‘नो युअर ऑनर’ हा राजेश्वरी देशपांडे यांचा लेख (रविवार विशेष, २८ एप्रिल) वाचला. देशाचे सरन्यायाधीश न्या. गोगोई यांच्यावर एका माजी न्यायालयीन महिला कर्मचाऱ्याने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप जितके दुर्दैवी आहेत तितकेच अनपेक्षित आहेत. शेवटी न्यायाधीशही माणसेच आहेत. सामान्य माणसांच्या ज्या वृत्ती आणि प्रवृत्ती प्रसंगानुरूप समोर येतात, त्या विशेष माणसांमध्येही असतातच. त्यामुळे ही उच्च पदावरील माणसे अधिकाराने विशेष असली तरी प्रसंगानुरूप त्या वृत्ती आणि प्रवृत्ती डोकावणारच नाहीत असे म्हणता येणार नाही.  त्या महिलेचा पूर्वेतिहास कसाही असला तरी कार्यालयातील या महिलेचे लैंगिक छळाचे समर्थन कसे काय होऊ  शकते? त्यामुळे त्या स्त्रीचा पूर्वेतिहास गृहीत धरून ती स्त्रीच ‘तशी’ होती असे म्हणून ‘या’ आरोपांतून सुटका होऊ  शकत नाही. हे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पूर्वेतिहास हा चोरीचा आहे म्हणून त्याने दुसऱ्यावर केलेल्या चोरीच्या आरोपांची दखल घेता येणार नाही. कारण त्याचा पूर्वेतिहास हा चोरीचा आहे असे म्हणण्यासारखे आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची स्वायत्तता किंवा न्याययंत्रणेवर घाला घालण्याचे हे षड्यंत्र आहे असे म्हणणे. ‘मी टू’ चळवळीत अनेक चित्रपट नायकांवर, संपादकांवर असे आरोप झाले. म्हणून काही चित्रपट उद्योग किंवा वृत्तपत्रसृष्टी लगेच या अशा (खोटय़ा किंवा खऱ्या) आरोपांमुळे ओस पडली नाही. अनेक न्यायाधीशांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षासुद्धा झाली आहे. म्हणून संबंधित न्यायालयांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची स्वायत्तता धोक्यात आली आहे या विधानाला काही अर्थ नाही. राहता राहिला प्रश्न न्यायाधीशांनी ‘आपल्या कार्यालयात शक्यतो स्त्रिया नकोत’ या केलेल्या मागणीचा. हे असे करता येणार नाही. कारण ही घटनाबाह्य़ मागणी ठरेल.

– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण

 

शहीद करकरे सर्वाच्या मनात कायम राहतील..

‘पपा म्हणायचे, की दहशतवादाला धर्म नसतो..’ ही बातमी (लोकसत्ता, २८ एप्रिल) वाचली. हेमंत करकरे यांची कन्या जुई नवरे यांचा वडिलांबद्दल असलेला सार्थ अभिमान, प्रेम, आदर, त्यांचे देशप्रेम, कुटुंबाबाबतची कर्तव्ये हे तर दिसतेच, शिवाय देशसेवा हे त्यांचे प्रथम कर्तव्य होते, यात वडिलांवर आजोबांचे झालेले सुसंस्कार व वडिलांचे या दोन मुलींवर झालेले सुसंस्कार प्रकर्षांने दिसतात. सुसंस्कार इतके चांगले की वडिलांबद्दल प्रज्ञासिंह ठाकूर काय बोलल्या हे माहीत असूनही त्यांच्या वक्तव्यावर जुई यांनी एक चकार शब्दही काढला नाही. करकरे यांच्यासारख्या देशभक्त अधिकाऱ्याला महाराष्ट्राने गमावले याचे दु:ख जितके जुई यांना आहे, तितकेच महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीस आहे. शहीद हेमंत करकरे हे आपल्या सर्वाच्या मनात आहेत व सतत राहतील.

– सुधा परांजपे-गोखले, गोवंडी (मुंबई)

 

‘संध्याछाया भिवविती..’  ही भावना राहातेच!

‘तेरी दुनिया में जीने से..’ हा नितीन अरुण कुलकर्णी यांचा मृत्यू या गूढ विषयावरील लेख (२७ एप्रिल) अभ्यासपूर्ण आहे. मृत्यूचे गूढ व भय सर्वच प्राणिमात्रांना असते. डिस्कव्हरी चॅनेलवर वाघ आपल्या भक्ष्याच्या मागे लागल्यावर ते हरीण किंवा जनावर जीवाच्या आकांताने पळत असते हे बघताना संवेदनशील हृदयाला मरण म्हणजे काय हे समजते. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे मरण झाले तर अजाण मूल आजोबा असे का झोपले आहेत असे विचारल्यावर त्याची आई निरुत्तर होते. समज येईपर्यंत माणसाला मरणाची ओळख झालेली नसते. पण एखादी व्यक्ती मरण पावलेली बघून तो माणूस मरणाबद्दल विचार करू लागतो तो स्वत:च्या अंतापर्यंत. कलाकार आपल्या मृत्यूबद्दलच्या भावना कलेद्वारे व्यक्त तरी करू शकतो, पण सामान्यजनांचे जिणे या कलेच्या अभावामुळे अधिकच भयाण होऊन जाते. चिडचिडेपणा वाढू लागतो. यावर रामबाण उपाय म्हणून हल्ली ज्येष्ठ नागरिक स्वत:ला कामात गुंतवून घेत आहेत. तेव्हा हुरूप येऊन मरणाचे भय तात्पुरते तरी विरल होते. मृत्यूवर आधारित तत्त्वज्ञान आजपर्यंत अनेकांनी लिहिले. तरीपण ‘संध्याछाया भिवविती हृदया’ ही भावना राहतेच. ग. दि. माडगूळकरांच्या  ‘दैव जात दु:खे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.’ या गीतातील तिसऱ्या कडव्यात जन्म व मृत्यू ही जन्मजात जोडी असून ‘दिसे भासे ते सारे नाशवंत’ हे सत्य, तर चौथ्या कडव्यात ‘मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा’ पुढे पाचव्या कडव्यात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कुणाची सुटका नाही, म्हणूनच ‘वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा’ असे अटळ सत्य प्रतिपादन केले आहे.

– राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली

 

‘टिक टॉक’ वाजते डोक्यात..

‘वास्तव वाऱ्यावरच’ हा अग्रलेख (२७ एप्रिल) वाचला. झाडाचे पान किडले असता झाडच तोडणे जरा अर्थहीनच ठरते. टिक टॉक अ‍ॅपची अशीच दशा झाली होती. पण आठवडाभरापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी दोन दिवसांपूर्वीच काही मर्यादा घालत उठवली. अश्लीलतेचे कारण पुढे सारत न्यायालयाने बंदी घातली होती, मात्र त्याच अश्लीलतेचे भान ठेवण्यास सांगून बंदी उठवली. त्यामुळे खऱ्या अर्थाने टिक टॉकला न्याय मिळाला. कारण तसे पाहिले तर इतर समाजमाध्यमांवरदेखील अश्लीलतेचा धोका आहेच. किंबहुना या समस्येतून बाहेर येण्यात सर्वच समाजमाध्यमे अयशस्वी ठरली आहेत, असे असताना ‘टिक टॉक’वरच बंदी करणे योग्य ठरत नाही. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, यू-टय़ुब यांसारखी इतर समाजमाध्यमेदेखील या समस्येशी लढा देताना दिसतात. मात्र या सर्वामधील व टिक टॉकमधील फरक म्हणजे इतर समाजमाध्यमे जरा नियंत्रित असतात. व्यक्तिगत गोपनीयतेची काळजीसुद्धा घेतात. ती मात्र ‘टिक टॉक’ने घेतली नव्हती. त्रयस्थ व्यक्तीने टाकलेल्या मजकुराकरिता कंपनीला कसे काय दोषी ठरविले जाऊ  शकते, असा प्रश्न कंपनी व्यवस्थापनाने केला होता. त्यावर न्यायालयाने केलेला पुनर्विचार किडलेल्या पानावरती केलेला उपचारच ठरतो.

– शुभम शेळके, अहमदनगर</strong>

 

तपास यंत्रणेकडून आता तरी सकारात्मक कृती व्हावी

‘संवेदनशील प्रकरणांमध्ये हस्तक्षेप नको’ ही बातमी (लोकसत्ता, २७ एप्रिल) वाचत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे या विचारवंतांच्या हत्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांची (अ)कार्यक्षमता व या यंत्रणांना प्रत्येक वेळी कुणाच्या तरी आदेशाची वाट बघावी लागते या गोष्टी न्यायालयाने अधोरेखित केल्या आहेत. कदाचित राजकीय हस्तक्षेपामुळे तपास यंत्रणांची धार जाणवण्याइतपत बोथट झाली असेल. शेजारच्या कर्नाटक राज्यातील गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासाच्या प्रगतीच्या पाश्र्वभूमीवर तपास यंत्रणेचे प्रत्येक सुनावणीच्या वेळी न्यायपालिकेला सादर करत असलेले फुकाचे दावे फक्त सोपस्कार आहेत की काय असे वाटत आहेत.

समाजहितासाठी आयुष्य वेचलेल्या डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे होऊन गेली तरी खुनाचा तपास अजूनही कासवाच्या गतीने होत आहे, याबद्दल कुठल्याही राजकीय पक्षाला व त्यांच्या नेत्यांना ना खेद ना खंत. यासंबंधातील सामान्यांचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहोचतो की नाही अशी शंका यावी इतकी स्मशान शांतता.  पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत तपास यंत्रणेकडून काही तरी सकारात्मक कृती होईल एवढीच माफक अपेक्षा.

– प्रभाकर नानावटी, पुणे</strong>

 

धर्मसहिष्णुता आणि रोजीरोटी

राजा देसाई यांचा ‘सामान्य हिंदूंना काय हवे आहे?’ हा लेख (रविवार विशेष, २८ एप्रिल) वाचला. लेखकाच्या प्रश्नाला ‘धर्मसहिष्णुता आणि रोजीरोटी यांचा ताळमेळ कसा घालायचा हे सांगणारं नेतृत्व हवं आहे’ असं उत्तर द्यावं लागेल. ‘‘माणसाला जीवनातील उच्च तत्त्वे पेलत नाहीत, म्हणून सर्वच धर्मानी मंदिर, मशीद, चर्च यांसारखे पांगुळगाडे दिले, त्यांची गरज संपत जाणे यात मानवाचा खरा धार्मिक विकास आहे’’ हे या लेखातलं मर्म आहे. म्हणजे धर्मसहिष्णुतेच्या विचाराचं शिवधनुष्य पेलण्याची ताकद नसलेल्या माणसानं निर्माण केलेल्या परमेश्वरी श्रद्धांना प्रार्थनेच्या माध्यमातून सगुण रूप देण्यासाठी निर्माण केलेली ही साधनं आता माणुसकीचा अंत साध्य करण्यासाठी वापरली जाऊ  लागली आहेत असंच ना? आता मात्र आपल्या देशातल्या सामान्य हिंदूंना धर्मसहिष्णुता ही जगात फक्त आपलीच जबाबदारी आहे, हे जोखड नको झालंय असंच वाटतंय. मशिदी आणि चर्च बांधून हिंदूंना निर्वासित करू पाहणाऱ्या मुघलांच्या आणि इंग्रजांच्या सत्तांना बरीच वर्षे सहन केल्यानंतर हिंदुस्थानात आपण आपली रोजीरोटी कमावू शकतो हा आत्मविश्वास येण्यासही हिंदूंना अनेक र्वष लागली. शेवटी प्रेम आणि द्वेषभावनांचं मूळ या रोजीरोटीतच असतं ना? जमिनीचे तुकडे, त्यावरची पिकं, सागरसंपत्ती, भूगर्भातल्या संपत्तीचे स्रोत यांवर मालकी प्रस्थापित करण्यासाठी भाषा, पोशाख, राहणी, संस्कृती साधम्र्य असलेल्या माणसांच्या झुंडींकडून धर्माचा आधार घेतला गेला. इतर धर्मीयांनी आपली प्रजा पाहिजे तेवढी वाढवावी आणि हिंदूंनी लोकसंख्या वाढीची चिंता करत कुटुंबनियोजन करावं हेच घडत आलंय.

– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

 

विखे पाटील यांनी आधी आमदारकी सोडावी

आपल्या मुलाला काँग्रेसचे तिकीट मिळविण्यात यश न मिळाल्याने विखे पाटलांनी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्या पक्षाचे तिकीट मिळवून मुलाचा मार्ग मोकळा केला. राहुल गांधी यांची शिर्डीत सभा झाल्यानंतर खुलासा केला. त्यातून वैचारिक बांधिलकीपेक्षा व्यक्तिद्वेषाचे (शरद पवार) राजकारण केले ही बाब स्पष्ट झाली. यापूर्वीसुद्धा विखे पिता-पुत्रांनी सत्तेसाठी शिवसेनेसोबत घरोबा केला होता. त्यामुळे उगाच कुणावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे.

– डॉ. हिरालाल खैरनार, खारघर (नवी मुंबई)