त्यातही चुका होत असतील तर ही गंभीर बाब आहे. त्यांच्या या चुकांमुळे असंख्य विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागते.

१) २९ जानेवारीच्या  ‘विक्रीकर निरीक्षक’ परीक्षेत आयोगाचे ७ प्रश्न रद्द आणि ६ प्रश्नांची उत्तरे बदलली. म्हणजे एकूण १३ प्रश्नांचा गोंधळ झाला.

२) परवा झालेल्या ‘पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत‘ उत्तरात पाच प्रश्न रद्द आणि एक बदल. म्हणजे यातही सहा प्रश्नांमध्ये गडबड झाली.

आयोगातील तज्ज्ञच प्रश्नांबाबत गोंधळलेले असतील तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे किती हाल होत असतील, याचा विचार न केलेलाच बरा. एकेका गुणावरून विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले जाते, त्यांची वर्षभराची मेहनत, अभ्यास वाया जातो. त्यामुळे अशा प्रकारांना जबाबदार कोण? आधीच सरकारी नोकऱ्यांची संधी कमी होत आहे. त्यात आयोगाच्या या लहरी कारभाराचा फटका उमेदवारांना बसतो आहे. सरकारने यापुढे तरी आयोगात चांगले व कार्यक्षम अधिकारी नेमावेत, पॅनेलमध्ये वशिलेबाजी होऊ नये, ही अपेक्षा.

निखिल तावडे, पुणे

 

बेधुंद तरुणाई यातून काही शिकेल?

पॉप गायक जस्टिन बिबरच्या नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी आलेल्या हजारो चाहत्यांची बिबरने प्रत्यक्षात गाणी न गाता केवळ ओठांची हालचाल करून निराशा केलीच, पण हजारो रुपये खर्च करून कार्यक्रमस्थळी आलेल्या हजारो रसिकांची फसवणूक केल्याचे आता उघड झाले आहे, कारण गाणे चालू असताना बिबर चक्क पाणी पीत होता. या कार्यक्रमासाठी जस्टिन बिबरने अनेक अटी लादून २५ कोटी रुपयांचे मानधन घेतल्याचे म्हटले जाते. त्याच्या एका दर्शनासाठी केवळ मुंबईच नव्हे तर देशाच्या अनेक भागांतून हजारोंच्या संख्येने तरुणाई एकवटली होती. त्या सर्वाची बिबरच्या या ‘लिप सिंक’च्या प्रकाराने चांगलीच निराशा झाली. बेधुंद तरुणाई यातून काही शिकेल तो सुदिन म्हणावा लागेल.

प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (मुंबई)

 

सोलापूरच्या स्वातंत्र्ययुद्धाची उपेक्षा

भारतीय स्वातंत्र्ययुद्धाची अनेक पाने उपेक्षित राहिलेली आहेत. त्यातच सोलापूरच्या स्वातंत्र्ययुद्धाचा उल्लेख करावा लागेल. स्वातंत्र्याच्या लढय़ात सोलापूरकर आघाडीवर होते आणि १९३०च्या मे महिन्यात चार दिवस या शहराने अभूतपूर्व उठाव करून शहरातल्या सगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांना पळून जायला भाग पाडले होते. हे चार दिवस सोलापूर शहरावर जनतेचे राज्य होते. नगरपालिकेच्या इमारतीवर तिरंगी झेंडा फडकत होता. मात्र १३ मेपासून या शहरात लष्करी कायदा पुकारण्यात आला आणि लष्कराने जनतेचे हे बंड अनन्वित अत्याचार करून दाबून टाकले. अनेकांवर खटले भरून त्यांना प्रदीर्घ कारावासाच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. चार नेत्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यांची नावे किसनलाल सारडा, जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी अशी होती. त्यांचे पुतळे सोलापूरच्या पार्क मैदानाजवळ उभे आहेत. अशा प्रकारचा लढा भारताच्या कोणत्याही शहरात लढला गेलेला नाही. लष्करी कायदा केवळ सोलापूर आणि लाहोर या दोनच शहरांत पुकारण्यात आला होता. या इतिहासामुळे पंडित नेहरू सोलापूरला नेहमी शोलापूर असे म्हणत असत. या शहरात लष्करी कायदा, मार्शल लॉ पुकारला गेला, त्याचा आज स्मृतिदिन आहे. वास्तविक या स्मृतिदिनाचा कार्यक्रम राज्य शासनातर्फे केला पाहिजे व सरकारने या इतिहासाची दखल घेतली पाहिजे.

अरविंद जोशी, सोलापूर

 

पिंजरबासूदांचा नव्हे, द्विवेदी यांचा चित्रपट

‘वाग्देवीचे वरदवंत’ या सदरातील ‘अमृता प्रीतम – कादंबरीलेखन’ हा भाग (९ मे) वाचला. यात ‘पिंजर’ हा सिनेमा बासू भट्टाचार्य यांचा असल्याचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात ‘पिंजर’ ही सर्वागसुंदर कलाकृती   डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित केली आहे. मूळ कथा ज्ञानपीठविजेत्या अमृता प्रीतम यांची असून पटकथा द्विवेदी यांनी लिहिली आहे. यातील ऊर्मिला मातोंडकर, मनोज वाजपेयी यांच्यासह सर्वच कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, गुलजारसाहेबांची गीते आणि उत्तमसिंग यांचे संगीत सर्वच अविस्मरणीय आहे. हा चित्रपट किती जणांनी पाहिला माहीत नाही, पण यापुढे जेव्हा संधी मिळेल तेव्हा हा अप्रतिम चित्रपट दर्दीनी आवर्जून पाहावा, यासाठीच हा पत्रप्रपंच.

अंजली पुरात, विलेपार्ले (मुंबई)