17 September 2019

News Flash

‘पृथ्वीचे हृदय’ जळते, ‘मुंबईचे हृदय’ तुटते!

‘अ‍ॅमेझॉन वणव्याची झळ’ हा ‘अन्वयार्थ’ (२६ ऑगस्ट) वाचला.

‘अ‍ॅमेझॉन वणव्याची झळ’ हा ‘अन्वयार्थ’ (२६ ऑगस्ट) वाचला. ब्राझीलमधील अग्नितांडवाबद्दल पुष्कळ माहिती देऊन त्यात या आगीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. सदर चिंता पृथ्वीच्या संवर्धनासाठी योग्यच आहे. अ‍ॅमेझॉन जंगलाला ‘पृथ्वीचे हृदय’ संबोधले जाते. पृथ्वीवर मोसमी पावसाचे चक्र सुरू ठेवण्यात या जंगलाचे योगदान आहे. ज्या दिवशी या पृथ्वीवरून जंगल नष्ट होईल, त्या दिवशी पृथ्वीचा अंत ठरलेला आहे. याबद्दल शास्त्रज्ञ, वन्यजीवप्रेमी, राजकीय नेते, जनता या सर्वाचेच एकमत असावे. असे असतानाही विकासाच्या नावाखाली भरमसाट जंगलतोड सुरू आहे. ‘अन्वयार्थ’मध्ये ब्राझील व ब्राझीलचे अध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांना दूषणे देण्यात आली आहेत, तीही योग्यच. पण इकडे मुंबईत तरी वेगळे काय होत आहे?

‘मुंबईचे हृदय’ असलेल्या आरे कॉलनी व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील जंगलांत विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड सध्या सुरू आहे. जर अ‍ॅमेझॉन जंगल हे ‘पृथ्वीचे हृदय’ आहे, तर आरे कॉलनी व बोरिवली ते ठाणे-येऊर पट्टय़ातील जंगल हीसुद्धा ‘मुंबईचे हृदय’ नक्कीच आहेत आणि सध्या विकासाच्या नावाखाली या हृदयावर दिवसाढवळ्या घाला घातला जात असतानासुद्धा मुंबईकर गप्प आहे!

वृक्ष प्राधिकरण ही नामानिराळी असलेली संस्था आहे; त्यामुळे आतापर्यंत त्यांनी अशा वृक्षतोडीला कधी कडाडून विरोध केला आहे, असे कधीही वाचण्यात आले नाही. मुंबई पालिकेतील नगरसेवकांबद्दल काय बोलावे? ते किती ज्ञानी आहेत, हे तमाम मुंबईकरांना माहितीच आहे; तोडपाणी हीच त्यांच्या ज्ञानाची परिसीमा! त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे दगडातून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील तमाम निसर्गप्रेमींनी तसेच सर्व मुंबईकरांनी सदर वृक्षतोडीचा कडाडून विरोध सरकापर्यंत पोहोचावा आणि येणाऱ्या संकटापासून मुंबईला वाचवण्यात यावे.

– रमेश पाटील, मालाड (जि. मुंबई)

 

रसायन-कारखाने स्फोटांत आणखी किती बळी?

राज्यात व्यवसाय करणे सुलभ व्हावे म्हणून आवश्यक असलेल्या विविध परवान्यांची संख्या कमी करून ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’ धोरण सरकारने आखले आहे. यात सर्वात धोकादायक बाब सुरक्षेच्या परवान्याची आहे. संबंधित कारखान्याने ‘सुरक्षेचे सर्व उपाय योग्य पद्धतीने केले आहेत’ असे एकदा प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले, की त्या कारखान्याची जबाबदारी संपते! मात्र त्या कारखान्याने केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांची सत्यता पडताळून पाहण्याची सरकारची कोणतीही यंत्रणा नाही. परिणामी २०१६ च्या मे महिन्यात डोंबिवली येथील रसायन-कंपनीत झालेल्या स्फोटात ११ जणांचा बळी गेला. २०१८ मध्ये मार्च महिन्यात बोईसरच्या एका फार्मास्युटिकल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि आता धुळे जिल्ह्य़ातील वाघाडी येथील रसायन-कंपनीच्या स्फोटात १३ जण ठार व ७२ जण जखमी झाले आहेत. सुरक्षिततेचे योग्य उपाय न योजल्यामुळे होणाऱ्या जीवघेण्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने, कारखान्यांनी केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांची वेळोवेळी तपासणी करून मगच सुरक्षेचा परवाना देणे गरजेचे आहे.

– प्रदीप शंकर मोरे, अंधेरी पूर्व (जि. मुंबई)

 

‘सोन्या’सारखी साथ होती, म्हणूनच..

‘टॉलस्टॉयचे स्मितहास्य..’ हे संपादकीय (३१ ऑगस्ट) वाचले. त्याचे सद्य:कालीन संदर्भ समजले. लिओ टॉलस्टॉयच्या लेखनामागील प्रेरणा ही त्याच्या मानवतावादी दृष्टिकोनात होती, असा संपादकीयातील रोख आहे.

टॉलस्टॉयची पत्नी सोफिया (सोन्या) हिचे आयुष्यभराचे दैनंदिनी लेखन २०१० मध्ये- म्हणजे टॉलस्टॉयच्या मृत्यूनंतर १०० वर्षांनी प्रकाशात आले. त्यामुळे टॉलस्टॉयचे विचार, उच्चार, विकार, लेखन व स्वभाव यांबद्दल पूर्णपणे नवी, अज्ञात माहिती वाचकांसमोर आली. ती मुळातून वाचायला हवी. सोफिया स्वत: उत्तम वाचक, लेखक, कलावंत होती. ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’चे तिने सात वेळा पुनर्लेखन, संपादन केले होते. तिची १३ बाळंतपणे झाली. टॉलस्टॉय ६० वर्षांचा असताना तिने १३ व्या मुलाला जन्म दिला. टॉलस्टॉयचे बहुचर्चित ‘कन्फेशन’ त्यापूर्वी आठ वर्षे प्रसिद्ध झाले होते. सोफिया ऊर्फ ‘सोन्या’ची यंदा स्मृतिशताब्दी सुरू आहे.

– जया नातू, बेळगाव

 

‘खेकडय़ांच्या धरणा’नंतर ‘उंदरांचा बंधारा’!

४२ वर्षांपूर्वी बांधकाम सुरू केलेला, केवळ १२ कोटी मूळ किमतीचा, परंतु आता २२०० कोटी किंमत झालेला झारखंडमधील कोनार नदीवरील बंधारा फक्त २२ तासांमध्येच पडला. जनतेच्या पैशाचा चुराडा झाला. मुख्यमंत्री रघुबर दास यांना याबद्दल पत्रकारांनी घेरल्यावर त्यांनी हात वर केले आणि नंतर, ‘‘उंदरांनी बिळे करून पोखरल्यामुळे हा बंधारा उद्ध्वस्त झाला’’ असेही ‘अधिकृत’ उत्तर मिळाले! या देशातील शेतकऱ्यांची आणि जनतेची अशी क्रूर चेष्टा करणाऱ्या दोषींना जबर शिक्षा होणे जरुरीचे आहे. कित्येक सार्वजनिक बांधकाम योजनांत असे प्रकार वारंवार घडतात. सरकारे कुणाचीही येवोत; परंतु या निर्ढावलेल्या लुटारूंना जाब विचारण्याचे धाडस कोणी दाखवेल काय?

– मिलिंद कोर्लेकर, ठाणे

 

उत्तरानंतरची अस्वस्थता..

‘अन्यथा’ या सदरांतर्गत ‘ऑस्ट्रियाचे धडे’ ही गिरीश कुबेर यांची पाच लेखांची नैमित्तिक मालिका वाचली. लेखांतील खास टिप्पण्यांनी अंतर्मुखही केले. ‘दोन ओळीं’मध्ये खचाखच भरलेले अर्थही वाचता आले. त्यातील ‘विकत घेणाऱ्यांचा देश..’ या शेवटच्या लेखात (३१ ऑगस्ट) मांडल्यासारखाच त्रासदायक अनुभव मला स्वारोस्कीत (क्रिस्टल वस्तूंसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीच्या वस्तुसंग्रहालयात) आला. मला काहीच खरेदी करायचे नसल्याने त्यांचे कसलेसे ‘डिस्काऊंट कुपन’ सहप्रवाशाला देऊन तिथे फिरताना आपल्या लोकांच्या.. भारतीयांच्या.. खरेदीच्या कलकलाटाने अगदी अस्साच रसभंग केला होता. ती कटू आठवण जागविली गेली आणि लेखाच्या समारोपात त्याचे उत्तरही मिळाले.. अन् पुन्हा अस्वस्थता..

– अलकनंदा पाध्ये, ठाणे

First Published on September 2, 2019 2:04 am

Web Title: loksatta readers letter part 303