24 September 2020

News Flash

अध्यात्माची भुरळ!

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या बाबांच्या संख्येला आळा घालणार तरी कोण?

‘बाबा प्रजासत्ताक’ हे संपादकीय (२८ ऑगस्ट) वाचून, फार पूर्वी वाचलेल्या अल्डस हक्सले यांच्या ‘जेस्टिन्ग पिलेट’ पुस्तकातील एक वाक्य आठवले ते असे होते: ‘इंडिया वुड हॅव बिन बेटर विथ लेस स्पिरिच्युअलिझम’. तेव्हा या वाक्याला बाबा-बुवांचा संदर्भ नव्हता आणि नसावा, तरीही ते तेव्हा अर्थपूर्ण वाटले होते आणि आताच्या बाबा आणि महाराजांच्या संदर्भात अधिक अर्थपूर्ण वाटले. अशिक्षितांपासून ते सुशिक्षितांपर्यंत भारतातील सर्वाना फक्त एका गोष्टीची सर्वाधिक भुरळ पडलेली आहे आणि ती म्हणजे अध्यात्म. कोणीही यावे, भगवे घालावे आणि स्वतस बाबा, महाराज वा गुरू म्हणवून घ्यावे. माणसे मागे येतील याची खात्री. आणि हे असे याच देशात घडू शकते. या अध्यात्माने भारताचे काय फायदे झाले ते तो देवच (असल्यास) जाणे, पण या अध्यात्माने भारताचे नुकसान झाले असे मात्र म्हणता येत नाही- भारतात निर्माण झालेले आध्यात्मिक शब्दजंजाळ  इतके संदिग्ध आणि अनाकलनीय आहे कीत्याने पाश्चात्त्यांनाही भुरळ पाडलेली आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. पाश्चात्त्यांचा काही दिवसांत भ्रमनिरास तरी होतो, पण आपल्या लोकांचा होत नाही. कारण तो आपला वारसा आहे आणि महान आहे. मग कुणी तरी बाबाने चावून चोथा केलेला विडा प्रसाद होतो आणि लैंगिक शोषणसुद्धा ‘प्रसाद’ होते.

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या बाबांच्या संख्येला आळा घालणार तरी कोण? कारण त्यांना आता राजाश्रय मिळाला आहे. सर्व धर्मातील त्यातील पंथांतील आणि उप उप उप पंथांतील बाबांचे, महाराजांचे मुबलक पीक आता भारतात येणार आहे. भोंदूगिरीचा विजय असो!

– रघुनाथ बोराडकर, पुणे

 

आणखी किती ‘अवतार’ हवेत?

‘बाबा प्रजासत्ताक’ हे संपादकीय (२८ ऑगस्ट) वाचले आणि जुन्या शालेय अभ्यासक्रमातील ‘मठाची उठाठेव का तरी’ या पेशवेकालीन भोंदूगिरीवर जबरदस्त प्रहार करणाऱ्या राम जोशींच्या कवितेचे स्मरण झाले. आजच्या भोंदूगिरीला आळा घालण्यात सरकारची होणारी कुतरओढ अतिशय केविलवाणीच आहे. उलटपक्षी अशा भोंदूंच्याच दावणीला शेकडो मंत्री बांधल्याचा प्रत्यय वारंवार येतो. यातून नाडली जाणारी प्रजा एकीकडे तर ‘भोन्दुम शरणं गच्छामि’ म्हणणारे केंद्रीय सरकार दुसरीकडे, अशी आजच्या भारतीय प्रजासत्ताकाची अवस्था झाली आहे. त्यात चुकून एखादे डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारखे ‘राम जोशी’ हल्ली जन्माला आलेच, तर त्यांची हत्या केली जाते. ना हत्या करणारे सापडत, ना प्रजासत्ताकाचा हरविलेला सूर गवसत आणि ना नाडलेल्या प्रजेच्या डोक्यात असे बाबा प्रजासत्ताकाचे वाढलेले स्तोम ध्यानी येत. प्रश्न आहे तो असे किती आसाराम आणि रामरहीम अवतार धारण करून देशाची अब्रू मातीत घातल्यावर शहाणपण येईल, हा.

– जयवंत कुलकर्णी, नेरुळ (नवी मुंबई)

 

प्रश्न आणि त्याचे उत्तर इतके सोपे नाही

लाखो दलित आणि पीडित जनतेला शासनाने वाऱ्यावर सोडले. त्यांना निवारा, शिक्षण आणि दवापाणी ‘डेरा’ देत होते. एकीकडे त्यांच्यावर स्वतला भगवान म्हणून भंपक अध्यात्माचे गारूड केले जात होते. स्वत ऐषआरामाचे जीवन जगत आपले हे संस्थान निरंकुशपणे चालावे म्हणून हा बाबा अनेक गुंड पोसत होता, शस्त्रास्त्रे बाळगून होता. हे संस्थान खालसा करायचे, तर खऱ्या अर्थाने ‘कल्याणकारी राज्या’ची (वेल्फेअर स्टेट) गरज आहे. बाबाच्या अराजकाला विरोध करणारे शासन हवे; त्याची व्होट-बँक करणारे नको. लक्षात घ्या कार्ल मार्क्‍स काय म्हणाले, ‘धर्म ही पीडित जनतेसाठी अफूची गोळी आहे, तिच्या वेदनेचा तो हुंकार आहे.’ आधी त्यांची ही वेदना दूर करायला हवी. हजारो वर्षांचे धर्माचे गारूड सहजासहजी नष्ट होणे नाही. म्हणूनच डॉ. दाभोलकर संविधानाचा पूर्ण मान ठेवून, धर्माला विधायक वळण देऊन लोकांना नीती आणि विवेकाच्या मार्गावर नेण्याच्या प्रयत्नात होते.

– प्रभा पुरोहित, मुंबई

 

लज्जास्पद विरोधाभास!

ऑक्सिजन नसल्यामुळे निष्पाप मुलांचा जीव गेल्यानंतर कोणी रस्त्यावर उतरले नाही. मात्र बलात्कारी बाबाला पाठिंबा देण्यासाठी अंध भक्त जाळपोळ करीत रस्त्यावर उतरले. काय ही मानसिकता? सत्याचा आरसा दाखवून अंधश्रद्धेच्या खड्डय़ातून बाहेर काढणाऱ्यांचा जीव घेतला जातो आणि अंधश्रद्धेच्या खड्डय़ात गाडून मौजमजा करणाऱ्या अय्याशी, कुकर्मी बाबासाठी लोक स्वतहून जिवावर उदार होतात. किती लज्जास्पद बाब ही!

– राधिका जाधव (गोगदरे), नांदेड.

 

कणखरपणाचा खोटा मुखवटा

‘पंतप्रधान भारताचे, भाजपचे नव्हे’ तसेच ‘तरीही खट्टर यांना अभय’ या बातम्या (२७ ऑगस्ट) वाचल्या. न्यायालयाने हरियाणातील रामरहिमच्या अटकेनंतर उसळलेल्या दंगलीसंदर्भात पंतप्रधानांना ते केवळ एका पक्षाचे नसल्याची जाणीव करून देणे ही पंतप्रधानपदाला लाजिरवाणी बाब आहे. परंतु सत्तेची मस्ती आलेल्यांना त्याचे काहीच सोयरसुतक वाटणार नाही, हे दुसऱ्या बातमीवरूनच सिद्ध होते. न्यायाधीशांच्या या स्पष्टपणावर भाजप त्यांना ‘विरोधकांचा हस्तक’ ठरवून मोकळा होईल व त्यांची बदली करून सूड उगवेल. खट्टर यांच्यासारख्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला न सांगण्याचे बातमीत नमूद असलेले कारण काय तर म्हणे चुकीची निवड असा संदेश सर्वत्र जाईल. अशी भीती जर पंतप्रधानांना वाटत असेल तर याचा अर्थ मोदींनी कणखरपणाचा खोटा मुखवटा धारण केलेला आहे असा होतो.

-चंद्रशेखर सु. खारकर, ठाणे

 

अडवाणींचा घोटाळा कोणता?

‘माझी अवस्था लालकृष्ण अडवाणींसारखी; खडसे यांची खंत’ – ही बातमी (२८ ऑगस्ट) वाचली. खडसे यांनी अशी खंत व्यक्त करणे, म्हणजे बाथरूममध्ये घसरून पडल्यामुळे पाय प्लास्टरमध्ये टाकल्याने अंथरुणाला खिळून राहावे लागलेल्या एखाद्याने – ‘माझी अवस्था शरपंजरी पडलेल्या भीष्मांसारखी’ असे म्हणण्यासारखे आहे! मुद्दा असा की, खडसे यांना जमीन गरव्यवहारप्रकरणी चौकशी प्रलंबित असल्याने घरी बसावे लागत आहे. अशावेळी जर ते आपली तुलना अडवाणींसारख्या बुजुर्ग नेत्याशी करत असतील, तर साहजिकच असा प्रश्न पडतो, की अडवाणींचा गरव्यवहार/घोटाळा कोणता? अडवाणींबाबत विवाद्य मुद्दे बरेच असले, तरी अजूनही त्यांचे नाव कोणत्याही घोटाळ्याशी जोडले गेलेले नाही.  खडसे यांनी स्वतची तुलना अडवाणींशी करण्यात अडवाणींना कमीपणा येतो, ही वस्तुस्थिती आहे.

-श्रीकांत पटवर्धन, कांदिवली पूर्व (मुंबई)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 2:45 am

Web Title: loksatta readers letter part 77
Next Stories
1 अंधाऱ्या चोरवाटांचे जतन करू, अवघे धरू कुपंथ?
2 गोपनीयता हा एक फार्सच..
3 हा तर उघड पलायनवाद !
Just Now!
X