12 December 2017

News Flash

कुलपतींनी मुंबई विद्यापीठावर त्वरित प्रशासक नेमावा

मान खाली घालून राहिल्यास मंत्री ‘भ्रष्ट’ नाहीत?

लोकसत्ता टीम | Updated: August 4, 2017 4:33 AM

अत्यंत वेदना आणि उद्विग्नपणे मी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे कुलपती यांना हे पत्र लिहीत आहे. सध्या सुरू असलेल्या अभूतपूर्व पेचप्रसंगामुळे मुंबई विद्यापीठाचे लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे जे अपरिमित नुकसान झाले आहे, त्यांची बाजू कुलपतींसमोर मांडणे हा एकमेव उद्देश त्यामागे आहे.

आदरणीय महोदय,

२००० ते २००४ यादरम्यान मी मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होतो, हे मी माझे भाग्य समजतो. त्यानंतर गेल्या १३ वर्षांत विद्यापीठामध्ये अनेक अप्रिय घटना घडूनसुद्धा केवळ व्यावसायिक नीतिमत्ता म्हणून त्यावर भाष्य करण्याचे मी कटाक्षाने टाळले. परंतु एके काळी अत्यंत प्रतिष्ठित अशा या विद्यापीठाच्या १६०व्या वर्षांमध्ये लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणणाऱ्या सध्याच्या पेचप्रसंगाच्या वेळी मी तटस्थ राहू शकत नाही. त्यामुळे राज्याचे घटनात्मक प्रमुख आणि मुंबई विद्यापीठाचे कुलपती या नात्याने आपल्याविषयी अतिशय आदरयुक्त, परंतु तितक्याच वेदनामय मनाने मी खालील मुद्दे आपल्या सखोल विचारार्थ ठेवू इच्छितो –

(१)  विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू संजय देशमुख यांनी सर्व म्हणजे ४७७ पदवी परीक्षांच्या उत्तरपत्रिका ‘ऑनलाइन’ पद्धतीने तपासण्याचा अ-तार्किक, अ-विवेकी आणि बे-जबाबदार निर्णय घेतल्यामुळे विद्यापीठातील सध्याचा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती आता सर्वज्ञात झाल्यामुळे मी त्याची पुनरुक्ती करीत नाही.

(२)  कुलपती या नात्याने आपण या प्रकरणामध्ये जेव्हा ४ जुलै रोजी, कुलगुरूंना समज दिली, तेव्हाच परिस्थिती हाताबाहेर गेल्याने त्याबाबत कसलीही उपाययोजना करता येणार नाही, इतका उशीर झाला होता.

(३) ४ जुलै रोजी सुमारे १८ लाख उत्तरपत्रिकांपैकी १० टक्केसुद्धा उत्तरपत्रिका तपासून झाल्या नव्हत्या, याची आपल्याला कल्पना असताना ‘३१ जुलैपर्यंत सर्व म्हणजे ४७७ परीक्षांचे निकाल लावलेच पाहिजेत,’ अशी अंतिम मुदत आपण कोणत्या आधारे दिली? त्यावर कहर म्हणजे, २ ऑगस्टपर्यंत ४७७ पैकी ३०६ (म्हणजे ६० टक्के) परीक्षांचे निकाल शिल्लक असताना, ते लावण्याची ‘५ ऑगस्ट’ ही नवीन तारीख आपण कशाच्या आधारे दिलीत? आपण दिलेल्या या तथाकथित अंतिम तारखांना काही ‘महत्त्व’ आहे की नाही? ‘१५ ऑगस्टपर्यंत निकाल लागणार नाहीत,’ असे कुलगुरूंनी एका शिष्टमंडळाला सांगितल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. एकूण चार लाख ७७ हजार विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त ४७,४९३ विद्यार्थाच्या हाती निकाल आले आहेत. या पाश्र्वभूमीवर, आपण दिलेल्या अंतिम तारखा ‘निर्थक’ व ‘हास्यास्पद’ ठरत नाहीत काय?

(४)  आपण दिलेल्या मुदतीत निकाल लावण्यासाठी उत्तरपत्रिका तपासून घेताना विद्यापीठ कोणत्याही अयोग्य व बेकायदा मार्गाचा अवलंब करीत आहे. उदा. मुंबई विद्यापीठाचा भिन्न अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती इ. असताना पुणे, शिवाजी, नागपूर, औरंगाबाद इ. विद्यापीठांच्या शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला आपण परवानगी दिली होती का? नसल्यास असा निर्णय घेण्याचे परीक्षांसंबंधीचे नियम आणि औचित्य धाब्यावर बसवणारे नव्हे काय? काही ठिकाणी तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तरपत्रिका तपासल्याच्या हतबुद्ध करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हे सर्व विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे नव्हे काय?

(५)  नवीन माहितीनुसार असे समजते की, अंतिम तारीख पाळण्याच्या भरात एखाद्या परीक्षेच्या १०-१५ टक्के उत्तरपत्रिका तपासायच्या शिल्लक असतानाही विद्यापीठ त्याचे निकाल जाहीर करीत आहे. ही अंशत: निकाल लावण्याची पद्धत चुकीची व घातक असून ती यानंतरही सुरू राहणार आहे काय?

विद्यार्थ्यांना वेठीस धरणारा मुंबई विद्यापीठाचा सद्य पेचप्रसंग हा गेल्या दोन वर्षांत कुलगुरूंना पुरेशा जबाबदारीशिवाय अमर्याद अधिकार मिळाल्यामुळे व त्याच वेळी त्यांच्यावर अंकुश नसल्यामुळे निर्माण झाला आहे. या संदर्भात मी खालील मुद्दे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो –

(अ)  मुंबई विद्यापीठाशी सुमारे ८०० महाविद्यालये संलग्न असून सुमारे सात लाख विद्यार्थी असताना पूर्वीप्रमाणे कुलगुरू संजय देशमुख यांनी प्रामुख्याने परीक्षा विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या प्र-कुलगुरूची नियुक्ती केली नाही, तेव्हा आपण हस्तक्षेप करून प्र-कुलगुरू नेमण्याचा आदेश का दिला नाही?

(ब)  परीक्षा पद्धतीमध्ये अचानक एवढा आमूलाग्र बदल करण्यापूर्वी विद्यापीठाने पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नेमण्यासाठी आपण हस्तक्षेप का केला नाही?

(क)  महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ नुसार नेमण्यात आलेली व्यवस्थापन परिषद, विद्वत्सभा, अधिसभा, परीक्षामंडळ, अभ्यासमंडळ इ. महत्त्वाची प्राधिकरणे, त्यांची मुदत संपताच राज्य शासनाने बरखास्त केली व त्यांच्या जागी नियुक्त सभासदांची निर्थक मंडळे नेमली, तेव्हा आपण हस्तक्षेप का केला नाही? त्यामुळे विद्यापीठाचा कारभार वाऱ्यावर सोडल्यासारखे झाले नाही काय?

(ड)  आता निकाल कधी लागतील, हे सांगता येत नाही; परंतु ते जेव्हा लागतील तेव्हा लाखो विद्यार्थाच्या भवितव्याच्या दृष्टीने, उत्तरपत्रिकांच्या सदोष तपासणीमुळे त्या निकालांची ‘गुणवत्ता’ काय?

या पाश्र्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षक  व एकूणच जनतेचा परीक्षा पद्धतीवरचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी मी पुढील सूचना करीत आहे – (१)  कुलगुरूंचा तत्काळ राजीनामा व नव्या कुलगुरूंची निवड-प्रक्रिया सुरू करणे;

(२)  मध्यंतरीच्या काळात विद्यापीठावर सक्षम प्रशासक नेमणे;

(३)  पूर्णवेळ परीक्षा नियंत्रकाची त्वरित नियुक्ती करणे;

(४)  व्यवस्थापन परिषद, विद्वत्सभा, अधिसभा, परीक्षामंडळ, अभ्यासमंडळ इ. प्राधिकरणे स्थापन करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करणे; आणि

(५)  उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून परीक्षा पद्धतीच्या अभूतपूर्व घोटाळ्याशी संबंधित सर्व बाबींची चौकशी करणे व तीन महिन्यांत त्याचा अहवाल जाहीर करणे.

विद्यापीठाच्या हितासाठी वरील सर्व सूचनांचा आपण गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय घ्याल, याविषयी माझ्या मनात संदेह नाही; परंतु तसे न झाल्यास, प्रस्तुत पेचप्रसंगाची जबाबदारी राजाबाई टॉवरपुरती सीमित न राहता ती राजभवनापर्यंत पोहोचेल, असे मला खेदाने नमूद करावेसे वाटते.

भालचंद्र मुणगेकर (माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) 

 

मान खाली घालून राहिल्यास मंत्री भ्रष्टनाहीत?

भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत ‘भाजप सरकारे पारदर्शक कारभार करतात आणि कोणत्याही मंत्र्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा ओरखडाही उठलेला नाही’ हा भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी व अमित शाह यांचा दावा नुसताच फोल नव्हे तर ते दोघेही भाजपच्या तथाकथित स्वच्छ कारभाराबाबत स्वत:ला सोयीच्या अशा आत्मसंमोहनावस्थेत आहेत असे म्हणावे लागेल. याच अवस्थेतून ते जनतेला त्यांच्या सरकारच्या स्वच्छ कारभाराबद्दल आश्वस्त करीत असावेत; हे आजपर्यंत ‘निष्कलंक चारित्र्य’ असणाऱ्या प्रकाश मेहतांचा पर्दाफाश झाल्यामुळे स्पष्ट झाले आहे.

मेहतांसारखे ‘आजपर्यंत निष्कलंक चारित्र्य’ असणारे आणखी किती भ्रष्ट मंत्री महाराष्ट्रात व केंद्रात आणि देशात भाजप सरकारे असलेल्या राज्यात आहेत याविषयी, दोघा भ्रष्ट मंत्र्यांच्या चेहऱ्यावरील ‘निष्कलंकत्वाचे’ पडदे टराटरा फाडण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेल्या पद्धतीमुळेही जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो.

जोपर्यंत मंत्री संघशिस्तीत डोके खाली ठेवून काम करतात तोपर्यंत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही ओरखडा उठलेला नसतो. पण त्याने शिस्त मोडून जर डोके वर काढले तर मात्र त्या नाठाळाच्या माथी कडक शिस्तीची काठी हाणण्यात येते हा संदेश या ‘अन्वयार्था’तून वाचकांसमोर गेला आहे. म्हणजे, थोडक्यात, शिस्तीत राहिले असते तर मेहतांचा २०० कोटी रुपयांचा घोटाळा हा घोटाळा नव्हताच. जरी असला तरी तो संघशिस्तीच्या नियमांना धरून होता. पंकजाताई जोपर्यंत लपून चिक्की खात होत्या तोपर्यंत साध्या चिक्कीमध्येसुद्धा घोटाळा होऊ  शकतो याची जनसामान्यांना कल्पनादेखील नव्हती. पण ‘जनतेच्या मनातील मीच मुख्यमंत्री’ हे जाहीर करण्याची जेव्हा त्यांना बुद्धी झाली तेव्हा त्यांचे ‘गैरव्यवहार’ जनतेसमोर आले. तावडे व खडसेंच्या बाबतीतही तेच झाले.

याचा अर्थ गैरव्यवहार वा भ्रष्ट चारित्र्य नव्हे तर एखाद्याची वर्तणूक जेव्हा भाजप सरकार किंवा पक्षनेतृत्वाला त्रासदायक ठरते तेव्हाच त्या ‘भ्रष्ट’ मंत्र्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जातो. प्रकाश मेहतांवरील या कारवाईमुळे जनतेच्या मनातील भाजपच्या निष्कलंक कारभाराबद्दलचा भ्रमाचा भोपळा आता फुटला असेल.

महाराष्ट्राच्या भाजप सरकारातील अजून किती मंत्री भ्रष्ट आहेत एवढाच नव्हे तर सदैव डोळे वटारून राज्यशकट हाकणाऱ्या मोदींच्या केंद्र सरकारमधील किती मंत्री प्रत्यक्ष भ्रष्ट आहेत पण डोके खाली ठेवून चुपचाप काम करीत आहेत याविषयीही जनतेच्या मनात संदेह निर्माण होईल. कदाचित तो भाजप सरकारांबद्दल भ्रमनिरास असेल.

संजय जगताप, ठाणे.

 

सरपंच निवडीचा बैलपोळा!

शासनाने जेव्हापासून जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला आहे तेव्हापासून माझ्या गावातील अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून जणू काही मीच सरपंच होणार या तोऱ्यात सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करू लागले. पण भ्रष्टाचाराने बरबटलेल्या माझ्या गावात त्यांचे ध्येय मात्र एकच आहे ते म्हणजे ५ वर्षे सरपंच राहून भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार करून संपूर्ण भविष्याची कमाई करायची. मला सरपंच करा, मी हे करीन, ते करीन अशी गोड प्रलोभने व चहा व दारूची सोय आतापासून सुरू झाली आहे. त्यातून गावात तरुण मुले व्यसनाच्या नादी लागत आहेत. यातून शासनाच्या निर्णयामुळे एक धोका तर नक्कीच संभवतो आहे, तो म्हणजे प्रस्थापित भ्रष्टाचारी लोक मात्र जितके उमेदवार जास्त तितकी मतविभागणी, या सूत्रानुसार सहज निवडून येणार आहेत.

आजपर्यंत माझ्या गावात एकही जनतेच्या व गावाच्या विकासाचे काम झाले नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि हे इथून पुढे होणार नाही याची मी हमी देतो. कारण या शासननिर्णयाने चांगले नेतृत्व उदयास येणार नाही. हे एक माझ्या गावातील वास्तव आहे.

कृष्णा जायभाये, काकडहिरा (बीड)

 

आत्महत्येसंबंधीचे बोलणे गांभीर्याने ऐकूया

‘आत्महत्येपूर्वी मनप्रीतने पाठवलेल्या संदेशाची मित्रांकडून थट्टा’ ही बातमी (लोकसत्ता, २ ऑगस्ट) आत्महत्येविषयी समाजमनातील प्रचंड अज्ञान दाखवणारी आणि अस्वस्थ करणारी आहे. आत्महत्येची धमकी देणारे लोक हे केवळ समोरच्या माणसाला घाबरवण्यासाठी नाटक करीत असतात असा एक अशास्त्रीय समज आपल्याकडे खोलवर रुजलेला आहे. त्यामुळे आत्महत्येविषयीचे व्यक्तीचे बोलणे अनेक वेळा थट्टेवारी घेतले जाते.

‘गरजते है, वो बरसते नही है’ हा विचार त्यामागे असतो. पण आत्महत्येच्या बाबतीत ‘गरजते है, वो कभी ना कभी बरसते है’ असे विधान जास्त शास्त्रीय आहे.

मानसशास्त्रानुसार, कुठल्याही वयाच्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारे आत्महत्येचे विचार व्यक्त करणे ही भावनिक मदतीसाठी मारलेली आर्त हाक असते. याच सहानुभावाच्या नजरेतून आपण त्याकडे बघितले तरच आपण त्या व्यक्तीला योग्य वेळी मदत करू शकतो. ही माहिती जर मनप्रीतच्या मित्रांना असती तर कदाचित त्याला योग्य मदत मिळू शकली असती.

‘मी यापुढे तुम्हाला दिसणार नाही’, ‘सोमवारपासून शाळेत येणार नाही’ हे मनप्रीतने मित्रांना पाठवलेले संदेश असो अथवा ‘जगून काय करायचे आहे’, ‘उद्या सकाळी जाग आली नाही तर बरे’, ‘यापुढे आपली भेट कधीही होणार नाही’ अशी वाक्ये जर संवादाच्या मध्ये येत असतील तर ती चेष्टेने नाही, तर अत्यंत गांभीर्याने घेण्याची बाब आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. जसे, छातीमध्ये दुखले तर ते हृदयविकाराच्या दुखण्याचे लक्षण आहे का? हे तपासायला आपण तातडीने डॉक्टरकडे पळतो त्याच गांभीर्याने घेण्याचे हे लक्षण आहे. कारण हे लक्षण वेळीच ओळखले नाही तर जिवाला धोका होऊ  शकतो.

भारतामध्ये दर वर्षी एक लाखापेक्षा अधिक आत्महत्या होतात; त्यापैकी ६० टक्क्यांपेक्षा अधिक या १५ ते ३५ वयोगटातील आहेत. जणू एका सुप्त संसर्गजन्य आजाराप्रमाणे ते समाजात पसरत आहे.  देशात उपलब्ध असलेले इनमिन ४५०० मनोविकारतज्ज्ञ याला कुठेच पुरे पडू शकत नाहीत. समाज त्यांच्या मदतीला उभा राहिला तरच आपण हे थोपवू शकतो. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लोकांपैकी नव्वद टक्केपेक्षा अधिक व्यक्ती त्या प्रयत्नांच्या आधीच्या कालावधीत त्याविषयी कुठल्या ना कुठल्या प्रकारे जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त होत असतात.

हे व्यक्त होणे समजून घेण्याची संवेदनशीलता समाज म्हणून आपण दाखवून जर त्यांना योग्य ठिकाणी मदत घ्यायला तयार करू शकलो तर अनेक आत्महत्या आपण टाळू शकू.

डॉ. हमीद दाभोलकर

 

अशी कशी नवसपूर्ती?

तिरुपती मंदिरात दानपेटीत दानाच्या स्वरूपात आलेल्या आठ कोटी २९ लाखांच्या पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत भरण्याची परवानगी देण्यात यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याचे वृत्त समजले.

याचिकेत असे नमूद होते की, तिरुपतीला नवस करताना भाविकांनी जुन्या नोटा दानपेटीत टाकल्या आहेत त्या बँकेने स्वीकारल्या नाहीत तर भक्तांचे नवस पूर्ण होणार नाहीत. हे कारणच मुळात तकलादू आणि हास्यास्पद आहे. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर ५० दिवसांचा अवधी नोटा बदलण्यासाठी दिलेला असतानाही भाविकांकडून मंदिराच्या दानपेटीत जुन्या नोटा टाकल्या जाणे हेच चुकीचे होते. त्यातही, या  ५० दिवसांच्या मुदतीत दानपेटीत टाकण्यात आलेल्या जुन्या नोटा  बदलून घेण्यास मंदिर व्यवस्थापनाला देखील पुरेसा वाव होता.

त्यामुळे ८.२९ कोटी रुपयांपैकी किती रक्कम मुदतीपूर्वी आणि किती रक्कम मुदतीनंतर दानपेटीत टाकली गेली याचा खुलासा होणे गरजेचे आहे. सर्वच नोटा ५० दिवसांच्या मुदतीनंतर दानपेटीत टाकल्या गेल्या असतील तर त्या टाकताना भाविकांचा नवस किती ‘स्वच्छ’ होता आणि दानधर्म करण्याची भावनाही किती ‘शुद्ध’ होती हे स्पष्ट होते.

दीपक काशिराम गुंडये, वरळी.

 

गांभीर्याने चर्चा का होत नाही?

विधानमंडळात सध्या सुरू असलेले कामकाज कुणालाही संभ्रमात टाकणारे झाले आहे.. विरोधात कोण, सरकारमध्ये कोण काही समजत नाही. सरकारची प्रतिमा यामुळे मलिन होत आहे. काही विषयांवरून सत्ताधारी पक्षातील सदस्यांनीच सभात्याग करणे, ही गोष्ट महाराष्ट्राच्या विधिमंडळात खूप दुर्मीळ आहे. प्रकाश मेहता यांचे प्रकरण अत्यंत गंभीर असताना सरकार तुम्ही काय केले, आम्ही काय करीत आहोत, एवढेच बोलत आहे. त्यांनी काही केले नाही म्हणून आम्ही तुम्हाला सरकारमध्ये बसवले आहे; परंतु तुम्हीसुद्धा हेच करणार का!

यापेक्षाही अनेक गंभीर प्रकरणे महाराष्ट्रात सुरू असताना सरकार- आणि विरोधकही- सभागृहात चर्चा करायची सोडून एकमेकांची उणीदुणी काढण्यामध्ये सभागृहाचा वेळ मारून नेत आहेत, असेच वाटत आहे. समृद्धी महामार्ग, पीकविमा, कर्जमाफी या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याऐवजी फक्त तुम्ही राजीनामा द्या, यांचा राजीनामा घ्या, यामध्ये वेळ घालवला जात आहे. ‘समृद्धी’विरुद्ध रस्त्यावर उतरणारी, कर्जमाफीसाठी शेतकरी-संप पुकारणारी महाराष्ट्राची जनता यापेक्षा हुशार आहे.. सरकार किती ‘सेटलमेंट’ने चालवले जाते, याची कल्पना लोकांनाही असणारच.  सभागृहाचा वेळ हा असा घालवण्यापेक्षा चर्चेला जास्त महत्त्व देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सरकार आणि विरोधी पक्ष यांनी सर्व घटनांकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.सभागृहात आता सरकार आणि विरोधी पक्ष एकमेकांवर धावून जाण्यासारखे वाटत आहे. यामुळे त्या सभागृहाची आजपर्यंतची जी प्रतिमा आहे ती बिघडत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला या गोष्टी शोभणाऱ्या नाहीत, हे सरकार आणि विरोधी पक्षात असणाऱ्या सर्वानी समजून घेणे गरजेचे आहे. या सभागृहांना एक इतिहास आहे, तो मलिन होत आहे, याची दखल घेणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात तशीच चर्चा व्हावी, ही माफक अपेक्षा आहे.

महेश तुकाराम कोटकर, लासूरगाव ( ता. वैजापूर, औरंगाबाद) 

 

गीता वा धर्मग्रंथांचे सार्वजनिक प्रदर्शन कोणत्या हेतूंसाठी?

‘राजकीय नैराश्यातून गीतेला विरोध’ हे (लोकमानस, ४ ऑगस्ट) माझ्या याआधीच्या पत्रास (३ ऑगस्ट) उत्तर देऊ पाहणारे पत्र वाचले. तथाकथित धर्मनिरपेक्षवाद्यांना सध्याच्या राजकारणामुळे नैराश्य आल्यामुळे त्यांनी डॉ.कलाम यांच्या पुतळ्या शेजारी गीतेची प्रत ठेवण्यास विरोध असल्याचा निष्कर्ष त्यात आहे. मुळात गीताग्रंथाला कुणी महान ठरवावे किंवा त्या ग्रंथाची प्रत एखाद्या धार्मिकस्थळी किंवा अगदी ग्रंथसंग्रहालयातही ठेवण्यातही कुणाचा आक्षेप नाही, तर एखादा धार्मिक ग्रंथ एका महान वैज्ञानिकाच्या स्मारकापाशी ठेवण्यास आक्षेप आहे. एखादा शास्त्रज्ञ त्याच्या व्यक्तिगत जीवनात  देव-धर्म मानत असला (हे विज्ञाननिष्ठेशी विसंगतचे) तरी त्याच्या स्मारकाचा उपयोग धर्म वा आध्यात्मिक ग्रंथ यांचे माहात्म्य वाढविण्यासाठी करणे हे आक्षेपार्हच ठरते. त्यामुळे समाजात विशुद्ध स्वरूपातील विज्ञाननिष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यात बाधा येते.

पत्रलेखकाने गीतेतील कर्मयोगाचा उल्लेख करून स्मारकापाशी गीताप्रत ठेवण्याच्या कृतीचे समर्थन केले आहे. पण गीतेतील हा कर्मयोग वर्णावर आधारित कर्मेच करण्याची एक प्रकारे सक्ती करतो. (स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: ) म्हणजे अन्य वर्णाची कर्मे कितीही चांगली असली तरी ती आपण करू नयेत आणि आपले कर्म कितीही सदोष असले तरी ते टाकू नये. यातच या जन्माचे सार्थक आणि पुढील जन्मासाठी पुण्याची बेगमी असते. म्हणजे शूद्र जन्मभर उच्चवर्णीयांची सेवा-चाकरी आणि गुलामी कशी करीत राहतील याची घेतलेली खबरदारी आहे. दुसरे म्हणजे गीतेतील निष्काम कर्मयोग हा अंतिमत: मोक्षप्राप्ती साठीच सांगितला गेला आहे. ऐहिक जीवनस्तर उंचविण्यासाठी किंवा विश्वाचा कार्यकारणभाव जाणून घेण्यासाठी नाही. विज्ञान आणि वैज्ञानिक हे तर याच गोष्टीसाठी कार्यरत असतात. मग डॉ.कलाम यांच्या स्मारकापाशी गीतेची प्रत ठेवून कुठल्या कर्मयोगाचा पुरस्कार केला जात आहे? पत्रात अनेक महनीय व्यक्तींचे दाखले दिले आहेत. प्रथम म्हणजे या सर्व महनीय व्यक्तींनी पूर्ण भावरहित बुद्धीने गीतेचा सखोल अभ्यास केल्यावर मग त्यांना गीता महान वाटली की, ते आधीच गीतेच्या नावलौकिकाने प्रभावित झाले होते आणि त्याला पूरक म्हणून व आपला प्रभाव समर्थनीय ठरावा, या उद्देशाने त्यांनी गीतेचा अभ्यास केला? विषमतेचे खुले समर्थन करणारी, अर्जुनाला माणुसकीतून पडलेल्या प्रश्नापेक्षा युद्धालाच प्राधान्य देणारी गीता म. गांधींना प्रिय कशी? हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

तसेच डॉ.आंबेडकरांसारख्या प्रकांडपंडिताला गीतेत विशेष असे काहीच आढळत नाही. घटनेच्या शिल्पकाराच्या मतालाही आपण किंमत देणार की नाही?  शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याच शब्दात सांगायचे तर, ‘वेद आदी धर्मग्रंथांची जागा ही फक्त ग्रंथालयातच आहे, सार्वजनिक ठिकाणी नाही.’

अनिल मुसळे, ठाणे, पश्चिम

 

मंगळयानकारही अजाणच?!

‘विज्ञानाची बौद्धिक भूमिका लक्षात येईल ?’ हे पत्र (लोकमानस, ३ ऑगस्ट)  वाचले. पत्रातील शेवटच्या परिच्छेदात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या एका वाक्याचा उल्लेख आहे. ते वाक्य असे : ‘विज्ञानाची बौद्धिक भूमिका ज्याच्या नीट लक्षात येईल त्याच्या बुद्धीत ईश्वराला आणि धर्माला स्थान मिळूच शकत नाही. मिळाल्यास ती एक बाकीच्या व्यवस्थित विचारसरणीशी विसंगत असलेली व परंपरागत श्रद्धेने राखून ठेवलेली कल्पना होय, असेच म्हणावे लागेल.’

तर्कतीर्थ जोशी यांचे हे विधान तपासणे गरजेचे आहे. आपण यासाठी इस्रोचे माजी प्रमुख, डॉ. के. राधाकृष्णन – इस्रोच्या मंगळ यान मोहिमेचे शिल्पकार, सूत्रधार – यांचे उदाहरण घेऊ. त्यांनी त्या मंगळयानाची प्रतिकृती तिरुपतीच्या बालाजी मंदिरांत श्री व्यंकटेश मूर्तीच्या पायांपाशी ठेवल्याची घटना (आणि त्यावरून उठलेला वाद) सर्वश्रुत आहे. अर्थात, डॉ. राधाकृष्णन यांच्या बुद्धीत ईश्वराला, ईश्वरविषयक श्रद्धेला स्थान आहे, हे निश्चित. आता, तर्कतीर्थाच्या म्हणण्यानुसार  बघायचे झाल्यास, ‘विज्ञानाची बौद्धिक भूमिका’ डॉ. राधाकृष्णन यांच्या ‘नीट लक्षात आली नाही’ (!)असेच म्हणावे लागेल.

श्रीकांत पटवर्धन, कांदिवली पूर्व (मुंबई)

First Published on August 4, 2017 4:33 am

Web Title: loksatta readers letter part 64