20 November 2017

News Flash

थोडी तरी पारदर्शकता आणावी..

आवाजाविरुद्धची लढाई बरीच वर्ष चालू आहे.

लोकसत्ता टीम | Updated: August 30, 2017 1:22 AM

 

राज्याचे विद्यमान अर्थमंत्री सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी शुक्रवार दिनांक १८ मार्च २०१६ रोजी जाहीर केलेल्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात एक एप्रिल २०१६ पासून राज्यातील दिव्यांगांना (अपंगांना) शासनातर्फे मिळणारे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान १०००/- दरमहा झाल्याचे सांगितले, परंतु एक वर्ष उलटले; अद्याप वाढीव रकमेचा पत्ता नाही.एकीकडे राज्यातील सर्व माजी आमदारांना ५०,००० व ६०,००० पेन्शन एका क्षणार्धात मंजूर होऊन खात्यावरही लगेच जमा होते!

मीसुद्धा या योजनेचा गेल्या १० वर्षांपासून लाभार्थी आहे. जे आहे तेही व्यवस्थित नाही. केंद्र शासनाचे ४०० व राज्य शासनाचे २०० असे एकूण ६०० रुपये दरमहा निराधारांना मिळतात, पण माझा अनुभव असा की प्रत्येकी ५० रुपये कमिशन घेतले जाते आणि लाभार्थीची सही ६०० वरच घेतली जाते. या कारभाराला जबाबदार कोण?  याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी की संबंधित अधिकारी? याचा सखोल विचार करावा व गरिबांना, निराधारांना, अपंगांना न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत थोडी तरी पारदर्शकता आणावी.

– आनंद सुधाकर कुलकर्णी, औरंगाबाद 

मुख्यमंत्र्यांना हे ‘अवगत’ नव्हते का?

एखाद्या जनहित याचिकेच्या प्रकरणात राज्याचा महाधिवक्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माघार घेत नाहीत म्हणून दबाव आणतो. न्यायमूर्ती माघार घेत नाहीत असे कळल्यावर, मुख्य न्यायमूर्तीना अंधारात ठेवून प्रकरण अन्य खंडपीठाकडे वर्ग करवून घेतो. राज्याचे विधि व न्याय आणि गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. मुख्यमंत्र्याला ‘अवगत’ न करता राज्याच्या महाधिवक्त्याला असा माज करता येतो? उच्च न्यायालयाचा असा झालेला अपमान ‘पारदर्शक’ मुख्यमंत्र्याला चालतो? की मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय हा अपमान झाला असे समजायचे महाराष्ट्राच्या जनतेने?

– राजकुमार बोरसे, मुलुंड (मुंबई)

.. पुढे राहा जागे!

‘एक पाऊल मागे, पण..’ हे सावधगिरीचा इशारा देणारे संपादकीय (२९ ऑगस्ट) वाचले. डोकलाममधून चिनी सन्य जरी माघार घेत असले तरी, यात कावेबाज चीनची निश्चित काही चाल असू शकते हे कदापिही विसरता येणार नाही. चीन हा शेजारधर्म न पाळणारा शेजारी आहे, हे भारत सरकारने विसरता कामा नये. यामागे चीनची अत्यंत धूर्त चाल असू शकते, हे कदापिही विसरू नये. भारतीय लष्कर सतर्क राहीलच, परंतु देशवासीयांनीही सावध राहण्याची गरज आहे.

– धोंडिरामसिंह राजपूत, वैजापूर (औरंगाबाद)

‘करून दाखविणारे’ कणखर पंतप्रधान!

भारताने डोकलामबाबत चीनला जी माघार घ्यायला लावली आणि पाकिस्तानविरोधात ज्या कडक कारवाया केल्या त्यामुळे जागतिक पातळीवर ठोस भूमिका घेणारी आपली प्रतिमा निर्माण झाली आहे. पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या बोटचेपी भूमिकेच्या संदर्भात हा बदल मोठा आणि स्पृहणीय आहे. ‘बोलणारा’ नाही तर ‘करून दाखवणारा’ असा कणखर पंतप्रधान भारताला मिळाला आहे अशी मोदींची प्रतिमा झाली आहे. भारताच्या परराष्ट्र नीतीचे हे मोठे यश मानावे लागेल.

 – अरविंद दि. तापकिरे, चारकोप (मुंबई)

आता तरी गोंगाट थांबेल?

‘राज्य सरकारचा मुखभंग’ हे वृत्त (लोकसत्ता, २८ ऑगस्ट) वाचले. निकाल अंगलट येईल असे लक्षात आल्याबरोबर न्यायमूर्तीवर पक्षपातीपणाचा आरोप, त्याची मुख्य न्यायमूर्तीनी तात्काळ घेतलेली दखल, उसळलेला जनक्षोभ आणि न्यायमूर्तीनी तात्काळ बदललेली भूमिका याचा अन्वयार्थ काढण्यात काही अर्थ नाही. जागृत जनतेमुळे आणि वकिलांच्या रेटय़ामुळे हे झाले? कुणास ठाऊक! आवाजाविरुद्धची लढाई बरीच वर्ष चालू आहे. जे कायदे करतात त्यांच्यापैकी कित्येक कायदे मोडण्यात गुपचूप सक्रिय असतात. पोलीस खटले भरतात आणि चौकटीत राहून सरकार ते मागे घेऊन एका तऱ्हेने झुंडवाल्यांचे ऐकते. वाढलेले वाहन ध्वनिप्रदूषण आणि जगणे अधिक अवघड झालेले असल्यामुळे माणसाला शांततेची जास्त गरज आहे. या मुखभंगानंतर तरी गोंगाट थांबेल का?

– केशव देव, पुणे

शांतता क्षेत्रे अबाधित ठेवा

लोकशाही म्हणजे अर्निबध वागणुकीचा परवाना अशी समजूत आपल्या समाजाची झाली आहे. दहीहंडी असो किंवा गणेश उत्सव; लोकांना बेंजो, डीजे वाद्यांचा गोंगाट  किंवा ध्वनिक्षेपकावरून कर्कश आवाजात सिनेसंगीत लावणे म्हणजेच सण साजरा करणे वाटत असावे. अशा गोंगाटामुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा समाजाला शिस्त लावणे हे खरे म्हणजे शासनाचे काम. पण  शासनाने त्याउलट ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करण्यासाठी आग्रह धरणाऱ्या न्यायमूर्तीवर पक्षपाती व सरकारविरोधी असल्याचा आरोप केला. फडणवीस सरकारकडून अशा तऱ्हेने न्यायालयावर कुरघोडी करणे अपेक्षित नव्हते. सरकारनेच आपल्या निर्णयाचा फेरविचार करून पूर्वीप्रमाणेच शांतता क्षेत्रे जाहीर करावीत व ध्वनिप्रदूषण रोखावे अशी अपेक्षा आहे.

– प्रकाश गोडसे, विलेपाल्रे पूर्व (मुंबई).

‘जयते’ नव्हे, ‘जयति’

‘संस्कृत शीर्षकातील व्याकरणदोष’ (लोकमानस, २८ ऑगस्ट) या पत्रात मी एक दुरुस्ती सुचवू इच्छिते की ‘व्यक्तिरेव जयति’ असे असायला हवे. कारण ‘जयते’ हे रूप व्याकरणदृष्टय़ा चूक आहे. परंतु ‘सत्यमेव.. ’पुरतेच ते ग्राह्य़ धरलेले आहे. इतर ठिकाणी ‘जयति’ असेच असायला हवे. ‘जयते’ हे आर्ष रूप आहे व इतर ठिकाणी आपण ते वापरू शकत नाही!

– अलका रानडे, बोरिवली (मुंबई)

विनाकारण विसर्ग!

‘संस्कृत शीर्षकातील व्याकरणदोष’ दाखविल्याबद्दल (लोकमानस, २८ ऑगस्ट) पत्रलेखकाला धन्यवाद! अशीच चूक विसर्ग देताना केली जाते. संस्कृत भाषा म्हणजे विसर्ग  हवाच असा गरसमज आहे. विनाकारण विसर्ग दिला जातो. उदा. ‘मातृदेवो भव’! येथे व नंतर विसर्गाची गरज नाही. अशा अनंत चुका वृत्तपत्रे व चित्रवाणी वाहिन्या करीत असतात. संस्कृत जाणणाऱ्यांचा सल्ला घेतलेला बरा!

-शर्मिला पिटकर, कांदिवली (मुंबई)

 

 

 

First Published on August 30, 2017 1:20 am

Web Title: loksatta readers letter part 78