‘थर्मामीटर फोडून ताप जाईल?’ हा योगेंद्र यादव यांचा लेख (२३ ऑगस्ट) वाचला. गॅलिलिओने जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडला, तेव्हा त्याच्या या मताचा स्वीकार कोणीही केला नाही. उलट त्या वेळच्या व्यवस्थेने त्याला आपले मत मागे घ्यायला लावले त्यासाठी त्याला तुरुंगातही डांबले. पण पुढल्या काळात त्याच्या अनुमानाचा स्वीकार सर्वाना करावाच लागला कारण ते सत्य होते. सत्य सुरुवातीला नेहमी अल्पमतात असते आणि सत्यासाठी किंमतदेखील चुकवावी लागते. पण नंतर मात्र त्या सत्याचा स्वीकार सर्वाना करावाच लागतो. आजच या देशाच सत्य काय आहे, तर आज आपला देश आíथक मंदीतून जात आहे, गेल्या काही दिवसांत हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत आहे, रुपयाचे अवमूल्यन होत आहे, हे या देशाचे सत्य आहे ज्यावर सरकारने ‘देशभक्तीची’ खोटी झालर टाकली आहे, परिणामी या देशातील बहुसंख्य लोक हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत. पण सत्य हे नेहमी अल्पमतात असले तरी त्या सत्याचा स्वीकार शेवटी सर्वानाच करावा लागतो. योगेंद्र यादव यांनी मांडलेल्या सत्याचा स्वीकार सर्वजण करतील हीच अपेक्षा.

   – आकाश उगले, अमरावती</strong>

 

गिधाडप्रवृत्तीमुळे मदतीवरचा विश्वास उडेल

पूरग्रस्त भागात मदतीची वाटमारी. त्याचबरोबर टोळ्यांकडून दमदाटी आणि जातीपातीच्या राजकारणाला ऊत अशी बातमी (लोकसत्ता, २३ ऑगस्ट) वाचली.  हीच मानव जातीतील गिधाडे उद्या येणाऱ्या मदतीवर घिरटय़ा घालतील अशी शंका होती, त्याच अनुषंगाने १४ ऑगस्टच्या ‘लोकसत्ता’ मध्ये ‘मदतकार्यात राजकारण दिसणार की नतिकता?’ हे पत्र लिहिले होते. अशा नसíगक संकटात आपल्या बांधवांसाठी खारीचा वाटा का होईना म्हणून लोकांनी मदत केली; पण मानवाची गिधाड प्रवृत्ती त्यावर घिरटय़ा घालू लागली. हे जर असेच चालू राहिले तर पुढे काही नसíगक संकटे आली तरी समाजातला कोणताच वर्ग मदतीसाठी धजावणार नाही. प्रशासनाने येणारी मदत ही आपल्या कार्यक्षेत्रात घेण्याची गरज आहे आणि प्रेताच्या टाळूवरचे लोणी खणाऱ्यांच्या मुसक्या आवळणेही आवश्यक आहे. या पुरात वाहून गेलेल्या संसारांमुळे अख्खा महाराष्ट्र हळहळतो आणि आपल्याला जमेल तशी मदत करतो;  पण काही प्रवृत्ती इथेही लुटालूट करतात हे अस्वस्थ करणारेच आहे.

– महेश सोनाबाई पांडुरंग लव्हटे, परखंदळे (जि. कोल्हापूर)

 

यंत्रणांना वाकविण्याची सुरुवात काँग्रेसचीच..

‘ज्याची काठी त्याची. ’ (२३ ऑगस्ट) हा अग्रलेख वाचला. माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि गृहमंत्री यांनी ज्या प्रकारे आपली अटक टाळण्यासाठी पळापळ केली आणि तपास यंत्रणांनी ज्या प्रकारे त्यांची धरपकड केली ते निश्चितच लाजिरवाणे म्हणावे लागेल. २००८ ची ही कथित केस, पण याच यंत्रणांना गेली दहा वष्रे त्यामध्ये काहीही काळेबेरे आढळले नाही आणि ज्या  न्यायासनाला आधी याच चिदम्बरम यांना जामीन द्यावासा वाटला आणि तेच न्यायासन आता चिदम्बरम हे या घोटाळ्यातील कळीचे गुन्हेगार (किंगपिन) आहेत, म्हणून त्यांना जामीन देणे योग्य नाही, असे सुनावते हा विरोधाभास नक्कीच खटकणारा आहे.  काँग्रेसने यावर ‘ही सुडाची कारवाई आहे’ आणि ‘या यंत्रणांचा सरकारकडून अर्निबध वापर होत आहे’ अशी प्रतिक्रिया देणे म्हणजे, आपले दात पुढे असताना दुसऱ्याच्या पुढल्या दातांना हसण्यासारखे आहे! या यंत्रणांना जर  सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे वाकवता येत असेल तर ती काँग्रेसची चूक आहे. कारण या सर्व यंत्रणा काँग्रेसच्या कार्यकाळातील आहेत आणि त्या तेव्हा जशा वागत होत्या तशाच आताही वागत आहेत! आपल्या पक्षावरचा सत्तेचा सूर्य कधी ढळणारच नाही असे काँग्रेसवाल्यांना वाटत होते, त्यामुळे या यंत्रणांचा अर्निबध वापर करता येईल अशा प्रकारे ही यंत्रणा वाकविली गेली,  हे नाकारता येणार नाही. त्याच यंत्रणेची काँग्रेस आता शिकार होत आहे आणि म्हणून या कारवाईबाबतचे काँग्रेसचे अश्रू हे नक्राश्रूच ठरतील. हे सत्तेचे दुष्टचक्र थांबायला हवे!

– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण (पश्चिम)

 

आता मालक बदलला आहे.. इतकेच

‘ज्याची काठी त्याची.. ’ हे संपादकीय (दिनांक 23 ऑगस्ट) वाचले.माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे काय होणार हे त्यांनी केलेल्या कथित घोटाळ्याची संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यावरच कळेल. याचीच पुनरावृत्ती कोहिनूर मिल प्रकरणात होताना दिसत आहे. हे प्रकरण देखील २००८ याच वर्षांतील आहे, परंतु चौकशीची नोटिस पाठविण्यासाठी सक्तवसली संचालनालयाला (ईडी) दहा वर्षांचा कालावधी लागतो. आरोपींची चौकशी आणि कार्यवाही झालीच पाहिजे; पण  तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेचा आणि कार्यपद्धतीचा प्रश्न देखील उपस्थित केला पाहिजे. जर हे गुन्हे खरेच इतके महत्त्वाचे होते जितके वर्तमानात भासवले जात आहेत; तर इतके दिवस देशातील दोन सर्वोच्च तपास यंत्रणा कशाची वाट पाहत होत्या? देशातील सर्वोच्च न्यायालयाला देखील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या ‘कार्यक्षमते’ची पुरेपूर जाणीव आहे.. २०१३ साली कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी याच तपासयंत्रणेचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने ‘िपजऱ्यातला पोपट’असा केला होता. आता या ‘पिंजऱ्यातअसलेल्या पोपटाचा’ मालक बदलला, इतकाच अर्थ काढावा काय?

– ऋषिकेश क्षीरसागर, कोंढवा पुणे.

 

मग कशाला पळ काढला?

‘ज्याची काठी त्याची’ हे संपादकीय (२३ ऑगस्ट) वाचले.  सरकारी यंत्रणेची म्हैस गोठय़ात कशी बांधली जाते ते काही आता नव्याने सांगण्याची गरज नाही. काँग्रेस नेत्यावर कारवाई होते म्हणून त्यात सूड भावना आहे अशा अर्थाचे तात्पर्य काढणे हाही बालिशपणाच ठरतो. चिदम्बरम जर निर्दोष आहेत, त्यांचा न्यायपालिकेवर विश्वास आहे तर मग त्यांनी कुठे पळ काढला होता?

– अमर मालगे, नेरिपगळाई(जि. अमरावती)

 

न्यायालयाचे मत बदलू शकते..

‘ज्याची काठी त्याची’  हा अग्रलेख (२३ ऑगस्ट) तपास यंत्रणांच्या काही प्रमादांवर थेट बोट ठेवतो. मात्र – चिदम्बरम किंगपिन आहेत असे न्यायालयाला वाटते मग त्यांना एक वर्ष जामिनावर का बाहेर ठेवले, असा प्रश्न या अग्रलेखाने उपस्थित केला आहे; तो पटणारा नाही. न्यायालयाची प्रक्रिया ही सतत घडत राहणारी प्रक्रिया असते, अनेक पुरावे, नवी माहिती न्यायालयासमोर येत असते त्यामुळे ते कळीचे सूत्रधार आहेत हे मत अलीकडेच पक्के झालेले असू शकते.

– गार्गी बनहट्टी, मुंबई.